News Flash

जगते प्रत्येक क्षण

‘‘मी खरी कोण-यशस्वी की अयशस्वी? अशा ‘अस्तित्ववादी’ प्रश्नात गुंतून न पडता; प्रसिद्धी, सामाजिक स्थान वगैरेला महत्त्व न देता; ज्या गोष्टीतून आंतरिक आनंद, समाधान मिळतील

| February 28, 2015 01:01 am

ch20‘‘मी खरी कोण-यशस्वी की अयशस्वी? अशा ‘अस्तित्ववादी’ प्रश्नात गुंतून न पडता; प्रसिद्धी, सामाजिक स्थान वगैरेला महत्त्व न देता; ज्या गोष्टीतून आंतरिक आनंद, समाधान मिळतील त्या करत मी आयुष्याचा प्रत्येक क्षण अगदी मस्त जगते.’’
सत्तरी जवळ येत चालली तरी स्वत:च्या आयुष्याच्या यशापयशाचं गणित मला अजून सुटत नाही. आयुष्यात एखाद्या खेळांतल्यासारखे जिंकण्या-हरण्याचे स्पष्ट नियम नाहीत; यश जोखण्याची वस्तुनिष्ठ परिमाणं नाहीत, हे एक कारण! पण त्याहून महत्त्वाचं, बालपणी आईवडिलांनी मला व माझ्या बहिणींना, यशापयशाचं मोजमाप शिकवण्याऐवजी केवळ भरभरून जगायला शिकवलं!
प्रत्येक बाबतीत सतत उतू जाणारा उत्साह हा माझा खास स्वभावधर्म! लहान असल्यापासून वाचनाची आणि नाचाची (की नाचण्याची) विशेष आवड होतीच, पण चक्क अभ्यासदेखील मी प्रचंड उत्साहाने करत असे! मोठं होता होता टेबल टेनिस, नाटक, सिनेमा अशी यादी लांबत गेली. आईवडिलांनी प्रत्येक उपक्रमाला प्रोत्साहन दिलं. कुठलंही बंधन न घालता. अपेक्षा एकच- जे करायचं ते मनापासून, स्वत:च्या ताकदीनुसार उत्तमरीत्या करावं; प्रयत्नात कमी पडू नये. शाळेत माझा नेहमी पहिला नंबर असे. पण ‘पहिली यायलाच हवी’ असा दबाव कधी आणला नाही. टेबल टेनिस स्पर्धा जिंकण्याहून अधिक वेळा मी हरायचे, पण ‘असं खेळून काय फायदा? त्यापेक्षा स्वयंपाकात लक्ष घातलंस तर लग्नानंतर उपयोगाला येईल!’ असा उपदेश आईनं कधी केला नाही. मला स्वत:च्या लयीनुसार वाढायला, फुलायला दिलं. मी कॉलेजात असताना आई शाळेत शिकवायला लागली. तोपर्यंत वडील एकटेच कमावणारे, त्यातून प्रामाणिक सरकारी नोकर. त्यामुळे घरी सुखवस्तूंचं वावडं होतं. मात्र, शक्य त्या चांगल्या नृत्य/संगीताच्या कार्यक्रमांना, चित्र-प्रदर्शनांना नेऊन आईने आमची सौंदर्यदृष्टी सतत जोपासली. गंमत म्हणजे, ज्या नाटय़-दिग्दर्शकांबरोबर माझा आयुष्यभराचा एक्सायटिंग पण तणावपूर्ण संबंध आला, त्या सत्यदेव दुबेचं कौतुक पहिल्यांदा मी आईच्याच तोंडून ऐकलं.
