‘‘खरंच काय लिहायचं सहजीवनाबद्दल? आणि कोणा-कोणाबद्दल लिहायचं? फक्त पती आणि पत्नीचंच सहजीवन असतं का? आई-वडील, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या यांच्याबरोबर घालवलेले लहानपणीचे सोन्यासारखे दिवस हे सहजीवन नाही? मला तरी एकाबरोबर घालवलेलं ते सहजीवन असं मर्यादित स्वरूपात नाही मांडता येणार. ज्या ज्या माणसांनी मला भले आणि बुरेही अनुभव देऊ केले त्या सगळ्यांबरोबर मी जीवन जगलो आणि मला ते सहजीवनच वाटतं.’’आपली पत्नी, सुकन्या कुलकर्णी यांच्याबरोबरच्या आणि सुहृदांबरोबरच्या सहजीवनाविषयी  सांगताहेत सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक  संजय मोने.
सहजीवन म्हणजे नेमकं काय? बरोबर राहणं की जोडीनं राहणं? एकत्र एका घरात राहणं की कुठेही असलं तरी जवळ असल्याची भावना वारंवार उचंबळून येणं? माणूस कंपू करून, टोळी बनवून किंवा गर्दी करून राहतो त्याला सहजीवन म्हणायचं की प्राणी एकत्र कळपानं किंवा झुंडीनं राहतात त्याला सहजीवन म्हणायचं? आजकालच्या धकाधकीच्या आणि न संपणाऱ्या प्रवासानंतर घरी जाऊन आपल्या कुटुंबासोबत देह नेऊन टाकतो त्याला सहजीवन म्हणायचं? की बोलायला वेळ नाही म्हणून एकमेकांशी दूरध्वनीवरून किंवा संदेश पाठवून सगळ्या भावना व्यक्त करतो त्याला सहजीवन म्हणायचं? काहीच कळत नाही. का कळून घेतलं आणि मनातल्या संकल्पनेला तडा गेला तर..? या भीतीनं काही कळून घ्यायचं नाही आणि जोपर्यंत काही होत नाही, घडत नाही तोपर्यंत आपलं मस्त चाललंय.. म्हणून खोटय़ा निर्धास्त भावनेनं आला दिवस गेल्या दिवसापेक्षा बरा निघेल म्हणून एकाच छपराखाली राहायचं, त्याला कुटुंब असं नाव द्यायचं आणि जगण्याचं एक चोवीस तास चालणारं आणि हमखास बेरंग करणारं नाटक आपण प्रमुख पात्र म्हणून अभिनय करून पुढे चालू ठेवायचं?
थांबा! थांबा! थांबा! आता हा लेख वाचणं थांबवावं, असं जर तुम्हाला वाटलं असेल तर थांबा! इथून पुढे असं काहीही मी या लेखात लिहिणार नाही. आता तुम्ही विचाराल.. की हे सद्गृहस्था! मग या आधी हे तू काय लिहिलं आहेस? (तुम्ही मला विचाराल हे उगाच! )
सहजीवन यावर लिहायचं म्हटल्यावर सहजीवनाला सुरुवात केली तितकं मागे जाऊन आठवायला लागणार. तर ते आठवता आठवता त्या काळात असं सदर-बिदर म्हटलं की असंच काहीतरी अनाकलनीय, सुरळीच्या पाटवडय़ा उलगडल्यासारखं लिहायची चूष होती, सोप्या शब्दात सांगायचं तर, फॅशन होती. पूर्वी गावाला आज्याबिज्या वाती वळायच्या आणि वळता वळता पेंगायच्या. त्या काळात असलंच काहीतरी वाचून वाचून आम्हीही पेंगायचो आणि झोपी जायचो. त्या काळात अनेक लेखक असे झोपेला हमखास रामबाण उपाय होते. अर्थात अशा लेखांचा शेवट दुसऱ्या दिवशी रद्दीत व्हायचा. त्या काळात सहजीवन ही जगायची गोष्ट होती, आता ती लिहायची गोष्ट झालीय. अभिनय ही करून दाखवायची गोष्ट होती, आता ती लिहून दाखवायची गोष्ट आहे. खरंच काय लिहायचं सहजीवनाबद्दल? आणि कोणा-कोणाबद्दल लिहायचं? फक्त पती आणि