एकमेकांना आपापल्या क्षेत्रात वाढण्यासाठी अवकाश आणि सोबत जगायचं आश्वासन देत, घरच्यांचा आणि समाजाचा विरोध पत्करून आम्ही बावीस वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला. त्यानंतर दोन वर्षांनी आम्हाला पहिली मुलगी झाली. ती जन्मत:च मतिमंद आहे हे समजल्यावर, पहिल्या      स्वाभाविक प्रतिक्रियेची लाट ओसरल्यावर आम्ही हे सत्य स्वीकारलं- आव्हान म्हणून घेतलं. तिच्या वेगळेपणाचं स्वरूप आणि वाढविकासाच्या शक्यता, त्यासाठीचे उपाय याची माहिती मिळवण्यासाठी   डॉक्टर, पुस्तकं, वेगळ्या मुलांचे पालक, स्वयंसेवी संस्था असे अनेक स्रोत धुंडाळले. सल्ले अनेकांचे घेतले पण ते डोळसपणे, विचार-विवेकाच्या कसोटीवर तपासून स्वीकारले आणि लेकीच्या, सईच्या विकासासाठी धडपडत राहिलो. आज ती आहे त्या मर्यादांसह आनंदात आहे. पण या धडपडीतून आम्हीही खूप शिकलो.
 लग्न करताना स्वत:च्या आयुष्याची काही स्वप्नं होती. त्यांचे संदर्भ सईच्या जन्मानं बदलले पण माणूस म्हणून, आईबाप म्हणून वाढत, विकसतच राहिलो. सईसाठी पुरेसा वेळ देऊन स्वत:ला, एकमेकांना आणि घराला क्वालिटी देऊ शकलो. हळूहळू लक्षात आलं की आपली ही मुलगी आनंदी राहावी, असं आपल्याला वाटत असेल तर आधी आपण आनंदी, उत्साही असायला हवं आणि त्यासाठी विचारपूर्वक केलेल्या ‘धडपडीला’ यश येवो की अपयश, ती आपल्याला नवं शिकवणारी म्हणून आनंददायीच असते.
‘एकत्र जगताना एकमेकांचं वेगळेपण ओळखून, मान्य करत ते स्वीकारायचं असतं.’ हे आम्ही दोघे जण मिळूनच शिकतो आहोत. सईसोबत वाढतानाचे अनुभव लिहायचे ठरवले तेव्हा दोघांनी मिळून आजवरच्या प्रवासाकडे आपापल्या नजरेनं मागं वळून पाहिलं. ज्याला जे दिसलं ते एकमेकांशी बोलणं करीत नोंदवलं. जिथं बाबाचं एकटय़ाचं बघणं आणि भोगणं होतं तिथं बाबानं लिहिलं. जिथं आईची भूमिका परिस्थितीमुळे आणि काही वेळा स्वतंत्र व्यक्ती म्हणून वेगळी होती तिथं आईनं ‘मी’ च्या भाषेत लिहिलं. ज्या अनुभवांबाबतचा दोघांचाही दृष्टिकोन समान आहे ते सगळं ‘आम्ही’ म्हणून उतरलं. सईसोबत आनंदानं जगण्याचं आव्हान पेलताना बाबाचा प्रचंड काळजी घेण्याचा, जिवापाड प्रेम करण्याचा, आत्ताच्या क्षणाच्या आनंदासाठी झोकून देण्याचा स्वभाव आणि आईचा अभ्यासपूर्वक, विचारपूर्वक व दूरदृष्टीनं प्रयत्न करीत राहण्याचा स्वभाव यांची बहुतांश वेळा सांगड घातली गेली. एरवी अधूनमधून एकमेकांना रुतणाऱ्या दोघांच्याही स्वभावातल्या खाचाखोचा सईच्या विकासाच्या मुद्दय़ावर एकमेकांच्या खाचात कशा फीट बसतात याचा पुन:प्रत्यय हे पुस्तक लिहितानाही घेता आला. त्या वेळी डायऱ्यांमध्ये तपशीलवार केलेल्या नोंदीमुळे छोटय़ा छोटय़ा घटना-प्रसंगांच्या आजूबाजूचं बरंच काही आठवत गेलं. आपण काय काय केलं? कोणत्या विचारांनी केलं? कशामुळे काय झालं? या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता स्वत:च्याच कृतींकडे, त्यामागच्या विचारांकडे काही अंतरावरून पाहता आलं. काही चुकांची कबुलीही प्रांजळपणे देता आली.
