07 March 2021

News Flash

व्वाऽऽ हेल्पलाइन : ना.शा.ची भाषा

अनेकदा ‘ना. शा.’ला धाब्यावर बसवूनच मोठे व्यापार, सौदे होतात; पण उलटं होत नाही.

| December 19, 2020 01:16 am

चांगला नागरिक भलत्या मोहात पडून गैरव्यवहार करायला चटकन जात नाही.

मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

‘‘एखादी सार्वजनिक वस्तू आपण वापरल्यानंतर पुढे ती कोणी तरी वापरणार आहे, याची जाण लोकांना कशी आणि कधी येणार?’’ असा प्रश्न मॅडमनी वत्सलावहिनींना विचारला. मॅडमना कोडय़ात टाकत वत्सलावहिनी म्हणाल्या, ‘‘नाशातून!’’

मस्तपैकी एअरकंडिशण्ड डब्यातलं, खालच्या बर्थचं रिझव्‍‌र्हेशन आहे आपल्याजवळ, तेव्हा गाडी सुटली की खुशाल अंग पसरून टाकायचं, अशी स्वप्नं बघत मॅडम डब्यात चढल्या, तर त्यांच्या बर्थवर, खाली, कडेला, मधल्या पॅसेजमध्ये असंख्य बॅगा, हॅण्डबॅगा, खोकी, पोती, पिशव्या, बोचकी, असं सामान पसरलेलं होतं. एक इंच रिकामा कुठे सोडलेला नव्हता. आपली चिमुकली बॅगही ठेवायला कुठे जागा नाही हे बघून त्यांच्या कपाळावर आठय़ा चढल्या. आपल्या ‘रिझव्‍‌र्हड’ आसनाखालच्या सामानाची हलवाहलव त्या ओणवून कशीबशी करताहेत, तोवर समोरची सहप्रवासिनी म्हणाली, ‘‘ते माझं सामान आहे हो. मी एक तास आधी येऊन बसवून घेतलंय ते नीट!’’

‘‘अहो, पण सामान बसवताना मला बसायला कुठेही जागा ठेवली नाहीत तुम्ही?’’

‘‘जरा ‘अ‍ॅडजस्ट’ करा ना मॅडम. बदली झालीये आमची. सामान तर जाणारच ना? घ्या थोडं सरकून.’’ ती स्वत: एक सेंटिमीटरही न सरकता म्हणाली.

मॅडमचा मेंदूच सरकला एकदम. ‘‘तुम्ही एका तिकिटावर एक बोगी भरून सामान नेलंत तर इतरांनी काय करायचं?’’

‘‘अ‍ॅडजस्ट! बायकांचा प्रॉब्लेम समजून घ्यायला नको?’’ सहप्रवासिनीनं एकदम भावनेलाच हात घातला होता. अर्थात स्वत:चा हातही न हलवता!

शेवटी ‘घट डोईवर, घट  कमरेवर’च्या चालीवर ‘बॅग डोईवर, पिशवी कमरेवर’ अशी व्यवस्था स्वीकारत मॅडमना तिथेच कसंबसं अंग टेकावं लागलं. आपल्याकडे कुठेही अगोदर पोहोचलेल्यांना नंतर येणाऱ्यांची कशी काहीच फिकीर नसते याचं पुन्हा नव्यानं आश्चर्य करत असताना रात्री झोपण्याची सोय करण्याची वेळ आली. डोक्याजवळ लोखंडी हडप्याची कडी, पायापाशी भांडय़ांच्या पोत्याचं टेकण आणि बाकाला टेकून उभा केलेला कॅरमबोर्ड यांच्या संगतीत त्या आडव्या तर झाल्या, पण रात्रभर डब्यातल्या वेगवेगळ्या फोनांचे रिंगटोन्स झोप मोडत राहिले. अगोदर वरच्या बर्थवरली कन्यका खूप वेळ फोनवर ‘‘वॉव.. कम्मॉन.. डार्लिग.. स्वीटी’’ वगैरे चिवचिवत राहिली. (संवाद लग्नपूर्व असावा. नाही तर ‘चिवचिव’ची जागा ‘कावकाव’नं घेतली असती!) नंतर शेजारच्या कूपेमधला एक बेपारी ‘‘ब्ये कट्टा तमे मुकी दो, त्रण मारामाटे राखजो’’ वगैरे सूचना फोनवरून (पण सगळ्या डब्याला ऐकू जातील अशा पट्टीत) देत राहिला. कट्टा, खोका, पेटी यांची पुरेशी देवघेव होईपर्यंत त्यानं डब्यात कोणालाही झोपू दिलं नाही. उरलेल्या रात्रीत कोणाचे अलार्मस्, कोणाचं ‘कॅण्डी क्रश’, कोणाची काय ती रीमाइंडर्स, वगैरे वाजता वाजता शेवटी पहाटे सव्वा पाचला एका मोबाइलनं ‘ओम् जय जगदीश हरे’चा गळा काढला. त्यावर कोणा तरी सहप्रवाशानं हरकत घेतल्याबरोबर, ‘‘भजनच लावतोय ना? ‘चिमणी उडाली भुर्र्र..’ लावलंय का?’’ असं म्हणून त्यानं सर्वाना भुर्र्र उडवून टाकलं. झोप आलीच नव्हती म्हणून ती उडाली नाही. जन सक्तीनं भजन भजत राहिले.

