15 August 2020

News Flash

झाली फुले कळ्यांची! : सहजीवनाचे नाबाद अर्धशतक

‘‘कार अपघातातून वाचल्यावाचल्या अशोक लगेच कामाला लागलाच. पुढे त्याचे हíनयाचे ऑपरेशन झाले.

| December 20, 2014 01:01 am

‘‘कार अपघातातून वाचल्यावाचल्या अशोक लगेच कामाला लागलाच. पुढे त्याचे हíनयाचे ऑपरेशन झाले. ताबडतोब अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. उपचारानंतर ठीकठाक झाले नि हा लगेच कामाला हजर.. मला यांत कधी मध्ये पडून ‘आता हे थांबव,’ असे म्हणावेसे वाटत नाही, कारण हेच त्याच्या आणि माझ्या सहजीवनाचे मर्म आहे, स्वान्तसुखाय जगण्याचे! पण वर्षांतून एकदा तरी आम्ही दोघेच ठरवून ८-१० दिवसांसाठी लांब फिरायला जातो, सगळे सगळे मागे टाकून! एकमेकांना अजूनही नव्याने ओळखतो आणि भावश्रीमंत होऊन परततो.’’ सांगताहेत लातूरमध्ये सार्वजनिक ‘काकू काका’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. ज्योत्स्ना कुकडे, आपले डॉक्टर पती डॉ. अशोक कुकडे यांच्याबरोबरच्या ५० वर्षांच्या सहजीवनाविषयी..

आ म्ही आमच्या सहजीवनाचे ‘नाबाद’ अर्धशतक ९ डिसेंबर २०१४ या दिवशी पूर्ण केले. विश्वास नव्हता बसत असे अर्धशतक गाठण्याचा; पण अखेर गाठलेच. तसे ‘क्लीन बोल्ड’ व्हायचे प्रसंग आयुष्यात दोघांच्याही आले; पण कधी झेल सुटले, कधी धावचीत होता होता वाचलो. ५ वर्षांपूर्वी तर मदानावरच्या पंचाने ‘आऊट’ म्हणून बोट वर केलेच होते. मामला तिसऱ्या पंचाकडे सोपवला. त्याने ‘नॉट आऊट’ असा निकाल दिला आणि आजही आम्ही मदानावर टिकून आहोत..
आमच्या विवाहाची तारीख ९ डिसेंबर १९६४. त्याआधी वर्षभर एकमेकांना भेटणे, ओळखणे चालू होते, त्याचबरोबर दोघांचे पदव्युत्तर शिक्षणही. मी स्त्री-रोग प्रसूतिशास्त्र या विषयात डी.जी.ओ., तर डॉ. अशोक सर्जरीमध्ये एम.एस. करत होता. आम्ही दोघेही पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी. डॉ. अशोक माझ्यापुढे दोन वष्रे. मला अभ्यासाव्यतिरिक्त इतर भानगडींत खूपच रस. मग ती आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा असेल; कॉलेजच्या स्नेहसंमेलनातल्या नाटकांत काम करणे असेल; कलोपासक मंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून असेल; रात्र रात्र वसतिगृहातल्या मत्रिणीबरोबर गप्पा मारणे असेल; मला सगळे मनापासून प्रिय, या सर्वात कधीच कुठे               डॉ. अशोकचा परिचय झालेला नव्हता, मात्र कॉलेज अभ्यासक्रमांत रुग्णांच्या निदानावर, त्यांच्यावरील उपाययोजनेवर अभ्यासपूर्ण चर्चा घडणाऱ्या क्लिनिकल मीटिंग्ज दर १-२ महिन्यांनी व्हायच्या. अशा वेळी आम्ही नुसते श्रोते, तर अशोकचा अगदी सक्रिय सहभाग. उलटसुलट मुद्दे काढून ‘बॉस’ला कोंडीत पकडणार. ‘फारच स्मार्टपणा दाखवतो गं हा कुकडे,’ असे आम्ही म्हणायचो.