 एकोणिसाव्या वर्षी माझ्या सुरक्षित, स्वप्निल आयुष्यात अचानक खळबळ माजली. जन्मल्यापासून माझ्या हृदयात कसलासा विकार होता, ज्याची मला कल्पनादेखील नव्हती. अभ्यास करताना वारंवार विसर पडायला लागल्यामुळे वैद्यकीय तपासण्या केल्या गेल्या आणि ताबडतोब हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागली. नाच किंवा टेबल टेनिससारख्या शारीरिक हालचाली बराच काळ बंद ठेवाव्या लागल्यामुळे भरपूर रिकामा वेळ होता. केवळ या एका कारणासाठी मी कॉलेजच्या मराठी नाटकात काम केलं. लगोलग, राज्य नाटय़स्पर्धेत एका हौशी ‘ग्रुप’साठी केलेल्या हिंदी नाटकात मला चक्क अभिनयाचं पारितोषिक मिळालं. ही दोन्ही लोकप्रिय व्यावसायिक नाटकांची नक्कल होती. मला तशा नाटकात बिलकुल रस नव्हता. त्यामुळे अभिनयाची आवड असूनही भविष्याच्या आखणीत नाटय़क्षेत्र कधी नव्हतं. पण त्याच सुमारास       गिरीश कर्नाडच्या ‘ययाती’ या नाटकात चित्रलेखाची भूमिका करण्यासाठी दुबेकडून विचारणा आली. फायनल बी.ए.चं वर्ष असूनही आईने होकार दिला आणि आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं!
दुबे केवळ तालीममास्तर नव्हता. अभिनयातले बारकावे अभिनेत्यांच्या ‘रिकाम्या डोक्यात’ (हे त्याचे शब्द!) घुसवत असतानाच, प्रायोगिक नाटकांतून नाटय़कलेचे (तसेच समाजाचे) प्रस्थापित नियम झुगारायला तो प्रवृत्त करत असे. माझ्या मनाची अनेक कवाडं त्याच्यामुळे उघडली गेली. त्याचबरोबर, त्याच्या लहरी, तऱ्हेवाईक वागण्याचे चटकेही मला भरपूर मिळाले. बादल सरकारांच्या ‘एवम इंद्रजीत’मध्ये मानसीच्या भूमिकेसाठी त्याने मला निवडलं. तीन महिने तालीम चालू होती. तितक्यात, अरविंद (देशपांडे) स्पर्धेसाठी  बसवत असलेल्या ‘लोभ नसावा..’चा प्रयोग १५ दिवसांवर आला तरी नायिकेसाठी कुणी सापडत नसल्याने, मी ती भूमिका करावी, असा सुलभाने निरोप आणला. दुबेची रीतसर परवानगी घेऊन मी अरविंदच्या तालमींना जायला लागले. स्पर्धेचा प्रयोग पार पडल्यावर परत येऊन बघते तर माझी ‘इंद्रजित’मधून हकालपट्टी झालेली! मी परवानगी घेतल्याची आठवण दिल्यावर दुबे म्हणे, ‘‘अरविंद-सुलभा माझे जवळचे मित्र. मी परवानगी नाहीच नाकारणार. तू आपणहून नकार देण्याऐवजी मला विचारलंस, हेच चुकीचं होतं!’’ त्यावेळी मी फक्त २१ वर्षांची होते, नाटकाच्या दुनियेत नवी होते. आपल्यावर अन्याय झाला, भारतीय रंगभूमीवर ठसा उमटवायची संधी हातून गेली, वगैरे वाटून मी फार दु:खी झाले. पण मराठी रंगभूमीवर नव्या, तरुण लेखकांच्या प्रायोगिक नाटकांची लाट आली, ज्यात मला मनसोक्त कामं मिळाली. ‘गोची’ मधलं माझं काम बघून दुबेने पुन्हा बोलावून घेतलं; (आणि पुन्हा, जितक्या नाटकात मला घेतलं, त्याहून अधिक नाटकातून-कारणं न देता-काढूनही टाकलं!)   
