04 March 2021

News Flash

पटरीवरचं धावणं

घरातल्याचं पोट भरायचं तर रेल्वेतल्या पोलिसांचा ससेमिरा चुकवायचा, डब्यातल्या बायकांच्या शिव्या खायच्या, जे काय १००-२०० रुपये मिळतील त्यातच आयुष्य घालवायचं.

| February 21, 2015 02:52 am

घरातल्याचं पोट भरायचं तर रेल्वेतल्या पोलिसांचा ससेमिरा चुकवायचा, डब्यातल्या बायकांच्या शिव्या खायच्या, जे काय १००-२०० रुपये मिळतील त्यातच आयुष्य घालवायचं. दुसरं आयुष्यच माहीत नसलेल्या आणि रेल्वे डब्यात टिकल्या, कानातले, गळय़ातल्या माळा विकणाऱ्या..पटरीवरच आयुष्य गेलेल्या शालूबाईची कहाणी.

‘‘ए ऽ शंकरअम्मा या डब्यात कशापायी चढली गं! तू बी हीच गाडी मारलीस तर माजा धंदा व्हईल का? जा मागची टिटवाळा पकड.’’ दर ठेसनाला बायका चढत्यात उतरतात. पण शंकरअम्मा लई खटय़ाळ. आपल्याला बघिटलं तरी बी त्योच डबा घेनार! मग जुंपते धंदेवाल्या बायांबरोबर. पण ती काय ऐकत न्हाय! आता मी बी सकाळधरनं तीन गाडय़ा मारल्या. ११ वाजता माल भरला आन् निघाले. आता चार वाजलेत. भूक लागलीया. व्हिटी ठेसनावर वडा-पाव खाईन. पानी पिईन आन ईळभर बसन. पर आपून बसलं का धंदा बसला. दोन टायमाचं जेवण, घरातलं काम करूनशान घर सोडलं तवापासून दिसभरात घटकाभर बसायला बी मिळालं न्हाय? पण काय करणार? सकाळी गर्दीच्या टायमाला गाडी मारता येत न्हाय. गर्दीत घुसायला बी मिळत न्हाय. आपला माल गर्दीत सांडला लवंडला तर नुसकान हायेच. वर कोनाला जरा धक्का लागला तर बायांचे शिव्याशाप हायेतच! मला कळना बया, या बायकाबी पोटासाठीच लोकलच्या गर्दीतून जात्यात का न्हाय? पन आमी पोटासाठी धंदा करतो तर आमाला शिव्या भेटत्यात! काय म्हनायचं याला? आमी बी हौसेनं न्हाय करत धंदा! मजबुरी असतीया. लोकांचं कर्ज असतया. फेडाया नगं? आता माजच बगा. दोन मुलं आन् दारूडा न्हवरा आयतं बसून खात्यात! हा येक मुलगा आन सून त्योच धंदा करत्यात. पन ते येगळं ऱ्हातात. त्यांच्या पोरांसाठी कमावत्यात! आमचं काय?
लई वंगाळ जीणं बगा आमचं. या महागाईच्या काळात भागंना झालंय. मंग समद्या न्हाय, पण काय काय बाया लागतात भीक मागाया, पोरान्ला  शिकवितात एकदोन भजनं! आन धाडतात धंदा कराया. दुपारी पोरगं कंटाळलं का आईला इचारतं, माय २०० रुपयाचा धंदा झालाया. जाऊ घरला? पन ती आनी दोनचार गाडय़ा माराया लावती तवाच ते लेकरू घरला जातं. ही पोरं बक्कळ पैका कमावत्यात तवा त्या बायांचं घर चालतं. न्हाई ना ईश्वास बसत? पण खरंय ते.
मी चवदाव्या वर्सी लगीन करून हीथं मुंबईत आले तवा माझ्या आजुबाजूच्या सगळय़ा आमच्या पारधी समाजातल्या बाया याच धंद्यात व्हत्या. मी बी शिकले त्यांच्याकडून माल भरायला. आन गाडी मारायला लागले. पोटुशी असताना बी धंदा करायची आन नंतर लेकरू झोळीत घालूनशान पाटुंगळीला बांधून दिवसभर धंदा करायची. आज तीसच्यावर वर्स झाली. हाच धंदा करती मी!
