12 August 2020

News Flash

आरे रांग..आरे रांग रे

‘सुख म्हणजे बरोबर, दु:ख म्हणजे चूक’ हे कुणी ठरवलं? त्यापेक्षा किमचे ‘वर’ आणि ‘खाली’ हे शब्द मला छान तटस्थ वाटले.

| March 22, 2014 12:55 pm

‘सुख म्हणजे बरोबर, दु:ख म्हणजे चूक’ हे कुणी ठरवलं? त्यापेक्षा किमचे ‘वर’ आणि ‘खाली’ हे शब्द मला छान तटस्थ वाटले. सुखाला आणि दु:खाला आपोआप ‘सारखंच’ करून टाकणारे. एका नाटकातलं एक वाक्य आहे. ‘आयुष्याने कधीच ‘तुला मी फक्त सुखच देईन’ असं वचन दिलं नव्हतं कुणालाच. नव्हतंच दिलं खरंच.. मग ‘फक्त सुखच दे’ हे भांडण कुणाशी आणि का?
मध्ये इंटरनेटवर एक व्हिडीओ पाहिला. एक छोटं बाळ. साधारण सात-आठ महिन्याचं! त्याची आई त्याच्याशी खेळते आहे. ते तिला आसपासच्या वेगवेगळय़ा गोष्टी खिदळत दाखवत आहे. ती त्याला प्रतिसाद देत त्या गोष्टींकडे पाहते आहे. मग अचानक ती आई हळूहळू प्रतिसाद देणं बंद करते. बाळाच्या आधी लक्षात येत नाही. ते आपलं खिदळत तिला काहीबाही दाखवतच आहे. ती मात्र थंडपणे त्याच्याकडे पाहते आहे. त्याचं खिदळणं हळूहळू मावळायला लागतं. ते पुन्हा पुन्हा त्या गोष्टी तिला दाखवायला लागतं. तिच्या प्रतिसादाची असोशीनी वाट पाहतं. ती थंडच! आता मात्र त्या छोटूच्या चेहऱ्यावरचं हसू पूर्ण मावळतं. त्याचे डोळे भयचकित होतात. ते आता असह्य़पणे तिच्याशी काही बोलू पाहतं. तरीही ती थंडच! अखेर त्याचा धीर सुटतो आणि ते भोकांड पसरतं. त्या क्षणी मात्र कुठल्याशा प्रयोगाचा भाग म्हणून थंड राहणाऱ्या त्या आईचंही ते थंड अवसान सुटतं आणि ती पुढे झेपावत ‘सॉरी बाळा’ म्हणत त्या चिमुकल्याला कवटाळते. ते इटुकलं इतकं घाबरलेलं असतं की आईनं घेऊनही कितीतरी वेळ ते हमसून रडतंच राहतं. आई पाठीवरून हात फिरवत राहते. काही वेळानं त्याला तो स्पर्श ओळखू यायला लागतो आणि ते तिच्या डोळय़ात पाहतं. ती प्रेमानं त्याच्या डोळय़ात बघून हसते. त्याचं रडणं कळ दाबल्यासारखं थांबतं. तो कुठलासा बालमानसोपचाराशी संबंधित प्रयोग होता.
