सिद्धी महाजन snmhjn33@gmail.com

युगांडामधील एक धीट मुलगी शाळेत जाण्याच्या वयातच हवामानबदलासंबंधीचे प्रश्न समजून घेऊ लागली होती. आपल्या देशातील सामान्यांच्या रोजच्या जगण्यातील समस्या त्याच्याशी कशा जोडलेल्या आहेत याचा अर्थ ती लावत होती. जगभर ठिकठिकाणी लहान आणि तरुण मुलंमुली पर्यावरणरक्षणाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमं प्रभावीपणे वापरत आहेत, हेही तिनं पाहिलं. आणि ती या पर्यावरणाच्या  दिडीत पूर्ण क्षमतेनं सहभागी झाली. ती लिया नमुगेरवा..

‘‘मला पर्यावरणाबाबत अमाप आस्था असणारी एक पिढी घडवायची आहे. ही पिढी कदाचित अनुभवी नसेल, पण त्यांच्या हृदयात निसर्गाविषयी कळकळ असेल. पर्यावरणासंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी मोठी माणसं जर पुढाकार घेत नसतील, तर आम्ही त्यांचं नेतृत्व करू. आजपर्यंत फक्त घेण्याची सवय लागलेल्या माणसाला आम्ही द्यायला शिकवू. मी राहात असलेल्या पृथ्वीची जर मोठय़ा प्रमाणात हेळसांड होत असेल, तर मी फक्त ते बघत राहावं का?’’

हे उद्गार होते युगांडाच्या राजधानीत समस्त नेतेमंडळी आणि जनतेसमोर न घाबरता बोलणाऱ्या चौदा वर्षांच्या एका मुलीचे. ती ज्यांचं प्रतिनिधित्व करत होती, ती सामान्य आफ्रिकन जनता होती. हवामानबदलामुळे निर्माण झालेल्या अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देता देता जगण्याची लढाई लढत असलेल्या सामान्य आफ्रिकी माणसाचं दु:ख ती मांडत होती. अन् त्यामुळे व्यथित झालेल्या लाखो चिमुकल्या मनस्वी हृदयांचं आक्रंदन ती आपल्या स्वगतातून सांगू पाहात होती. तिचं नाव लिया नमुगेरवा. युगांडात एरवी तसा सुट्टीचा आणि आरामाचा दिवस असलेल्या शुक्रवारला आपल्या कामाचा महत्त्वाचा दिवस बनवणारी ही मुलगी. लिया ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ या जगभर पसरलेल्या विद्यार्थी चळवळीअंतर्गत निदर्शनं करते, प्लास्टिक प्रदूषणाच्या विरोधात जनजागृती करते आणि निसर्गावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडते. ती रस्त्यावर उतरते, शांततापूर्ण निदर्शनं करते आणि तिच्या या सजग भूमिकेतून येणाऱ्या जबाबदारीच्या जाणिवेमुळे तिच्या वाणीला कमालीची धार चढते.

२०१८ मध्ये लियानं ग्रेटा थनबर्ग आणि तिच्या शांततापूर्ण चळवळीबद्दल थोडंफार ऐकलं होतं. तेव्हापासून तिला या प्रकाराबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. थोडं आश्चर्य आणि उत्सुकताही वाटली होती. चळवळ आणि तीही शांततापूर्ण? देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या प्रक्रियेपासून, ते पूर्णत: लोकशाही स्थापन होईपर्यंतच्या कालखंडात अतोनात हिंसाचाराचं प्राबल्य पाहिलेला हा देश. अजूनही निवडणुका जवळ आल्यावर घडणाऱ्या आणि रक्तरंजित हिंसेचं साम्राज्य निर्माण करत मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या असंख्य घटना निवडणुका पूर्ण झाल्यावरही बराच काळ इथल्या जनतेच्या मनात दहशत माजवत आठवणींच्या रूपानं टिकून राहातात. इथे न्याय मिळतो, पण त्यासाठी रक्त सांडावं लागतं.

अन् अशा या पार्श्वभूमीवर शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गानं संप करणं म्हणजे नक्की काय, हे त्या लहान मुलीला समजायला बराच वेळ लागला. ‘हवामानबदलाविरुद्ध केला जाणारा शालेय संप’ किंवा ‘क्लायमेट स्कूल स्ट्राइक’ या शब्दांचा अर्थ तिनं वडिलांना विचारला, तेव्हा तिला समजलं, की परदेशांतही काही लहान मुलं शुक्रवारी शाळेत न जाता, हवामानबदलासंदर्भात ठोस कार्यवाही व्हावी म्हणून सरकारी इमारती व सार्वजनिक ठिकाणी धरणं धरून बसतात. पर्यावरण संरक्षणाबाबत त्यांच्या देशांच्या सरकारांनी दाखवलेल्या निष्काळजीपणाविरुद्ध निषेध नोंदवण्यासाठी संपावर जातात.

