संपूर्ण जीवन समर्पित वृत्तीने  जगणारे तपस्वी, रामेश्वर त्र्यंबक कर्वे ऊर्फ तात्या कर्वे आज ९६व्या वर्षीही पेणमधील शाळेत विनामूल्य संस्कृत शिकवण्याचं काम करत आहेत. या सच्च्या देशभक्ताने स्वातंत्र्यसंग्रामातही आपलं योगदान दिलं. त्यासाठी तुरुंगवास भोगला. शस्त्रांचे वार झेलले आणि तरीही स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारं पेन्शन मात्र, ‘मी जे केलं ते देशासाठी केलं.’ म्हणत नम्रपणे नाकारलं. राष्ट्रोद्धाराची तळमळ सदैव उरी बाळगणाऱ्या भारतमातेच्या या सुपुत्राची ही विलक्षण जीवनगाथा खास १५ ऑगस्टच्या निमित्ताने..
राष्ट्रासाठी झिजणे कणकण ।
तेच खरे हो विजयी जीवन ।।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे ब्रीद, एक व्रत म्हणून आयुष्यभर आचरणाऱ्या अलिबागमधील किहीमच्या ९५ वर्षीय रामेश्वर त्र्यंबक कर्वे ऊर्फ तात्या कर्वे यांचं जीवन म्हणजे एक वादळाची कथा आहे. तात्यांनी अनेक क्षेत्रांत आपलं आयुष्य मनस्वीपणे झोकून दिलं. आधी नगर आणि मग अलिबाग परिसरातील लहानलहान वस्त्यांत, पाडय़ापाडय़ात शेकडो शाळा (अंदाजे दीडशे) काढल्या. जातिभेद नष्ट व्हावेत, राष्ट्र एकसंध व्हावं मुलामुलींना स्तोत्र, मंत्र, पूजाविधी.. इ. शिकवण्याचा वसा घेतला. त्यानुसार हजारो विद्यार्थ्यांना अथर्वशीर्ष, पुरुषसुक्त, श्रीसुक्त, रुद्र.. असा मंत्राभ्यास विनामूल्य शिकवला. त्यामुळेच आज कोकणसारख्या विकसनशील भागातील कोळी समाजातील मुलीही स्वच्छ उच्चारात मंत्र म्हणून गणेशाची पूजा करताना दिसतात. पाठय़पुस्तकातील प्रतिज्ञा मुलं संस्कृतमध्ये तोंडपाठ म्हणून दाखवतात. विशेष म्हणजे ही मुलं दर वर्षी निरपेक्षपणे हजारोंच्या संख्येने एकत्र येतात व सामूहिक मंत्रपठण करतात. अलिबागच्या ग्रामीण भागात दिसणारं हे अपूर्व दृश्य म्हणजे तात्या कर्वे यांच्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येला आलेलं एक मधुर फळ आहे. इतकंच नव्हे या सच्च्या देशभक्ताने स्वातंत्र्यसंग्रामातही आपलं योगदान दिलं. त्यासाठी तुरुंगवास भोगला. शस्त्रांचे वार झेलले आणि तरीही स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारं पेन्शन मात्र, ‘मी जे केलं ते देशासाठी केलं.’ म्हणत नम्रपणे नाकारलं.
 ज्ञानप्रबोधिनी, पेण आयुर्वेद संघटना अशा मान्यवर संस्थांनी दिलेली मानपत्रं, महाराष्ट्र शासनाचा महाकवी कालिदास संस्कृतसाधना पुरस्कार (२००७) असे सन्मान तात्यांकडे चालत आले अन् त्या पुरस्कारांनाच तेजोवलय लाभलं. असा हा संपूर्ण जीवन समर्पित वृत्तीने जगणारा तपस्वी आज ९६व्या वर्षीही पेणमधील ‘अहिल्या महिला मंडळाच्या संस्कृत पाठशाळेत विनामूल्य संस्कृत शिकवण्याचं काम करत आहे. राष्ट्रोद्धाराची तळमळ सदैव उरी बाळगणाऱ्या भारतमातेच्या या सुपुत्राची ही विलक्षण जीवनगाथा खास १५ ऑगस्टच्या निमित्ताने..