सुविद्या प्रकाशननं प्रकाशित केलेली ही ‘मर्यादाच्या अंगणात जगताना’ची कहाणी अनेक उत्तरांच्या दिशा दाखवत सुफळ संपूर्ण होईल, असा विश्वास वाटतो.
सुजाता लोहकरे , अरुण लोहकरे

संक्षिप्त पेशवाई..!
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक उज्ज्वल कालखंड म्हणजे ‘पेशवाई’! पेशवाई म्हणजे मराठी मनाचे मुक्तचिंतन व जिव्हाळ्याचा विषय! २०१३ मध्ये  पेशवाईस ३०० वर्षे पूर्ण झाली, हे औचित्य साधून भिवंडीच्या ब्राह्मण आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मला ‘संक्षिप्त पेशवाई’ लिहिण्यास प्रवृत्त केले, प्रोत्साहन दिले. आणि ५५ ते ६० पानांत पेशवाई लिहावयाची, अशी अट घातली. हे कठीण आव्हान मी स्वीकारले. मग सुरू झाला पेशवाईचा सखोल अभ्यास!
पेशवाईसंदर्भातील अनेक पुस्तकांचा अभ्यास केला. आणि ६० पानांची ही ‘संक्षिप्त पेशवाई’ लिहून झाली व भिवंडी ब्राह्मण आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्मरणिकेत ती प्रसिद्ध झाली. या ‘संक्षिप्त पेशवाई’ पुस्तकामध्ये मी बाळाजी विश्वनाथ पेशव्यांपासून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांपर्यंत म्हणजे सन १७७३ ते १८५१ पर्यंतचा कालखंड उलगडून  दाखविला आहे.
ही ‘संक्षिप्त पेशवाई’ म्हणजे मराठी मनाचे मुक्त चिंतन आहे. पेशवाई म्हणजे यशापयशाचे दाहक सत्य आहे. पेशवाई म्हणजे पराक्रमाचा, शौर्याचा आविष्कार आहे, पेशवाई म्हणजे कलासक्त रसिकेचा मधुर झंकार आहे. पेशवाईला फुटीरतेचा, राजद्रोहाचा व भाऊबंदकीचा जळजळीत शाप आहे. पण अटकेपार झेंडा फडकवणारी पेशवाई समस्त मराठी मनाचा अभिमानबिंदू आहे. ‘संक्षिप्त पेशवाई’ या पुस्तकात मी पहिल्या पेशवीणबाई राधाबाईसाहेब, काशीबाईसाहेब, मस्तानी, गोपिकाबाई साहेब, रमाबाई साहेब, आनंदीबाई, पार्वतीबाई, गंगाबाई, दुसऱ्या रमाबाई या पेशवीणबाईंचाही धावता आढावा घेतला आहे.