रात्रभराच्या जागरणानं त्रासलेल्या मॅडम ‘जगभरातले सगळे मोबाइल फोन धावत्या गाडीच्या खिडकीतून भिरकावून दिल्यास काय होईल?’ असा हिंस्र विचार करत आपल्या इमारतीत लिफ्टजवळ आल्या, तर लिफ्ट वरती पाचव्या मजल्यावर अडकून पडलेली. इमारत जुनी, लिफ्ट जुनी. तिचा दरवाजा नीट पूर्ण बंद केल्याशिवाय ती सुरू होत नसे; पण लिफ्टनं एकदा आपल्या, हव्या त्या वरच्या मजल्यावर पोहोचलेल्यांना दरवाजा बंद करायला वेळ नसे. सगळे ‘व्हेरी बिझी यू नो’ गटातले. की खाली लिफ्टसाठी थांबलेल्यांचे गजर सुरूच.

‘‘वॉचमन.. लिफ्ट कुठे अडकलीये बघा.’’

‘‘अहो.. वरती कोण आहे? लिफ्ट सोडा!’’ (‘पाणी सोडा’सारखं!) कधीकधी तर खालच्या लिफ्टेच्छुकाला जिने चढून, इष्ट त्या मजल्यावर जाऊन लिफ्टमधून हव्या त्या मजल्यावर यावं लागे, तर काही आधुनिक श्रावणबाळांना वृद्ध आई-वडिलांसाठी लिफ्ट जातीनं खाली आणून द्यावी लागते.

मॅडमपाशी एवढा वेळ अजिबातच नव्हता. त्यांनी धापा टाकत सामानासह मजला-दरमजला करत आपलं घर गाठलं, पण मनातला राग वाढला होताच. लिफ्टचं दार बंद करायला किती सेकंद लागतात बरं? एकदा लिफ्टचं दार बंद करण्यानं किती थकवा येत असेल? किंवा किती ‘हॉर्स पॉवर’ शक्ती जळत असेल? किंवा जर लिफ्टला दरवाजा नसेलच तर काय होईल?

स्पर्धा परीक्षांसाठी ‘इतिहास’ हा विषय मॅडम काही क्लासेसमध्ये शिकवत असत. त्यासंदर्भात एक अलीकडचं पुस्तक त्यांना ग्रंथालयातून मिळवायचं होतं. त्यासाठी दोन-तीन फेऱ्या मारून झाल्या होत्या. वाचनालयात रीतसर ‘क्लेम’ लावून झाला होता. आज तरी ते पुस्तक मिळायलाच हवं होतं. म्हणून प्रवासानंतरची आवराआवर झाल्यावर लगेच त्यांनी त्या वाचनालयात फोन लावला. पुस्तकाची चौकशी केली. ग्रंथपाल बाई म्हणाल्या, ‘‘नाही आलंय अजून ते पुस्तक आमच्याकडे.’’

‘‘अहो, पण मी कधीचा क्लेम लावून ठेवलाय..’’

‘‘कबूल आहे मॅडम, पण आपल्याकडे पुस्तकं वेळेवर परत करण्याची प्रवृत्ती कमीच आहे. लोक परस्पर एकमेकालाही पुस्तकं देतात, कुठे तरी गावाबिवाला जाताना नेतात, गहाळ करतात, घरात पाडून ठेवतात, पण परत करत नाहीत. असे प्रकार. काय सांगायचं तुम्हाला!’’

‘‘थोडक्यात, आपलं वाचून झालं की झालं.. पुढच्या कोणा वाचणाऱ्याची किंमत नाही.’’

