28 February 2021

News Flash

नात्यांची उकल : सहजीवन आनंदाची गुरुकिल्ली

कोणत्याही व्यक्ती एकत्र राहत असताना जे बंध निर्माण होतात त्यातून फुलतं ते ‘सहजीवन’!

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

कोणत्याही व्यक्ती एकत्र राहत असताना जे बंध निर्माण होतात त्यातून फुलतं ते ‘सहजीवन’!

परंतु अनेकांच्या आयुष्यातलं सहजीवन फार लवकर संपूनच जाते आणि केवळ एकत्र सोबत इतकाच अर्थ उरतो. यातूनच पुढे येतो तो नात्यांमधला दुरावा, एकमेकांविषयी फारशी आत्मीयता न वाटणे, त्यातून समोर उभा राहणारा प्रचंड एकटेपणा, नराश्य इत्यादी.  यातून जगण्यातला आनंद गमावून बसण्याची स्थिती निर्माण होते. काय करता येईल आनंदी सहजीवनासाठी..

‘‘तुम्हाला सांगू का डॉक्टर, मी माझ्या घरात सगळ्यांना स्वातंत्र्य दिलंय. हवं ते करण्याची मुभा आहे. कोणावर काहीही लादत जगावं असं मला वाटत नाही.’’ एक पन्नाशीचे गृहस्थ माझ्याशी बोलत होते. एका कार्यक्रमात, आजूबाजूचे वातावरण फारच अनौपचारिक असल्याने, सहज गप्पा सुरू होत्या.

त्या गृहस्थांकडे पाहून त्यांची पन्नाशी उलटलीये यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, इतका सळसळता उत्साह, हसत-खेळत, सगळ्यांशी अदबीने वागणे, विविध विषयांतले ज्ञान, त्यावर गप्पा; त्यामुळे एकंदरीत त्या समारंभात तेच केंद्रस्थानी असल्याप्रमाणे सगळेच त्यांच्या अवतीभवती होते. त्यांच्यापासून एकच व्यक्ती जराशी अलिप्त असल्यासारखी होती, ती म्हणजे त्यांची पत्नी! त्या काहीशा अबोल, एका खुर्चीवर शांतपणे बसून होत्या. त्याही एका नामांकित विद्यापीठातील प्रसिद्ध प्राध्यापिका. खूप व्यासंगी असल्या तरीही स्वत:बद्दल जुजबी बोलणाऱ्या.

पुढे चाललेल्या चर्चाना कलाटणी मिळत विषय परदेश भ्रमणावर येऊन ठेपला. तेव्हा ते गृहस्थ पटकन म्हणाले, ‘‘तिला काही सुट्टय़ा मिळणार नाहीत, पण मी मात्र ही संधी सोडणार नाही. शिवाय माझ्या बऱ्याच मत्रिणीपण येतायत!’’ अगदी सहजतेने डोळे मिचकावत ते हे बोलून गेले. त्यांच्या पत्नी यावर केवळ हसल्या. आणि ‘नेहमीचंच’ असं म्हणत त्यांनी विषय बदलला. इथे काहीतरी खटकतंय, काहीतरी यांनाही म्हणायचंय असं मला वाटत राहिलं. त्यानंतर एकदा त्या माझ्याशी खास म्हणून बोलायला आल्या. तेव्हा लक्षात आलं, की त्या आणि त्यांचे पती यांचं जगच खूप वेगवेगळं होतं. आता बराच काळ एकत्र राहात असताना, ते त्या दोघांनीही मान्य केलं होतं, पण यात आपल्याला ‘सहजीवन’ अनुभवता येत नाही याचीही खंत होतीच आणि आता दिवसेंदिवस ती एखाद्या टोचणीसारखी सारखी सलत होती. आपण ‘सहजीवन’ हा शब्द, त्याचा अर्थ, कितीतरी वेळा केवळ पती-पत्नीचं, जोडीदारांचं एकमेकांशी नातं, असाच गृहीत धरतो. मात्र याचा खरा अर्थ म्हणजे, कोणत्याही व्यक्ती एकत्र राहत असताना, आयुष्य जगत असताना, जे बंध निर्माण होतात त्यातून फुलतं ते ‘सहजीवन’! उदा. एखाद्या वृद्धाश्रमात, अनाथालयात एकत्र राहणारी सगळी आबालवृद्ध मंडळी एक प्रकारचे ‘सहजीवनच’ जगत असतात.

