समाजकार्याला सुरुवात केली त्याला जवळजवळ ३२ वर्षे लोटली. या ३२ वर्षांत अनेक प्रकारचे चढ-उतार पहिले. सामाजिक कार्याची आवड होतीच म्हणून हा पर्याय निवडला, पण त्याहीपेक्षा गरज आणि सुरक्षितता म्हणून हे काम करताना ज्या-ज्या वेळेला मी एकटी असायचे त्या-त्या वेळेला डोळ्यांतून अश्रू आल्याशिवाय राहायचे नाहीत. त्या वेळी कवयित्री बहिणाबाईंच्या ओवीची आठवण मनात रुंजी घालायची. त्या ओळी खूप आधार द्यायच्या.
  रडू नको माझ्या जीवा, तुला रडायाची रे सव
  रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव
मग मी मनाची समजूत घालायचे, तू आता रडायचे नाहीस. तुला काही तरी चांगले करायचे आहे. असे हताश होऊन चालायचे नाही. नशिबाने मला पुढील आयुष्यात खूप चांगले लोक भेटत गेले. वैचारिक बैठक असणारे नाना जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ते माझे गुरू झाले. वेळोवेळी गप्पांतून त्यांनी अनेक वैचारिक दृष्टिकोन माझ्यात रुजवले. एकदा असेच गप्पा मारता मारता ते मला म्हणाले, ‘‘कोणतेही काम करताना आई या भूमिकेतून करावे म्हणजे त्याचा निकाल चांगला मिळतो.’’ हे वाक्य माझ्या आयुष्याला दिशा देणारे ठरले.  
एकदा ते असेच राऊंडला आले असताना सर्व कामे आटोपून मी पेपर वाचत बसले होते. नाना म्हणाले, ‘‘झाला वाटतं स्वयंपाक!’’ बोलत बोलत त्यांनी थेट स्वयंपाकघर गाठले. मी होकार दिला. ‘‘एवढा मोठा स्वयंपाक रोज करून तू थकत बरी नाहीस?’’ मी नाही म्हटलं. ‘मला खूप आनंद मिळतो त्यातून.’ असं माझं उत्तर ऐकून त्यांनी मला उद्देशून म्हटलं, ‘‘तुला एक सुचवू का? म्हणजे तुला आणखी आनंद मिळेल. भाजी-पोळी असा स्वयंपाक करताना तू मनात हे मी माझ्या कृष्णासाठी करते, रामासाठी करते असा भाव ठेवता जा, त्यामुळे ती भावनिक सात्त्विकता अन्नामध्ये उतरते व मुले सात्त्विक वृत्तीची होतात.’’
   एकदा मी देवपूजा करत होते. तेवढय़ात नाना कुणी तरी पाहुणे घेऊन माझ्याकडे आले. छोटी मुले घरातच होती आणि मोठी शनिवार असल्यामुळे शाळेत गेली होती. तेव्हाही नानांनी मला आध्यात्मिक बठकीचा परिपाठच घालून दिला. कर्मकांडापेक्षा आत्मपरीक्षण फार महत्त्वाचे असते, हेच त्यांना सुचवायचे होते. या गोष्टींचा मला पुढील आयुष्यात पदोपदी उपयोग झाला. त्यामुळे कधीही मला एकाकी वाटले नाही किंवा कधी निराशा आली नाही. उत्साहाने मी माझ्या कामात रमत गेले.

‘‘माझ्या स्वप्नातही नव्हते आपण एवढे कार्य करू शकू, पण वíधनीचा संपूर्ण युवक-युवती गट, अधिकारी वर्ग, महिला कार्यकर्त्यां या सर्वाच्या प्रेरणेने आणि सहकार्याने हे कार्य घडत गेले ‘आपण काहीच करत नसतो. तो परमेश्वर आपल्याकडून सर्व करून घेत असतो,’ असे नाना म्हणत आणि ते खरंच आहे. त्याचा पदोपदी मलाही अनुभव येत गेला.’’ सांगताहेत गेली ३२ वर्षे बालग्राम व ‘स्व’-रूपवर्धिनीच्या माध्यमातून महिला सबलीकरण व मुलांच्या सर्वागीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां पुष्पा नडे.”

