17 January 2021

News Flash

पर्यावरणपूरक जीवनशैलीचा धडा

आमची फॅक्टरी बंद आणि उत्पादनही बंद त्यामुळे आमचं आर्थिक नुकसान कित्येक लाख रुपयांच्या घरात गेलं.

(संग्रहित छायाचित्र)

अनिता डोंगरे

फॅशन डिझाइनर

मार्च महिन्याच्या आरंभीच आपल्याकडे ‘करोना’ प्रकरणाने जोर धरायला सुरुवात केली होती.  मी १८-१९ मार्चला दिल्लीहून मुंबईत परतले, अन्यथा दिल्लीत अडकून पडले असते. टाळेबंदी सुरू झाली आणि बघता बघता अनेक उद्योगधंदे, नोकऱ्या, दुकानं, मॉल सगळ्यांना कुलपं लागली. टाळेबंदी उठण्याची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू झाली असली तरी फॅशन इंडस्ट्री आणि एन्टरटेन्मेंट इंडस्ट्री या व्यवसायानं आपलं काम अजूनही शंभर टक्के  सुरू केलेलं नव्हतं. दिवाळीपासून या कामाला नव्यानं सुरुवात झाली.

टाळेबंदी सुरू झाल्यावर आम्हाला आमचा नवी मुंबई येथील कारखाना तडकाफडकी बंदच करावा लागला. या ठिकाणी ७०० कर्मचारी काम करत होते. ट्रेन, बस आणि वाहतुकीची साधनं बंद असल्यानं कर्मचारी कामावर रुजू होऊ शकत नव्हते. आमचं उत्पादन बंद पडलं, बरेचसे कर्मचारी मिळेल त्या वाहनांनी त्यांच्या त्यांच्या गावी परतले. माझ्याही मनात बेचैनी, अस्थिरता, भीतीनं काहूर माजलं होतं. कळणाऱ्या बातम्यांनी जीव घायकुतीला येत होता.  सगळीच अनिश्चितता होती. ज्यांचे निकटचे आप्तेष्ट  वारले त्यांच्या मानसिक हालांना पारावार राहिला नाही. आजही त्या आठवणींनी मन विदीर्ण होतं.

आमची फॅक्टरी बंद आणि उत्पादनही बंद त्यामुळे आमचं आर्थिक नुकसान कित्येक लाख रुपयांच्या घरात गेलं. पण म्हणतात ना, ‘सर सलामत तो पगडी पचास!’  करोना लाटेतही आपण जिवंत आहोत हे कमी नाही, यात आनंद मानणं इतकंच हाती होतं. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहावं म्हणून मी दररोज योग करत असे. या दिवसांमध्ये तंत्रज्ञान, डिजिटल माध्यम उपयुक्त ठरले.

मार्च ते सप्टेंबर..  भयंकर होते ते दिवस.  पण अखेर ऑक्टोबरमध्ये, तब्बल ६ महिन्यांनी मी माझी फॅक्टरी उघडली. आजही अनेक कर्मचारी मुंबईत परतलेले नाहीत. जे आहेत त्यांना फॅक्टरीमध्ये येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे माझ्याकडील ७०० कर्मचाऱ्यांपैकी ३०० कर्मचारी फॅक्टरीत सध्या येऊ लागले आहेत. सामाजिक अंतराचं भान ठेवताना भरपूर कर्मचारी ठेवणं सध्या शक्य नाही.

करोनाकाळानं समस्त मानवजातीला धडा दिलाय. एक तर ‘लक्झरी लाइफ’ जीवनासाठी आवश्यक नाहीच. तीन जोडी कपडे, दोन वेळेस अन्नपाणी आणि डोक्यावर छत इतकीच माणसाची कमीतकमी गरज आहे.

माझ्या ‘ ड्रेस कलेक्शन’ची ओळख म्हणजे ते शाश्वततेने प्रेरित असं, ‘सस्टेनेबल’ असतं.  ज्याचा पुनर्वापर होणार नाही असं कोणतंही उत्पादन मी वापरत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिकच उत्पादनं वापरते. त्यामुळे भविष्यात माझ्याकडून कधीही पर्यावरणविरोधी काम होणार नाही एवढं नक्की. एप्रिल-मे महिन्यात माझं उन्हाळी कलेक्शन येईल तेव्हा फॅशनप्रेमींचा विश्वास वाढेल. त्यावर काम सुरू आहेच.

करोनाकाळ संपला की भारतीय फॅशनला पुन्हा जगभर कसं नेता येईल हे विचार आणि योजना सुरू आहेत.

शब्दांकन – पूजा सामंत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2021 12:08 am

Web Title: lesson on eco friendly lifestyle in corona period abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 प्रश्नांची उत्तरे शोधताना..
2 आमचा ‘काको’!
3 अर्थहीन जगण्यातला अर्थ
Just Now!
X