आपला जास्त वेळ आपल्या कामाच्या ठिकाणी जात असेल तर तिथे आपले सहकारी, वरिष्ठ, कनिष्ठ यांच्यासोबतही आपण नकळत एक ‘सहजीवन’ जगण्याची सुरुवात करतो. त्यातही एखादी व्यक्ती हळूहळू जास्त जवळची, समजून घेणारी वाटू लागते त्या वेळेस त्या व्यक्तीशी जास्तच घट्ट नातं तयार होतं. म्हणजेच त्या व्यक्तीसोबतचं ‘सहजीवन’ आपल्यासाठी जास्त सुखकारक, हवंहवंसं वाटायला लागतं. शिक्षणासाठी वसतिगृहात एकाच खोलीत राहणारे, वेगवेगळ्या घरांतून, स्तरांतून, संस्कारांतून आलेले कितीतरी लोक, याच सहजीवनाने एकमेकांशी घट्ट बांधले जातात. तसंच सहजीवन, आपले आई-वडील यांच्यासह, किंवा आपली भावंडे यांच्यासह आपण जगत असताना आपसूकही तयार होते. कित्येकदा याच्याकडे आपण केवळ एक सवयीचा भाग असंच पाहतो.

या उदाहरणांवरून हे लक्षात येईल, की कोणत्याही दोन किंवा अधिक एकत्र राहणाऱ्या व्यक्ती सहजीवन अनुभवू शकतात. काही नात्यांचा मात्र तो अध्याहृत गाभाच समजला जातो. जसं जोडीदारासोबतचं किंवा पती-पत्नींमधील नातं. पण काही कारणांस्तव किंवा व्यक्तिमत्त्वातल्या काही मूलभूत फरकांमुळे मात्र त्यात निराशा येण्याची शक्यता अधिक. पाहा ना, साधारण आत्ता साठी ओलांडलेल्या किंवा सत्तरीच्या जवळ पोचलेल्या अशा कित्येक जोडय़ांकडे पाहिलं की हे प्रकर्षांने जाणवतं. ‘इतक्या काळात एकमेकांसोबत राहण्याची झालेली सवय किंवा एक सोय’ इतक्या माफक पद्धतीने याच्याकडे पाहिलं जातं. मग त्यात एकाला- दुसरं कोणीतरी असावं इतकीच भावना. त्यामुळे या अशा कितीतरी परस्परविरोधी जोडय़ा सर्रास दिसतात. वयोमानानुसार त्यांच्यातील मतभेदांवर पांघरूण घालत, प्रसंगी हिरिरीने भांडत त्यांनी पांढरं निशाण फडकवून एक तह केलेला असतो, इतकंच. त्यामुळे कित्येकदा अशा जोडप्यांना सल्ला देताना मजेशीर प्रतिक्रिया ऐकायला मिळतात, ‘‘छे हो डॉक्टर, आम्ही हवापालट म्हणून कुठे चार दिवसांसाठी जाऊन काय करणार? मला फिरायची आवड आहे, यांना नाही. तिथेही हे झोपून वेळ वायाच घालवतील. त्यापेक्षा न गेलेलंच बरं.’’ किंवा ‘‘तुम्ही एकत्र वेळ घालवा म्हणताय, इथे आम्ही एकत्र भाजी आणायलासुद्धा जाऊ शकत नाही.’’ किंवा ‘‘शक्यच नाही. आम्हाला जमणारच नाही. त्यापेक्षा चाललंय ते बरंय!’’