लहान मुलं संपावर जातात अन् तेही हवामानबदल नावाच्या एका प्रत्यक्ष न दिसणाऱ्या अन् तसे थेट परिणाम न कळणाऱ्या आपत्तीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी. राजकारणी आणि मोठय़ा माणसांना समज देण्यासाठी! या गोष्टीचं गांभीर्य तिला त्या वयात कसं लक्षात येणार? पण त्याबद्दलची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. टीव्हीवर अनेक बातम्या कान टवकारून ऐकताना, लक्ष देऊन क्षणचित्रं पाहाताना, वर्तमानपत्र वाचताना तिच्या असं लक्षात आलं, की युगांडाच्या पूर्व भागात पडलेल्या दीर्घकाळ अवर्षणामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. भूकबळी जात आहेत. भूस्खलनामुळे अनेक माणसांनी आपले प्राण गमावले आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळेही अनेक लोक बेघर झाले आहेत, प्राणाला मुकले आहेत. या वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या मुळाशी फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे हवामानबदल.

त्यानंतर मात्र तिला या गोष्टीचं गांभीर्य पुरतं कळून चुकलं. तिनं याबद्दल अधिक माहिती मिळवली, वाचन वाढवलं आणि कृतिशीलतेचा एक भाग म्हणून शुक्रवारी संपावर जाणं सुरू  केलं. आंदोलनाचा पहिला दिवस तिच्यासाठी तसा कठीणच गेला. काही लोक तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहात, तर काही लोक तिला वेड लागलं आहे असं समजून मान हलवत निघून जात. ज्या देशात शिक्षणापासून अनेक मुलं वंचित आहेत, अशा देशात तिच्या वयाच्या मुलीनं एक दिवसही शाळा बुडवणं कसं चूक आहे, हे काही जण तिला समजावयाचा प्रयत्न करत. तसं ते चूक नव्हतं, कारण तिच्या देशात गरिबी आणि उपासमारीमुळे शाळेत जाणं अनेक मुलांसाठी अजूनही चैन आहे. पण तेवढंच जरुरीचं होतं लोकांचा दृष्टिकोन बदलणं, त्यासाठी सतत प्रयत्नशील राहाणं. तिच्या काही शिक्षकांनाही असं वाटे, की वातावरणबदल हा पूर्णपणे देवाचा शाप असून माणूस त्यासाठी काहीही उपाय करू  शकत नाही. म्हणून ते तिला तिच्या उद्दिष्टांपासून दूर करण्याचा प्रयत्न करत. या परिस्थितीत तिनं आपलं आंदोलन चालूच ठेवलं. या कामासाठी तिच्या पालकांनीही तिला पाठिंबा दिला.

समाजातून विरोध झाला, तरीही लियानं आणि तिच्या सहकाऱ्यांनी हिम्मत हरली नाही. प्रसंगी कोऱ्या कागदांवर रंगीत पेननं घोषणा लिहून, कमी खर्चात मोठमोठे फलक तयार करून, अधिक साधनं हाताशी नसतानाही त्यांनी आपला लढा चालूच ठेवला. प्रसारमाध्यमांनी त्यांच्या प्रयत्नांची म्हणावी तशी दखल घेतली नाही. राजकारण आणि सिनेतारकांचं खासगी जीवन यांच्यावर केंद्रित झालेलं त्यांचं लक्ष पर्यावरणाकडे कसं वळवायचं? अशक्यप्राय होतं ते. मात्र ‘ट्विटर’सारखं समाजमाध्यम याबाबतीत फार प्रभावीपणे काम करू शकतं हे त्यांनी हेरलं. ट्विटरच्या माध्यमातून मोहीम राबवायला सुरुवात केली. ही मात्रा मात्र योग्य ठिकाणी लागू पडली. अनेकांनी त्यांची दखल घ्यायला सुरुवात केली.

लिया आणि तिच्या सहकाऱ्यांनी ट्विटरवरून आपल्या चळवळीला नवी ओळख दिली आहे. ते ट्विटरच्या माध्यमातून सरकारला सूचना करतात. नवीन पर्यावरणविषयक धोरणं लागू करण्यापेक्षा असलेले कायदे परिणामकारकरीत्या कसे राबवता येतील, यावर त्यांच्या सूचनांचा रोख असतो. असलेली व्यवस्था अजून परिणामकारक कशी बनवता येईल, यावर ते बारकाईनं विचार करतात.