‘बालग्राम’च्या कामाची कल्पना खूप निराळी व मनाला भावणारी होती. विनासायास दहा मुलांची आई होऊन आपण काम करायचे, त्यांच्यासोबतच राहायचे. हे खूपच प्रेरणादायी वाटले. मला आठवतंय जेव्हा ‘बालग्राम’मध्ये मी गेले, त्या वेळी खानोलकर सरांशी झालेल्या भेटीतच मला ‘बालग्राम’च्या कामाची कल्पना फार आवडल्याची कबुली मी देऊन टाकली होती; पण त्यांनीही तुमच्यासारख्या लोकांची आम्हाला अत्यंत
गरज आहे, असे उद्गार काढले, त्या वेळी माझ्यावरच्या जबाबदारीचीही जाणीव झाली. काम आवडले असले तरी आईवडिलांची परवानगी मिळवण्यात दोन महिने गेले. आपल्या आयुष्यातले आणखी दोन महिने वाया गेले याची टोचणी लागून राहिली.
त्याहीपूर्वी वैयक्तिक आयुष्यातील अडचणींमुळे दहा मोलाची वर्षे वाया गेली होती. मात्र आता मला एकही क्षण वाया घालवायचा नव्हता. प्रत्येक क्षण समाजासाठी लागला पाहिजे, असं मी जणू परमेश्वराला वचनच देऊन बसले होते. शेवटी भावांनी व आईने परवानगी दिली, पण वडिलांनी मात्र अबोला धरला. तो न जुमानता मी ‘बालग्राम’मध्ये पाऊल टाकले व ही माझ्या आयुष्यातली महत्त्वाची घटना घडली. अर्थात हे पुढे ‘बालग्राम’मध्ये सहा वर्षे काम करता करता लक्षात आले.
‘बालग्राम’मधील कामात मी खूप रमले. एक दिवस बालग्राममध्ये पाच तान्ही बाळं आली होती. त्यांना सुरुवातीचं एक वर्ष मेडिकल सेंटरला ठेवलं जाणार होतं, असा ‘बालग्राम’चा नियमच होता. वर्षभरानंतर ती त्यांच्या त्यांच्या मातांकडे सुपूर्द केली जाणार होती. यातील कुणी शेताच्या बांधावर, कचराकुंडीत, विहिरीच्या काठावर, तर कुणी देवळाच्या पायरीवर सापडलेले होते. त्यात ३ मुली व २ मुले होती. वर्षभरानंतर शीतल नावाची मुलगी जालन्याला देवळाच्या पायरीवर सापडली. इतर मुलांसारखी सुधारणा शीतलमध्ये झाली नव्हती. तिला जमिनीवर दोन्ही पायांवर उभं राहता येत नव्हतं. डॉ. भंडारी यांनी माझ्याशी पैज लावली. शीतलला सहा महिन्यांत चालायला शिकवण्याचा मीही निश्चय केला. त्या दिवसापासून तिच्यावर जास्तीत जास्त मेहनत घ्यायला मी सुरुवात केली. त्यासाठी तिला माशांच्या तेलाने मसाज करणे, वाळूच्या िपपात उभे करणे, सकाळी तेल लावून उन्हात बसवणे, तिला कुशीत घेऊन झोपवणे,  पदार्थाची चव कळावी म्हणून तिच्या जिभेवरून तो-तो पदार्थ फिरवत राहणे अशा प्रकारच्या सेवेत एकही दिवस खंड न करता सहा महिने हा दिनक्रम सुरू राहिला. अखेर माझ्या प्रयत्नांना यश आले. शीतल हळूहळू हात धरून चालू लागली. तिच्याबरोबर आलेल्या सर्व मुलांना ‘सेंट मीरा’मध्ये के.जी.मध्ये प्रवेश मिळाला, पण शीतलच्या प्रवेशाचा कुणी विचारच केला नव्हता, तिला अबनॉर्मल ठरवून टाकलं होतं, पण मी तिच्यावर थोडे कष्ट घेऊन त्याच शाळेत तिला प्रवेश मिळवला. हीच शीतल पुढे पहिल्या पाच मुलांमध्ये येत होती. मुलांना घडवताना असे अनेक लक्षात राहणारे किस्से ‘बालग्राम’मध्ये घडत गेले.
