उमा बापट

umaajitbapat@gmail.com

टाग्रेट-डेडलाइन या कार्यपद्धतीतून येणाऱ्या मानसिकतेने व्यवसायापलीकडे जाऊन शिक्षण क्षेत्रात, सांस्कृतिक कार्यक्रमात आणि बघता-बघता थेट शहरी-गृहस्थीत काही प्रमाणात शिरकाव केला आहे. त्यामुळे निखळ जगणं दुर्मीळ होत चालले आहे. मुलांच्या वाढीच्या काळात शुद्ध अनुभव घ्यायची संधी कमी होत गेली तर निखळ जगण्याचे मर्म मुलांपासून हिरावून घेतल्यासारखे होईल.. म्हणूनच गरज आहे ती निखळ सहजता आणि हेतूनुसार नियोजनबद्धतेची. घालू या दोन काडय़ांची वीण आपल्या निरामय घरटय़ासाठी..

‘काडी निरागसतेची’ या लेखात (१८ जानेवारी)आपण निरागसतेची फरफट बघितली. समाज निरागस क्षण टिपणं कसं विसरत चालला आहे. समाजमान्य परंतु अनावश्यक पद्धतींमुळे नको त्या वयात मुलांवर येणारा ताण, समाजात बाजारीकरणाचा अवास्तव बाऊ आणि त्यातून प्रौढांनी ओढवून घेतलेली विनाकारण चिंता याचे भान ठेवून या गुंत्यातून बाहेर पडायला रोजच्या जगण्यात निरागसतेची काडी वेचू या, असेही आपण ठरवले. निरागसतेच्या काडय़ा वेचत आपल्या निरामय घरटय़ासोबत निखळ जगण्याचा प्रवास करणं, हेच खरं आयुष्य.

ठरावीक वेळात नेमून दिलेले काम संपवणे, नियोजनानुसार उद्दिष्ट गाठणे, ते काम अंतिम तारखेला सुपूर्द करणे, जाहीर करणे, काही काळ त्यातून सूट, परत नवीन नेमून दिलेले काम करायला सुरुवात (प्रोजेक्ट- असाइनमेंट, टाग्रेट, डेडलाइन, रिलीज, ब्रेक, प्लॅनिंग-प्रपोजल). असे चक्र चालू राहते. कामातली उत्तमता आणि प्रगती साधायला ही कार्यपद्धती गरजेची असते. हळूहळू या चक्रात फिरणे अंगवळणी पडते. एवढेच नाही तर त्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे व्यक्तित्वावर काही ठसा उमटवू शकते. पालकत्वाविषयी सल्ला घेण्यासाठी पालक आले की अनेक मुद्दे खुलासेवार उलगडण्याचा प्रयत्न होतो. मुलाच्या वागण्यात विधायक बदल घडण्यासाठी पालकांची भूमिका, त्यासाठी लागणारा वेळ, ही जादू नाही. एकेक करत घडणारी प्रक्रिया कशी आहे याची जाणीव-जागृती पालकांमध्ये होणे ही बदलाची सुरुवात असते..

या सविस्तर विवरणानंतरही काही पालक शेवटी विचारू शकतात, ‘‘मग माझं मूल हे बदल कधीपर्यंत करू शकेल?’’ या प्रश्नाच्या रोखात ‘टाग्रेट-डेडलाइन’ या मानसिकतेची छटा पुसटशी मिसळलेली सापडेल. अमुक वेळेत पूर्वनियोजित बदल मुलाच्या वागण्यात घडतील हे संगणकीय प्रणालीसारखे काटेकोरपणे आखणे पुरेसे नसते. केवळ माहितीच्या महाजालातून मिळालेली बाल-विकासाची टिप्पणी पुरी पडणार नाही. ते वास्तवात जगणे आहे. मुलाचे प्रतिसाद, आपल्या वागण्याचे त्याच्यावर होणारे परिणाम असे अनेक बारकावे, कंगोरे प्रत्यक्ष अनुभवाशिवाय कसे दिसणार? वास्तवातल्या जगण्यात प्रत्येक क्षणाला भिडताना ‘एकवीस- अपेक्षित’सारखी परीक्षेसाठी रट्टून तयार केलेली उत्तरे कशी वापरणार? दरवेळी चूक-बरोबरच्या तराजूत पारडे कुठे झुकतेय हे माप कसे लावणार? आपण चिकित्सा बाजूला सारून येणाऱ्या क्षणात समरसतेने कधी जगणार?

