kagadमाझ्या गळ्यात हात टाकून, हुंदके देऊन सूनबाई रडत म्हणाली, ‘‘आई, कसं सोसलंत सगळं इतकी र्वष? यांची माया कुठे गेली हो? मधुमेह, साखरेबरोबर आपल्या माणसांचं प्रेमही काढून घेतो का हो हा? अलीकडे हे माझ्यावर सारखी  चीडचीड करतात.’’

कधी तरी वाटतं, त्या वेळी माझ्या प्रकृतीबद्दल यांना काही बोलले नसते तर बरं झालं असतं. प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाताना मी त्यांच्यावर का अवलंबून राहिले, असं आता फार वाटतं. पण अशा नंतरच्या वाटण्याला काही अर्थ असतो?
अलीकडे माझ्या प्रकृतीत कोणाला ‘इंटरेस्ट’ नाही कारण मधुमेह आता नेहमीचा झाला आहे. एखादा पाहुणा खूप दिवस राहिला की त्याचं कौतुक कमी होतं, तसंच हे. आता मी एकटीच, रक्त तपासायला जाते, तिथे जाऊन आले की रक्तात किती साखर निघाली की मात्र घरात जोरदार चर्चा सुरू होते, साखर जास्त निघाली की मला भारी कानकोंड होतं, काय सांगू, सहा महिन्यांपूर्वी खूप पथ्यपाणी सांभाळूनही, रक्तात साखर जास्त निघाली, तेव्हा मी चोरून गोड खाल्लं असेल, असा यांनी माझ्यावर आरोप केला हो, भारी वाईट वाटलं. ही राधाबाई खोटं कधी बोलत नाही, हे काय यांना का ठाऊक नाही? खूप रडले..
 ‘अहो, खरंच मी बिन साखरेचा चहा पिते, भातसुद्धा खात नाही हो,’ किती वेळा सांगितलं, तरी कोणाला पटत नव्हतं. त्यात आमची छोटी नात वय वर्षे सात बोलून गेली, ‘‘आजोबा, आज्जी किनई देवाच्या नैवेद्यात, दुधात साखर घालते, नंतर ते दूध चहात घालते. नैवेद्याचं दूध गोड गोड असतं, मस्त.’ मग काय यांना ऊतच आला, चष्म्यातून गरागरा डोळे फिरवून मला म्हणतात कसे, ‘उद्यापासून मी पूजा करणार.’ मनात म्हटलं, पांडुरंगा! सबंध आयुष्यात तुला साधा नमस्कार न करणारे आमचे हे, उद्यापासून तुझी पूजा करणार आहेत, तुझं भाग्य उजळलं रे बाबा. माझंही तेवढं काम कमी झालं, कित्ती दिवसांपासून सांगत होते, वेळ जात नाही. पूजा करा, पण छे. स्वयंपाकघरातही यायचं ते माझ्यावर लक्ष ठेवायला, चहात साखर घालते का, भाजीत किती गूळ घालते, मुलगा-सून नोकरीवर, नात शाळेत, दिवसभर घरात हे, मी अन् माझा मधुमेह. दुसरा विषय म्हणून नाही, तर काय सांगत होते, त्या दिवशी, जेव्हा रक्तात साखर जास्त निघाली, तेव्हा सुनेला म्हणाले, ‘‘आजपासून तू स्वयंपाक कर, ही तुला भाजी वगैरे चिरून देईल, तिचं पथ्य ती बघेल, माझं जेवण झाकून, फ्रिजला, फडताळाला कुलूप घाल. किल्ली मला देऊन जा.’’ नोकरी करणारी माझी सून, तिची किती धांदल होईल हे यांना समजायला नको? आणि मी चोरून गोड कशी खाईन? मी काही अडाणी नाही, एखाद्या वेळी पथ्य मोडतं, पण..