 या प्रवासात, मी ज्यांच्या सान्निध्यात घडले त्यात मुलांचा सहभाग तर आहेच, त्याशिवाय येरवडा बालग्रामची स्थापना करणारे येरवडा जेलचे आय.जी. आबासाहेब जाधव, रिटायर्ड सुप्रींटेंडंट खानोलकर सर, घोले सर आणि माझे गुरू नाना जोशी या साऱ्यांचे योगदान आहे. नानांचे सर्व आयुष्य कैद्यांमध्ये गेलेले असूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात मृदू भाव असायचा. ‘अगं, कैदी कितीही क्रूर असला तरी तो शेवटी माणूसच आहे. त्याच्या आतला माणूस जागा करायचे काम आम्हाला करायचे असते आणि त्यासाठी वेळप्रसंगी आईची-वडिलांची भूमिकाही करावीच लागते,’ असे ते नेहमी म्हणत.
  नाना जोशी आणि देसाई सर यांच्या आग्रहाखातर मी ‘स्व-रूपवíधनी’त आले; पण वíधनीच्या व ‘बालग्राम’च्या कामामध्ये फारच फरक होता. ‘बालग्राम’चे काम चार िभतींच्या आतले होते. वर्धिनीसाठी बालवाडी चालवताना कोणताही त्रास झाला नाही. त्रास झाला तो बालवाडीसाठी मुलं मिळवताना. खूप आटापिटा केल्यावर १२ मुले मिळाली. जून महिना उलटून गेला होता. जुलचा पहिला आठवडाही संपत आला होता. वर्धिनीच्या संस्थापकांपैकी एक असणाऱ्या किशाभाऊ  पटवर्धनांना मी भीतभीतच सांगितले, ‘‘सर, फक्त बारा मुले मिळाली आहेत.’’ त्यावर ते उत्साहाने म्हणाले, ‘‘व्वा! छानच. करा सुरुवात. बाराचे एकशेवीस व्हायला वेळ लागणार नाही पुष्पाताई!’’
 माझ्या स्वप्नातही नव्हते आपण एवढे कार्य करू शकू, पण वíधनीचा संपूर्ण युवक-युवती गट, अधिकारी वर्ग, महिला कार्यकर्त्यां या सर्वाच्या प्रेरणेने आणि सहकार्याने हे कार्य घडत गेले. नाना मला नेहमी म्हणायचे, ‘आपण काहीच करत नसतो. तो परमेश्वर आपल्याकडून सर्व करून घेत असतो.’ आणि ते खरंच आहे. त्याचा पदोपदी मलाही अनुभव येत गेला. महिलांचे काम करताना, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधताना, मोठय़ा प्रतिकूल परिस्थितीतून जाताना या महिला मला दिसायच्या; पण ‘तूच ते छान कशी करू शकते आणि तुला ते किती छान जमणार आहे’ अशा प्रोत्साहनपर मार्गदर्शनाने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर आम्ही भर द्यायचो. अशा रीतीने जळत्या राखेतून समर्थपणे उभ्या राहिलेल्या अनेक महिलांचे अनुभव गाठीशी आहेत. त्यातील एक अनुभव आवर्जून सांगावासा वाटतो. नवरा मारतो, जाळतो, प्रसंगी खून  करतो अशी अनेक उदाहरणे समाजात घडताना दिसतात; परंतु एका जन्मदात्या बापानेच तीन वेळेला मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीला आम्ही तिच्या घरातून बाहेर काढलं आणि तिच्या पायावर उभं करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली. तिच्या घरातून खुशीखुशी परवानगी घेऊनच तिला व्यावसायिक प्रशिक्षण दिलं. त्यासाठी वडिलांची मानसिकता बदलणं, हे फार अवघड होतं; परंतु वर्ग संपताना तिचे वडील स्वत: मुलीची सुटकेस घेऊन वíधनीच्या कार्यालयात आले. ‘‘तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला तिला जिथे कुठे कामाला पाठवायचे आहे तिथे पाठवा.’’ अशा शब्दांत त्यांनी मुलीवरचा व संस्थेवरचा विश्वास व्यक्त केला. अशा अनेक मुली-महिला प्रसंगातून बाहेर पडल्या आणि स्व:तच्या पायावर उभ्या राहिल्या आपले कुटुंब न विस्कटता.