सकाळच्या पारी माल भरायचा. रोज नवा माल! ३ रुपयाची किलीप ५ रुपयाला इकायची. ५ रुपयाची माळ धा रुपयाला इकायची. दिवसाला दोनशे रुपये भेटलं तर शंभर रुपये घरी न्यायचं. पुन्ना शंभर रुपयांचा माल भरायचा. कधी माल कमी पडला तर कोणाकडून बी उधारी घ्याची आन दुसऱ्या दिवशी माल भरायचा. न्हायतर अशोक सारडा शेठ हाय! भला मानूस! देतो माल उधारीवर! पर बाया त्यान्ला बी फसिवतात. उधारी बंद करून टाकतात. पण गिऱ्हाईक टिकवायचं तर रोज माल नवा भरावाच लागतो. आता या धंद्यात पयल्यासारका पैसा न्हाय मिळत. आता काय झालया. लई पोरं शिरल्यात या धंद्यात. ती चालत्या गाडीत चढतात, उतरतात. लेडीसचे तीन-तीन डबे फटाफट मारत्यात. फटाफट उडय़ा मारूनशान गाडय़ा बदलत्यात. बायांना असं कराया जमतं व्हय? मेलं गाडीवर बी ही पोरं धंदा करत्यात अन् लोकल बी मारतात. यांना आपल्या सारकं काय घरदार हाये का पोरंबाळं!
आता बगा मगाधरनं दोन गाडय़ा मारल्या, पण धा रुपयाचा बी धंदा नाय झाला. लघवीला लागलेय कवाधरनं पण पोट दाबूनशान बसलीया. ठेसनावरच्या संडासात जायचंय, पण तिथे बी पाच रुपये घेत्यात. दिसातून चारवेळा जायला काय परवडत न्हाय.  एक दिवस धंद्यावर न्हाय आलं तर दुसऱ्या दिवशी चूल बंद! हातावर पोट आमचं. त्यात घरभाडं, लाईट बील समदं कसं भागायचं? मग व्याजानं कर्ज काडायचं. त्ये बी फेडलं जात न्हाय. मंग लाखाचं कर्ज झालं का सावकार बसतो यिऊनशान दारात! जिवाची हकीकत कोणाला सांगायची? गरीबाचं मरण झालया. पण रीतभात तर गरिबाला बी चुकत न्हाय. आता बगा गेल्या साली पोराचं लगीन करायचं व्हतं. आता लगीन तर गावाकडंच व्हायला हवं. त्ये बी झोकात! गावकीच्या समद्या भाऊबंदांना जेवण असतया. लायटिंग.. बस्ता.. कसं व्हायचं? गावाकडल्यांना वाटतं, मुंबईत धंदा करत्यात आन बक्काळ पैसा कमीवत्यात. पन आमचं हीथं हातावर पोट हाय. ते कोनाला सांगनार हो? तरीबी पोराच्या लग्नासाठी जीव मारून पै-पैका साठवीला आन धंद्यातल्याच एका बाईकडं भिशी लावली. आमी बाया अडाणी! शिक्शान न्हाय. इस्वासानं पैसं दिलं तिजजवळ तर भवानीन् बुडविलंच की आमाला! मला हजारोंचा गंडा घातला. लय जणींना फशीवलं आन आज बी आमच्या संगच धंदा करती. पण काय करणार आमी? आमचं गाऱ्हानं ऐकनार कोन?
