25 January 2021

News Flash

गद्धेपंचविशी : या मंडळी सादर करू या!

मी १९७५ मध्ये ‘जे. जे.’ उपयोजित कला महाविद्यालयातून पदविका घेऊन बाहेर पडलो.

(संग्रहित छायाचित्र)

पुरुषोत्तम बेर्डे

मी १९७५ मध्ये ‘जे. जे.’तून पदविका घेऊन बाहेर पडलो. त्या वेळी रौप्यपदक, ‘बेस्ट स्टुडंट अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘टुरटुर’ ही  स्पर्धेसाठी लिहिलेली धमाल गाजलेली एकांकिका, एवढं भांडवल माझ्याकडे होतं. प्रा. दामू केंकरेनी मला एका व्यावसायिक नाटकासाठी बोलावलं. पण मला तिकडे कोणीच ओळखेना..  शिवाय संपूर्ण नाटकात मला एकच वाक्य..  निराशेच्या गत्रेत जातोय की काय असं मला वाटलं. पण नाही.  दीर्घकाळ सरांच्या हाताखाली शिकायला मिळालं. सगळे खाचखळगे जवळून बघायला मिळाले. एक अविस्मरणीय आनंद आणि शिक्षण मिळालं. २५ प्रयोगांनंतर नाटक बंद पडले आणि रौप्यपदकाच्या जीवावर एका जाहिरात एजन्सीत नोकरी मिळाली, पण तिथं एकापेक्षा एक ‘धन्य’ लोक होते.  २४ तासांत त्याला लाथ मारून बाहेर पडलो. गद्धेपंचविशीतल्या फुरफुरणाऱ्या वारूप्रमाणे डोक्यात राख घालून घेऊन निर्णय तर घेतला नव्हता ना? ..

गद्धेपंचविशी म्हणजे काय? तर सोप्पं आहे.. ज्या काळात शिंगं फुटून ती व्यवस्थित वाढलेली असतात आणि उलटसुलट फिरून परत आपल्याच गळ्याभोवती विचित्र पद्धतीने गुंफली जातात, तो, एका अंगठय़ावर संपूर्ण शरीर तोलून धरण्याचा सर्कशीचा काळ, म्हणजेच वयाची पंचविशी! तिला आपल्या पूर्वजांनी ‘गद्धेपंचविशी’ हे उपरोधिक आणि समर्पक नाव देऊन समग्र तरुण(!) युवकांना अपमानग्रस्त विशेषणांनी सन्मानित केले आहे. तशी वयाप्रमाणे अनेक विशेषणात्मक नावं, म्हणी ठेवलेल्या दिसतात. ‘सोळावं वरीस धोक्याचं’ (अर्थात हे मुलींसाठी आहे, त्यामुळे मुलग्यांनी या वयात हुंदडायला हरकत नाही. शिवाय मुलींना हा धोक्याचा इशारा मुलग्यांपासून दिला असल्यामुळे पूर्वजांनी तरुणांनाच ‘टाग्रेट’ केलं आहे!) ‘विशीत मिशी फुटते’ याचा सरळ साधा अर्थ घेण्यात तथ्य नाही. तोसुद्धा मुलांना एक टोमणाच आहे. मिशी फुटलीय याचा अर्थ अक्कल फुटली असाच घ्यायचा असतो. म्हणजे ही शिंगं फुटण्याच्या आधीची पायरी आहे.  वीस ते पंचवीस या वयामध्ये तारुण्याचा ओघ हा भरतीच्या दिशेनं चढत जाणारा असतो. शाळा आणि कॉलेज  बऱ्यापैकी अनुभवून झालेलं असतं आणि आता प्रयत्न असतो बाहेरच्या जगात स्वतंत्रपणे      हात-पाय  मारायचा. अशा वेळी मन भिरभिरलेलं असतं, उत्साह कोणत्याही क्षणी चाकोरी मोडून बाहेर पडू शकतो आणि एखाद्या कटू अनुभवापोटी आतल्या आत विरूनही जाऊ शकतो. जीवनातले खाचखळगे खऱ्या अर्थानं याच वयात तोल बिघडवून टाकतात अथवा नीट चालायला शिकवतात.