कामातली मागणी, त्यातून येणारा ताण, अपेक्षित उद्दिष्ट गाठतो आहे का ही चिंता, अपयशाचे भय, रात्रीचा दिवस करून काम हेच जीवन, कामापलीकडचे आयुष्य गौण. मात्र ठरावीक प्रकल्प संपला की जणू त्या विषयाला पूर्ण विराम. यातून येणारी यांत्रिकता. परत नवीन मागण्या, नवे उच्चांक गाठायची चढाओढ.. हे दळण चालूच राहते. बरेच जण कामाच्या ठिकाणी या चक्रात फिरत असतात. कुटुंबातल्या नात्यांवरही याचा परिणाम दिसू शकतो. मानसशास्त्रानुसार एकमेकांसाठी अटीतटींशिवाय असणे हा कुटुंबातल्या निरोगी नातेसंबंधाचा पाया असतो. मात्र ही मंडळी पालकाच्या भूमिकेत शिरली तरी त्यांना हे बाहेरचे अपेक्षांचे ओझे उतरवता येत नाही. घरी मुलांसोबत फक्त असणे लीलया जमतेच, असे नाही. निखळ सहवास असू शकतो हे जणू विसरायला होते. मग बाहेर पाऊस पडत असताना घरात ‘रेनी सीझन’ची उजळणी घेतली जाऊ शकते. मुलांबरोबर पावसात भिजायला पालक वेळ कुठून आणणार? अडचण वेळेची असते का वृत्तीची? पुस्तकी उजळणीचे फायदे थेट असतात. तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा त्यातले गुण इत्यादी. पावसात भिजून काय मिळणार? पावसात न भिजताही अभ्यास करता येतो. आजचा क्षण न निसटवता उद्याचा विचार होऊ शकतो. निखळ अर्थात शुद्ध जगताना असे अनुभव अडथळे बनत नाहीत. पावसाचा अभ्यास हा फक्त अभ्यासक्रमातला विषय राहात नाही.

ठरावीक काळापुरते-ठरावीक गुणांसाठी, ‘टाग्रेट-डेडलाइन’ ही समांतर पद्धती शैक्षणिक क्षेत्रात दिसून येते. शाळेत दिले जाणारे गृहपाठ, प्रकल्प म्हणून दिले जाणारे काम, स्व-अध्याय म्हणून शिकणे कमी आणि परीक्षेतल्या गुणांसाठी, श्रेणी मिळवण्यासाठी अधिक असा काहीसा कल व्हायला लागतो. प्रकल्पापुरते पाठांतर व्हायला लागते. घरी-दारी तोच तो गुणांसाठी काम पूर्ण करणं हा ‘सबमिशन-दणका’ पाठी लागतो. अनुभव घेत जगण्याच्या साखळीतून निखळ-अनुभवाची कडी निखळून पडू शकते. पक्षीनिरीक्षण करताना मुलांनी त्यासोबत निसर्गातले अनुभव घेणे हे खरे तर नैसर्गिक आहे. त्याची सर तयार बाजारात मिळणारा तक्ता घेऊन चित्र, स्टीकर वहीत चिकटवून होईल का?

काही वर्षांपूर्वी एका पक्षीसंग्रहालयात गेले होते. तिथे एक आई आपल्या मुलाला पक्षी जिथे ठेवले होते त्या प्रत्येक ठिकाणी नेत होती.  प्रत्येक पक्ष्याच्या नावाची जी पाटी लावली होती, ते प्रत्येक नाव मुलाकडून वदवून घेत होती. अशा सलग दोन फेऱ्या तिने मुलाबरोबर मारल्या. दरवेळी पक्षी माहितीपट चालूच. शाळेचा गृहपाठ म्हणून मुलं पुस्तकातले पक्षी पाठ करणार आणि नंतर घरच्यांबरोबर असेच आखीव फेरी मारणार  असतील तर पक्ष्यांकडे निखळ दृष्टीने कधी बघणार? जागरूक आईचा पक्षी परिचयाचा सुनियोजित हेतू स्तुत्य, मात्र त्या बापुडय़ा मातेला कणमात्र भान नसावं का की पाखरं पाहताना स्वच्छंदी विहरायला आपल्या पाखराला आपण पारखे करतो आहोत?