मुळात ही मंडळी विचारांत इतके मतभेद असताना किंवा काहीच साम्य नसताना एकत्र राहिलीच कशी? तर याची साधी उत्तरं म्हणजे, ‘केलंय म्हणून टिकवायलाच पाहिजे, किंवा उठल्यासुटल्या कोणत्याही कारणांवरून लगेच असलेलं मोडायचं कसं? जमवून घ्यायलाच पाहिजे, किंवा लोक काय म्हणतील? इत्यादी.’

हे झालं त्या पिढीविषयी पण वर मी जे उदाहरण दिलं, तशीच त्या फळीतली किंवा अगदी तरुण म्हणवणारी कितीतरी जोडपीसुद्धा हे असंच जगताना दिसतात. अगदी आपण आहोत तशाच व्यक्ती जगताना आपल्या आजूबाजूस असणं किंवा त्या असण्याची, मिळण्याची कल्पना, अपेक्षा असणं हे आदर्शवादी म्हणावं लागेल. असलेल्या नात्यातच सुसंगत बाबी शोधत ते अधिकाअधिक सुसह्य़ करणं हा त्यातला मधला मार्ग. परंतु एकत्र जगत असताना काहीच सुसंगत, सुसह्य़ नसेल किंवा कोणताच सांधणारा दुवा नसेल तर मात्र तिथे ‘सहजीवन’ निर्माण होण्याच्या शक्यता अंधूक होऊ शकतात. तिथे मग एकत्र राहताना आपापल्या मार्गाने जात राहणे इतकंच काय ते उरतं.

माणूस हा मुळातच समूहात, गटात राहणारा प्राणी ही त्याच्याबद्दलची व्याख्या. आपण कुठे बसतो त्यानुसार आपण समूहाची निवड करत राहतो. काही जणांच्या बाबत हा शोध, त्यांच्या वैयक्तिक कुटुंबाची एक घडी तयार झाली, आजूबाजूस काही गोतावळा तयार झाला, की संपून जातो. परंतु आपलाच, माणूस म्हणून दुसरा गुणधर्म असा, की यातही आपण आपल्यासाठी खास अशी एक व्यक्ती कायमच शोधत राहतो. विशेषत: ज्या व्यक्ती, सातत्याने वेगवेगळ्या पद्घतीने होणारी जडणघडण आपलीशी करत राहतात, तिथे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विस्तार कायम वाढणारा. आता इथे काही काळापूर्वी असणारे सहजीवनाबाबतचे, त्या एका व्यक्तीबाबतचे किंवा जोडीदाराबाबतचे निकषसुद्धा बदलण्यास सुरुवात होते.