या प्रयोगात ती आई आणि ते मूल डोळय़ांनी आणि स्पर्शानी एकमेकांशी जे काही बोलत होते ते पाहाणं चित्तथरारक होतं. लहानपणी आपल्याला आपलं ‘असणं’ हे फक्त आई-बाबांच्या डोळय़ातूनच कळत असतं. त्यांचे डोळे हीच आपली ‘जाणीव’ असते. त्यांच्या डोळय़ांत जर आपण नसू तर आपण अस्तित्वातच नाही असं इटुकल्यांना वाटत असावं आणि ती भोकांड पसरत असावीत. त्या अर्थानं लहानपण हे क्षणोक्षणी ‘आई दिसली नाही किंवा तिच्या डोळय़ांत ‘आपण’ दिसलो नाही की ‘मरण’ आणि ती दिसून, तिच्या डोळय़ात आपण दिसून, तिचा हात पाठीवरून फिरला की ‘पुन्हा जिवंत होणं’ असतं! पण अगदी लहान असताना दरवेळी भोकाड पसरलं की आपसूक पाठीवरून फिरणारा आईचा हात मोठा होता होतासुद्धा क्षणोक्षणी, दरवेळी तसाच पाठीवरून फिरत राहील, असं कसं शक्य आहे? प्रत्येक आईला तिचं बाळ मोठं व्हायला हवं असतं. मग त्यासाठी लहानपणच्या त्या पिल्लाच्या प्रत्येक रडण्याला धावून जाणारी ती आई ते थोडं मोठं झाल्यावर त्याला रडू देते. त्याला जे हवं ते त्याला स्वत:च स्वत: मिळवू देते. तिला माहीत असतं, कधीकधी तिच्या धावून न जाण्यानंही ते पिल्लू मोठं होणार असतं. तसं ते होतंही. सगळं काही आपापलं करायला लागतं. स्वत:चं आयुष्य स्वत:च्या हातात घेऊ पाहतं. स्वत:ची वेगळी स्वप्नं पाहत मोठं होऊ पाहतं. पण ते वयानं कितीही मोठं झालं तरी आईला त्या डोळय़ांत तिच्या पाठीवरून फिरणाऱ्या हाताचं अप्रुप कायम राहतं. नुसतं राहत नाही तर अधनंमधनं त्याची आठवण जागी होत राहते, मोठं झाल्यावरही. काही वेळांना त्या जाग्या झालेल्या अप्रुपाला समोरून हवा तसा प्रतिसाद मिळतो. मग मोठं झालेल्या आपल्या आतलं ते इटुकलं आई दिसल्यासारखं चेकाळून खिदळतं. पण कधीकधी आत जाग्या झालेल्या त्या आईच्या, तीव्र आदिम आठवणीला समोरून प्रतिसाद मिळतही नाही. कधी आई या जगातही नसते. बऱ्याचदा तर मोठं झाल्यावर ती जवळही नसते. कधीकधी आतल्या इटुकल्याला ते कळतच नाही. त्याची समजूत पटतच नाही, आतल्या आत ते आकांत मांडतं. माझ्या काय, कुणाच्याच आयुष्यात या वेळा सांगून येत नाहीत. आतून एकदम घाबरल्यासारखं, एकुटवाणं वाटतं. बाहेरचं सगळं खरं तर जिथल्या तिथं असतं. भरभरून प्रेम करणारा नवरा आता घरी नसला तरी कामात कुठे ना कुठे असतो. मित्रमंडळी असतात कुठे ना कुठे, समोर नसली तरी.. आईसुद्धा कुठल्या ना कुठल्या गावी असते. तरी काहीच पोचत नाही आत, असं वाटतं. मला नेमकं असं कुठल्या कुठल्या वेळांना वाटतं याचा मी गेली काही र्वष अभ्यास करते आहे. म्हणजे माझ्या या क्षेत्रानं मला तो अभ्यास करणं भाग पाडलं आहे. अगदी वरवर पाहता मला जाणवतं, माझं आवडतं काम मी करत असेन, तेव्हा माझ्यातल्या छोटय़ाला आई भेटल्याचा आनंद होतो. तसं नसेल तर ते आईशिवायचा आकांत मांडतं. आवडतं काम चालू असतानासुद्धा या घाबऱ्याघुबऱ्या आकांताच्या वेळा येतातच..
माझ्या क्षेत्रातली माझी एक मैत्रीण एकदा म्हणाली होती, ‘नाटकाच्या तालमींचे पहिले काही दिवस, पहिले काही प्रयोग, सिनेमाच्या किंवा मालिकेच्या चित्रीकरणाचे पहिले काही दिवस, सिनेमा लागल्यानंतर तो हिट का प्लॉप हे त्याचं भवितव्य ठरवणारे दिवस, मालिकेचं भवितव्य ठरवणारा, तिचा ‘टी.आर.पी.’चा आकडा काय हे कळण्याचा दिवस, कुठल्याही पुरस्कारांची नामांकनं जाहीर होण्याचा दिवस, पुरस्कार वितरणाचा दिवस हे सगळे कितीही मोठा कलाकार असो, तो वरवर कितीही शांत आहे, असं दाखवतो. आतून तो सशासारखा कावराबावरा असतो.’