२६ सप्टेंबर १९१९ हा तात्यांचा जन्मदिवस. ठिकाण किहीम. सातवीपर्यंतचं शिक्षण तिथेच झालं. मुंजीनंतर त्यांनी गावामध्येच गुरुवर्य विष्णू हर्डीकर यांच्याकडे ब्रह्मकर्मातील संध्या, ब्रह्मयज्ञ, पुरुषसुक्त, श्रीसुक्त, अथर्वशीर्ष यांचा अभ्यास केला. पुढे याज्ञिनी शिकण्यासाठी ते नगरला गेले. तेथे ललितमामा नावाच्या दशगं्रथी ब्राह्मणाकडे त्यांनी पूजा, अभिषेक, लग्न, मुंज, श्रावणी अशा विधींची माहिती करून घेतली. त्याचबरोबर महादेवशास्त्री मुळ्यांकडे संस्कृत शिकायलाही सुरुवात केली.
नगरमधील वास्तव्यात काही ठरावीक दिवस ते वारावर जेवत व उरलेल्या दिवशी माधुकरी मागत. त्या लहान वयातही त्यांनी स्वत:साठी काही नियम आखून घेतले होते. ते म्हणजे ताटातला पदार्थ कितीही आवडला तरी पुन्हा मागायचा नाही आणि दुसरा नियम फक्त पाचच घरी माधुकरी मागायची. तीन वेळा ‘ओम् भवती भिक्षान् देही’ म्हणूनही घरातील बाई बाहेर आली नाही तर मुकाट माघारी फिरायचं. या सवयी तात्यांच्या हाडीमांसी एवढय़ा खिळल्यात की आज पाणीदेखील ते पुन्हा मागत नाहीत. जेवढं ग्लासात असेल तेवढंच पितात.
त्या काळी नगरच्या उत्तरेला गावाबाहेर महार समाजाची वस्ती होती. या वस्तीच्या पलीकडे अनाथगृहाची विहीर होती. या विहिरीवर ते आंघोळीला जात. जाता-येताना त्यांची वस्तीतल्या मुलांशी ओळख झाली आणि त्यांनी त्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. पहिलं वर्ष तोंडी शिकवण्यात गेलं. मग कुणाची तरी ओसरी मिळाली. फळा आला. अन् तात्यांची पहिली शाळा सुरू झाली. सर्व मुलांचा १ ली ते ४ थीपर्यंतचा अभ्यास ते एकत्रच करून घेत. हिंदी सोडून सर्व विषय स्वत:च शिकवत. या व्यवस्थेला नियमितपणा आल्यावर जिल्हा परिषदेच्या परवानगीने तिथल्याच एका जाणत्या मुलाच्या ताब्यात ती शाळा देऊन ते बाजूला झाले. दुसऱ्या वस्तीत हाच प्रयोग. अशा प्रकारे त्यांनी नगरच्या वस्तीवस्तीत अनेक शाळा सुरू केल्या. या ज्ञानप्रसाराचा मोबदला घेण्याची कल्पनाही त्यांना शिवली नाही. शिक्षणाबरोबर तात्यांनी तिथल्या पुरुषवर्गाची दारू सोडवली. त्यांना आंघोळीच्या व इतर स्वच्छतेच्या सवयी लावल्या. मुख्य म्हणजे हे सर्व त्यांनी स्वत: विद्यार्थी असताना केलं.
दरम्यान, ललितमामांनी त्यांना वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत जाऊन संस्कृतमधील प्रगत शिक्षण घेण्याविषयी सुचवलं आणि ते वाईला आले. प्राज्ञ पाठशाळेत विनोबा भावे यांचे सहकारी बाबा लेले व व्याकरणाचार्य पाध्ये गुरुजी या ऋषितुल्य गुरूंच्या मार्गदशनाखाली त्यांचं अध्ययन सुरू झालं.