जवळजवळ दोन ते अडीच हजार महिला अशा प्रतिकूल परिस्थितीतून पार झाल्या. आता महिला विभागात आणि बाल विभागात काम करणाऱ्या ज्या महिला कार्यकर्त्यां आहेत. त्यासुद्धा आपला संसार सांभाळून स्वेच्छेने हे कार्य करताहेत. त्यातल्या कमलाताई टाककर पती गेल्यानंतर अगदी हवालदिल झाल्या होत्या; परंतु वíधनीत आल्या आणि बालकांमध्ये रमल्या, की त्यांना त्यांच्या वयाचे भान नसायचे. स्वातीताई काय्रेकर यांच्या घरात अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी या कामाला न्याय दिला. तसेच माधुरीताई गुरव या वíधनीपासून खूप लांब राहायला असूनही अनेक वर्षे शिवणवर्ग नेमाने घेत आल्या. नंदाताई बेंडखळे या मूळच्या नाशिकच्या. घरी दोन मुले, पती, नातवंडं असा संसार मागे टाकून गेली पाच वर्षे पूर्णवेळ साहाय्यक परिचारिका वर्ग घेताहेत. त्याचप्रमाणे, विजयाताई कुलकर्णी यांनी नìसगच्या कामातून ऐच्छिक निवृत्ती घेतली आणि वíधनीच्या कामात अडकल्या. यासह मराठेबाई, कलबागबाई सगळेच माझ्या प्रेरणास्थान आहेत. त्यांच्यामुळेच आज महिला विभाग इतक्या ताकदीने चालू आहे.
 ‘बालग्राम’मधील एका प्रसंगाची आठवण सांगते. दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस होता. ते माझ्या नाही, पण मुलांच्या लक्षात होते. मुलांमध्ये मोठय़ा असणाऱ्या १२ वर्षांच्या मंजूने सर्व मुलांना पहाटे लवकर उठवून मला जाग येण्याआधीच सर्वाना आंघोळी घातल्या, स्वच्छ कपडे घातले आणि प्रत्येकाच्या हातात मोगऱ्याची आणि अबोलीची फुले दिली. ओळीने ही मुले माझ्या खोलीत आली आणि एकदम सगळे म्हणाले, ‘‘हॅपी बर्थ डे मम्मी!’’ दचकून मी उठून बसले त्याचबरोबर प्रत्येकाने माझ्या पायावर फुले वाहिली आणि मला नमस्कार केला. मंजूने माझ्यासाठी गोड शिरा करून ठेवला होता. तसे पहिले तर मंजू फार मोठी नव्हती. अशा पद्धतीने मुलांनी प्रेमाने मला जिंकले होते. मी स्वत:च खूप प्रेमाची भुकेली होती. असा आपला समाज प्रेमाचा खूप भुकेला आहे. परमेश्वराने स्त्रीमध्ये या गोष्टी भरभरून दिल्या आहेत, त्या फक्त अशा प्रेमाच्या भुकेल्या समाजामध्ये वाटत आल्या तर आपल्या जीवनाचे सार्थक होईल.    ल्ल

संपर्क- पुष्पाताई नडे, ‘स्व’-रूपवर्धिनी, २२१, मंगळवार पेठ, पारगे चौक, पुणे-११.
दूरध्वनी- ०२०-२६१२१७०४, २६१३४३१०.
ई-मेल- pushpanade@gmail.com
wardhinee@gmail.com
वेबसाइट- http://www.swaroopwardhinee.org