 काय सांगू, यापूर्वी मी किती किती भोग भोगले, ऐन चाळिशीत मधुमेहाचा रोग जडला, पहिल्यांदा शिरेत सुई घातली, तेव्हा केवढी किंचाळले मी, दरदरून घाम फुटला, रक्त पाहून यांना तर चक्करच आली, मला रडूच कोसळलं. डॉक्टरांना विचारलं, ‘मी खूप पथ्य करीन हा रोग बरा होईल ना हो? की सारखी सारखी अशी तपासणी करावी लागेल?’ त्या काहीच बोलल्या नाहीत, तेव्हा काय समजायचं ते समजले. घरी आल्यावर यांच्या कुशीत शिरून खूप रडले, कित्ती प्रेमानं थोपटलं होतं यांनी त्यावेळी. त्यानंतर गेली तीस वर्षे हे खाऊ  नको, ते खाऊ  नको, हे औषध घे, तो काढा घे, म्हणून छळलं हो मला, औषधांच्यासुद्धा तऱ्हा. कधी म्हणायचे, तुला रोज कारल्याचा रस काढून देतो, रोज मंडईतून हिरवीगार कारली आणायचे, आठवडाभर मी रस प्यायले, कधी बेलाचं पान तर कधी दुर्वाकुरांचा रस, कसले कसले रस आणि काढे विचारूच नका. मग हेच कंटाळले.
गेल्या तीस वर्षांत अनेक बरे-वाईट प्रसंग आले, मी दिवाळी कधी साजरी केली नाही. फक्त मीच हो, कारण, चकल्या मी करायच्या, करंज्या, लाडू, चिवडा करायचा, अगदी एकटीनं सगळं करायचं. आणि मधुमेह म्हणून मी एकटीनं काही खायचं नाही, या रोगाला मधुमेह का म्हणतात कोण जाणे, सगळं जीवन कडवट करणारा हा खरं म्हणजे कडुमेह!
या दिवाळीत मात्र सगळं काही खाण्यासाठी हे आग्रह करीत होते, पण नकोच वाटलं काही. सून मात्र माझ्याशिवाय काहीही खायला तयार नव्हती, माझ्यासाठी अलीकडे तिला काय काय करू असं झालं आहे. त्याचं काय झालं सांगते, गेल्या महिन्यात तिला ताप आला, काय तो मेला दोन दिवसांचा ताप, पण अलीकडे लॅबरोटरीची फॅड निघाली आहेत नं? डॉक्टरांनी अनेक तपासण्या सांगितल्या. मुलानं रजा घेतली, मोठय़ा प्रेमानं, काळजीपूर्वक बायकोला घेऊन डॉक्टरकडे निघाला, अगदी पहिल्यांदा यांनी मला कसं नेलं होतं अगदी तसं. माझ्या सुनेच्या जागी मला मीच दिसू लागले. हिचा रिपोर्ट चांगला येऊ  दे, नाहीतर तोसुद्धा बायकोला यांच्यासारखा वनवास करील. खाऊ  पिऊ  द्यायचा नाही, लग्नाला, समारंभांना जाऊ  द्यायचा नाही, छळेल नुसता..सुनेच्या रिपोर्टची मी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते.
अखेरीस नको तेच घडलं, सूनबाईत थोडी साखर दिसलीच. सूनबाई रडायलाच लागली,  तिचे रडू पाहून मला कीव आली, पण थोडा आनंदही झाला, थोडाच हं, आनंद अशासाठी, की निदान ती तरी माझं दु:ख समजू शकेल.
..आता खरी गम्मत सुरू झाली, धांदलीत धांदलीत थोडा स्वयंपाक यांचा, जास्त स्वयंपाक आमचा असं होऊ  लागलं, मुलगा ऑफिसात जेवायचा, चारच दिवसांनंतर, सूनबाईनं सगळा स्वयंपाक, कमी तेलाचा, बिन खोबऱ्याचा, बिन गुळाचा करायला सुरुवात केली, म्हणाली, माझी फार धांदल होते हो, आजोबांना काही हवं असलं तर वरून घालून घेतील, नाही तरी फ्रिजच्या, फडताळाच्या किल्ल्या त्यांच्याकडे असतात.
