प्रतिभा वाघ

plwagh55@gmail.com

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..

आदिम काळापासून मानव रेषांच्या साहाय्याने चित्र काढून, त्यात नैसर्गिक रंग भरून, आनंद मिळवत आला आहे. निसर्गाच्या सहवासात अहोरात्र असल्यामुळे लोककलाकारांच्या चित्रातील, कलाकृतीतील विषय, प्रतीके  निसर्गाशी संबंधित असतात. विशेष म्हणजे, या कलानिर्मितीत पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा सहभाग अधिक असतो. निसर्गत: निर्मितीक्षमता स्त्रियांकडे अधिक असते. त्यामुळे असेल त्या घरातील, शेतातील कामे सांभाळून, सवड मिळेल तेव्हा त्यांच्या भावना सरळ, सोप्या, साध्या आकारांतून व्यक्त करतात. मुलगी आपल्या आई, आजीकडून शिकते. गुरू-शिष्य परंपरेप्रमाणे हा वारसा पुढे-पुढे जात असतो. ‘वारली’, ‘मधुबनी’, ‘चित्रकथा’ या अशाच काही चित्रशैली. त्यांना आजही जिवंत ठेवणाऱ्या, नव्हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या काही स्त्री-लोकचित्रकारांना ‘चित्रकर्ती’ या लेखमालेतून आपण भेटणार आहोत, दर पंधरवडय़ाने.

आपले अवघे जीवन हे चित्रात्मक आहे. चित्रकलेची आंतरिक शक्ती मानवी मनाला सतत आनंद देत असते. कलात्मक विचारविमर्श, तिच्यातील पारंपरिकता मानवी मनाला विकसित करते. राजा रविवर्मा, अमृता शेरगील, पाब्लो पिकासो, एम. एफ. हुसेन ही जागतिक स्तरावर नाव मिळवलेल्या काही चित्रकारांची नावे. त्यांच्या प्रसिद्ध कलाकृती सर्वसामान्यपणे सगळ्यांनाच परिचित असतात. पण जंगलात राहणाऱ्या, शहरापासून दूर खेडेगावात वस्ती केलेल्या जमातींची चित्रकला, तिथले चित्रकार यांच्याविषयी त्या तुलनेत फारच कमी माहिती लोकांना असते. ‘चित्रकर्ती’ या लेखमालेचा उद्देशच, लोकचित्रकला आणि लोकचित्रकार, त्यांच्या चित्रकृतींची एवढंच नव्हे तर ते चालवत असलेल्या कलेच्या वारशाची माहिती वाचकांपर्यंत पोचवावी ही आहे.

आत्तापर्यंत अनेक लोकचित्रकारांशी मला संवाद साधता आला, तो कलाप्रदर्शन आणि कार्यशाळांच्या निमित्ताने. अर्थात त्यांचा अभ्यास करणे हासुद्धा उद्देश होताच. हे सर्व कलावंत रोजच्या अस्थिर आणि कष्टप्रद जीवनातूनही लोकचित्रकलेच्या माध्यमातून आपापल्या परंपरा जपत असतात, त्या जिवंत ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतात. सिमेंटच्या जंगलात राहणारे आपण आधुनिक जीवनशैली जगत असतो. सुशिक्षित, संपन्न, विद्याविभूषित असूनही कायम तणावाखाली असतो. मात्र खऱ्याखुऱ्या जंगलात, निसर्गाच्या सहवासात, कष्टाळू जीवन जगणारे आदिवासी मात्र आपल्यापेक्षा खडतर जीवन असूनही संगीत, चित्रकला, नृत्य या परंपरा जपतात, आनंद मिळवतात. नव्हे, ते त्यांच्या जीवनाचे महत्त्वाचे अंग समजतात. मनावरील ताण दूर करण्यासाठी छंद जोपासायला हवा, हे माहीत असूनही, शहरातील अनेकांना सेवानिवृत्त होईपर्यंत त्यासाठी वेळ काढता येत नाही.