मी १९७५ मध्ये ‘जे. जे.’ उपयोजित कला महाविद्यालयातून पदविका घेऊन बाहेर पडलो. बाहेर पडताना रौप्यपदक, ‘बेस्ट स्टुडंट अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘टुरटुर’ ही माझ्या शेवटच्या वर्षांला असताना स्पर्धेसाठी लिहिलेली धमाल गाजलेली एकांकिका, एवढं भांडवल माझ्याकडे होतं. ‘टुरटुर’मधली माझी कामगिरी पाहून तत्कालीन उपअधिष्ठाता प्रा. दामू केंकरे यांनी मला त्यांच्या एका आगामी व्यावसायिक नाटकात काम करायला बोलावलं आणि मी अक्षरश: हवेत गेलो. छाती फुलून आली. ते नाटक ग. म. रेगे आणि अशोकजी परांजपे या लेखकांचं होतं आणि ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’सारखी नावाजलेली संस्था ते निर्माण करीत होती. त्यामुळे मी आणखी उंच हवेत उडत होतो. पण प्रत्यक्ष तालमीला गेलो आणि पाहिलं तर एकापेक्षा एक दिग्गज कलावंत त्या नाटकात होते. दया डोंगरे, अरुण जोगळेकर, माधव वाटवे, मोहन कोठीवान, नयन भडभडे (रीमा लागू) विहंग नायक, सुरेश टाकळे आणि बरेच.. अशोक पत्कींचं संगीत होतं. कॉलेजमधला स्टार मी, पण मला तिकडे कोणीच ओळखेना.. केंकरे सर सोडून कोणी माझी दखलही घेईना. शिवाय संपूर्ण नाटकात मला एकच वाक्य आणि ढोलकी वाजवणं.. बस्स  एवढंच!  निराशेच्या गत्रेत जातोय की काय असं मला वाटलं. ज्या एकांकिकेनं कॉलेज डोक्यावर घेतलं, मला डोक्यावर घेतलं, ती एकांकिका इकडे कोणालाच माहिती नव्हती. तरी मी आपला रोज तालमीला हजर राहात गेलो. आठ-दहा दिवसांनी माझ्या लक्षात आलं की, अरे, मला कुठे अभिनेता व्हायचंय? मी चित्रकार आहे, डिझायनर आहे, लेखक आहे, दिग्दर्शक आहे, वादक आहे. आणि ‘टुरटुर’ या एकांकिकेत मी ते सिद्ध केलंय. हे सगळे मला आज ओळखत नसतील, पण उद्या आपलाच आहे. आणि केंकरे सर?  ते तर माझे गुरू.. मनातल्या मनात त्यांच्या नावाने गंडा बांधला आणि तालमी केल्या. सहा महिने हळूहळू त्या तालमी ‘सुशेगाद’ होत होत्या. केंकरे सर गोव्याचे. संस्था ‘गोवा हिंदू’. सगळं काही ‘सुशेगाद’ म्हणजे हळूहळूच चाललं होतं. त्यात माझा फायदा म्हणजे मला दीर्घकाळ सरांच्या हाताखाली शिकायला मिळालं. व्यावसायिक नाटक उभं कसं राहातं, त्याच्या तालमी, रंगीत तालीम, प्रयोग, त्यात येणारी संकटं, दिग्दर्शन, अभिनयातले खाचखळगे, सर्व काही जवळून बघायला मिळालं. मला इथे का कोणी ओळखत नाही, मी म्हणजे कोण?, अशा त्या वयात पडणाऱ्या प्रश्नांच्या आहारी न जाता तग धरून राहिलो आणि एक अविस्मरणीय आनंद आणि शिक्षण मिळालं, जे आयुष्यभर उपयोगी पडलं.