‘‘किंवा पुस्तक अनेकांसाठी आहे ही जाणीवच नाही. आम्ही काय अशा लोकांची घरं शोधून, घरी माणसं पाठवून ही पुस्तकं परत आणवायची का?’’

‘‘त्यापेक्षा पुस्तकं वाचनालयाबाहेर जाऊच देऊ नयेत!’’ ‘‘तसं केलं तरीही तो पुस्तकाचा अनादरच ठरणार ना.. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यातच त्याची शोभा आहे.’’

‘‘लेट फी. उशिराबद्दलचा दंड वाढवलात तर?’’ ‘‘वाढवतो मध्येमध्ये. लोक कुरकुरत देतातही, पण पुढच्या वाचकांची गैरसोय केल्याबद्दलची दिलगिरी फारशी कोणी व्यक्त करत नाही. उलट रुबाब दाखवतात. दंड भरतोय ना? मासिक वर्गणीच्यावर? वट्टं? मग बोलायचं काम नाही.’’

बहुसंख्य लोक रेल्वेचं तिकीट काढूनच प्रवासाला निघतात. लोकसहनिवासाचं सभासदत्व घेतात म्हणूनच त्यांना लिफ्टची सोय मिळते. शाळा-महाविद्यालय-वाचनालय यांच्याही फिया, शुल्कं विद्यार्थ्यांनी भरलेली असतात; पण असं करणारे आपण खूप जण आहोत, ही सोय ही आपल्या एकटय़ाची मिरास नाही, असं का कधी जाणवत नसावं? मॅडमच्या मनात विषाद भरून राहिला.

सवयीनं कोचिंग क्लासमध्ये जाऊन आपला त्या दिवशीचा ‘पोर्शन’ संपवून त्या थकल्या पावलांनी आपल्या स्कूटरजवळ गेल्या. तर गाडय़ा ‘लावून जाणाऱ्यांसाठी’ पार्किंगच्या ठळक तिरक्या, भडक रेघा रंगवलेल्या असूनही त्यांच्या पट्टय़ातल्या दोन-तीन तिरप्या स्कूटरींच्या मागे, ऐसपैस फतकल मारल्यासारखी आपली स्कूटर आडवी लावून कोणी तरी भिडू पसार झालेला. मॅडमची स्कूटर नेमकी मधोमध. बाकीच्यांना पाडून तिला जाता आलं नसतं किंवा बाकीच्यांवरून उडूनही सुटका करून घेता आली नसती. अशी तिची कोंडी. भर रस्त्यात एखादी मख्ख म्हैस आडवी बसकण मारून सर्वाची नाकेबंदी करते तसा प्रकार.पण हा स्कूटरवाला वयानं मोठा असणार, किमान शिक्षित असणार. एक वेळ तिरक्या डोक्याचा असला, तरी ‘आडवं म्हणजे तिरकं नाही’ एवढं तरी त्याला कळत असणार. तरीही खुशाल त्यानं आपली स्वत:ची सोय झाल्यावर असं चालतं होणं याला काय म्हणायचं? बेदरकारी? बेजबाबदारी? निव्वळ स्वार्थ? की आपल्याच मस्तीत जगणं? प्रत्येकानं जर असं फक्त आपल्याच मस्तीत जगायचं ठरवलं तर सहजीवन कसं शक्य आहे? का आजच्या लोकांना सहजीवन नकोच आहे?

वास्तविक वाढती लोकसंख्या आणि घटती नैसर्गिक साधनसामग्री यामुळे माणसांना यापुढे जास्तीत जास्त सहकाराची, परस्परहिताची गरज पडणार आहे. ‘मी’ला ‘आम्ही’मध्ये, ‘आम्ही’ला ‘आपण’मध्ये बेमाालूम मिसळता येईल तोच टिकणार आहे. असं असूनही आज एवढा पराकोटीचा ‘मी’पणा का येतो? का फोफावतो? त्याला ताळ्यात कसं ठेवता येईल? मॅडमचा शिणलेला मेंदू विचार करत होता. तेवढय़ात घरातल्या टीव्हीच्या छोटय़ा पडद्यावर त्यांना एक ख्यातनाम अभिनेता तळमळून सांगताना दिसला, ‘‘प्रयोग रंगात आला असताना प्रेक्षकांतून कोणाचा तरी फोन ठणाणा वाजतो. आम्हा अभिनेत्यांचं चित्त विचलित होतं, प्रेक्षकांचा रसभंग होतो. तुम्ही एका प्रयोगाचं एक तिकीट विकत घेतलंत म्हणजे सर्व प्रेक्षकांना किंवा आम्हा नटमंडळींना विकत घेतलेलं नसतं, हे सांगून थकलो. तरी अंतिम निषेध म्हणून पुढलं वर्षभर रंगभूमीवर पाय न ठेवण्याची घोषणा मी मायबाप प्रेक्षकांसमोर..’’