आमच्या अशा कॉमेन्ट्स त्याच्या एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षांचा निकाल लागेपर्यंत चालूच होत्या. निकाल लागला तेव्हा     डॉ. अशोक सर्वप्रथम, तीन विषयांतही प्रथम, अनेक पारितोषिके जाहीर झाली. तेव्हा मात्र आम्ही गपगार झालो. ‘मानलं पाहिजे हं कुकडेला’ अशी आमची नरम प्रतिक्रिया. मी पूर्वाश्रमीची ज्योत्स्ना गोखले. माझेही शिक्षण कुठेही नापासाचा शिक्का न लागता सुरळीत पार पडले आणि मीही चक्क डॉक्टर झाले.
शिक्षण संपले आणि घरी लग्नाचा विषय चालू झाला. डॉ. अप्पासाहेब पेंडसे पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी या प्रख्यात संस्थेचे संस्थापक सदस्य, माझे सख्खे धाकटे मामा. डॉ. अशोक आणि मामांचे नाते गुरू-शिष्याचे. अप्पा म्हणजे अत्यंत आदरणीय असे प्रेरणास्रोत. त्यांच्या नियमित भेटीगाठी असत. एक दिवस अप्पा मामांनी मला बोलावून विचारले, ‘‘काय गं! तुमच्या कॉलेजच्या डॉ. अशोक कुकडेला ओळखतेस का? पाहा एकदा त्याच्याशी बोलून.’’ मी एकदम उडालेच! पण मग भेटण्याचे ठरले. माझी उत्सुकता आणि मानसिक ताण दोन्ही वाढलेले आणि त्या संध्याकाळी अशोकने स्वत:ची विस्तृत ओळख करून दिली, कुकडे कुटुंबाचा परिचय, मध्यम आíथक स्थिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लहानपणापासून असलेली जवळीक, वैद्यकीय क्षेत्रातही संघटन करण्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा, एकत्रित व्यवसायाचा दृढ विचार, गरजेपुरते पसे मिळतील, पण छानछोकी, ऐषआराम आयुष्यात नसेल, पुणे सोडावे लागेल, ज्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा नाहीत अशा ठिकाणी मला जायचे आहे, मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही काम करायला आवडते, किंबहुना संघविचाराच्या प्रेरणेतूनच अशा तऱ्हेचा संघटित वैद्यकीय व्यवसाय करण्याचा विचार आम्ही काही मित्र करत आहोत वगरे वगरे बरेच काही.    
मी नुसती ऐकत होते, अचंबित होत होते. स्वत:च्या आयुष्याची अशी सखोल विचारपूर्वक प्रामाणिक मांडणी करता येऊ शकते? मला त्याचा प्रामाणिकपणा, जिद्द, आत्मविश्वास स्पर्शून गेला. ‘‘मला आवडेल असे आयुष्य जगायला,’’ मी मनापासून सांगितले यानंतरच्या अनेक भेटींत एकमेकांना ओळखायचा प्रयत्न करत राहिलो.  लग्नानंतर पुणे  सोडून लातूरसारख्या छोटय़ा गावांत आम्ही जायला ठरवले. लातूरचे नावही आम्ही प्रथमच ऐकलेले. ४ जानेवारी १९६६ रोजी डॉ. बाबा अलूरकर (भूलतज्ज्ञ), त्यांच्या पत्नी शरयूवहिनी, सर्जन डॉ. अशोक आणि प्रसूतितज्ज्ञ मी – आम्ही चार आणि आमचे चार असे खरेखुरे एकत्रित सहजीवन सुरू झाले. सत्यनारायण कर्वा आणि रामेश्वरजी भराडिया यांचा आम्हाला भक्कम आधार आजपर्यंत मिळत राहिला. प्रथम भाडय़ाच्या १२ खोल्यांच्या अर्धवट, पूर्णावस्थेत असलेल्या वास्तूंत ९ खोल्यांत रुग्णालय; ३ खोल्यांत आमचे एकत्र कुटुंब अशी सहजीवनाची वाटचाल सुरू झाली.
