नववर्षांच्या शुभेच्छा! हल्ली एकूणच आपल्याला सतत सगळं नवं, ताजं, फ्रेश हवं असतं. नाहीतर डायरेक्ट अ‍ॅण्टिक व्हॅल्यू असलेलं. थोडं जुनं, सवयीचं, रुळलेलं, ‘बोअरिंग’ वाटतं. इतकं, की नवं वर्ष सुरू होण्याआधी महिनाभर नव्या वर्षांच्या शुभेच्छांचे मेसेजेस सुरू होतात. नावीन्याची आवड इथपर्यंत ठीक आहे, पण नव्याची इतकी घाई मात्र मला थोडी गडबडून टाकते.
आयुर्मान वाढल्यामुळे आता ‘मध्यमवय’ही पुढे सरकलंय. पूर्वीसारखं चाळिशी म्हणजे आयुष्याची दुपार, असा विचार आपण करत नाही. उलट मला तर माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातलं सर्वात आवडलेलं दशक म्हणजे हे तिशीचं दशक वाटतं. जन्माला आल्यासरशी करण्यासारख्या ज्या बेसिक गोष्टी असतात, म्हणजे शिक्षण, लग्नं, मुलंबाळं हे टप्पे बरेचसे पार केलेले असतात. स्वत:शी पुरेशी ओळख झालेली असते. आपल्याला काय हवं आहेपेक्षा काय नको आहे, हे नक्की कळलेलं असतं. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींनी भावनिक होणं कमी झालेलं असतं. जगण्याला स्वत:चा एक ऱ्हिदम, स्थैर्य, शांतता आलेली असते आणि मग, काहीतरी ‘वेगळं’ करावंसं वाटायला लागतं. अभिनयाच्या क्षेत्रात लुडबुड करताना माझं लिखाणही सुरू झालं, ते यामुळेच असावं. आपण बरेचदा आपल्याकडे असलेल्या बटव्यातल्याच वस्तू बाहेर काढून आपलं मन रमवतो. म्हणजे, एखादीला लहानपणापासून गाण्याची आवड आहे, कुणाची पेंटिंग्सची इच्छा राहून गेलीये, कुणाला इतक्या वर्षांत ट्रेकिंगला जायला वेळच मिळत नव्हता. आता वेळ मिळत असेल, तर हे करायलाच हवं, पण अचानक फारसं कधी मनात न डोकावलेलं काहीतरी नव्यानं शिकायला मिळालं तर? हल्ली मुलांचे सतत कसले तरी क्लासेस असतात. आपणही त्यांच्याबरोबर गिटार, स्केटिंग, बेकिंग, पॉटरी असं काहीतरी शिकू या. आपल्या लहानपणी कुठे होत्या या गोष्टी? आणि आता नाही करणार तर कधी करणार? मी केला हा प्रयत्न. नुकतीच कथ्थकची तिसरी परीक्षा दिली. खरंच सांगते, इतका ‘सेन्स ऑफ अचिव्हमेंट’ मला बऱ्याच काळात मिळाला नव्हता.
सध्याच्या काळातली मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे मोठय़ा वयात नवं काहीतरी शिकणारी बाई जरा ‘ही’च दिसत्ये असं आता कुणालाही वाटत नाही. माझ्या अनेक चाळिशीतल्या मैत्रिणी स्वत:चे छोटेखानी व्यवसाय सुरू करतायत, क्लासेस घेतायत, शिकतायत. अतिशय पॉझिटिव्हली पुढच्या आयुष्याची सकस आखणी करतायत. याउलट काहीही न करणाऱ्या एखादीकडे ‘बिचारीला स्वत:चं असं काहीच करायला जमत नाही,’ असं सिम्पथीनं पाहिलं जातं. ‘सुपरवुमन सिन्ड्रोम’ होण्याचा धोका टाळला तर स्वत:ला आवडीच्या गोष्टींमध्ये व्यग्र ठेवणं, हे श्वास घेण्याइतकं गरजेचं आहे हे मात्र नक्की. शरीराची आपण जितकी काळजी घेतो, मशागत करतो, त्याच्या दहा टक्के तरी लक्ष मेंदूकडे देतो का? मेंदूला काम द्यायलाच हवं. म्हणजे जाडजूड ग्रंथच वाचले पाहिजेत, असं नाही. पण साधं मुलांशी खेळायचा कंटाळा येतो म्हणून त्यांच्या हातात पीएसपी देणाऱ्या आयांची मला कीव आणि काळजी वाटते.
आधीच बायकांना कामं कमी की काय, म्हणून आता फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपही वाढले आहेत. सतत त्यावर फोटो टाकणं, क्षणोक्षणी मनात आलेलं लिहिणं, हे फार मोठ्ठंच काम होऊन बसलंय. सोशल जरूर असावं, पण ही ‘अतिसार्वजनिकता’ मला फार खटकते. आपण काय खातोय, कुणाबरोबर बसलोय, कशासाठी कुठे आहोत, प्रत्येक गोष्ट सतत जगाला सांगायची काय गरज आहे? आपलं आयुष्य ‘ओपन बुक’ करता करता, चौकाचौकात होर्डिग्सही लावायला लागलो आहोत आपण. सतत आपण काहीतरी ‘हॅपनिंग’ आयुष्य जगतोय हे स्वत:ला आणि जगाला पटवून देत राहणं कठीणच आहे. आपलं, आपल्यापुरतं, आपल्यासाठी असं काही उरतच नाही. आपल्याला नक्की काय वाटतंय याचा विचार करण्यापेक्षा आपण ते लोकांसमोर कसं मांडतोय याकडे जास्त लक्ष दिलं जातं. सतत ‘ऑडियन्स’ हवा असण्याची ही सवय अत्यंत धोकादायक आहे.
शेवटी आळस वाढवावा तितका वाढतो आणि कमी करावा तितका कमी होतो. तो झटकू या. नव्या वर्षांत एक तरी असा विषय घेऊ या, ज्याचा अभ्यास करून त्यावर आपण अधिकारवाणीनं बोलू शकू. बाहेरच्यांसाठी नाही, आत्मविश्वास वाढावा म्हणून. नवं वर्ष आनंदाचं आणि सर्वार्थानं भरभराटीचं जावो..