लहानपणी मुक्तपणे वाढलेल्या मला जगाचं ‘खरं’ स्वरूप दाखवणारी दुसरी व्यक्ती म्हणजे माझ्या सासूबाई. त्यांनी बोहल्यावर अचानक माझं ‘चित्रा’ हे मूळ नाव बदलून ‘अनुया’ केलं, आणि पुढच्या क्षणापासून (दोन वर्षे ‘चित्रा’वर प्रेम करून लग्न केलेल्या नवऱ्यासकट) झाडून सगळे सासरचे मला ‘अनुया’ म्हणायला लागले, तेव्हा मला मोठा झटकाच बसला! माझ्या मते, लग्नाआधीची ओळख बदलणं हे माझं २१ वर्षांचं अस्तित्व पुसून टाकण्याजोगं होतं. तशात दुबेने ‘अनुया’ हे नाव मला न विचारता नाटकाच्या दुनियेतही पसरवलं! स्वत:च्या आयुष्यावर आपला ताबा राहिला नाही असं वाटून मी अतिशय अस्वस्थ झाले. पण न पटणारी गोष्ट चुपचाप स्वीकारणं माझ्या स्वभावात नव्हतं. नाव बदलण्याची प्रथा का चुकीची आहे, हे नवऱ्याला कारणांसकट पटवून, कायदेशीररीत्या पुन्हा ‘चित्रा’ व्हायचं मी ठरवलं. हे घडायला दहा र्वष लागली खरी, पण त्या प्रक्रियेतून जाता जाता- तोवर स्त्री-पुरुष समानता गृहीत धरलेल्या- माझे डोळे उघडले; समाजाचे पितृसत्ताक नियम, स्त्रियांचे हक्क यांविषयीच नाही तर इतर सामाजिक/सांस्कृतिक बाबींविषयीसुद्धा मी विचार करायला लागले; हा फायदा काही थोडाथोडका नव्हता!
बी.ए. संपल्या संपल्या मी प्रेमविवाह केला. कौटुंबिक जबाबदाऱ्या, एम.ए. चा अभ्यास, पुढे नोकरी, नाटक अशी कसरत सुरू झाली. ते दिवस रोमांचकारी होते यात शंका नाही. प्रायोगिक नाटकात अमोलचं दिग्दर्शक म्हणून आणि माझं अभिनेत्री म्हणून नाव होत होतं. तेव्हढय़ात आमच्या आयुष्याने अचानक खूप मोठं वळण घेतलं. अनपेक्षितपणे, अमोल हिंदी सिनेमात केवळ नायकच नाही तर ‘हिट स्टार’ झाला, आणि आमचं जीवन माझ्या तोवरच्या कुठल्याही योजनेत नसलेल्या मार्गावरून वाटचाल करायला लागलं. पैसा, पारितोषिकं, सन्मान यांचा आनंद, अभिमान होताच. पण त्याचबरोबर आमचं खाजगी आयुष्य नाहीसं होऊ  लागल्याचं दु:ख होतं; शाल्मलीला ‘साध्या सरळ, मोकळ्या’ वातावरणात वाढवू शकू का, ही काळजी होती. मुख्यत:, स्वत:च्या आयुष्यासंबंधीचे कित्येक महत्त्वाचे निर्णय घेणं माझ्या हातात न उरल्यामुळे माझी घुसमट होत होती. पण ‘स्टार’ होणं म्हणजे गुन्हा करणं नव्हे हेही कळत होतं. त्यामुळे, (अधूनमधून रडले-चिडले तरी) परिस्थिती स्वीकारून, अमोलच्या यशात, आनंदात सहभागी झाले.
‘आक्रीत’पासून आम्ही एकत्र चित्रपट बनवायला सुरवात केली आणि पुढची २० वर्षे मनाजोगते चित्रपट बनवण्यात गेले. पटकथा लिहिण्यापासून ते चित्रपट सेन्सॉर होईपर्यंत प्रत्येक स्तरावरच्या कामात स्वत:ला झोकून देण्यात मला मिळणारा आनंद काही और होता. पण काही काळ गेल्यावर माझ्या लक्षात आलं की ‘बायको’ असल्याने निर्माते माझा सहभाग गृहीत धरतात; अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या तरी त्यांच श्रेय मला अधिकृतरीत्या मिळत नाही. प्रत्येक वेळी असं घडलं की माझी ‘व्यावसायिक ओळख’ धूसर होत चालली आहे, असं वाटून मी सुन्न होई. पण पुढचा चित्रपट आला की मागचं विसरून त्यात पुन्हा बुडी मारी. या सगळ्या प्रकारात माझी अस्वस्थता वाढायला लागली; आत्मविश्वास हळूहळू कमी होऊ  लागला. यातून मार्ग काढणं आवश्यक होतं. शेवटी ‘कैरी’ आणि ‘ध्यासपर्व’ पूर्ण झाल्यावर स्वतंत्रपणे काम करायचं ठरवून, तसं मी अमोलला सांगितलं आणि ‘कुठल्याही कामासाठी गरज पडल्यास मी आहेच’ ही खात्री दिली. पण हे चित्रपट संपता संपता आयुष्याला वेगळी, अनपेक्षित कलाटणी मिळाली..   