पत्नीचंच सहजीवन असतं का? आई-वडील, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या यांच्याबरोबर घालवलेले लहानपणीचे सोन्यासारखे दिवस हे सहजीवन नाही? आणि जगात अविवाहित राहिलेले असंख्य जीव आहेत, त्यांनी सहजीवन म्हणजे काय हे अनुभवलंच नाही असं म्हणायचं का? वादविवाद होऊनही अनेक नाती अबाधित राहतात ते सहजीवनच ना? मला तरी एकाबरोबर घालवलेलं ते सहजीवन असं मर्यादित स्वरूपात नाही मांडता येणार. ज्या ज्या माणसांनी मला भले आणि बुरेही अनुभव देऊ केले त्या सगळ्यांबरोबर मी जीवन जगलो आणि मला ते सहजीवनच वाटतं. लग्नाच्या आधीपासून काही मित्र-मत्रिणी मला होत्या आणि अजूनही आहेत. धनंजय गोरे, सतीश जोशी, अजित भुरे, विजय केंकरे, विनय येडेकर, अंजू प.. हे सगळे माझे तीस ते पस्तीस र्वष जुने..जुने तरी का म्हणू अजूनही नवे नवे मत्रीचे पलू आम्हाला उलगडत जातात, तर इतके जुने मित्र आहेत. आजही आम्ही रोज सकाळी भेटतो आणि त्यांच्याबरोबर घालवलेले हजारो-लाखो क्षण मला हरघडी आठवतात, हे सहजीवनापेक्षा कमी नाहीत. आज माझ्या बायकोला माझ्याबद्दल जितकी माहिती आहे त्यापेक्षा थोडीशी का होईना पण जास्त माहिती त्यांना माझ्याबद्दल आहे. त्याला काहीच अर्थ नाही? लेखात लिहायला किंवा मुलाखतीत बायकोबद्दल सांगताना आमचे संबंध स्फटिकासारखे आहेत, असं म्हणायला फार छान वाटतं, लोक अशा उत्तरांना टाळ्याही देतात पण असं खोटं मला नाही सांगता येणार. आणि जे सांगतात तेही सत्यापेक्षा असत्याच्या जास्त जवळ असतं.. याहून अधिक मवाळ शब्दात मला नाही मांडता येणार.    कै.सुधीर भट आणि कै. विनय आपटे यांच्याबरोबर माझे ८० आणि ९० सालापासून व्यावसायिक संबंध होते त्यातला व्यावसायिकपणा पुढे गळून गेला, त्या मत्रीची गणना कुठे करणार? विजय केंकरेबरोबर मी दहापेक्षा जास्त नाटकं केली. राजीव आणि अरुण नाईक यांनी मला नाटक, सिनेमा, साहित्य याबद्दल नवनवी ओळख करून दिली. त्यांनी माझ्या कक्षा रुंदावल्या, त्याची मोजदाद कशी करणार?
 मी व्यवसाय म्हणून अभिनय करू लागलो, आजही करतो. आणि आजही मी त्याच्याकडे एक व्यवसाय म्हणून बघतो. त्याच्याबरोबरचं माझं सहजीवन मागील सत्तावीस र्वष चालू आहे. त्या माझ्या सहचराने मला काय शिकवलं? तर अभिनय हा इतरांना पसे घेऊन राजरोस फसवण्याचा मार्ग आहे, म्हणजेच इतरांना आपण सातत्यानं त्यांच्या खुशीनं फसवतो, तेव्हा इतरांकडून फसवून घ्यायचं नाही. समोरच्या माणसाच्या बोलण्यामागे एक अदृश्य बोलणं दडलेलं असतं ते ओळखायला शिकायचं. कुठे कुणाकडे पार्टीला किंवा समारंभाला गेलात तर तिथे तुम्हाला तुमच्या नाटकातला काही भाग करून दाखवा ना, असा आग्रह होईल तेव्हा माझ्याऐवजी एखादा डॉक्टर आला असता तर त्याला आऽऽऽ करून घसा दाखवला असतात का, असं ताडकन बोलायला शीक. आणि ते मी आजपर्यंत करत आलोय आणि त्याचा मला झाला असेल तर थोडाबहुत फायदाच झाला आहे. मुळात असं सांगायची िहमत होता कामा नये, असा उग्र स्वभाव मी सोबत बाळगलाय.