स्वातंत्र्याचे वारे वाहणारा तो काळ. वाई -सातारा परिसरात तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिशांविरुद्ध पत्री सरकारची स्थापना केली होती. तात्या या चळवळीकडे ओढले गेले. जुलमाने वागवणाऱ्या गोऱ्यांना संपवायचं, हा पत्री सरकारचा त्या वेळचा एककलमी कार्यक्रम. तात्या वयाने व उंचीनेही लहान असल्याने, अपेक्षित व्यक्ती समोर येताच, पटकन पुढे जाऊन त्याच्या गुडघ्यात डोकं घालून त्याचं लक्ष विचलित करण्याचं काम त्यांच्याकडे होतं. मग बाकीचे पुढे येऊन त्या फिरंग्याला पकडत. असे किती तरी मोहरे तात्यांनी जाळ्यात पकडले. इंग्रजांच्या हातातील शास्त्रांमुळे त्यांना जखमाही झाल्या. तुरुंगात जावं लागलं,पण स्वातंत्र्याच्या ‘नशे’पुढे या गोष्टी क्षुल्लक  होत्या.
प्रज्ञा पाठशाळेतील काव्यतीर्थ अभ्यासक्रमाची चार वर्षे पूर्ण झाल्यावर परीक्षा, प्रमाणपत्र, पदवी यांच्या वाटेला न जाता तात्या आपल्या गावी किहीमला परतले. नगरला असताना भिक्षुकीत मिळालेले थोडे पैसे त्यांच्याजवळ होते. त्यातून त्यांनी किहीमजवळच नांदाईचा पाडा येथे शेतजमीन घेतली व त्यानंतर शेती, शाखेचं काम व आजूबाजूच्या गावांत शाळा काढणं असा त्यांचा तीनकलमी कार्यक्रम सुरू झाला.
१९४८ मध्ये तात्यांचा प्रेमविवाह झाला. त्यांची पत्नी शकुंतला (पूर्वाश्रमीची गीता पेठे) यांचं माहेर श्रीमंत होतं. वडील डॉक्टर होते. साहजिकच त्यांना आपल्या तोलामोलाचं स्थळ हवं होतं. माहेरच्यांचा रोष पत्करून शकुंतला या निष्कांचन फकिराकडे आल्या आणि पुढे जन्मभर नवऱ्याच्या फाटक्या, पण स्वाभिमानी संसाराला मायेची ठिगळं जोडत राहिल्या.   
त्या वेळी गावोगावी शाळा काढणं या एकाच ध्येयाने तात्या झपाटले होते. अलिबागच्या आसपास दिवसाला ४ ठिकाणी जाऊन ते एकटे ४ शाळा चालवत. त्यासाठी चाळीस-चाळीस मैल अंतर ते पार करत. कधी सायकलने तर कधी पायी. त्यांच्या स्वत:च्या गरजा अत्यंत कमी होत्या, आहेत. केससुद्धा पुन्हा-पुन्हा कापण्याचा खर्च नको म्हणून टाळूसरशी कापत.
तेव्हा अलिबाग तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच हायस्कूलं होती. त्यामुळे लांब, लांबच्या गावांतली मुलं ४ थी, फार-फार तर ७ वी झाली की घरीच बसत. तात्यांनी या मुलांसाठी किहीमजवळ चौंडी गावात ८ वी ते ११ वीपर्यंतची शाळा सुरू केली. नाव दिलं ‘लोकमान्य विद्यालय’ आता या संस्थेचं कॉलेजही झालंय. शाळेतील मुलं सतत गैरहजर राहिली की त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणींचं निवारण करून त्यांना परत शाळेत आणायचं कामही तात्या करत. असाच शोध घेताना एकदा त्यांना समजलं की नमूताई आणि सुमन या चितळ्यांच्या दोन मुली बरीच वर्षे नुसत्याच घरी बसल्यात. पुढे न शिकण्याचं कारण होतं, ‘हायस्कूलात जाण्यासाठी बरे कपडे नाहीत.’ हे समजताच शकुंतलाताईंनी आपल्या मोजक्या नऊवारी तीन साडय़ांपैकी एक अधिक त्यांच्या आईची एक अशा दोन साडय़ा फाडून त्याच्या तीन सहावारी साडय़ा शिवल्या. (एक जास्तीची असू दे म्हणून) गाडग्या-मडक्यात थोडी चिल्लर मिळाली त्यातून मांजरपाटाचं कापड आणून परकर-पोलके शिवलं. या शिदोरीवर त्या बहिणी मॅट्रिक झाल्या. जिल्हा परिषदेत नोकरीला लागल्या आणि आज स्वत:ची पेन्शन घेत सन्मानाने जगत आहेत.