इथे आपल्यासोबतच, आपण त्यांच्यासोबत राहतो, आयुष्य जगतो त्यांचीही जडणघडण आणि वाढणं सुरू राहिलं असेल तर कित्येकदा हे आपल्यातलेच बदल सुसह्य़ होतात किंवा त्यांना आपलंसं करणाऱ्या व्यक्तीही त्याच राहतात. मात्र तसे न होता, या सगळ्या प्रक्रियेत आपण एकटेच बऱ्याच स्थित्यंतरांतून जात असू, तर मात्र ही त्या ‘एका व्यक्तीसाठी’ म्हणून वाटणारी ओढ, सहजीवनाची वाटणारी आस, यातून एक पोकळी निर्माण व्हायला लागते.  इथे सहजीवन संपूनच जाते आणि केवळ एकत्र सोबत इतकाच अर्थ उरतो. यातूनच पुढे येतो तो नात्यांमधला दुरावा, एकमेकांविषयी फारशी आत्मीयता न वाटणे, त्यातून समोर उभा राहणारा प्रचंड एकटेपणा, नराश्य इत्यादी. इथे खंबीर न राहता, त्यावर फारच आत्मकेंद्री होऊन किंवा हवालदिल होऊन सातत्याने विचार झाला, तर मात्र कायम वाद, भांडणे किंवा एकमेकांशी सवयीचा अबोला, हे घडते. यातून आपापल्या कार्यक्षेत्रावर परिणाम, त्यातून निर्माण होणारा ताण, यातून जगण्यातला एकंदरीतच आनंद गमावून बसण्याची स्थिती निर्माण होते. तिथे मग कित्येक नवीन उथळ नातेसंबंध, व्यसनाधीनता, यांची सुरुवात व्हायला वेळ लागत नाही. किंवा ‘आपण आनंदात आहोत’ याची खोटीच ग्वाही सतत स्वत:ला आणि इतरांना देत राहण्याचा अट्टहास. त्यातून सतत आपल्या अवतीभवतीचे वातावरण आनंदी राहावे, त्यातून कोणालाही खरी परिस्थिती समजणार नाही यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि त्याचाही वाढत जाणारा ताण. अगदी नको असलेले विषारी वर्तुळ. इथे एक मूलभूत गोष्ट आपण सगळेच विसरतो, ती म्हणजे यातून तयार झालेली पोकळी भरून तर निघणार नाही आणि सध्याच्या सहजीवनातही फरक पडणार नाही, अर्थात मूळची समस्या आहे तशीच!

मग काय करावं?

काही बाबतचं सहजीवन निवडण्याची आपल्याला मुभा नाही. जसे आपण वर पाहिले, की आपले आई-वडील, संपूर्ण कुटुंब, इत्यादी. इथे हळूहळू संपत जाणारे सहजीवन ताजे-तवाने, जिवंत ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करता येईल. कित्येक कुटुंबांत सहा-सात व्यक्ती असूनही, कोणीच कोणाशी बोलत नाही ही परिस्थिती असते. पालकांसोबतच राहणारी कित्येक मुलं- मुली, यांच्यात आणि कुटुंबातही संवाद संपलेला असतो. जेवतानासुद्धा कमालीच्या शांततेत, जेवणं एखादे काम करावे तशी उरकली जातात.

इथे बऱ्याचदा आपले आणि त्यांचे हळूहळू निर्माण झालेले मतभेद किंवा त्यांना आपले काही न पटलेले निर्णय किंवा त्यांना वयानुसार एक प्रकारे आलेली निरसता या बाबी असू शकतात. अशा वेळेस, कटाक्षाने आपण यात ठरवून बदल घडवू शकतो. ‘आजकाल आपण कशावरच बोलत नाही.’ इथपासून सुरुवात करून ते पुढे कोणत्याही कामात, उपक्रमांत त्यांना सहभागी करून घेता येईल किंवा त्यांच्या कामात ठरवून मदत करता येईल.

त्यांच्या लहानमोठय़ा अडचणी, तक्रारी लक्षपूर्वक ऐकणं, यातूनही बऱ्याचदा संवादाची सुरुवात घडते. तिथे आपले निर्णय कसे बरोबर आहेत किंवा आपले आयुष्य कसे वेगळे आहे हे ठासून सांगण्यापेक्षा त्यांचे म्हणणे कोणतेही अर्थ न लावता ऐकता येईल. यातून कोंडी फुटून हळूहळू सहजीवनाची नवी सुरुवात करता येईल. पती-पत्नी किंवा जोडीदार यांच्याबाबत बऱ्याचदा निवडीचे स्वातंत्र्य असते. ती करत असतानाच फार भारावून न जाता शक्य तितक्या डोळसपणे करता येईल. तिथेही, कोणतीही व्यक्ती कोणत्याही टप्प्यावर बदलू शकते हे लक्षात ठेवणे आवश्यक. इथे बऱ्याचदा ज्या वेळेस सकारात्मक जडणघडणीतून व्यक्ती बदलतात तेव्हा त्यांचा मूळ गाभा तसाच राहून त्या अधिकाधिक परिपक्व होतात. तेव्हा हे बदल स्वागतार्हच असतात. ते जास्तीतजास्त सहजतेने होण्यासाठी समविचारी व्यक्ती निवडता येतील. इथे आयुष्यातली मूल्ये, ध्येय, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, व्यवसाय, काम, शिक्षण हे सारेच महत्त्वाचे. त्याशिवाय दोन एकत्र राहणाऱ्या व्यक्तींमध्ये काही समान आवडी, छंद असणे जसे आवश्यक तसेच काही प्रकारे त्यांच्यामध्ये एकमेकांना पूरक अशी विभिन्नतासुद्धा महत्त्वाची. यातूनच नात्यात मोकळा श्वास घेता येतो.