यावेळी मला माझे ‘ती फुलराणी’ नाटकाचे सुरुवातीचे दिवस आठवतात. नाटक आल्या आल्या त्याच्यावर अनेक परीक्षणं लिहून आली. माझं पहिलं मोठं नाटक. वय लहानच! काही परीक्षणांमध्ये इतकी स्तुती होती की माझ्यातलं इटुकलं आई दिसल्यासारखं आतल्या आत चेकाळून खिदळलंच! पण काही परीक्षणांमध्ये अचानक खूप टीकाच लिहून आली! इतकी टीका की आतल्या कावऱ्याबावऱ्या इटुकल्यानं आकांतच मांडला. त्यातली काही वाक्यं वाचून तर मला हमसाहमशी रडायला यायला लागलं. तसंच मी दिङमूढही झाले. मला कळेना यातलं नेमकं खरं काय? एकाच भूमिकेविषयी ही दोन टोकाची मतं? मी या सगळय़ाचं काय करायला हवं? सगळय़ात आधी प्रकर्षांनं जाणवलं, बाहेरून कितीही काही टोकाचं आलं तरी आत हे जे टोकाचं उसळतं आहे ते सावरायला हवं. आनंदानं चेकाळलं आणि दु:खानं उन्मळणं हे जर सारखंच व्हायला लागलं तर कठीण होईल. या क्षेत्रात तर अजूनच कठीण. कधी मनासारखं काम असेल, कधी जमेलही हे सगळं उतू न जाता शांत सांभाळायला शिकायला हवं. हे मला ‘फुलराणी’च्या परीक्षणांनी सुरुवातीच्या दिवसातच शिकवायला घेतलं. गेली कित्येक र्वष मी ते शिकते आहे. त्या शिक्षणातला एक सुंदर धडा मी नुकतीच त्रिवेंद्रम् महोत्सवासाठी केरळला गेले होते तेव्हा मिळाला. तो धडा देणाऱ्या माझ्या गुरूचं नाव आहे, ‘किम किडुक.’ हा साऊथ कोरियातला मोठा चित्रपट दिग्दर्शक आहे. त्रिवेंद्रम् चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच गेले होते. तिथे लोक चित्रपट संपल्यावर श्रेयनामावलीतलं शेवटचं नाव संपेपर्यंत बसून असतात. त्यानंतर कडाडून टाळय़ा वाजवतात. चित्रपट संपताच त्यावर भरभरून प्रश्न विचारतात. चित्रपटातला विचार जाणून घ्यायची धडपड करतात. ‘किम किडुक’चे चित्रपट सगळे तिथल्या लोकांनी पाहिले होते. त्याला बघण्यासाठी तिथे झुंबड उडाली होती. धक्काबुक्की चालू होती. मी याआधी एवढी गर्दी मुंबईत बच्चनसाहेबांना बघायला लोटल्याची पाहिली होती. पण एका दिग्दर्शकाला बघायला एवढी धक्काबुक्की मला नवीन होती. त्याच्या चित्रपटाला एवढी गर्दी झाली की प्रेक्षकातली काही माणसं गुदमरून बेशुद्ध पडली. (एक माणूस माझ्या चित्रपटाचा दिग्दर्शक सुनील सुकथनकर याच्या मांडीवर पडला!) किमच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमातही एकमेकांच्या उरावर चढून लोकं प्रेक्षागृहात घुसू पाहत होती. किमला इंग्रजीचा शब्दही येत नाही. त्याला प्रेक्षकांनी इंग्रजीत विचारलेले प्रश्न त्याच्या कोरियन भाषेत समजावले जात होते आणि त्याची कोरियन उत्तरं आम्हाला इंग्रजीत सांगायला एक दुभाषी बसवली होती. माझ्या सुदैवानं त्या खेचाखेचीतला, पोलिसांच्या कडय़ातनं धावणारा ‘किम किडुक’ जसा बघायला मिळाला तसाच, माझा चित्रपट त्या महोत्सवात असल्यानं त्या महोत्सवातल्या पाटर्य़ाना जाता आल्यानं त्या पाटर्य़ामध्ये कुठल्याही सुरक्षेशिवाय वावरणारा, विनम्र, हसरा, साधा, एकटा बसून आसपासच्याचं शांत निरीक्षण करणारा किम किडुकही बघायला मिळाला. तो ते दोन्ही