पतीच्या सेवायज्ञात शकुंतलाताई कायम समिधा बनून राहिल्या. तात्या थंडीवाऱ्यात वणवण फिरतात म्हणून त्यांनी स्वत:च्या हाताने एक छानसा स्वेटर त्यांच्यासाठी विणला. तो नवाकोरा स्वेटर घालून तात्या बाहेर पडले आणि येताना थंडीने कुडकुडणाऱ्या कोणा गावकऱ्याला देऊन आले. यावर त्या माऊलीचे उद्गार होते, ‘बरं झालं, दिवसभर तुमच्या अंगावरपण राहिला आणि त्या गरिबीलाही ऊब मिळाली.’
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भेटीची आठवण तात्यांच्या मनावर कायमची कोरली गेलीय. सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्यांना भेटण्यासाठी एकदा तात्या तिथे गेले होते. समोर उभ्या असलेल्या किडकिडीत गृहस्थाला संस्कृतमध्ये विशेष गती आहे हे कळल्यावर स्वातंत्र्यवीर उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘सर्व जातीधर्माच्या मुलांना संस्कृत शिकवायचं काम तू कर. हीच तुझी देशभक्ती आणि हेच तुझं स्वातंत्र्यासाठीचं योगदान.’ सावरकरांनी दिलेल्या या आदेशाचं तात्या कर्वे यांनी देवाज्ञा मानून पालन केलं, आजही करत आहेत. तात्यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेतली आणि शाळाशाळांत जाऊन मुलांना अथर्वशीर्ष व इतर छोटी-छोटी स्तोत्रं शिकवायला सुरुवात केली. हा उपक्रम झपाटय़ाने फोफावला. थळ, पोयनाड, शहाबाज, नागाव, रेवदंडा, माणकुल, पोफेरी व अलिबाग येथील माध्यमिक शाळा तसंच अलिबाग तालुक्यातील ७ वीपर्यंतच्या सर्व मराठी शाळा यांमधील मुलांना स्तोत्रं शिकवल्यावर साडेपाच हजार विद्यार्थ्यांच्या सामुदायिक मंत्रपठणाचा कार्यक्रम मुनवली (ता. अलिबाग) येथे साजरा झाला तो पाहून अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं.
 तात्यांचा गीर्वाणभाषेच्या प्रसाराचा निरपेक्ष धडाका सुरू असताना त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचं काय हा प्रश्न मनात येतो. तात्यांना एकूण ४ मुलं, १ मुलगा व ३ मुली. शिवाय एकत्र कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेतलेली. पोटापुरतं अन्नधान्य शेतीतून मिळे. बाकी गरजांसाठी उत्पन्नाचा एक लहानसा स्रोत म्हणजे परदेशी विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्यासाठी ते मधून-मधून मुंबईला जात. (स्वातंत्र्यपूर्व काळात तर त्यांनी वाईचे डी.एस.पी. मिस्टर हर्ट यांच्या ‘गोऱ्या’ पत्नीला ‘शाकुंतल’ शिकवलंय.) शिवाय पौरोहित्यातून मिळणारी दक्षिणा व संस्कृत शिकवण्यापोटी वर्षअखेर शाळांमधून परस्पर घरी पोहोचवलं जाणारं अल्पसं मानधन (तात्या हात लावत नसल्याने) यावर त्यांचा संसार तरून गेला.
१९९९ पासून तात्या पेणमध्ये राहायला आले. त्यानंतर तीन वर्षांनी शकुंतलाताईंची साथ सुटली. त्या आधीच म्हणजे १९९७ मध्ये तात्यांच्या मोठय़ा मुलीनं, वासंती देव हिने वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पेणमध्ये दुर्बल गटातील महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी अहिल्या महिला मंडळाची स्थापना केली. जुलै २००३ मध्ये मंडळातर्फे संजीवन वृद्धाश्रम व इंदिरा संस्कृत पाठशाळा सुरू झाली. तेव्हापासून या वृद्धाश्रमातील (हा तात्यांचाच आग्रह) तात्यांच्या स्वतंत्र खोलीत संस्कृत शिकण्यासाठी इच्छुकांची जा-ये सुरू झाली.