वास्तविक, घटस्फोटाच्या बाजूने वाद सहज जिंकता येण्याइतके भरपूर मुद्दे माझ्यापाशी होते. लग्न मोडल्यानं आपण मरत नाही हे कळण्याइतकी अक्कलही मला नक्कीच होती. पण बऱ्यापैकी चाललेलं आयुष्य अचानक उद्ध्वस्त होणार असं वाटून मनात भीती, दु:ख, निराशा इत्यादी भावनांची ही गर्दी झाल्यावर समंजस विचारांना थारा कुठला? भविष्यात फक्त अंधारच दिसायचा! मी निराशेचा तळ गाठला त्याच क्षणी माझ्यातली, आयुष्यावर प्रचंड प्रेम करणारी दुसरी चित्रा खडबडून जागी झाली. आयुष्य सशक्तपणे तसंच आनंदाने जगण्याच्या उत्कट इच्छेपुढे माझा अहंभाव गौण होता. मी अजिबात संकोच न करता जवळच्या सगळ्यांची, तसंच मानसतज्ज्ञांची मदत घेतली; लँडमार्कनामक संस्थेचा नॉन लिनिअर शैक्षणिक कोर्सदेखील केला, आणि असाहाय्यतेच्या, निराशेच्या दलदलीतून शक्य तितक्या लवकर बाहेर पडले. या प्रयत्नातून माझा आत्मविश्वास तर मी परत मिळवलाच, पण त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा धडाही मला मिळाला- ‘नको असलेली कुठलीही घटना आयुष्यात घडल्यावर इतरांना दोष देण्याऐवजी, त्यासाठी मी स्वत: किती जबाबदार आहे हे तपासून पाहिलं, तर आयुष्याची दोरी माझ्याच हातात राहते,’ हा! गंमत म्हणजे, हे तत्त्व लक्षात आल्यासरशी मनातले वेडेवाकडे किडे, वर्षांनुवर्षे जपून ठेवलेले खुन्नस, चक्क गायब व्हायला लागले! इच्छेविरुद्ध काही घडलं की लगेच मनातल्या मनात पटकथा लिहून त्यात ‘दु:खी नायिके’ची भूमिका करण्याच्या माझ्या सवयीचं मलाच हसू यायला लागलं! इतरांचं म्हणणं ऐकून घ्यायची पूर्वी सवयच नव्हती, ते आता (चुकतमाकत का होईना) मी करायला लागले!! आणि त्याचबरोबर चित्रपट दिग्दर्शित करायची माझी इच्छा पुन्हा उफाळून आली.