इतकं सहज घेत होता. थिएटरमध्ये त्याचं नाव घेऊन आरडाओरडा करणारी तुडुंब गर्दी आणि पाटर्य़ामध्ये त्याच्या आसपास फारसं कोणी नसणं या दोन्ही अवस्थांमध्ये त्याच्या चेहऱ्यावर एक शांत सौम्य हसू होतं. बुद्धासारखं! आमच्या क्षेत्रातले काही ‘स्टार्स’ त्यांच्याभोवती गर्दी नसेल तर कसंनुसे, अस्वस्थ झालेले मी पाहिले आहेत. मग ते अस्वस्थपणे गॉगल्स चढवतात. केसातनं हात फिरवायला लागतात. किम पाटर्य़ामध्ये एकटा शांत बसून होता. तो त्या महोत्सवाचा प्रमुख पाहुणा होता. त्याच्या भाषणाचा शेवट त्यानं एका गाण्यानं केला. त्या गाण्याचं नाव ‘आरे रांग..’ त्यानं या नावाचा चित्रपटही बनवला आहे. भाषण झाल्यावर त्यानं दुभाषीला जागेवर बसण्याची खूण केली आणि माईक घेऊन तो समोर त्याच्या नावानं आरडाओरडा करणाऱ्या प्रचंड जनसमुदायासमोर आला. त्यानं पहिला शब्द उच्चारला मात्र.. ‘‘आरे रांग..’’ समोर सन्नाटा पसरला. तो गाऊ लागला.. ‘‘आरेरांग, आरेरांग, आरेरांग रेऽऽ.’’  ते गाणं कोरियन भाषेतलं आहे. कदाचित माझे शब्द इकडे तिकडे होतील, पण त्यानं सांगितलेला त्याचा अर्थ मात्र कानात घट्ट आहे! ‘‘आरे रांग’’चं मराठी भाषांतर साधारण. ‘‘वर खाली, वर खाली, वर खाली रेऽऽ वर खाली, वर खाली, वर खाली रेऽऽ’’ असं होईल. ‘आरे रांग’ म्हणताना किमचा एक हात नागमोडी लहरी दाखवल्यासारखा वर आणि खाली जात होता. गाणं संपल्यावर तो म्हणाला, ‘आरे रांग.. धीज इज लाईफ.’ आणि टाळय़ांचा कडकडाट झाला. ‘वर खाली हेच आयुष्य..’’ म्हणत नागमोडी वर खाली हालणारा किमचा हात मी विसरू शकत नाही. ते गाणं त्या दिवसानंतर जवळजवळ रोज मी मनात म्हणते आहे. किमसारखा नागमोडी हात हलवत. कुठंतरी वाचलेलं या निमित्तानं आठवतं आहे, ‘सुख म्हणजे बरोबर, दु:ख म्हणजे चूक’ हे कुणी ठरवलं? त्यापेक्षा किमचे ‘वर’ आणि ‘खाली’ हे शब्द मला छान तटस्थ वाटले. सुखाला आणि दु:खाला आपोआप ‘सारखंच’ करून टाकणारे. एका नाटकातलं वाक्य आहे- ‘आयुष्याने कधीच ‘तुला मी फक्त सुखच देईन’ असं वचन दिलं नव्हतं कुणालाच.’ नव्हतंच दिलं. खरंच.. मग ‘फक्त सुखच दे’ हे भांडण कुणाशी आणि का? सामावणंच खरं. एकदम लक्षात आलं, माझ्या आत वर-खाली उसळणाऱ्या ज्या लाटांना मी इतकी घाबरते आहे, त्याच लाटांचं किम गाणं गाऊ पाहात आहे. लाटांना घाबरणं मागे टाकून त्याचं गाणं करणं शक्य आहे.. नव्हे, वर खाली लाटा म्हणजे आयुष्य आहे.
आरे रांग, आई हवी आहे- आई दिसली- आनंद-लाट वर, आई नाही आली. दु:ख-लाट खाली, परीक्षण चांगलं-वर, वाईट-खाली, पैसे आहेत-वर, नाहीत-खाली, सिनेमा चालला-वर, पडला-खाली, मी प्रेमाच्या माणसाच्या मिठीत आहे-वर, खूप वर.. तो माणूस माझ्याजवळ नाही, खाली.. घाबरू नकोस. दोन्ही योग्य आहे. थिजू नकोस, चालत राहा.. आरे रांग.. आरे रांग.. आरे रांग रे..   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2014 12:55 pm

Web Title: life not committed just pleasure
Next Stories
1 सुंदर मी आहेच!
2 मैत्र जीवांचे
3 सोबुक्वे
Just Now!
X