नाटक २५ प्रयोगांत बंद पडलं. पुढे काय, असा  त्या वयात पडणारा आणखी एक प्रश्न. पण रौप्यपदकाच्या जीवावर एका जाहिरात एजन्सीत नोकरी मिळाली. पण तिथं एकापेक्षा एक असे ‘धन्य’ लोक होते. अक्कल नाही चार आण्याची आणि शिकवायला निघाले बारा आण्याचे, अशी गत. २४ तासांत त्यांना लाथ मारून बाहेर पडलो. गद्धेपंचविशीतल्या फुरफुरणाऱ्या वारूप्रमाणे डोक्यात राख घालून घेऊन निर्णय तर घेतला नाही ना? असं मात्र वाटलं नाही, कारण तोपर्यंत आम्ही ‘जे. जे.’तून पदविका घेऊन बाहेर पडलेले वर्गमित्र- जे माझ्या ‘टुरटुर’ एकांकिकेत होते, त्या आम्हा सर्वाना नाटकाचा ‘किडा’ चावला होता. हा किडा एकदा चावला की त्यावर इलाज नाटकं करीत राहाणं एवढाच असतो. आम्ही सर्वानी मिळून ‘या मंडळी सादर करू या’ अशा विचित्र नावाची हौशी वा प्रायोगिक नाटय़संस्था सुरू केली. जे. जे.मधले एक अत्यंत कडक आणि ‘टेरर’ असे  प्राध्यापक षांताराम पवार आमचे अध्यक्ष झाले. त्यामुळे ‘जशी शोकेस, तसा माल’, अशी आमची ओळख ठरली. कारण पवारसर हे प्रायोगिक रंगकर्मीमध्ये हेकेखोर आणि मानभावी चित्रकार आणि नेपथ्यकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे विद्यार्थी म्हणून आमच्यावरही तो शिक्का बसला. विचार करा, दाढय़ा आणि केस वाढवलेले तीस-चाळीस तरुण रोज एकत्र फिरतायत, चित्रं काढतायत, नाटकं करतायत, सिनेमे एकत्र बघतायत.. अशी झुंडीनं फिरणारी मुलं कोणाला आवरणारी नव्हती. त्यातल्या त्यात दामू केंकरे आणि षांताराम पवार यांचे अधिपत्य मानणारे आम्ही कानात वारं शिरल्यासारखे भिरभिरत होतो. तो त्या वयाचा मामला होता. गुर्मी होती. अहंकार होता. सहजासहजी कोणाचा सल्ला ऐकायची तयारी नव्हती. त्याच ‘क्रिएटिव्ह’ गुर्मीत ‘श्री मनाचे शोक’ ही एकांकिका लिहिली आणि ‘उदय कला केंद्र’च्या स्पर्धेत आम्हाला (‘या मंडळी सादर करू या’ला) सर्व बक्षिसं मिळाली. परीक्षक होते माधव वाटवे, जयराम हर्डीकर आणि मंगला संझगिरी. जयराम हर्डीकरला तर केवढं कौतुक! तशात माधव वाटवे- जे गोवा हिंदू असोसिएशनच्या नाटकात होते, मला भेटले आणि म्हणाले, ‘‘अरे? छुपा रुस्तम निघालास रे तू?.. तू एवढा सगळा असशील असं त्या तालमींच्या दिवसांत वाटलं नव्हतं.’’

तेव्हा मला जाणवलं, की गद्धेपंचविशीच्या त्या काळातही संयम दाखवला किंवा योग्य दिशेनं पावले उचलली तर त्याची फळंही गोड मिळतात. तशी मिळत होती. अचानक आम्ही ‘छबिलदास चळवळी’तल्या अरिवद देशपांडे, सुलभाताई, काकडेकाका यांच्या दृष्टिपथात आलो. ‘छबिलदास’मध्ये आमच्या एकांकिकांचे प्रयोग होऊ लागले. कौतुक होऊ लागलं. तरीही एखादी बारीकशी चूक होतेच, जिचं स्वरूप पुढे जाऊन वाढीस लागतं. ‘जे. जे.’ सुटून दोन वर्ष झाली तरी कॉलेजची नाळ काही सुटत नव्हती. एका वेळेस तीस-चाळीस तरुणांचा ताफा, म्हणजे आमची अख्खी नाटय़ संस्था रोज संध्याकाळी शिवाजी पार्कच्या नाक्यावर ‘आझाद रेस्टॉरंट’ या इराण्याच्या हॉटेलात भेटत असे. तिथून एकत्र जमून मग सतान चौकी येथील जाखादेवी मंदिरात तालीम किंवा तालीम नसेल तर मग एखादा सिनेमा, त्यानंतर रात्री उशिरा घरी, असा दिनक्रम.