आदिम काळापासून मानव रेषांच्या साहाय्याने चित्र काढून, त्यात नैसर्गिक रंग भरून, आनंद मिळवत आला आहे. निसर्गाच्या सहवासात अहोरात्र असल्यामुळे चित्रातील विषय, प्रतीके  ही निसर्गाशी संबंधित असतात. विशेष म्हणजे, लोकचित्रकारांमध्ये कलानिर्मितीत पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा सहभाग अधिक असतो. निसर्गत: निर्मितीक्षमता स्त्रियांकडे अधिक असते. त्या घरातील, शेतातील कामे सांभाळून, सवड मिळेल तेव्हा त्यांच्या भावना सरळ, सोप्या, साध्या आकारांतून व्यक्त करतात. मुलगी आपल्या आई, आजीकडून शिकते. गुरू-शिष्य परंपरेप्रमाणे हा वारसा पुढे-पुढे जात असतो. लोकचित्रकला ही अविरत साधना आहे. या कलाकारांची अभिव्यक्ती, कुशलता, आकृती निर्मितीची त्यांची सहजता पाहिली की लक्षात येते, हे केवळ क्षणभराचे काम नसून त्यामागे मोठी साधना आहे, तपश्चर्या आहे. अशा या स्त्री-लोकचित्रकारांना या लेखमालेतून आपण भेटणार आहोत.

लोकचित्रकार खरंखुरं कलाजीवन जगतात. लोभ, लाभ, यांचं गणित त्यांना माहीत नसतं. आपली ‘कलानिर्मिती’ आपण आणि काहींनी पाहिली की त्यांना परमानंद मिळतो. पद, प्रसिद्धी, पुरस्कारांशी त्यांचं देणं-घेणं नसतं. विशेष प्रसंगी आणि विशिष्ट ठिकाणी या लोकचित्रांची निर्मिती केली जाते. चित्रांचे आकार, लहान-मोठे असतात. भिंत, कागद, कापड, जमीन अशा पृष्ठभागांवर ती काढली जातात. लोकचित्रकलेचा प्रभाव मर्मस्पर्शी असतो. हे चित्र पाहणाऱ्याच्या मनात ‘मला असे चित्र काढता आलं असतं तर?’ असा विचार आल्यावाचून नक्कीच राहत नाही. उदार आणि भावूक कलावंत तरुण चित्रकारांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देतात. आपल्या चित्रातील काही सोपे आकार रेखांकित करण्यासाठी, रंगवण्यासाठी, रंग तयार करण्यासाठी प्रशिक्षण देतात. त्यांना मदतनीस म्हणूनही घेतात. लोकचित्रकला ही प्रामुख्याने स्त्रियांची निर्मिती आहे आणि पुरुषांनी पुढे ती व्यवसाय म्हणून स्वीकारलेली दिसते. महाराष्ट्रातील ‘वारली चित्रकला’ हे याचे उत्तम उदाहरण आहे.

सर्व लोकचित्रांना, मग ते वारली असेल, मधुबनी असेल वा इतर कोणतेही; चित्रकथा आणि चित्रगीतांची मौखिक परंपरा आहे. या परंपरेचा लिखित स्वरूपात संग्रह होणं गरजेचं आहे. कारण विशिष्ट चित्राशी संबंधित कथा किंवा गीताबरोबर ते चित्र पाहायला मिळालं, तर त्याचा अर्थ समजल्यामुळे रसिकाला त्या कलाकृतीचा पूर्ण आनंद घेता येईल. या लेखमालेमुळे काही जिज्ञासू वाचकांकडून तसा प्रयत्नसुद्धा केला जाईल, अशी आशा वाटते. या लोकचित्रकलेच्या, त्यांच्या संस्कृतीच्या सान्निध्यात आपली संकुचित दृष्टी विकसित होईल. त्यांची जीवनपद्धती, आनंदानं जीवन जगण्याचं त्यांना सापडलेले सूत्र, त्याविषयाचे आपले विचार तपासून पाहायला लावते.