तात्यांपाशी संस्कृत शिकलेल्यांची संख्या पाहताना आपली मती कुंठित होते. पहिली, दुसरीच्या मुलांपासून पीएच. डी.च्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि गृहिणींपासून आयुर्वेदिक डॉक्टरांपर्यंत जो त्यांच्याकडे आला तो संस्कृतमध्ये न्हाऊन निघाला. आता आश्रमातील आया, मावशीही  वेळप्रसंगी आपलं बोलणं कुणाला कळू नये म्हणून संस्कृतमधून बोलतात. उदा. एक दुसरीला सांगते, ‘अहं कार्यालये न आगच्छामी स्वह:!’ (म्हणजे मी उद्या दांडी मारणार आहे) आहे की नाही गंमत?
आज वयोमानाप्रमाणे एक वेळ तात्यांना सकाळी कोण भेटून गेलं? दुपारी काय खाल्लं ते आठवत नाही, पण एखादा संस्कृत ग्रंथ उघडायचा अवकाश त्यांच्या जिभेवर सरस्वती नर्तन करू लागते. तुम्ही कोणत्याही श्लोकाला सुरुवात करा पुढचा भाग तात्यांनी पूर्ण केलाच म्हणून समजा. आजही एका महिन्यात बोली संस्कृत शिकवायची त्यांची हमी आहे. फक्त तुमची तयारी हवी.
आत्ता आत्तापर्यंत म्हणजे ९२-९३ वयापर्यंत तात्या एस.टी.ने एकटय़ाने प्रवास करत. आजूबाजूच्या गावातील स्त्री-पुरुषांना संस्कृत व्याकरण व पौरोहित्य शिकवत होते. आत्ताही त्या लाल डब्याच्या गाडीतून जायची त्यांची तयारी आहे, पण मनाई केल्यामुळे आता त्यांचं कार्यक्षेत्र पेणमध्येच एकवटलंय. अहिल्या महिला मंडळाच्या वसतिगृहातील वनवासी कल्याण आश्रमाच्या २५ मुलींना व्याकरण व अथर्वशीर्ष शिकवायला त्यांनी सुरुवात केलीय. त्यांना संस्कृत-विशारद बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे. आत्तापर्यंत पेणमधील ४०/४५ स्त्रियांनी तात्यांकडून शिकून एम.ए. संस्कृत ही पदवी मिळवलीय.
९५ वर्षांचे तात्या सकाळी ५ ला उठल्यावर रात्री ९ ला झोपेपर्यंत अंथरुणाला पाठ टेकत नाहीत. सकाळी २ ते ३ तासांत ३ ते ४ वर्तमानपत्रांचा फडशा पाडतात. त्यांच्या तोंडात एकही दात नाही. कवळी का नाही बसवली यावर त्यांचं उत्तर, ‘जेव्हा अन्नाची गरज कमी होते तेव्हाच दातांचं उच्चाटन होतं हे निसर्गाचं चक्र आपण समजून घ्यायला हवं.’ पण ‘तोंडाचं बोळकं’ असूनही वाणी एकदम स्पष्ट व स्वच्छ. खाकी हाफ पॅन्ट, पांढरा शर्ट व काळी टोपी या त्यांच्या नेहमीच्या वेशात ते बाहेर निघाले की येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे आदराने वळतात. रिक्षावाले एवढंच नव्हे तर बसचे ड्रायव्हरही थांबून तात्या कुठे निघालात? सोडू का? असं आदराने विचारतात. न मागता मिळणारा हा सन्मान ही त्यांची स्वकष्टार्जित पुण्याई आहे.   

Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
pune digitization, digitization social and political documents pune
पुण्यातील दीडशे वर्षांच्या सामाजिक-राजकीय दस्तऐवजाचे ‘डिजिटायझेशन’; पुणे सार्वजनिक सभेचा पुढाकार, निधीची मात्र चणचण
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान