31 October 2020

News Flash

सूर निरागस हो!

जगण्याच्या प्रवाहात परिस्थितीनुसार किंवा येणाऱ्या अनुभवांनुसार आपला एक स्वभाव बनत जातो.

लहानपणी आपल्या प्रत्येकाकडे असणारी, कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची खुली, निर्मळ दृष्टी या धबडग्यात हरवते का?

प्रभाकर बोकील – pbbokil@rediffmail.com

जगण्याच्या प्रवाहात परिस्थितीनुसार किंवा येणाऱ्या अनुभवांनुसार आपला एक स्वभाव बनत जातो. प्रौढपणा अंगात भिनतो. लहानपणी आपल्या प्रत्येकाकडे असणारी, कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची खुली, निर्मळ दृष्टी या धबडग्यात हरवते का?

आज दिवस विचित्रच उगवला होता. मनासारखं काहीच होत नव्हतं. नेहमी सकाळी साडेआठच्या ठोक्याला शाळेत माझ्या केबिनमध्ये पाऊल ठेवणारी मी, आज पंधरा मिनिटं उशिरा पोचले. कुणीतरी सिग्नलची शिस्त न पाळल्यामुळे झालेल्या ट्रॅफिक जॅममुळे हा उशीर झाला. मुळात बेशिस्तपणा खपवून घेतला जातो, कायद्याची कुणालाच भीती नाही, म्हणून बेजबाबदारपणा वाढतो. अशा वेळेस गाडी चालवताना डोकं कामातून जातं माझं.

केबिनबाहेर आठ-दहा जण ‘वेटिंग’मध्ये ताटकळत होते. मुख्याध्यापकांना भेटायची वेळ साडेआठ ते साडेनऊच असते, हे भेटणाऱ्यांनाही माहीत असतं. कारण साडेनऊच्या ठोक्याला मी शाळेच्या ‘राऊंड’साठी माझ्या केबिनबाहेर पडते. तशी शिस्तच आहे माझी. या शिस्तीमुळेच शाळेत ‘राधा मॅडम’ या शब्दालादेखील वेगळं वजन आहे, वचक आहे. पंधरा वर्षांपूर्वी शाळेत रुजू झाले तेव्हा शाळेत जो बेशिस्तपणा भरून राहिला होता, तो हद्दपार करण्यात माझे सहा महिने गेले. दरम्यान काही शिक्षक -शिक्षिका शाळा सोडून गेले. तरी विश्वस्तांनी माझ्यावर नेहमीच विश्वास दाखवला. मी आल्यानंतर दरवर्षी लागणारा निकाल पाहून पालक या शाळेकडे वळू लागले. आज ‘शारदा भवन’ शाळा शिक्षणाबरोबर चांगल्या संस्कारांसाठी ओळखली जाते.

केबिनमध्ये शिरता-शिरताच भेटायला आलेल्या पहिल्या माणसाला आत पाठवायला मी शिपायाला सांगितलं. ‘‘मे आय कम इन मॅडम..’’ दारात एक तरुणी उभी.

‘‘येस, प्लीज.. बसा.’’

स्वत:ची ओळख करून देत ती म्हणाली, ‘‘मी माझ्या मुलाच्या मिनी के. जी.च्या प्रवेशासाठी आले आहे.’’

‘‘पण अ‍ॅडमिशन्स पुढच्या महिन्यात आहेत.’’

‘‘हो, अ‍ॅडमिशनसाठी ३० सप्टेंबर ही तुमची ‘कट-ऑफ’ची जन्मतारीख आहे अन् माझा मुलगा २ ऑक्टोबरचा आहे. म्हणून..’’

‘‘म्हणून काय? तुमचा मुलगा कुणी वेगळा आहे का? कुणासाठीही नियम वाकवला जाणार नाही इथे मी असेपर्यंत! ’’

‘‘पण  १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर- पर्यंतची जन्मतारीख असणाऱ्या मुलांना प्रवेश देण्याचा अधिकार शाळांच्या मुख्याध्यापकांना..’’ ती म्हणाली.

‘‘तुम्ही मलाच माझे अधिकार सांगताय.. की धमकी देताय? तुमचा ‘अ‍ॅप्रोच’च चुकलाय. मुळात तुम्ही माझ्यापर्यंत यायचं कारणच नव्हतं.’’

‘‘मॅडम, ऑफिसमध्ये बसतात त्या बाईंनी मला तुम्हाला भेटायला सांगितलं..’’

मी ऑफिसात फोन लावला. ‘‘हे बघा, अ‍ॅडमिशनसाठी माझ्याकडे कुणाला पाठवू नका इथून पुढे..’’ फोन ठेवताना माझा आवाज चढल्याचं मलाच जाणवलं.