एके दिवशी आमच्या ग्रुपमधला दिलीप गैरहजर होता. दुसऱ्या दिवशी कळलं, काल कॉलेजमध्ये एका टोळक्यानं त्याच्यावर हल्ला करून त्याला बेदम मारलं. ‘जे. जे.’मध्ये असलेल्या आमच्या वर्चस्वावर हा हल्ला होता. आमच्या संस्थेत आमच्या नंतरच्या बॅचेसचे नाटकाची आवड असलेले विद्यार्थी आम्हाला आपोआप येऊन मिळायचे, तसा दिलीप होता. त्याच्यावर असा हल्ला म्हणजे आम्हाला आव्हानच होतं. गद्धेपंचविशीचं आमचं वय हा हल्ला सहन करणं शक्य नव्हतं. पण ज्या मुलांनी हल्ला केला त्यांना माहीमच्या एका गुंड गँगचा सपोर्ट होता. आता आली पंचाईत! आम्ही चाळीसएक जण असलो तरी पट्टीचे मारामारी करणारे नव्हतो.  तरीही आपल्यातल्याच एकावर इतक्या मोठय़ा प्रमाणात तीस-चाळीस मुलांनी हल्ला करणं, या कल्पनेनंच आम्ही अस्वस्थ झालो.  तो एक निष्क्रिय उडाणटप्पू  ग्रुप होता. कँटीनमध्ये बसून टवाळक्या करणं, पोरींची छेड काढणं, प्राध्यापक वर्गाला सतावणं, एखाद्याचं काम खराब करून ठेवणं, आदी उद्योग तो ग्रुप करायचा. दिलीपच्या हल्ल्याचं प्रकरण पोलिसात जाऊनही त्या लोकांनी ते वशिला लावून दाबून टाकलं. आमचं कॉलेज संपलं असलं तरी तिकडे जाणं-येणं होतंच. काही ज्युनिअर सभासद अजून कॉलेजमध्ये होते. त्यातलाच दिलीप. तो शेवटच्या वर्षांला होता. तो केवळ रुबाबात चालतो, कोणात मिसळत नाही तरीही चार मुलंमुली त्याच्याबरोबर असतात, या असूयेपोटी कुरापत काढून त्याच्यावर हल्ला केला गेला. कारण तो आमच्या संस्थेत होता, संध्याकाळी आम्हाला रोज भेटायचा. त्याच्यावर हल्ला झाल्याची बातमी आली आणि वाईट वाटलं, रागही आला. या गोष्टीचा वचपा काढण्याचे विचार मनात डोकावू लागले. आमच्यात कोणी लालबाग परळला राहाणारे होते तर कोणी दादर खांडके बिल्डिंगमध्ये राहणारे, मी कामाठीपुऱ्यातला. सर्वानी आपापल्या विभागातून कोणाची मदत मिळते का ते पहिलं. कारण तो सगळा ग्रुप पुढचे दोन-चार दिवस कॉलेजमध्ये विजयी मुद्रेनं फिरत होता. अर्थात आमच्या ग्रुपनं किंवा संस्थेनं चांगली कामं करून विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला होता. एकांकिका, प्रदर्शनं, धमाल वार्षिक स्नेहसम्मेलनं, अशा कामांत आमचा ग्रुप पुढे होता. शिवाय त्या वर्षी मी माजी विद्यार्थी म्हणून लेखक-दिग्दर्शक या नात्यानं ‘जे. जे.’ उपयोजित कला महाविद्यालयातर्फे ‘शरीरसंस्था’ ही एकांकिका ‘उन्मेष’ व ‘आयएनटी’च्या आंतर- महाविद्यालयीन स्पर्धेत उतरवली होती. त्यात पंचवीस-तीस मुलांचा मॉब वापरला होता व त्या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचा ‘बहुरूपी पुरस्कार’ही मिळाला होता. त्यामुळे कॉलेजमध्ये आमच्या ग्रुपची प्रतिमा आणखी उजळली होती, तीच दिलीपवरच्या हल्ल्याला कारणीभूत ठरली होती. त्या ग्रुपच्या गुंडगिरीला कॉलेज व्यवस्थापनही त्रस्त झालं होतं. कॉलेज सुटल्यानंतर त्यांचे इतरही गुंड मित्र कँटीनमध्ये येऊन  दारू-सिगारेटच्या पाटर्य़ा करीत. असं दूषित वातावरण आमच्या प्रिय कॉलेजला, विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापक वर्गाला त्रासदायक ठरत होतं याचं दु:ख आम्हाला होते.

