आयुष्याच्या रुळांवरून घसरलेले जगण्याचे डबे परत रुळावर आणावेच लागतात. फक्त गरज असते ती कष्ट करण्याची आणि आत्मविश्वासाची. वयाच्या ३६व्या वर्षी आलेले वैधव्य मागे ठेवून २९ वर्षांपूर्वी रत्नागिरीसारख्या ठिकाणी झेरॉक्सचा व्यवसाय सुरू करणाऱ्या सुलभाताईंच्या आयुष्यातला हा ‘यू टर्न’ त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं वळण ठरला.  
तीकाळरात्र. २ डिसेंबर १९८४, बरोबर २९ वर्षांपूर्वीची. अचानक, काहीही कल्पना नसताना माझ्या पतीला झोपेतच मृत्यू आला. हृदयविकाराचा तीव्र झटका. माझ्या सासूबाई, मी, दोन मुलं (वय १० व ७ वर्षे) एवढेच घरात होतो. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. हे गेले, पण अनेक प्रश्न मागे ठेवून!
काही तासातच सर्व नातेवाईक आले. सर्व पार पडले. दिवस संपला. दुसऱ्या दिवसापासून पुढे काय? कोणालाच काही सुचेना. माझ्या भविष्यकाळाकडे मी रित्या नजरेने पाहत होते. भयानक वळण होतं ते आयुष्यातलं. रत्नागिरीतून बदली होऊन आम्ही कोल्हापूर येथे आलो होतो. हे एका नामांकित औषध कंपनीत होते. त्या कंपनीने मला नोकरी देऊ केली, परंतु त्यासाठी मला नाशिकला जावे लागणार होते. वयाच्या ३६व्या वर्षी नवीन गावात जाऊन तेथे जम बसवणे मला सोपं वाटलं नाही. म्हणून मी मुलं आणि  सासूबाईंसह पुन्हा रत्नागिरीला जायचा निर्णय घेतला. तिथे आमचे छोटेसे घर होते. ९ वीपासून मी रत्नागिरीत होते. घरी तर आलो, पण पुढे काय? सर्व प्रश्न पैशाभोवती येऊन थांबतात. कंपनीतून फंड, ग्रॅच्युईटी, पेन्शन काहीही मिळाले नाही. ना जमीनजुमला. थोडय़ाशा शिलकीत पुढचं आयुष्य जाणार नव्हतं. मुलांचं शिक्षणही महत्त्वाचं होतं. त्यासाठी हातपाय हलवणे अपरिहार्य होतं.
लग्नापूर्वी मी सरकारी नोकरी करता करता शिकत होते. रत्नागिरीत आल्यावर माझ्या शिक्षिका प्रा. मेनन मॅडम यांच्या सल्ल्यानुसार मी ३ महिने शिक्षिकेची नोकरी केली. पण माझ्यापेक्षा मोठय़ा भावाला (दत्तात्रय नाफडे) मी काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं. एक दोन जणांचे सल्ले घेऊन त्याने मी अ‍ॅटोमॅटिक झेरॉक्सचा व्यवसाय करावा असं सुचवलं. त्यावेळी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्य़ात (सिंधुदुर्गही) कोठेही झेरॉक्सचा व्यवसाय नव्हता. मी धाडस करायचं ठरवलं. मी व मोठा भाऊ आम्हा दोघानांही घरातून कुणाचा पाठिंबा नव्हता. कारण धंद्यात यश येईलच याची खात्री नसते. दुसरं म्हणजे व्यवसायाची पाश्र्वभूमी कुटुंबात नाही, हेही कारण असावं. आर्थिक फटके बसले तर ते झेलायचीही ताकद नव्हती. पण निर्णय झाला होता.