आवाज खाली आणून समोर बसलेल्या त्या आईला म्हटलं, ‘‘हे बघा, तुम्ही सांगताय त्या अधिकाराचा देणगीसाठी गैरवापर होतो. माझी शाळा ‘अ‍ॅडमिशन विदाऊट डोनेशन’ या तत्त्वावर चालते आणि मुख्याध्यापकाच्या अधिकारातच सांगते, तुमच्या मुलाचा प्रवेश येत्या वर्षांसाठी होणार नाही. पुढच्या वर्षी नियमानुसार होईल. त्यामुळे डोंट फील सॉरी.. आणि खेळू द्या की थोडं मोकळेपणानं एवढय़ाशा मुलाला.’’ मी थोडं हसत वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला;  पण त्या ‘आई’वर काहीच फरक पडला नाही. ‘‘थँक्स मॅडम..’’ म्हणत ती उठली.

तेवढय़ात एक छोटा मुलगा केबिनच्या दारात येऊन तिला बिलगत, माझ्याकडे बघत म्हणाला, ‘‘आजी, सी यू.. टेक केअल.’’

‘‘अरे चिन्मय, तू कसा आत आलास? अन् आजी कुठाय?’’असं म्हणत चिन्मयचा हात धरून ती आई बाहेर पडली.

मी खिडकीतून बाहेर पाहिलं. आजी त्या कॉरिडॉरमध्येच ओशाळल्या चेहऱ्यानं, पण नातवाकडे कौतुकानं पाहात उभी होती. ‘‘अगं, माझा हात सोडून पळाला, बिलंदर!’’

बिलंदर!..  माझ्या डोळ्यांत पाणीच आलं.  असं कसं झालं? मी सहसा हळवी-बिळवी होत नाही. पण आज.. आजचा दिवस विचित्रच उगवला होता.. मनासारखं काहीच होत नव्हतं.. दिवस कसाबसा गेला; पण ‘बिलंदर’ अन् त्याची आई, आजी काही डोक्यातून जाईनात. फार कठोर वागले का मी?

संध्याकाळी घरी आनंदनं हसतमुखानं दार उघडलं. मी थोडंसं हसले अन् आत निघून गेले. ताजीतवानी होऊन आल्यावर, आनंदनं केलेला चहा घेतानादेखील गप्पच होते.

‘‘अनू, आज गप्पगप्प? चहा कसा झालाय, नाही सांगितलंस..’’ तो म्हणाला.

‘‘सॉरी आनंद. एकदम मस्त झालाय चहा..’’

‘‘ सॉरी कशासाठी? शाळेत काही विशेष घडलं का?’’

‘‘आज शाळेत मला माझ्या मुखवटय़ाची जाणीव झाली.’’

‘‘मुखवटा? कसला?’’

‘‘हाच.. शिस्तीचा, कठोरपणाचा.’’

‘‘काय झालं काय, ‘राधा मॅडम’?’’ डोळे बारीक करत आनंदचा प्रश्न. एरवी आनंदसाठी मी फक्त ‘अनू’ असते. तो मला ‘राधा मॅडम’ म्हणतो तेव्हा.. काही तरी गडबड असते. मी घडलेला सारा किस्सा सांगितला.

‘‘ठीक आहे. यात काय विशेष.. पण हा तुझा मुखवटा नाही. तुझ्या स्वभावाप्रमाणेच तू वागलीस. तुझी शिस्त अन् कठोरपणा मला नवीन नाही. रोज शाळा सुटल्यावर मुलं कशी बेशिस्तपणे वागतात, तसा हल्ली निवृत्त झाल्यापासून घरी तू नसताना मी बेशिस्तपणे वागतो, ते सोड!’’ मिश्कीलपणे आनंद म्हणाला. दोघांचे दोन टोकांचे स्वभाव असल्यामुळे कदाचित आमचं छान जमत असावं.

‘‘तुझा बेशिस्तपणा मीदेखील सांभाळून घेते.. पण मी हळवी का झाले विचारलं नाहीस?’’

‘‘कारण तू आता बदलते आहेस.. थोडी हळवी झालीयेस. त्या बिलंदरच्या ‘सी यू, टेक केअल’मुळे आपल्या ‘बिलंदर’ची आठवण झाली, करेक्ट?’’ माझ्या डोळ्यांत टचकन् पाणीच आलं.

‘‘अनू, काय झालं? फोन लावायचाय का बिलंदरला? गाढ झोपेत असेल तिकडे तो.’’

‘‘नको. काल रात्रीच भेटला की फोनवर..’’

‘‘अन् फोन संपताना म्हणाला, गुड नाइट.. ठेक केयल, आजी!’’ बिलंदरच्या अमेरिकन अ‍ॅक्सेंटमध्ये आनंद म्हणाला.. अन डोळे पुसताना मला हसू आलं.

बिलंदर म्हणजे आमचा ‘बिल’. अमित आणि सेलेनाचा अडीच वर्षांचा मुलगा. अमितनं अमेरिकन सेलेनाशी तिकडेच लग्न करून आधी बाबाला- आनंदला कळवलं. ‘माझा कठोर स्वभाव’ हे त्यानं गुपचूप न सांगता लग्न केल्याचं सांगितलेलं कारण, हाही राग होताच; पण त्यामुळे वर्षभर आमच्यात संवाद नव्हता. बिलचा जन्म झाल्यावर सगळंच बदललं. दोन वर्षांपूर्वी आम्ही दोघंही तिकडे राहून आलो. आता रोज वाटतं, का असा लळा लावतात ही पोरं? अमेरिकेला अमित निघाला तेव्हा हे जाणवलं होतं.. अन् आता हा बिलंदर ‘बिल’!