खरं तर ८४-८५ सालच्या सुमारास, ‘बाल चित्रपट समिती’साठी मी माझी पहिली फिल्म बनवावी असं एका हितचिंतकाने सुचवलं. मी त्या दृष्टीने विषय शोधत असतानाच अमोल त्या संस्थेचा अध्यक्ष झाला. त्याची बायको असल्याने मी संस्थेसाठी चित्रपट बनवू शकत नव्हते. माझी निराशा झाली खरी, पण लगेच ‘कच्ची धूप’ ही वेगळ्या धर्तीची मुलांची मालिका लिहून मी तिची भरपाई केली. दूरदर्शन व स्पॉन्सर्सला नावाजलेला दिग्दर्शक हवा असल्यामुळे दिग्दर्शन अमोलचंच होतं. त्यावेळी वाटलं, आपल्याला काय पुन्हा संधी मिळेल, पण २० वर्षे कुठल्या ना कुठल्या कारणास्तव संधी हुकत गेली. आता माझ्या लक्षात आलं की वाट पाहत बसल्याने संधी मिळत नाही. ती आपणहून चालत येत नाही; खेचून आणावी लागते. मी ठरवलं की यावेळी काही झालं तरी मागे न हटता चित्रपट बनवायचाच! वय रिटायर होण्याचं, स्वतंत्र दिग्दर्शनाची पहिली वेळ, पैशाची मारामार पण कशालाही न जुमानता पुढे जात राहिले आणि माझ्या सहकाऱ्यांनी तितक्याच जोशात मला साथ दिली.
‘माती-माय’च्या शूटिंगमध्ये धुळीची अनपेक्षित वादळं, परवान्यांसाठी अधिकाऱ्यांनी केलेली अडवणूक, गुंडांच्या धमक्या अशा अनेक अडचणी आल्या. शूटिंगमध्ये जराही विलंब परवडणारा नव्हता. पैसे चारायचा तर प्रश्नच नव्हता. प्रत्येक वेळी न डगमगता, शांतपणे मार्ग काढावा लागला. मुळात उतावळी असलेल्या माझ्यासाठी ही पुढची पायरी होती. काम करताना चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा हा एकच इरादा मनात होता. तेव्हा राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षेपलीकडे ‘माती-माय’चं कौतुक झालं, ही अतिशय आनंदाची गोष्ट! पण तितकीच समाधानाचीही, की फासे उलटे पडल्यावरसुद्धा (क्षणभर निराश झाले तरी) ते मी आज हसतमुखाने स्वीकारते.
लहानपणी जशा अनेक गोष्टी मी (अति)उत्साहाने करत असे, तशाच आजही करते-अधाशासारखं वाचते, लिहिते, चांगले सिनेमे बघण्याचं व्यसन जपते, देशोदेशीचा प्रवास करते, नवनवे मित्र-मैत्रिणी मिळवते. मुख्य म्हणजे, सतत काही नवीन शिकत राहते! आज जे करते ते स्वत:ला कसं जगायचंय हे ठरवून; आयुष्यातून मला नेमकं काय मिळवायचंय याचा विचार करून.
समलिंगी लोकांवरचा अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने त्यांच्याबद्दलची खरी माहिती इतर लोकांपर्यंत पोचवणं आवश्यक आहे असं वाटल्यामुळे मी त्या प्रश्नांवर लेख लिहायला, चर्चा करायला सुरुवात केली. माझ्या लेस्बियन मुलीला जसं मी आनंदाने स्वीकारलं आहे, तसंच इतर समलिंगी मुलांना त्यांच्या आईबापांनी स्वीकारावं यासाठी प्रयत्न करायला लागले. ‘घरच्यांनी मला स्वीकारलंय’ असं भरल्या डोळ्यांनी सांगत या मुलांपैकी कुणी मिठी मारतं, तेव्हा आजवर मिळालेल्या कुठल्याही पारितोषिकापेक्षा ते मला अधिक महत्त्वाचं वाटतं.     
एकूण काय, ‘मी खरी कोण-यशस्वी की अयशस्वी?’ अशा ‘अस्तित्ववादी’ प्रश्नात गुंतून न पडता; प्रसिद्धी, सामाजिक स्थान वगैरेला महत्त्व न देता; ज्या गोष्टीतून आंतरिक आनंद, समाधान मिळतील त्या करत मी आयुष्याचा प्रत्येक क्षण अगदी मस्त जगते.   
 चित्रा पालेकर -chitrapalekar@gmail.com  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2015 1:01 am

Web Title: living each moment
Next Stories
1 प्रेमाचा पासवर्ड त्यागच!
2 गाजर
3 नो मोर ‘टॉपलेस’
Just Now!
X