News Flash

जगण्याचा ८८ वर्षांचा सराव!

आम्ही सारे मित्र रोज देवाला श्रेय देतो. तरुणपणी असं श्रेय रोज देत होतो का, हे नीट आठवत नाही.

‘शतायुषी भव’ असा आशीर्वाद आम्ही आमच्या लहानपणी कित्येक वेळा घेतला आहे.

भा. ल. महाबळ – mahabal60@gmail.com

माझे सर्व हयात मित्र म्हातारे आहेत. माझं चालू वय ८९ आहे. माझे मित्र ८५ वयाच्या वरचे म्हणजे म्हातारेच आहेत, यात काहीच नवल नाही. आम्ही सारे एवढे भरपूर कसे काय जगलो, हा प्रश्न आम्हा मित्रांना विचारला जातो. आमचा देवावर विश्वास आहे. त्यामुळे, ‘देह देऊनी तूच रक्षिसी। अन्न देऊनी तूच पोशिसी। बुद्धि देऊनी काम सांगशी। ज्ञान देऊनी तूच तारिशी॥’ ही कविता आम्ही उत्तरादाखल उच्चारतो.

आम्ही सारे मित्र रोज देवाला श्रेय देतो. तरुणपणी असं श्रेय रोज देत होतो का, हे नीट आठवत नाही. पण आजच्या वयात रस्त्यावर साठलेलं तुडुंब पाणी आणि पाण्याखाली लपून बसलेले खड्डे आम्ही टीव्हीवर पाहतो आणि देवाला शंभर वेळा घरूनच नमस्कार करतो. तरुण वयातली थकबाकी भरून काढतो. आमची दिनचर्या काय?, जेवणखाण, व्यायाम, झोप याबाबतचे आमचे काही नियम आहेत का?, हे नेहमीचे प्रश्न आम्हा मित्रांना विचारले जातात. खरं उत्तर आहे, ‘घेतो झोप सुखे, फिरोनि उठतो ही ईश्वराची दया!’ जगण्यासाठी आम्ही खास काही प्रयत्न करत नाही. आमच्या म्हाताऱ्या म्हणजे कमकुवत इंद्रियांच्या आज्ञा आम्ही इमानेइतबारे ऐकतो. भूक नसेल तर आम्ही अगदी श्रीखंड समोर आलं तरी तोंड उघडत नाही. ‘थकलो’ असा पुसट संशय जरी आला, तरी पलंगावर आडवे होतो. आम्ही वेळीअवेळी झोपतो याबद्दल कुणाचीही घरी तक्रार नसते, उलट कौतुकच होतं. ‘‘तुमची एवढीच मदत आम्हाला हवी. घराबाहेर जाऊ नका. घसरून पडून, फ्रॅक्चर होऊन अंथरूण पकडू नका. बस्स! एवढी मदत आम्हाला खूप झाली.’’ ही मदत देण्याकरता आम्ही एका पायावर नाही तर पूर्ण देहानं पलंगावर आडवे होऊन डोळे मिटायला तयार असतो.

आम्हा मित्रांची मुलं आणि त्यांचे मित्र आम्हाला अधूनमधून ‘वृद्धपणी मजेत कसं जगावं?’ हे सांगणारी पुस्तकं आणून देतात. आमची मुलं आणि त्यांचे मित्र साठीच्या वयातले आहेत हे मुद्दाम सांगतो. मुलं या शब्दांमुळे गैरसमज होऊ नये म्हणून खुलासा. जपानी लोक दीर्घायुषी आहेत. शंभर वर्षांपर्यंत जगणं हे जपानमध्ये स्वाभाविक समजलं जातं म्हणे! जपानी वृद्धांविषयी मराठीत लिहिलेली काही पुस्तकं मी चाळली. त्या पुस्तकांत दीर्घायुष्याबाबत जे सांगितलं आहे ते मला शाळेत असल्यापासूनच माहीत आहे. आहार, व्यायाम, निद्रा, मन आनंदी ठेवण्यासाठी छंद, हे जपानी लोकांच्या भरपूर आयुष्यामागचे घटक आहेत. आम्हा वृद्ध मित्रांना हे घटक अवगत आहेत. मला तर काही आयुष्यवर्धक सुभाषितं अर्थासह पाठ होती. माझ्या आजच्या वयात मला माझं नावच काय ते खात्रीपूर्वक, विनाविलंब आठवतं. पण माझ्या वहीत सुभाषितं आहेत. त्यांचे काही चरण मी देतो.

‘दिनान्ते च पिबेत् दुग्धम्। निशान्ते च पिबेत् पय:।

भोजनान्ते पिबेत् तक्रम्। किम् वैद्यस्य प्रयोजनम्॥’

अर्थात रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यावं, सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यावं, जेवण झाल्यावर ताक घ्यावं. एवढं केल्यावर वैद्य-डॉक्टर यांच्याकडे जायची गरज पडणार नाही. माझ्या एका मित्राची- प्रधान पणजोबांची स्मरणशक्ती वयानुसार अधू झाली आहे. ते आपण दूध घेतलं होतं हे रोज नियमितपणे विसरतात. मी त्यांच्या सुनेला (वय ५७) माझी सून वापरते ती सोपी रीत वापरायला सांगितली. माझी सून मला दूध आणून दिल्यावर माझी सही घेते. विस्मरणापोटी मी दुसऱ्या वेळी दूध मागितलं तर सून दुसऱ्यांदा ते आणून देते आणि पुन्हा सही घेते. त्यामुळे मला तिसऱ्या वेळी विस्मरण होत नाही.