‘‘काय गं अनू, पुन्हा हरवलीस?’’

‘‘खरंच माझ्यात बदल झाला आहे का रे?’’

‘‘बदल प्रत्येक वयात होत असतो अनू. वयस्क होताना जास्तच. आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, येणारे अनुभव.. सारं काही बदलत असतं. लग्नापूर्वी पाहिलेला मृणाल सेनचा ‘भुवन शोम’ आठवतोय?’’

‘‘फारसा नाही आठवत. त्याचं काय?’’

‘‘साधी सरळ छान गोष्ट होती. भुवन शोम हा करडय़ा शिस्तीनं, कठोरपणानं वागणारा, कुठलीही तडजोड न करणारा रेल्वे अधिकारी. नोकरीच्या अखेरच्या दिवसांत सुट्टी घेऊन फिरण्यासाठी, पक्ष्यांची शिकार करण्यासाठी गुजरातमधल्या एका  खेडय़ात जातो. तिथे त्याला एक अल्लड निरागस तरुणी भेटते. बारीकसारीक गोष्टींत ती भरभरून उत्साहानं बोलत असते. तिच्या अल्लडपणाचा, निरागसपणाचा त्याच्यावर खूप परिणाम होतो. तो अंतर्बाह्य़ बदलून जातो. शिस्त, कठोरपणा यापलीकडे आयुष्य जगण्याची दृष्टी येते. कामावर परत आल्यावर एका कर्मचाऱ्याचा किरकोळ गुन्हादेखील तो माफ करून टाकतो, तेव्हा खूप आनंदी होतो. स्वत:वरच खूश होतो.. तो शेवट तुला तेव्हा पटला नव्हता.’’

‘‘चित्रपट आपण दोघांनी पाहिला; पण तुला किती छान आठवतोय.. खरंच, किती छोटय़ाछोटय़ा गोष्टी आपण सहज विसरून जातो नाही? हल्ली कधी वाटतं, आयुष्य जगायचंच राहूनच गेलं..’’

‘‘असंच काही नाही. आपण आपल्या परीनं आयुष्याला सामोरे गेलो. फक्त आपल्या भूमिकेचा, तत्त्वाचा टोकाचा विचार करताना त्यात थोडा जिव्हाळा, थोडी माणुसकी मिसळली की आयुष्य सहजसुंदर होतं अनू!’’

‘‘माझ्या कठोर शिस्तीमुळे मी किती जणांवर अन्याय केला असेल नाही?’’ मी न राहावून आनंदला विचारलं.

‘‘त्या बिलंदरच्या आईवरदेखील! तिला शाळेत बोलावून चूक सुधारता येईल.’’ आनंद.

‘‘तिला आता कसं शोधणार? रागाच्या भरात तिचं नावदेखील विसरले रे..’’

‘‘पण एक विचारू?  कारण ‘जर-तर’च्या प्रश्नांना तसा फारसा अर्थ नसतो.. तरी विचारतो. आपला ‘बिलंदर’देखील

१ ऑक्टोबरचा आहे. इथं असता तर अ‍ॅडमिशन दिली असतीस तुझ्या शाळेत?’’आनंदचा प्रश्न ऐकून मी स्तब्ध झाले. मनाची चलबिचल झाली. सकाळी त्या ‘आई’शी बोलताना हे लक्षातच आलं नव्हतं. खरंच मी काय केलं असतं? माझ्याच शाळेत, मुख्याध्यापिकेच्या अधिकारात मी त्याला प्रवेश देणं मला पटलं नसतं; पण दुसऱ्या चांगल्या शाळेत कदाचित.. नक्कीच शब्द टाकला असता.

‘‘तू मला चांगलं ओळखतोस आनंद.. माझ्यापेक्षा जास्तच. तुला काय वाटतं? मी काय केलं असतं?’’

‘‘तुझा ‘भुवन शोम’ झाला असता!’’

मी सुस्कारा टाकला. आनंदइतकं मला दुसरं कोण ओळखणार? पोटच्या अमितनं तरी कुठं ओळखलं?

‘‘कसं आहे ना अनू, आयुष्याच्या सुरावटीत कुठला सूर घ्यायचा, कुठला वज्र्य करायचा, हे आपण स्वभावानुसार ठरवतच असतो. त्यांचं कोमल, मध्यम, तीव्र स्वरूप रागानुसार म्हणजेच परिस्थितीनुसार, वयानुसार बदलत असतं. मात्र त्या सप्तसुरातला एक सूर म्हणजे निरागसतेचा ‘नी’ मात्र कायम जपायला हवा!’’

आजचा दिवस विचित्रच उगवला खरं.. पण अस्तास जाताना बरंच काही देऊन गेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:55 am

Web Title: living life and nature of person dd70
Next Stories
1 विस्कटलेली घडी सावरताना..
2 गुंतवणुकीचा फेरविचार करताना..
3 मैत्र जीवाचे!
Just Now!
X