  तसा मी साधा-सरळ माणूस आहे. फारसा कोणाचा विश्वास बसणार नाही, पण जरासा प्रेमळही आहे. फारसे कोणाशी वादही होत नाहीत पण उगाच माणसं जवळ आलेली मला आवडत नाहीत. कोणी प्रयत्न केला तर मी कटाक्षानं त्या व्यक्तीला कळेल अशा देहबोलीनं माझं म्हणणं पोचवतो. कदाचित यामुळे फारसं कोणी मला पूर्ण ओळख झाल्याशिवाय आवडत नाही व माझ्या मते म्हणूनच मी फार उशिरा विवाह केला.
आज त्याला सोळा र्वष झाली. त्यामुळे माझ्या लौकिकार्थाने ज्याला सहजीवन म्हणतात त्याला तशी सुरुवात जरा विलंबानं झाली. सुकन्या (कुलकर्णी) बरोबरचा हा जरी प्रेमविवाह असला तरी आमच्यात वादबिद होतात आणि त्याला फार गंभीर कारणं लागत नाहीत. उशिरा विवाहबद्ध झाल्यामुळे आमची दोघांची काही काही बाबतीत मतं फार ठाम झालेली आहेत व ती योग्य आहेत, असाही आमचा ठाम आग्रह आहे. खरं तर माझ्या मते वाद-भांडणं ही झालीच पाहिजेत, कारण त्याशिवाय प्रेम किंवा जीवनाची गरज कळून येत नाही. वाद हे विचार न पटल्यामुळे होतात आणि भांडणं ही दुराग्रहामुळे होतात. माझ्या पत्नीला माणसं जोडण्याची कला अवगत आहे आणि मी माणसांना चार हात दूर ठेवण्यात पटाईत आहे. माझे काही नातेवाईक हे नेमके नात्याने माझे कोण लागतात त्याचा मला इतक्या वर्षांत पत्ताही नाही आणि तिच्यावाचून माझ्या काही नातेवाइकांचं पानही हलत नाही. आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही एकमेकांना एक एक महत्त्वाची गोष्ट शिकवली आहे. फार लहानपणापासूनच तिने तिच्या घराची सर्व जबाबदारी उचलली होती त्यामुळे तिला स्वयंपाक फारसा येत नव्हता, तो मी तिला शिकवला आणि मला तिने लोकांशी कसं वागलं पाहिजे ते शिकवलं. माझ्या परिचित लोकांपकी बरेच जण म्हणतात की मी माणसात आलो हे तिचं यश आहे. माझ्या मुलीला पूर्णपणे तिनं वाढवलं आहे. आमच्या जुलियाचं एक गुणी मुलगी म्हणून कौतुक करतात त्याचं सर्व श्रेय माझ्या पत्नीला जातं. माझ्या आई-वडिलांचा जो काही थोडी र्वष तिला सहवास घडला त्यात तिनं त्यांची उत्तम काळजी घेतली आणि त्यांना शेवटपर्यंत सुखी ठेवलं. मला हे हय़ाआधी करता आलं नव्हतं. त्यांच्या शेवटच्या आजारपणात तिनं जी काही सेवा केली त्याला तोड नाही. मला इतकं जमलं नसतं. कधीतरी मला त्यांचा राग आला असता. मी लहान असताना त्यांनी माझ्यासाठी ज्या खस्ता खाल्या होत्या, त्या विसरून मी त्यांच्यावर चिडलो असतो. दुसरी एक गोष्ट आम्ही कटाक्षाने पाळतो ती म्हणजे आमच्या व्यवसायाच्या बाबतीत आम्ही एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे, काय करावं किंवा केलं पाहिजे याबाबतीत आम्ही ढवळाढवळ करत नाही. तिला योग्य वाटेल ती भूमिका किंवा ते काम तिनं करावं