लियाला यामध्ये तिच्या अनेक भावंडांची आणि मित्रमैत्रिणींची साथ मिळाली आहे. तिचे काका, टिम मुगेरवा हे ‘ग्रीन कॅम्पेन आफ्रिका’ या संस्थेचं प्रतिनिधित्व करत आहेत. ते स्वत: एक पर्यावरण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत. पर्यावरणाच्या मुद्दय़ाला अग्रस्थानी ठेवून २०२१ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत. ‘फ्रायडेज फॉर फ्युचर, युगांडा’चे संस्थापक सद्राच निरेरे, हिल्डा फ्लाविया नकाबुये, लियाचा भाऊ बॉब मोटावू आणि लिया हे चौघे युगांडा देशातील पर्यावरण चळवळीचा भक्कम आधार आहेत. २९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी या सर्वानी कंपाला इथल्या गाबा किनाऱ्यावर संप पुकारला. सुमारे चाळीस विद्यार्थ्यांनी तासभर समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. यात काही अनाथ आणि बेघर मुली आणि काही लहान लहान मुलंही सामील होती. पिटर सेलुजा नावाचा गाबा मार्केटमध्ये राहाणारा आणि तिथेच काम करणारा एक कोळी आणि मुलांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी आलेले गावकरी यांचाही सक्रिय सहभाग होता. पूर्वपरवानगीशिवाय असा जमाव जमवणं त्यांच्या देशात बेकायदेशीर मानलं जातं. मुलांना त्यात अटक होऊ शकते, हे माहीत असूनही ती मागे हटली नाहीत. कारण त्यांच्या मते छोटे-छोटे प्रयत्नच त्यांच्या चळवळीला नवी दिशा देऊ शकतात.

या मुलांना असुरक्षित वाटतं का? पूर्णपणे वेगळ्या विचारांच्या समाजात वावरताना, त्यांची विचारसरणी बदलण्यासाठी प्रयत्न करताना थकल्यासारखं वाटतं का?.. तर नाही. मात्र आजूबाजूला राजकीय फायद्यासाठी पर्यावरणविषयक मुद्दय़ांचा वापर करून घेणारे नेते उदयास येत असताना त्यांना आपल्या सुरक्षिततेची चिंता जरूर वाटते. त्याबरोबरच जगातील मोठय़ा संख्येनं तरुण लोकसंख्या असलेल्या देशांत जो देश गणला जातो, त्या त्यांच्या देशातील तरुणाईच्या विचारसरणीला विधायक वळण देणं त्यांना महत्त्वाचं वाटतं. ते तरुणांना मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी प्रवृत्त करतात. आजपर्यंत १ कोटी झाडं  लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. ते प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी राष्ट्रपतींनी कार्यवाही करावी यासाठी याचिका दाखल करतात, मोहीम राबवतात. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागृती अभियान राबवतात.

जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत २२ डिसेंबर २०१५ रोजी पॅरिस करार मांडण्यात आला. १९५ देशांच्या प्रतिनिधींनी तो मान्य केला. ४ नोव्हेंबर २०१६ पासून तो अधिकृतरीत्या लागू झाला. पॅरिस करारातील सर्व सूचनांचं योग्य पालन व्हावं यासाठी सरकारला वारंवार धारेवर धरणारी ही मुलगी. २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामानबदल परिषदेत तिला प्रतिनिधी म्हणून बोलावलं होतं. युगांडाबरोबरच रवांडा, केनिया आणि स्वित्र्झलडमध्ये भरलेल्या परिषदांत ती आपलं म्हणणं मांडण्यासाठी प्रयत्नशील होती. तिच्या प्रयत्नांना माणुसकीची किनार आहे, पर्यावरणसंवर्धनाचा विचार आहे.

काही माणसांच्या सामूहिक बेपर्वाईमुळे माणसाच्याच जगण्यावर टाच येते आहे. वर्षांनुवर्ष पृथ्वीच्या कुशीत पोसल्या गेलेल्या मानवी संस्कृतीनं सामूहिक विचाराला अधिक महत्त्व आणि प्राधान्य दिलं. आता अनिर्बंध विकासानं मानवाला जगणं कठीण करून टाकलं आहे. जागतिक तापमानवाढीचा वाढता वेग पाहाता बंदुकीतून गोळी सुटायला फार वेळ नाही. ही रोखली गेलेली बंदूक साधीसुधी नाही, तर लांब पल्ल्याचा टप्पा गाठणारी आहे. एकेकाळी निसर्गाच्या साधनसामग्रीचा हवा तसा वापर केला जात होता, आज त्याच निसर्गाचा कोप आपल्याला काही सांगू पाहात आहे. हे चक्र भीतिदायक असलं तरीही अजून आशा आहे आणि ती या लहान मुलांच्या रूपानं निसर्गाप्रति असलेलं आपलं देणं हळूहळू परत करायला सांगत आहे. निदान कृतज्ञता तरी व्यक्त करायला परोपरीनं समजावून सांगत आहे. घेणं सोपं असतं, देणं कठीण असतं. ओरबाडून घ्यायची सवय लागलेल्या माणसाला ते केव्हा समजणार?..