मीना गोडखिंडी

‘दिनमहिमा’ आकार घेताना
राज्य पातळीवर, तसेच राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही विशेष दिवस पाळले जातात, एवढेच सामान्यज्ञान (इतरांप्रमाणेच) मलाही होते. तोच धागा पकडून वर्षभरात पाळल्या जाणाऱ्या दिनविशेषांची माहिती संकलित करावी, असं माझ्या मनात आलं. त्यासाठी त्या त्या दिनविशेषांची वृत्तपत्रांत आलेली माहिती कापून अशा कात्रणांचा संग्रह करू  लागले. तेव्हा वर्षांमध्ये इतके दिवस महत्त्वाचे आहेत, हे समजून मला आश्चर्य वाटले. आजची किशोरवयीन वा युवा पिढी संस्कारसंपन्न व्हावी म्हणून हा दिनमहिमा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, असे तीव्रतेने वाटले. यासाठी मी या संकलनाकडे गंभीरपणे पाहू लागले. वर्षभरातील हे विशेष दिवस राजकारण, अर्थकारण, संख्याशास्त्र, समाजजीवनावर आपल्या कर्तृत्वाचा अवीट ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी योजलेल्या विशेष दिनांबद्दल लिहिताना त्या व्यक्तीचे अल्प चरित्र व त्याच्या कार्याची थोडक्यात माहिती देऊन त्या विषयाच्या संदर्भात देशातील सद्यस्थितीचा मी थोडक्यात आढावा घेतला. तसेच या महनीय व्यक्तींचे कार्य पुढे चालविण्यासाठी सर्वसामान्य लोकांनीही आपापला खारीचा वाटा उचलावा, असे सांगण्याचाही प्रयत्न केला. या प्रकल्पासाठी बराच कालावधी लागल्यामुळे सर्वच नोंदी अद्ययावत कराव्या लागल्या. सर्व स्तरातून याचे स्वागत झाले. त्यामुळे विशेष समाधान वाटले.    
रोचना भडकमकर

कसोटी पाहणाऱ्या आयुष्याचं सार
‘इवल्याशा तळ्याच्या काठाशी!’ माझे हे पुस्तक म्हणजे- आयुष्य जगताना आलेल्या विविध स्मरणीय, हेलावून टाकणाऱ्या, प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या, कसोटी पाहणाऱ्या घटना, प्रसंग, भोग यांनी मनावर अधोरेखित केलेल्या जीवनप्रवासाविषयीचे ‘आत्मकथन’ आहे.
जीवनप्रवाहात पुढे पुढे जाताना वयाचे काही हलके टप्पे आपले जीवलग जेव्हा सन्मानित करतात तेव्हा आपल्याला उत्सवमूर्ती व्हावे लागते. त्यापैकी दीर्घायुष्याच्या एका टप्प्यावर ‘सहस्रचंद्रदर्शन’ हा सोहळा असतो. नियतीने इथवर आणून पोहोचवल्याचा तो एक कृतज्ञ भाव असतो. आयुष्याच्या ऐन लाटेवर असताना आपल्याला त्याचे बोलावणे आले नाही ही उपकारगर्भ जाणीव आणि भाव मनात असतो. पुढची सगळी वाट मात्र बेभरवशी, थकलेल्या गात्रांची, तब्येतीच्या आळूमाळू तनामनाची, वेगाचा आवेग संथ झाल्याची खूणगाठ असते. भूतकाळ व्यापक होतो. भविष्यकाळ प्रश्नांकित उरतो-अशा वेळी वाटते, ज्या प्रकारे जगलो, आडवळणातून वाटा शोधल्या ते ते सर्व बोलून टाकावे. सामान्य आयुष्य म्हटलं तरी ते काही देऊन, काही घेऊन जातं. अशा आयुष्याच्या कातरसांजवेळी, एकटेपणाच्या सोबतीनंच मी हे आत्मकथन लिहून पुरं केलं. अशी ही ‘इवल्याशा तळ्याच्या काठाशी’-अष्टोप्रहर एकटीच बसलेल्या एका ‘मी’ची कहाणी- जे जसं पुढय़ात आलं, त्याला सामोरं जाताना- हा व्यक्त होण्याचा अनुक्रम!
 ते मनातल्या मनांत काही दडपून ठेवू हा निर्धार निग्रहही टिकवू देत नाहीत. मग होते एक भोवळभिंगरी अवस्था- माझा शब्दप्रपंच हा अशाच मनोवस्थेत उभा राहिला आहे. प्रेरणेनं हात धरला आणि प्रांजलतेनं व्यक्त व्हायचं धारिष्टय़ दिलं ही जमेची बाजू! मी सदोदित शरणागत आहे म्हणून तिरपागडय़ा प्रसंगांतूनही तगून इथवर आले हे माझ्या आत्मकथनाचे सार!
सुमन फडके