मॅडमना पुढचं ऐकणं-बघणं असह्य़ वाटायला लागलं. त्यांनी सरळ वत्सलावहिनींनाच फोन लावला.

‘‘वत्सलावहिनी, आपल्याकडे प्रत्येक सार्वजनिक गोष्ट फक्त माझ्यासाठीच बनली आहे, तिच्यावर केवळ माझाच हक्क आहे असं का मानलं जातंय हो आता?’’

‘‘असं दिसतंय तुम्हाला?’’

‘‘शंकाच नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहापासून वातानुकूलित नाटय़गृहापर्यंत कुठेही बघा. मी पैसे मोजल्येत, मी असंच वापरणार! माझ्यानंतर कोणी वापरो, न वापरो, मला काय करायचंय? हाच प्रकार दिसतो चौफेर. आपल्यानंतरही कोणाला तरी हे लागेल, त्याची सोय बघायला हवी, ही मुळी जाणीवच नाही कुठे. कशी वाढवता येईल ही जाणीव?’’

‘‘नाशातून.’’

‘‘कशातून? मी नाश टाळण्याबद्दल बोलत्येय. तुम्ही नाशाची गोष्ट काय सांगताय वहिनी?’’ मॅडम म्हणाल्या.

‘‘नागरिकशास्त्र हो. शाळकरी पोरांच्या भाषेत ‘ना.शा.’. शेवटाला तास नसायचा का आपल्या शाळेत.. २० मार्काची परीक्षा वगैरे..’’

‘‘तो फुटकळच होता विषय. टाइमपास!’’

‘‘एक्झ्ॉक्टली! असं मनात आणायला, मानायला लागलो, तिथूनच चुकायला लागलं आपलं. नवनव्या विज्ञानाला डोक्यावर घेत गेलो. बायोटेक्नॉलॉजी.. रोबॉटिक्स.. मार्केटिंग..’’

‘‘ऑफ कोर्स! मॉडर्न ठरायच्या, नोकरी मिळवायच्या शक्यता त्यातच होत्या ना. प्रत्येकाला ‘मार्केटिंग’लाच तर जायचं असतं! किमान शिक्षण झालंय ‘एमबीए’ वगैरे.’’

‘‘कबूल आहे. सारखं काही तरी विका, विकत घ्या, ग्राहक बना किंवा ग्राहक बनवा, हा तर आजचा मंत्र आहेच; पण यामुळे ग्राहकांचं, ग्राहकसत्तेचं स्तोम भयंकर वाढलं असं नाही का तुम्हाला वाटत? त्यात माणूसपण वेठीला धरलं त्याचं काय?’’

‘‘खरंय. म्हणून तर आपण पैसे टाकले की काहीही करायला मोकळे, असंच वाटतं सगळ्यांना. याला पायबंद घालायला तुमची ‘ना.शा.’ची भाषाच शिकवायला हवी नव्यानं.’’

‘‘पटतंय ना?’’ ‘‘थोडंफार.’’

‘‘विचार करा. फार पटेल. अनेकदा ‘ना. शा.’ला धाब्यावर बसवूनच मोठे व्यापार, सौदे होतात; पण उलटं होत नाही. चांगला नागरिक भलत्या मोहात पडून गैरव्यवहार करायला चटकन जात नाही. या दृष्टीनं ‘ना.शा.’चा पाया पक्का करू या.’’ वत्सलावहिनी.

‘‘हे शिक्षणखात्याला सांगा!’’

‘‘बघा.. आपण आपली नागरिकत्वाची जबाबदारी किती सहज कोणावर तरी ढकलायला सरावलोय? प्रौढ व्यक्ती म्हणून, पालक म्हणून, डोळ्यापुढचा आदर्श म्हणून आपण ‘ना.शा.’ची भाषा नव्यानं गिरवायला लागू या. पुष्कळ इतर गोष्टी बदलतील. करून तर बघा!’’

(सदर समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 1:16 am

Web Title: learning social mannerism wwa helpline dd70
Next Stories
1 अपयशाला भिडताना : अल्पविराम
2 पोटगीसाठी यातायात?
3 आर्थिक सहजीवन
Just Now!
X