आहारावरचं आणि व्यायामावरचं आणखी एक सुभाषित बघा-

‘परिश्रम: मिताहार: भूगतौ अश्विनी सुतौ।

तौ अनादृत्य न एवं अहम् वैद्यम् अन्यम् समाश्रये॥’ अर्थ सरळ आहे- भरपूर श्रम आणि मोजका आहार हे जणू भूलोकी उतरलेले आश्विनीकुमार – दोन वैद्यच आहेत. त्यांचा अनादर करून मी इतर वैद्यांकडे जाणार नाही. भावार्थ असा, की भरपूर व्यायाम करा आणि आहार हलका ठेवा. मग डॉक्टरांकडे जायची वेळ येतेच कशाला?

मोकाशी आजोबा हे माझे मित्र अन्नपदार्थाना न्याय द्यावा आणि शरीरावर अन्याय करू नये या मताचे- म्हणजे भरपूर खावं आणि व्यायाम करून शरीराला छळू नये, या मताचे आहेत. मोकाशींचा या सुभाषितावर विश्वास नाही. अमृतप्राशन करणारे, कल्पवृक्षांच्या उपवनात विहार करणारे देव आजारी पडणंच शक्य नाही. मग आश्विनीकुमार हे वैद्य देवलोकात असतीलच कसे? म्हणजे परिश्रम आणि मिताहार हे पृथ्वीवर उतरलेले देवांचे वैद्य आहेत, ही या सुभाषितकारानं उठवलेली कंडी आहे. भरपूर श्रम आणि मोजका आहार या शब्दांतील भरपूर आणि मोजका या विशेषणांची जागा बदलणारे मोकाशी माझ्याच वयाचे आहेत. त्यांना वयाच्या मोठेपणाच्या आधारावर विरोध करणंही अवघड आहे.

जपानी लोकांना काहीतरी छंद असतो. त्यामुळे त्यांचं मन म्हणे प्रसन्न राहतं. मनाची प्रसन्नता त्यांच्या दीर्घायुष्याला उपकारक ठरली आहे. माझे दीर्घायुषी मित्र ओक यांचा या ‘प्रसन्नता तर्का’ला वेगळ्या प्रकारे पाठिंबा आहे. ओक म्हणतात, ‘‘आपण सर्वानी वेगवेगळ्या ऑफिसात ३०-३५ वर्षं मजेत नोकऱ्या केल्या. परंतु आपले साहेब आपल्या कामांवर खूश नसत. ते चिडचिड करत. त्यांचा निम्मा वेळ ते तुमच्या-माझ्या चुका दुरुस्त करण्यात घालवत. आतल्या आत धुमसत. परिणामी ते नेहमी अप्रसन्न असत. आजची स्थिती काय आहे? आपण सर्व नव्वदीच्या दिशेनं चाललो आहोत, आणि आपणा सर्वाचे साहेब? एकही हयात नाही. कारण त्यांची मनं नेहमी अप्रसन्न होती.’’ आम्ही दीर्घायुषी मित्रमंडळी ओकांना संमती देतो.

वरील सुभाषितं पंचवीस-तिशीतल्या हिरव्यागार, दमदार तरुणांकरता नाही. असे तरुण क्वचित, चुकून आम्हाला नमस्कार करायला येतात. वाकून नमस्कार करतात आणि सांगतात, ‘‘काळजी घ्या आम्हाला तुमचे आशीर्वाद हवे आहेत.’’ अच्छा! म्हणजे गेले दोन तास हॉलमधून जो हशा-आनंद-उत्साह आम्हाला ऐकू येत होता तो या मंडळींचा होता तर! अशा आशीर्वाद मागणाऱ्या तरुणांमुळे आम्हा म्हाताऱ्यांना आनंद होतो. याचा अर्थ या तरुणांच्या ‘यूटय़ूब-गूगल’वर अद्याप आशीर्वाद देण्याची सोय नाही. आमचा काही उपयोग आहे तर!

‘शतायुषी भव’ असा आशीर्वाद आम्ही आमच्या लहानपणी कित्येक वेळा घेतला आहे. ज्येष्ठांचा तो आशीर्वाद खरा करण्याकरता आणि तरुणांना आशीर्वाद देण्यासाठी शंभर वर्षं जगावं, असं आम्ही मित्र परस्परांना फोनवर सांगतो. ८८ वर्षं जगण्याचा मला सराव आहे, एकदाही मरणाचा अनुभव आलेला नाही. आता फक्त आणखी बारा वर्षं एकदाही न मरता जगायचं. ‘म्हातारपणी नवीन काही शिकणं, करणं अवघड वाटतं. जगणं सरावाचं आहे. तेच करावं,’ असा माझा तर्कशुद्ध मुद्दा पटल्यामुळे माझे मित्र शतायुषी व्हायला तयार झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 5:35 am

Web Title: living happy life at the age of eighty eight dd70
Next Stories
1 प्रतिभावंतांचं जाणं आणि सांस्कृतिक सपाटीकरण?
2 स्त्री स्वातंत्र्याच्या दिशेने ७३ वर्षं…
3 जीवन विज्ञान : प्रक्रियेतील पाणीशुद्धता
Just Now!
X