मी म्हटलं, ‘ते किल्ल्या प्रकरण, तू अन् तुझे सासरे पाहून घ्या,’ मनातल्या मनात मला हसू येत होतं, मला ठाऊक होतं, यांना भाजीत खोबरं घालायला, खमंग फोडण्या घालायला मीच लागणार, मीही गम्मत पाहायचं ठरवलं. हा ‘मधुमेही’ स्वयंपाक नातही जेवेना, तिला म्हटलं, रोज केळ्याचं शिकरण, नाही तर तूप-साखर पोळी खा. ती एकदम खूश. प्रश्न यांचा होता. पथ्याचं जेवण, पाणी पीत पीत जेवायचे. मधून माझ्याकडे पाहायचे, मी कशाला चौकशी करू? माझ्यावर विश्वास नाही, फ्रिजला कुलूप घालणं शोभतं का यांना? ते किल्ल्या देत नव्हते, मी मागत नव्हते.
एक दिवस संध्याकाळी मुलगा खूप चिडला, म्हणाला, ‘‘रोज सकाळी ऑफिसात जेवतो, रात्री हे असलं जेवण? संध्याकाळी हॉटेलात जाऊ  का?’ नंतर बायकोला म्हणाला, ‘‘तुला अन् आईला मधुमेह, तर त्याची शिक्षा आम्हाला का देता? तुमचं तुम्ही पाहून घ्या, हे असलं जेवण मला आवडणार नाही, सांगून ठेवतो.’’
सुनेचे डोळे भरून आले, रडवेल्या सुरात म्हणाली, ‘‘काय करू, बिन साखरेचा चहा, पथ्याचं खाणं, यानं माझी उमेद निघून गेली आहे, काही करावंसं वाटत नाही, मधुमेहानं माझ्या जीवनातील आनंद हिरावून घेतला आहे ..’’

लगेच आमचे हे म्हणतात कसे, ‘‘उद्यापासून संध्याकाळचा स्वयंपाक मी करणार, उद्या आधी भाजी करू.’’ मुलाकडे वळून म्हणाले, ‘‘त्या डावीकडच्या गल्लीत, मस्त बटाटेवडे मिळतात. येताना आणत जा कधी कधी, मलासुद्धा या जेवणाचा अगदी कंटाळा आला आहे.’’ हे सारं संभाषण ऐकून मला वाटलं, या सर्वाना केवळ पंधरा दिवसांत कंटाळा आला, गेलं तीस र्वष, हे जेवण मी जेवते आहे, कोणाच्या लक्षातही आलं नाहीना.
 रडणाऱ्या सुनेची कीव आली, तिच्या जवळ गेले, पाठीवर हात फिरवून म्हणाले,‘‘वेडाबाई, पुन्हा  एकदा तपासणी करून घेऊ . कधी कधी रिपोर्ट चुकूही शकतो. अगं, या क्षेत्रात मला खूप अनुभव आहे, घाबरू नको गं.’’
माझ्या गळ्यात हात टाकून, हुंदके देऊन सूनबाई रडत म्हणाली, ‘‘आई , कसं सोसलंत सगळं इतकी वर्ष? यांची माया कुठे गेली हो? मधुमेह, साखरेबरोबर आपल्या माणसांचं प्रेमही काढून घेतो का हो हा? अलीकडे हे माझ्यावर सारखी चीडचीड करतात.’’