पक्ष्यांची नावे माहिती असणे निश्चित चांगले आहे. मात्र माहिती घेणे आणि त्याचा निखळ अनुभव हे एकमेकाला छेद देणारे असू नये. हेतूनुसार नियोजित काम आणि टवटवीत उत्स्फूर्तता याचा योग्य मेळ घालता येणे महत्त्वाचे आहे. सुशिक्षित जागरूकतेच्या पंखांना निखळ जगण्याने बळ येतं. पंख पसरून विकास-क्षितिजाकडे भरारी घेताना आपल्या घरटय़ातली शुद्ध जीवनदृष्टी सोबत घेऊन झेपावता येऊ शकतं. त्यासाठी मुळात घरटय़ामध्ये निखळ जगणं अलगद सांभाळलेलं हवं. लहानपणापासून फक्त काही मिळवण्यापलीकडे प्रत्यक्ष प्रक्रियेतल्या प्रवासाची न्यारी गंमत अनुभवलेली असेल तर मुलं हे बाळकडू घेऊनच बाहेरही वावरतात. असे बाळकडू घेतलेला एक मुलगा त्याच्या नातेवाईकांबरोबर एका शाळेच्या गंमत जत्रेला (फन-फेअर) गेला होता. एका खेळाच्या स्टॉलवर खेळायला गेला. तिथले आयोजक म्हणाले, ‘‘आमची खेळासाठीची बक्षिसे संपली आहेत. स्टॉल बंद केला आहे.’’ तो मुलगा पटकन म्हणाला, ‘‘बक्षिसं संपली तर काय झाले, मी नुसते खेळतो. मला मजा येईल.’’ मुलाच्या नातेवाईकांना त्याचे खूप कौतुक वाटले. बक्षीस मिळणार नाही याची कल्पना असूनही आनंद घेत तो खेळला. इतरांना कौतुक वाटले तरी त्या मुलासाठी त्यात काही वेगळे, विशेष केले असे वाटत नव्हते. तो हे अगदी सहज करू शकला, कारण त्याच्या कुटुंबाच्या जीवनशैलीचा तो भाग होता.

निखळ जगणं ही जीवनशैली असेल तर अमुक नाही मिळालं म्हणून होणारी निराशा, ठरावीक गोष्ट मिळवण्याचा अट्टहास, त्यातून येणारा ताण यापासून सारं कुटुंबच दहा कोस दूर राहातं. समाधानी, शांत, स्वस्थ हा या कुटुंबाचा स्थायिभाव होतो. आपल्या सांस्कृतिक जीवनाचे ‘निखळ भाव’ हे अविभाज्य अंग होते. सण, उत्सव साजरे करताना दिखाऊ, हिशोबी नाही तर निखळ देवाण-घेवाण होती. या क्षेत्रातही आपण औपचारिकतेला घुसू दिले. स्वत:च्या अभिव्यक्तीऐवजी सण साजरे करताना बाह्य़ डामडौलाला बळी पडत गेलो. सण-समारंभात येईल तशी पण स्वत: रांगोळी काढणं हा उपजत कलास्वाद आपण विसरलो. रांगोळी काढायला बाहेरून लोकांना बोलवायला लागलो. व्यवसाय, प्रसिद्धी यासाठी काही करणं आणि निखळ अनुभव घेणं यातली फारकत आपण वेळीच ओळखली तर रोजच्या जगण्यातला ताणतणावाचा गुंता मुळातच होणार नाही. गुंत्यात अडकणे, तो कसा सोडवायचा ही चिंता, न सुटणारा गुंता सोडवायची व्यर्थ तारांबळ या दुषटचक्राला आपण थांबवू शकू.

पुढील महिन्यात मला यातले काय जमेल? याचा नक्की विचार करा आणि कृती करा.

रिटर्न गिफ्ट न देता एखादा अनौपचारिक कार्यक्रम घरी करणं.

आपल्या मुलाबरोबर कोणताही गृहपाठ, स्पर्धा, सादरीकरण यासाठी नाही, तर सहज चित्र काढणं, एकत्र पुस्तक वाचणं, त्याबद्दल गप्पा मारणं किंवा एकत्र स्वयंपाक करणं.

कोणाकडे भेटीला जाऊन मला काय फायदा आहे, त्यांचे निमंत्रण आहे का, या बाबी बाजूला ठेवून कोणाला तरी आपणहून भेटणं.

मुलाला तू काय करत होतास, किती काम पूर्ण झाले, यानंतर काय करणार आहेस, असे कोणतेही प्रश्न किमान दहा मिनिटे न विचारता, मुलाने काही दृश्य कृती नाही केली तरी त्याचे त्याला असू देणे. नियोजन, पूर्वतयारी, ठरवलेले उद्दिष्ट गाठणे ही कार्यपद्धती महत्त्वाची आहेच. ती जरूर वापरावी. त्याचबरोबर शुद्ध जगणं ही मानसिक आरोग्यासाठी नितांत गरज आहे. या दोन बाजूंचा योग्य तेव्हा योग्य तो समतोल साधला तर ना जीवन रूक्ष, यांत्रिक होईल, ना ही बेशिस्त दिशाहीन!

निखळ सहजता आणि हेतूनुसार नियोजनबद्धता, या दोन काडय़ांची घालू या वीण आपल्या निरामय घरटय़ासाठी..