मोठा भाऊ मुंबईत मशीन बुक करून आला. त्याच वेळी माझ्या पतीचे स्नेही (प्रा. शेडय़े सर) यांनी मी बी.एड करावं असं सुचवलं. त्यांना मी हा व्यवसाय करायचं ठरवलं हे सांगितलं त्यावर त्यांनी ‘तू बी.एड व व्यवसाय हे दोन्ही करायचं आहेस’ असं अधिकारवाणीने सांगितले आणि मी ऐकलं. जुलै  ८५ मध्ये मी व्यवसायाला सुरुवात केली. घरातलं थोडं काम, स्वयंपाक उरकून मी साडे दहा ते साडे पाच बी.एड कॉलेजात जायची. संध्याकाळी ६ वाजता परत फ्रेश होऊन व्यवसायाच्या ठिकाणी जायची. ती रात्री नऊ साडेनऊला घरी येत असे. सकाळच्या वेळात माझा लहान भाऊ (अरुण नाफडे) व एक मैत्रीण (जयश्री बर्वे) व्यवसाय सांभाळत. संध्याकाळी मी एकटी. असं एक वर्ष निघून गेलं. बी.एड.ही चांगल्या मार्कानी पास झाले. या दिवसभराच्या अत्यंत व्यस्त शेडय़ुलमध्ये माझ्या दोनही मुलांची काळजी माझी आई आणि माझ्या दुसऱ्या आई, सासूबाई घेत होत्या म्हणून हे शक्य झालं. बी. एड. झाल्यावर दोन शाळांमधून शिक्षिकेच्या नोकरीची विचारणा झाली, परंतु व्यवसायात जम बसल्यामुळे नोकरीचा विचार केला नाही. सुशिक्षित बेकार योजनेखाली बँकेकडून घेतलेलं कर्ज ३ वर्षांत परत केलं परत नवीन एक मशीन घेतलं. कारण एकाच मशीनवर अवलंबून राहणं योग्य नव्हतं. त्याच वेळी सायक्लोस्टाईलही सुरू केलं. झेरॉक्स व्यवसाय सर्वस्वी मुंबईवर अवलंबून होता. त्यावेळी मेकॅनिक, स्पेअर पार्टस्, कागद सर्व मुंबईहून येई. त्यासाठी माझ्यी दिरांचीही मदत मला झाली.
कधी कधी मशीन १५-१५ दिवस बंद पडे, मधून मधून लाइट जाणं, मेकॅनिक वेळेवर न येणं, स्पेअर्स पार्ट न मिळणं, कागद वेळेवर ऑर्डर देऊनही न येणं, आला तर त्याचा आकार वा दर्जा बरोबर नसणं या सर्वाची जमवाजमव करताना नाकात दम यायचा. फोनसाठी ५-६ मैलावर पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागायचं. अशा वेळी काम साचून राही. त्यावेळी दुहेरी नुकसान सोसावे लागे. झेरॉक्स काम नाही. शिवाय स्पेअर पार्टस्ला पैसे घालावे लागत. तिथेही फसवणूक व्हायची. कधी कधी कामाचा ताण इतका असायचा की १८-१८ तास उभं राहून काम करावे लागे. खूप कंपन्यांची, कार्यालयांची महिन्यांची कॉन्ट्रॅक्ट असायची. त्यांच्याकडून काम घेऊन येऊन परत वेळेवर काम द्यावे लागे. त्यावेळी ऊन-वारा-पाऊस याची तमा नसे.
    हळूहळू आपण स्थिरावतोय याची जाणीव झाली. मुलंही मोठी होत होती. त्यांनाही लहान वयात जबाबदारीची जाणीव व्हायला लागली होती. मुलीने तर ६वीत असताना २-३ तास एकटीने उत्तम दुकान सांभाळले. मुलं खूप वेळा माझ्याबरोबर असायची. त्यांचीही कामात मदत व्हायची. मी थोडं थोडं मशीन दुरुस्त करायला शिकले. मुलालाही त्याची आवड असल्यामुळे तोही छोटय़ा दुरुस्त्या करायचा. त्यामुळे मेकॅनिकवर अवलंबून राहणं कमी झालं. असं करता करता मुलगाही याच व्यवसायात पडला. त्यानं एक पाऊल पुढे टाकलं. स्टेशनरी, झेरॉक्स, लॅमिनेशन, स्पायरल बायडिंग, टोनर रिफिलिंग. आज तोही एक यशस्वी उद्योजक आहे.
२९ वर्षांपूर्वी एका स्त्रीने अशा व्यवसायात पडणं, जो आजही सर्वस्वी मुंबईवर अवलंबून आहे, तो यशस्वी करून दाखवणं हे माझ्यासमोरचं एक आव्हान होतं. पण हे मिळालेलं यश माझ्या एकटीचं नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. प्रामाणिक कष्ट करताना असंख्य हात आपल्याबरोबर असतात असा माझा विश्वास माझ्या बाबतीत सार्थ ठरला. म्हणूनच जीवनात या टर्निग पॉइंटवर आज मी खंबीरपणे उभी आहे.
असाच यू-टर्न माझ्या आईच्याही आयुष्यात आला होता. त्यावेळी तिचं वय फक्त २४ र्वष होतं. माझे वडील मी ३ वर्षांची असताना गेले. त्यावेळी तिच्याकडे ना पैसा होता न शिक्षण होतं. (तिला अ आ इ ईही येत नव्हते) पण तीच माझी आई शिक्षिका झाली आणि आम्हा तीन भावंडांना खूप चांगल्या रीतीने वाढवलं. माझ्यासमोर तिचा आदर्श होता. आता आयुष्याच्या संध्याकाळी ते दिवस आठवले तरी बेचैन होतं. जीवनात अडचणी, वळणं, चढउतार येतात. पण त्यातून धैर्याने मार्ग काढून आयुष्याच्या रुळावरचे घसरलेले डबे परत पटरीवर तर प्रत्येकाला आणावेच लागतात ना?