सुरुवातीला ५ कर्मचारी होते. आलेल्या रुग्णांची आस्थेने केलेली विचारपूस, योग्य उपचार, काटेकोरपणा, शिस्त, वेळेचे नियोजन यामुळे आता लातूरकरांना विवेकानंद रुग्णालय ‘आपले’ वाटायला लागले. परिवारातले सर्वात ज्येष्ठ डॉ. अलूरकर यांना ‘बाबा’, शरयूताईंना ‘वहिनी’ आणि आम्हाला सार्वजनिक ‘काकू काका’ अशी ओळख मिळवून दिली. ९ जून १९६७ ला आमची लाडकी कन्या अनघा विवेकानंद परिवारात दाखल झाली. १९६९ मध्ये डॉ. गोपीकिशनजी भराडिया व कांता भराडिया कुटुंबात सामील झाले. एका निष्णात फिजिशिअनची उणीव भरून निघाली. त्यानंतरही डॉ. महेश व डॉ. अरुणा देवधर, डॉ. दिलीपराव देशपांडे, अलका, डॉ. अभय ढगे, वैशाली व अनेक असेच सहकारी ‘संघटित वैद्यकीय व्यवसायाचे स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी सामील झाले. डॉ. अशोक संघाच्या कामात अधिकाधिक गुंतत होता तेवढाच यशस्वी सर्जन म्हणूनही लातूरकरांना तो परिचित होता. मीही माझ्या आवडीच्या इतर क्षेत्रांत काम करू लागले. महिला रुग्णांच्या शारीरिक तपासणीबरोबरच त्यांच्या दु:खांची, कौटुंबिक प्रश्नांची उकल सहजच होऊ लागली. महिला मंडळाची स्थापना, ‘भारतीय स्त्री शक्ती’ संघटनेची सक्रिय कार्यकर्ती, काही खास महिलांसाठीच्या सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण चर्चा, परिसंवाद, वैद्यकीय क्षेत्रांतही निरनिराळ्या चर्चासत्रांतून सहभाग यामुळे माझी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
सगळे सुरळीत चालले तर आयुष्य ते कसले! पहिला दणका बसला तो १९७५ साली. आणीबाणी २६ जूनला जाहीर झाली. तोपर्यंत भाडय़ाच्या खोल्या सोडून स्वत:च्या जागेत रुग्णालय हलवले होते आणि समरसून काम चालू होते. आणीबाणीत संघावर बंदी आली. देशभर धरपकड, अटकसत्र सुरू झाले. ६ जुलला डॉ. अशोकला मिसाबंदी म्हणून अटक झाली. मागे उरलो, मी आणि         डॉ. गोपीकिशनजी भराडिया आणि रुग्णालयाचा वाढता व्याप. आणीबाणीचा काळ किती लांबेल याचा कुणालाच अंदाज नव्हता; पण १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिराजींचा पराभव झाला आणि तब्बल २२ महिन्यांनी आणीबाणी हटवली गेली. या २२ महिन्यांत केवळ पत्ररूपानेच (तीही सेन्सॉर होत असत.) अशोक व मी एकमेकांना धीर देत राहिलो. या २२ महिन्यांत मी व डॉ. गोपीकिशनजींनी रुग्णालयाच्या कामांत झोकून दिले. अनघाकडे लक्ष देणे अवघड होत चालले. तिला पुण्याला, माझ्या सासरी शिक्षणासाठी पाठवून दिली. ज्ञानप्रबोधिनी संस्थेतच नंतर तिचे शालेय शिक्षण झाले. (पुढे मानसशास्त्र विषयात पीएच.डी. करून खऱ्या अर्थाने डॉक्टर होऊन आज ती ज्ञानप्रबोधिनीच्या प्रज्ञामानस विभागाची प्रमुख म्हणून कामात आहे.)     