येक डाव वाटलं, पोलिसांत जावं. पन ते काय करनार. त्यांचं बी बराबर हाय. सरकार म्हनतं, गाडीत धंदा करायचा न्हाय. पण धंदा न्हाय क्येला तर आमी पोट कसं भरनार वो? आमची मजबुरी पोलिसांना बी कळतीया. पण त्यांची बी नोकरी हाय. त्ये तरी काय करणार? मंग पोलिसांची धाड आली का धंद्यातले सोबती आधीच आवाज देत्यात. सावध करत्यात. मंग आमी ठेसनावर आसलो का लांब पळून जातो माल घिऊन, आन गाडीत असलो तर शिटखाली माल ढकलायचा आन दरवाज्यात जाऊन हुभं ऱ्हायचं! पण पोलीस वळीखत्यात आमाला! माल उचलत्यात आन आमाला कोर्टात हुबं करत्यात. जज म्होरं केस चालती. जज दंड सुनावत्यात. तीनशे रुपये डिपीशन भरायचं. मंग पुरुफ द्यायचं. आधारकार्ड, रेशनकार्ड आन माल सोडवून न्यायचा. पुन्ना गाडी मारायला सुरवात. हे असं असतया आमचं जगनं!
  मी या लायनीत आली तेव्हा लगीन झालं व्हतं. जवान व्हती. भडक माथ्याची. गर्दीत कुनाच्या डोस्क्याला आमची पेटी लागली, पाय पडला पायावर तर बाया लय श्या द्यायच्या. चवथी शीटवाली तर लय बडबड करायची. एरव्हीच्या बाया लय बडबड करत्यात. पन हापीसवाल्या बाया लय चांगल्या असत्यात. त्या दिवशी एका बाईनी मला आईभईनीवरून शिवी घातली. मंग मी बी तिची गचांडी धरली. माझं बी डोस्क फिरलं. येकतर रातभर नवऱ्यानं दारू पिऊन बडविलं व्हतं. त्यानं डोस्क तापलेलं. मंग हापीसवाला ग्रुप बसलेला. त्यातल्या दोगी बायांनी मला सोडवलं. शांत केलं. म्हनली, पोटासाठी बाहेर पडलीस न्हवं? तर शांतपणे धंदा कर. तवा हीथं टिकशील! म्या मानलं ते. तवाधरनं कुणी घासाघीस क्येली तर शांतपणे म्हणाली, ‘‘मावशी आमालाच या भावात माल नाय भेटत तुला कुठून देऊ? पटलं तर घे न्हायतर ठेव!’’ हापीसवाल्या बाया रोज भेटत्यात. वळखत्यात. त्यांच्याशी गोड बोललं का सगळय़ाच काय-बाय घ्येतात. चांगलं बोललं का दहाच्या जागी वीसजणी माल घेत्यात. आता कळतया, वाकडं-वंगाळ बोललं तर धंदा व्हईल? न्हाय व्हनार.’’
परवा दिव्याला दंगा झाला आन् गाडय़ा बंद पडल्या बगा! पाय दुखत व्हते. आंग ठणकत व्हतं. त्यात हा राडा झाला. सोबतीण बी कुनी भेटना. बसले प्लॅटफॉर्मवर तशीच. रातच्या टायमाला तिथं बसनं बी डेंजर! लय भ्या वाटत हुतं. मंग पब्लिकमधल्या भल्या बायका बगितल्या आन गेले त्यांच्यासंग रिक्शानं! दिवसभर कमावलं त्ये गेलं रिक्शावाल्याच्या डोस्क्यावर?
आता उमर ग्येली याच लायनींत? हा धंदा सोडूनशान काय करणार? आमास्नी द्या काही चांगलं. आमाला तरी कुठं हवंय असं रोज रोज पळणं. आमाला मुंबईत ना स्वत:चं घर ना गावाकडं घरदार शेतीवाडी! आमचं आयुष्य गेलं हीथंच! पटरीवर धावन्यात संपलं. तसंच संपनार. सकाळ झाली की, चला उचला पेटी. गाडी लागलीया.. चढाया हवं.. चालाया हवं..    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 2:52 am

Web Title: life on the railway track
Next Stories
1 ज्ञानाचा विस्तार
2 ..अन् मनावर दगड ठेवला
3 दाटून येते सारे..
Just Now!
X