सुनेला थोपटताना मनात आलं, माझ्यासारखा त्रास हिला नको रे देवा. तिची समजूत घालून दुसरे दिवशी तिला मी माझ्या डॉक्टरकडे नेलं, सर्व तपासण्या केल्या. संध्याकाळी रिपोर्ट आणले. काय सांगू, माझ्या सोन्यासारख्या सुनेचे सर्व रिपोर्ट अगदी नॉर्मल होते. त्या दिवशी, घरी येताना, हलवायाकडून गुलाबजाम, केशरी कंदी पेढे, मोतीचूर, काय काय आणलं. घरी आल्यावर सुनेला म्हटलं, ‘आधी बाजूला हो, आज मी स्वयंपाक करणार आहे.’ त्या दिवशी, बटाटेवडे, मसालेभात, पुऱ्या, खूप पदार्थ केले. माझं जेवण वेगळं ठेवायला विसरले नव्हतेच, सुनेनं पानं घेतली, आग्रहानं माझ्या आधी, यांच्या अन् मुलाबरोबर तिला बसवलं. नात भलतीच खूश होती, त्या दिवशी सर्वाच्या पानात चविष्ट पदार्थ वाढताना मला किती आनंद झाला म्हणून सांगू? हसत-खेळत जेवणं चालली होती
अर्ध जेवण झाल्यावर हे म्हणाले, ‘‘तूही बस की आता.’’ आत गेले, माझी बिनखोबऱ्याची, बिनगुळाची भाजी, आणि कोरडय़ा पोळ्या घेऊन आले. काय सांगू, यांनी स्वत: माझं ते ताट बाजूला सारलं, सुनेचा, मुलाचा आग्रह, ‘‘आई, मसालेभात कित्ती मस्त, खा ना. आधी वडा खा एकदम टॉप.’’
पाठोपाठ यांचा आग्रह, ‘‘गुलाबजामून खातेस? की मोतीचूर आवडेल?’’ आता मात्र माझे डोळे भरले, कधी कधी प्रेमसुद्धा सहन होत नाही. मुलाकडे पाहून म्हणाले, ‘‘अरे, मला मधुमेह आहे. हे जर आज खाल्लं, तर उद्या माझ्या रक्तातली साखर वाढणार नाही का? तुम्ही सारे छान जेवलात की माझं समाधान होतं.’’ त्याच्याशी बोलत असताना हे माझ्या मागे येऊन कधी उभे राहिले ते कळलंच नाही, माझ्या खांद्यावर त्यांचा हात, प्रेमाचा, दिलासा देणारा स्पर्श.
 डोळ्यात अपार माया.. एरवी मी कधी गोड खाताना दिसले, तर चष्म्यातून , गरागरा फिरणारे डोळे पाणावले होते, माझं ताट स्वत: वाढून दिलं, ताटात गोड, तिखट, तळलेले चमचमीत पदार्थ होते, गुलाबजामचा  तुकडा चमच्यात घेऊन, माझ्या तोंडासमोर आणला तेव्हा, मुलासमोर भारी संकोच वाटला हो. ‘‘खा गं, थोडी शुगर आज वाढली तर वाढू दे, एका गोळीऐवजी दोन घे, राहिलेलं आयुष्य तुला काय हवं ते खाऊन राहा.’’
 त्यांचा त्या क्षणाला मी मान राखला, पण माझं पथ्याचंच जेवण जेवले, यांनी आणि इतरांनी कितीही आग्रह केला तरी गेली तीस वर्ष मी जे पथ्य करते, तेच करणार आहे, कारण मधुमेहात पथ्य फार महत्त्वाचं आहे, हे मला माहीत आहे, म्हणून तर माझं आरोग्य चांगलं आहे, या प्रसंगामुळे एक चांगली गोष्ट झाली, माझ्यावरचा पहारा संपला आहे. कुलपं निघाली आहेत, माझी सुटका झाली आहे, याचाच मला आनंद झालाय, आपलं दु:ख दुसऱ्याला समजलं आहे. यापेक्षा कोणतं सुख हवं असतं आयुष्यात?   
माधवी कविश्वर-madhavi.kavishwar1@gmail.com