ही लेखमालिका लिहावीशी वाटली, याचे मुख्य कारण लोकचित्रकतीर्ंशी झालेल्या भेटी, त्यांचा सहवास आणि संवांदातून त्यांनी सांगितलेले अनुभव. दगड फोडणे, लाकडे तोडणे, मोहाची फुले गोळा करणे, मोलमजुरी करणे अशी कामे करत करत ‘चित्रकर्ती’ म्हणून समाजात स्थान मिळविलेल्या, या कलेमुळे चित्रकार म्हणून ‘नोकरी’ करणाऱ्या या स्त्रियांचा चित्रकलेची परंपरा जपण्याचा ‘ध्यास’ पाहिला की औपचारिक शिक्षण न घेताही त्या खूप ज्ञानी, सुशिक्षित वाटतात. त्यांनी केवळ लोकचित्रकलेची परंपरा जपलेली नाही, तर तिला जागतिक स्तरावर नेऊन ठेवले. विविध राज्यातील सांस्कृतिक मंत्रालये, संस्कृती परिषदा, आदिवासी लोककला अकादमी यांनी प्रोत्साहन दिल्यानं विविध योजनांच्या माध्यमातून, काही स्त्रिया परदेश दौरा करून आल्या आहेत. ते केवळ प्रवास, सदिच्छा भेट म्हणून नाही; तर आपल्या चित्रांची प्रदर्शने, प्रात्यक्षिके, कार्यशाळा असे अनेक उपक्रम तिथे केले आहेत. आपल्या प्रतिभेने विदेशातील रसिकांना प्रभावित केले आहे.

कला आणि संस्कृतीच्या सान्निध्यात, विशेषत: आदिवासींच्या, आपली संकुचित दृष्टीही अधिकाधिक विकसित होते. ही चित्रकला म्हणजे निव्वळ चित्रांकन किंवा अलंकारिकता नाही. या कलेचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्याकडे लोकचित्रकार गांभीर्यानं पाहतात. त्यामागे त्यांची खोलवर आस्था आणि निष्ठा असते. मानवी शरीरात जे महत्त्व नसांचे, वाहिन्यांचे आहे, तेच लोककलेचे आपल्या जीवनात आहे, असे हे लोकचित्रकार मानतात. पर्यावरणाचं महत्त्व त्यांना माहीत आहे. ते निसर्गाची पूजा करतात. त्यांचे रोजचे जीवन झाडे, पाने, फुले, कीटक, प्राणी, पक्षी, यांच्याशी इतके समरस झाले आहे, की ते स्वत:ला निसर्गापासून वेगळे मानतच नाहीत. वेगवेगळ्या प्रतीकांतून, चित्रांतून, जणू ते निसर्गाचे आभारच मानत असतात. सोबतच, निसर्गाकडे पाठ फिरवणाऱ्या शहरवासीयांना ते कळत-नकळत पर्यावरणाचा पाठ देतात.

या सदरातून विविध लोकचित्रकलेतील चित्रकर्तीची ओळख आणि त्यांच्या कलेचा आनंद वाचकांना नक्की मिळेल, याची खात्री वाटते.

(चित्र सौजन्य : शुभा वैद्य)

प्रतिभा वाघ, गेली ४० वर्षे कला अध्यापन करीत आहेत. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे दोन वषार्ंसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या निमित्ताने त्यांनी ‘चित्रकथी’ या महाराष्ट्राच्या लोप पावत चाललेल्या लोकचित्रकलेचा अभ्यास केला. इतर लोकचित्रकलांमध्ये वारली, मधुबनी, चित्रकथा, चर्मबाहुल्या यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी स्वत:ची खास चित्रशैली विकसित केली आहे. ३००० चर्मबाहुल्यांचा अभ्यास करून त्याची एक सूची तयार केली असून ती पुणे येथील ‘राजा दिनकर केळकर’ वस्तुसंग्रहालयाने प्रकाशित केली आहे. आंतरदेशीय पातळीवरील चित्रकलेतील ‘कालिदास पुरस्कार’, ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’, ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ हे प्रतिभा वाघ यांना मिळालेले काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत. देशात आणि परदेशांत चित्रांची अनेक प्रदर्शने झाली असून त्यांची चित्रे रसिकांच्या संग्रही आहेत.