आणि मला वाटेल ते काम मी करावं. असं आम्ही एकमेकांशी चर्चा न करताच ठरवून टाकलं आहे. एकत्र काम करायचंही आम्ही टाळतो. असं केलं तर मला ऑफिसचं काम घरी आणून केल्यासारखं वाटतं. लग्नानंतरच्या माझ्या आजारपणात तिनं ज्या पद्धतीनं मला परत जगायला प्रवृत्त केलं ते फार फार वेगळं होतं. जगात दुसऱ्या कुणाशीही मी लग्न केलं असतं तर माझ्या त्या पत्नीनं मला इतकं प्रेमानं आणि कसलीही जाणीव न करून देता वागवलं नसतं.. आजही आमच्यात जेव्हा कधी वाद होतात तेव्हा एकदाही हा वाद करायला तू जिवंत आहेस तो माझ्यामुळे असं ना कधी बोलून दाखवलं वा कधी कुठल्या कृतीनं सूचित केलं. आम्ही दोघेही कला क्षेत्रात असल्यानं काव्य-शास्त्र-विनोद यावर आमच्यात चर्चा होत असतील असं तुम्हाला वाटत असेल तर, तसं काहीही होत नाही. कविता मला फारशी आवडत नाही, हल्लीच्या तर नाहीच नाही. विनोदावर बोलावं असा विनोद गेल्या काही वर्षांत घडल्याचं मला आठवत नाही. वाचनाची तिला आवड नाही आणि सिनेमा बघण्यात मला रुची नाही. उगाच पावसात भिजायला गेले किंवा पाण्यात पाय सोडून बसले किंवा उंच उंच घरांच्या आडून अर्धामुर्धा चंद्र बघून रोमांचित झाले हे मला आचरटपणा केल्यासारखं वाटतं. एक मात्र आहे आम्हाला दोघांना घरी माणसं जमवून मस्ती करायला आवडते.. अर्थात मला ही आवड तिच्यामुळेच लागली. म्हणजे पूर्वी मीही घरी मित्र जमवायचो पण नंतर आम्ही जे करायचो ते आज.. आज काय कधीच, कुणीही आणि कुठेही छापू शकणार नाही. मी आजही कुठलीही वैयक्तिक खरेदी करायची असेल तर तिला सांगून करतो. अगदी कपडेलत्ते घ्यायचे असले तरी तिला विचारलं की मला जरा धीर येतो. अर्थात आम्ही एकमेकांच्या पसंतीनं खरेदी करत नाही, कारण स्त्रियांच्या खरेदीला खूप वेळ लागतो याची जाणीव तिला आहे आणि घासाघीस केल्याशिवाय खरेदी करायची नसते, असा तिचा ठाम विश्वास आहे, मला मात्र कुणी घासाघीस करू लागलं की विक्रेत्यांच्या पोटावर पाय दिल्यासारखं वाटतं. आता तुम्ही म्हणाल की तुमच्या कुठल्या विचारात साम्य नाही तर मग तुम्ही सहजीवन कसं म्हणता?
त्याचं एकच कारण आहे की माझं माझ्या बायकोवर जितकं प्रेम आहे त्याच्याहून कितीतरी पटीनं तिचं माझ्यावर प्रेम आहे. आणि याची जाणीव तिला नसली तरी मला आहे. आम्ही एकत्र असणं ही आमची दोघांची गरज आहे. शिवाय नाण्याला दोन बाजू असतात. एकच बाजू असलेलं नाणं व्यवहारात आणि जगात खोटं ठरतं. आम्ही दोघेही कलावंत म्हणून आमचं सहजीवन रोचक किंवा रोमांचकारी असेल या अपेक्षेनं तुम्ही वाचाल तर तुमची निराशा होईल, पण सामान्य माणसाचं म्हणून वाचाल तर बरं वाटेल तुम्हाला.

 

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?