जोडीदारासोबतच्या सहजीवनाचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यात येणारी मजा, आनंद. तो हरवतोय हे लक्षात आलं की त्याकडे दुर्लक्ष करत नुसतेच सोबत राहण्याऐवजी, त्यावर एकत्र बसून बोललेले उत्तम!

आपल्याला प्रचंड आवडणारी एखादी बाब आपल्या सोबत राहणाऱ्या व्यक्तीवर थोपवण्याचे टाळणे हेसुद्धा महत्त्वाचे किंवा त्यासंदर्भात आपल्या सोबतची व्यक्ती संपूर्ण उदासीनच असेल असा समजही घातकच. त्यापेक्षा तिथेही निवडीचे स्वातंत्र्य महत्त्वाचे. उत्तम सहजीवनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे एकमेकांच्या आवडीनिवडी नैसर्गिकपणे आपल्याशा होतात. ‘एकमेकांसोबत खूप वेळ एकत्र घालवावा,’ ही भावना प्रबळ होत जाते. मग ते नाते कालानुरूप कितीही जुने झाले तरीही! आपल्या जोडीदाराच्या समस्यासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या. तो सहजीवनात बऱ्याचदा येणारा अडथळा. तिथे एकमेकांवरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न उत्तम. बराच काळ सोबत राहून ‘सहजीवन’ सुटून गेलंय अशा व्यक्तींसाठी मात्र पुन्हा ते चालू करणे थोडेसे अवघड असते. अशा वेळेस अगदी लहानसहान बाबी एकत्र करण्यात वेळ घालवला तर त्यातून ते पुन्हा सुरू करता येईल. उदा. दिवसभरात एकदा तरी एकत्र बसून गप्पा मारत चहा घेणे, खाणे.

आता यातला पुढचा आणि तितकाच महत्त्वाचा भाग. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीसोबत मुबलक काळ घालवला आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरीही ते केवळ ‘सोबत राहणे’च होऊ शकते. अशा वेळेस, मूलत: आपल्या संवादांचे विषय एकसारखे नाहीत, आवडीनिवडी संपूर्णपणे वेगवेगळ्या आहेत, तात्त्विक किंवा बौद्धिक एकतानता नाही असेही लक्षात येऊ शकते. इथे किती काळ एकत्र घालवला यापेक्षाही तो कसा घालवला हे महत्त्वाचे. इथे ‘दोघांनाही एक उणीव सातत्याने जाणवत असेल, तर त्यातून बाहेर का पडू नये?’ हासुद्धा सकारात्मकच विचार आहे. त्याच्याकडे कोणत्याही ‘किंतु-परंतु’ने न बघता, आपल्या आणि जोडीदाराच्या उरलेल्या आयुष्याचा विचार करून पाहावा. सहजीवन ही नुसतीच गरज नाही तर तो जगण्यातला महत्त्वाचा आनंद आहे.

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 12:10 am

Web Title: living together symbiosis dr urjita kulkarni abn 97
Next Stories
1 आभाळमाया : तपस्वी शब्दसाधक
2 आकाशाशी जडले नाते
3 सामाजिक ‘खांदेपालट’
Just Now!
X