आता आम्हाला आहे ती जागा कमी पडायला लागली. शेजारचीच जागा मिळत असल्याने ती जागा संपादन करून त्यावरच्या सुसज्ज रुग्णालय वास्तूचा आराखडा तयार झाला. भूमिपूजनासाठी मुहूर्त ठरला २१ मार्च १९८२ आणि पाहुणे होते अटलबिहारी वाजपेयीजी! जोरात तयारी चालू झाली. अचानक एक दिवस स्नान करताना मला उजव्या ब्रेस्टमध्ये सुपारीएवढी गाठ लागली. डॉक्टर असल्याने साधारण अंदाज आला. डॉ. अशोकला कल्पना दिली. प्रश्न होता, भूमिपूजन होईतो थांबावे का नाही! पण डॉ. बाबा अलूरकर व डॉ. भराडियांनी निक्षून सांगितलं, ‘ताबडतोब पुण्याला जा. इकडचे आम्ही पाहून घेऊ.’ दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे पुण्याला आलो. आवश्यक त्या तपासण्या होऊन १८ मार्चला माझ्यावर शस्त्रक्रिया झाली. गाठ कर्करोगाचीच होती. तिसऱ्या दिवशी जड अंत:करणाने डॉ. अशोक लातूरला परतला. भूमिपूजनाचा कार्यक्रम देखणा झाला. आज त्या जागेवर सहा मजली सुसज्ज वास्तू उभी आहे.
आलेल्या प्रत्येक संकटाकडे एक संधी म्हणून पाहायची दृष्टी विवेकानंद परिवाराला मिळाली आहे. ३० ऑक्टोबर १९९३ ला किल्लारीला पहाटेच मोठा भूकंप झाला. गांभीर्य लक्षात आले. डॉ. भराडिया, डॉ. अशोकच्या मार्गदर्शनाखाली सर्वच डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी जिवापाड श्रम घेतले. पुढे एक वर्षभर भूकंपग्रस्तांना विनामूल्य सेवा पुरविली, त्यांचे पुनर्वसन केले. ‘संघटित वैद्यकीय व्यवसायाचे’ हे फलितच म्हणायचे. यासाठी देशपरदेशांतून अनेक देणग्या आमच्यावरच्या विश्वासामुळे आम्हाला मिळाल्या त्या योग्य विनिमयाच्या खात्रीमुळेच. याही संकटाला संधी मानून रुग्णालयाने ‘आपि अपघात उपचार केंद्राची’ सुसज्ज स्वतंत्र वास्तू बांधली.
१९९४ मध्ये दिवाळीत आम्ही दोघे अमेरिकेला अशोकच्या बहिणीकडे गेलो होतो. एका कार्यक्रमाला कारने चाललो होतो. क्षणात दुसरी कार वेगाने आमच्या कारवर आदळली. आमची गाडी गर्रकन फिरली आणि बंद पडली. पुढच्या सीटवर डॉ. अशोकला एकदम भोवळ आली. क्षणांत सर्व काही संपल्यासारखे वाटले. सुदैवाने कारचालक व मी बऱ्यापकी सुस्थितीत होतो. माझा हात अशोकच्या पल्सवरच होता. हळूहळू कण्हत अशोकने डोळे उघडले आणि आम्ही सुस्कारा सोडला. काही काळातच अशोक लगेचच कामाला हजर!
