News Flash

निरांजनातील ज्योत

एखाद्या क्रांतिकारकाची पत्नी असणं हा अनुभव ती पत्नीच घेऊ जाणे. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं आयुष्यही असं स्वातंत्र्यासाठी धगधगत होतं. त्यांच्या पत्नीचं, गोपिकाबाईचं आयुष्य कसं

| February 14, 2015 02:47 am

एखाद्या क्रांतिकारकाची पत्नी असणं हा अनुभव ती पत्नीच घेऊ जाणे. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं आयुष्यही असं स्वातंत्र्यासाठी धगधगत होतं. त्यांच्या पत्नीचं, गोपिकाबाईचं आयुष्य कसं होतं त्या काळी?
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त (१७ फेब्रुवारी ) गोपिकाबाईंच्या आठवणी जागवणारा लेख.
सुमारे सात दशकांपूर्वीचा तो प्रसंग अजून माझ्या आठवणीत ठाम आहे. पनवेलच्या फडके वकिलांच्या वाडय़ात गडबड उडाली होती. पनवेलच्या एका सभेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आले होते, ते सभास्थानी जाण्यापूर्वी फडके वाडय़ात आले आणि दिवाणखान्यातील क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांच्या प्रतिमेसमोर वंदन करीत नतमस्तक झाले. तेथून ते मागील अडोशाच्या एका खोलीत गेले आणि तेथे बसलेल्या एका धीरगंभीर वृद्धेसमोर त्यांनी लोटांगण घातले आणि उद्गार काढले, ‘बाई, तुमचे पती हे महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढय़ाचे अग्रणी. ते जरी हुतात्मा झाले असले तरी त्यांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य आम्ही लवकरच आणूच आणू.’ बाई गहिवरल्या होत्या आणि मला या प्रसंगामुळे प्रथमच समजले, गेली अनेक वर्षे मी पाहत असलेल्या, खिन्न चेहरा लाल पदराखाली झाकून घेणाऱ्या या बाई, म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांच्या पत्नी-गोपिकाबाई फडके.
जुन्नरचे कुंटे कुटुंब पुण्यातच राहण्यास आले आणि त्यांनी आपली कन्या गोपिका हिला पती नियोजित केला तो शिरढोणच्या धनाढय़ फडके घराण्यातील वासुदेव याला. इंग्रज सरकारच्या डिफेन्स-अकाऊंटस्मध्ये नोकरी, इंग्रजी शालान्त परीक्षा उत्तीर्ण, गोरापान सशक्त मुलगा असे ते सुस्थळ. नववधूने, श्रीमंती स्थिर कौटुंबिक आयुष्याची स्वप्ने मनात बाळगली असणारच. पण त्यांचा संसार एका खडकाळ वळणावरच गेला. गोपिकाबाईंचा संसार आणि वासुदेव बळवंताचे क्रांतिकार्य जवळपास एकदम सुरू झाले. तरीही एखाद्या सुसंस्कृत सोशीक भारतीय स्त्रीसारखी त्यांनी त्यांच्या चळवळीला मूक संमतीच दिली. लौकिकदृष्टय़ा अशिक्षित असलेल्या गोपिकाबाईंना धार्मिक ग्रंथ वाचनाचा छंद होता. धकाधकीच्या त्या संसारात वाचन त्यांना खूप मन:स्वास्थ्य आणि मनोबल देत असे. अल्प संसारातसुद्धा वासुदेवरावांनी त्यांना घोडेस्वारी, दांडपट्टा फिरवणे, बंदूक उडविणे या कला शिकविल्या होत्या. पुण्यात थट्टीवाल्यांच्या वाडय़ात बिऱ्हाड असताना, मागीलदारच्या वडाच्या झाडाला निशाण बांधून त्यावर बंदुकीच्या गोळीचा नेम त्या अचूक मारत.
   क्रांतिकार्य सुरू झाले आणि गोपिकाबाईंचा चिंताकाळ सुरू झाला. यजमानांचे वेळी अवेळी घरी येणे. येताना धगधगत्या कार्यकर्त्यांना, नाहीतर भयावह रामोशांना बरोबर आणणे आणि तासन्तास लढय़ाची चर्चा करणे हे त्यांना नित्याचे झाले. गोपिकाबाई धीर करून त्यांना विचारीत, ‘आपण कशात गुंतला आहात?’ त्यावर त्यांचे उत्तर असे, ‘आपल्याला संपूर्ण लुटू पाहणाऱ्या या इंग्रजांना या देशातून घालवून देण्यासाठी मी लढा उभारला आहे. आपल्याला लवकरच स्वातंत्र्य मिळेल आणि मग मी तुला सन्मानाने परत आणेन. तोपर्यंत तू काही दिवस जुन्नरला माहेरी जातेस?’.. पण परत यजमानांची भेट कधी झालीच नाही. त्या भयग्रस्त बातम्या ऐकत होत्या. सावकारांना लुटले, पुण्याच्या खजिन्यावर ताबा मिळवला, सरकारी सैनिक मागावर, गाणगापूरला अटक, राजद्रोहाचा खटला भरला, आगीच्या बंबात घालून जाळणार, फाशी तर नक्कीच.. असे अनेक तर्क आजूबाजूचे लोक त्यांच्यासमोर वर्तवीत आणि ‘हीच ती बंडखोर वासुदेव बळवंतांची बायको’ असा हिणकस निर्देश करत. अखेर त्यांना जन्मठेप-काळेपाणी झाल्याचे समजले. अंदमानमधील जन्मठेप म्हणजे जिवंतपणी थडग्यात गाडणे. गोपिकाबाई उद्ध्वस्त झाल्या. खटल्याच्या वेळीसुद्धा त्यांना, यजमानांची भेट नाकारली गेली आणि गोऱ्या सैनिकांच्या पहाऱ्यात त्यांना शिरढोणला स्थानबद्ध केले गेले.
तीन वर्षांनी सरकारी तार आली. ‘कैदी क्र. ० वासुदेव फडके यांचे १७ फेब्रुवारी १८८३ या दिवशी तुरुंगात निधन.’ बाईंना अकाली वैधव्य.. एकदा आत्महत्येचा प्रयत्न करूनसुद्धा त्यापुढे ५७ वर्षे त्या जीवित होत्या. दु:खी छटा असली तरी गोरापान धीरगंभीर चेहरा. घरातील सर्वाना सांभाळून घेण्याची वृत्ती या स्वभावामुळे त्यांच्या, पनवेलच्या पुतण्यांनी त्यांचा स्वत:च्या आईसमान सांभाळ केला. स्वातंत्र्य जवळ आले आणि गोपिकाबाई जनतेमध्ये काहीशा वंदनीय झाल्या. तरी त्यांनी कधीही आपल्या या संसाराबद्दल खंत व्यक्त केली नाही. आयुष्यभर स्वत: जळत राहूनसुद्धा निरांजनातील ज्योतीसारखा सोशीकतेचा प्रकाश त्यांनी स्त्रियांना दाखविला. १७ फेब्रुवारीच्या पुण्यतिथीदिनी क्रांतिवीरांचे पोवाडे गात असताना त्यांच्या पत्नीच्या मूकत्यागाचे विस्मरण होता कामा नये.    
मधुसूदन फाटक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 2:47 am

Web Title: life of a wife of martyr vasudev balwant phadke
Next Stories
1 स्वातंत्र्य लढय़ातील योगदान
2 तुणतुण्याची सुटता साथ..
3 शुभ्र काही जीवघेणे
Just Now!
X