२००८ मध्ये पुण्याला डॉ. अशोकचे हíनयाचे ऑपरेशन झाले. दुसऱ्या दिवशी आरामात अनघाच्या घरी आलो. सर्व आलबेल असताना अचानक अशोकने रात्री ८ वाजता मला हाक दिली. त्याला खूप अस्वस्थ वाटत होते. मी नाडीची गती पाहिली, ती २०० च्या पुढे. ताबडतोब रूबी हॉलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. योग्य उपचारामुळे संकटातून बाहेर पडलो. एकदा ठीकठाक झाले, की हा परत कामाला तयार, संघाच्या कामासाठी देशभर प्रवास जारी.. मला यांत कधी मध्ये पडून  ‘आता हे थांबव,’ असे म्हणावेसे वाटत नाही, कारण हेच त्याच्या आणि माझ्या सहजीवनाचे मर्म आहे – स्वान्तसुखाय जगण्याचे! पण वर्षांतून एकदा तरी आम्ही दोघेच ठरवून ८-१० दिवसांसाठी लांब फिरायला जातो, सगळे सगळे मागे टाकून! एकमेकांना अजूनही नव्याने ओळखतो आणि भावश्रीमंत होऊन परततो.
२००९ साली मला परत एका गंभीर आजाराला सामोरे जावे लागले. आता तर मला जिभेचाच कर्करोग झाला. अशीच एका क्षणी एक विचित्र गाठ हनुवटीखाली लागली. संशय आलाच! तो बायोप्सीनंतर खरा ठरला. वयाच्या सत्तरीत हे काय नवीन वाढून ठेवले असावे – त्यावर उपचार पद्धती एकच रेडिएशन. रेडिएशनचे इतके दुष्परिणाम मी सोसले की, ‘आता नको – मला जाऊ दे सुखाने’ असे म्हणण्याची वेळ आली.
म्हणण्याची म्हणजे लिहून दाखवायची – कारण आवाज बंद, गिळणे बंद, प्रचंड वेदना, मानेवरच्या जखमा – नळीतून अन्नपुरवठा, कधी अतिदक्षता विभागात पाठवणी –          डॉ. अशोक प्रचंड मानसिक ताण अनुभवताना दिसत होता. तासन्तास माझा हात हातात धरून बसायचा. माझी सर्व जबाबदारी, शुश्रूषा, मनोधर्य टिकवण्याचे काम लेक अनघा व जावई प्रसादने न बोलता केले. डॉ. भराडियांनी मला रेडिएशन संपल्यावर ताबडतोब लातूरला हलवण्याचा आग्रह धरला. मी लातूरला गलितगात्र अवस्थेत आले आणि काय ऐकायला मिळाले? माझी प्रकृती सुधारावी म्हणून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी नवस बोलला आहे. काही मत्रिणी रोज सकाळी प्रार्थना करत आहेत. रुग्णालयाच्या परिचारकांनी माझ्या शुश्रूषेसाठी डय़ुटी लावून घेतल्या आहेत! सारेच अनाकलनीय! इतकी सगळी फिल्डिंग लावल्यावर तिसऱ्या पंचाला ‘नॉट आऊट’ म्हणावेच लागले असणार! याही संकटाचे विवेकानंद परिवारातल्या सहजीवनकर्त्यांनी संधीत रूपांतर केले आहे. एक अद्ययावत रेडिएशन आणि ब्रॅकीथेरपीची सुविधा असलेले केंद्र कर्करोगग्रस्तांसाठी उभे आहे. येत्या  विवेकानंद जयंती दिनाच्या मुहूर्तावर ही सेवा रुजू होईल.
सहजीवनाचे हे अर्धशतक त्यामुळेच अधिक उठावदार वाटत आहे. यांत विवेकानंद परिवाराचा सिंहाचा वाटा आहे. आज आमच्या सहजीवनाचे फिक्स्ड डिपॉझिट मॅच्युअर झाले आहे. जो लाभ होईल तो बोनस म्हणून स्वीकारायचा. आम्ही खरेच तृप्त आहोत, कृतार्थ आहोत, कृतज्ञ आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2014 1:01 am

Web Title: life of dr jyotsna and ashok kukade
टॅग Chaturang,Loksatta
Next Stories
1 पुनर्वसन होता होता..
2 शिक्षणात पास होण्यासाठी
3 मदतीचा हात : मानवसेवेचे महामंदिर
Just Now!
X