आमच्यापैकी अशोक वंजारी, रघुवीर कुल, नलेश पाटील, हेमंत शिंदे, मी वगरे मिळून काय करायचं ते ठरवत होतो. हेमंत शिंदेचा मोठा भाऊ बाबा शिंदे तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा अंगरक्षक म्हणून काम करीत होता. त्यामुळे त्याचा लालबाग परळच्या तोडणकर बंधूंशी संपर्क होता. त्यातला विजू तोडणकर हा हेमंत शिंदेचा मित्र. त्याचा त्या विभागात अत्यंत आदरपूर्वक दरारा होता. त्याला भेटायचं ठरलं.  त्याआधी कामाठीपुरातल्या रवीदादाची मदत घ्यावी, असं मला सांगितलं. त्यानं ट्रकभर मुलं पाठवली असती, पण त्याच्या गँगमध्ये हिंदू-मुस्लीम आणि इतर अशी सर्व एकत्रपणे नांदणारी मंडळी होती, शिवाय शेजारी अन्जुमन इस्लाम कॉलेज. नुसता आरडाओरडा झाला असता. त्यातून काही निष्पन्नही झालं नसतं आणि वेगळाच अर्थ निघाला असता, म्हणून मी तो प्रस्ताव टाळला आणि विजू तोडणकरची मदत घ्यायचं ठरलं.

अत्यंत धीरगंभीर चेहऱ्याचा, मितभाषी आणि हॅण्ड्सम अशा विजू तोडणकरशी परळच्या एका इराण्याच्या हॉटेलात भेट झाली. सगळी कहाणी ऐकून विजूला आमची बाजू योग्य वाटली. त्यानं त्या मुलांना अद्दल घडवायचं ठरवलं. तीन  टॅक्स्या, त्यातल्या एका टॅक्सीत त्याचे दोन  सहकारी,  दुसऱ्या टॅक्सीत आणखी दोन सहकारी आणि दिलीप आणि तिसऱ्या टॅक्सीत मी, रघुवीर, नलेश पाटील आणि अशोक वंजारी अशी मोहीम एके दिवशी दुपारी दीड वाजता कॉलेजमध्ये थडकली. नेहमीप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणे कँटीनमध्ये त्या मुलांचा तुफान गोंधळ चालला होता. दिलीपनं लांबूनच त्याचे हल्लेखोर दाखवले, विजू आणि त्याचे सहकारी उतरले आणि त्यातल्या मुख्य टवाळखोरांना बॉक्सिंग स्टाइलनं मजबूत प्रसाद देऊन कुणाला काही कळायच्या आत ठरल्याप्रमाणे सटकलेही. कँटीनमध्ये पळापळ झाली, कोण कुठून आले ते कळायच्या आत टिवल्याबावल्या करणाऱ्या त्या पोरांची तीन मिनिटांत चक्कर येईपर्यंत पिटाई झाली, दहशत निर्माण झाली आणि कँटीनला पुढचे काही दिवस पुन्हा शिस्त लागली. पुढचे पंधरा दिवस आम्ही सर्व अज्ञातवासात होतो. दिवसभर कुठेतरी गायब होऊन रात्री परळच्या कामगार मदानाच्या हिरवळीवर विजू तोडणकरच्या सुरक्षित छायेखाली बसून रिलॅक्स होत होतो. कोणी काय केलं हे पोलिसांपर्यंत गेलंच नाही. शिवाय तिथे हजर असलेल्या बऱ्याच लोकांना या गँगचा परस्पर काटा निघाल्यानं आनंदही झाला होता.

त्याच वेळी ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात एक लेखवजा माहिती आली होती, की राजस्थानच्या बॉर्डरवर ‘अलवरा डाकू’ नावाच्या डाकूनं दहशत निर्माण केली होती. तिथल्या  राजकीय नेत्यांनी त्याच्या दहशतीचा वापर करून आपल्या मतदारसंघात स्वत:ची दहशत निर्माण केली होती. त्या डाकूचं नाव आणि राजकारण्यांचा उद्योग माझ्या मनात खूपच रुतून बसला. कामाठीपुऱ्यामध्ये गुंडांना हाताशी धरून तत्कालीन स्थानिक राजकारणीही तिथल्या दलितांची मतं मिळवण्यासाठी असेच उद्योग करताना मी पाहात होतो. याच विषयावर मी त्या वर्षी आमच्या ‘या मंडळी सादर करू या’ या संस्थेसाठी ‘अलवरा डाकू’ हे नवं नाटक लिहिलं- माझं पहिलं दोन अंकी नाटक. त्यात माझ्या कामाठीपुऱ्यातल्या वास्तव्याचं, तिथल्या दारिद्रय़रेषेखाली जगणाऱ्या समाजाचं, रस्त्यावर खेळ करून उपजीविका करणाऱ्या पोटार्थी कलावंतांचं चित्रण होतं. या सर्वाच्या आविष्कारातून हे नाटय़ उभं राहिलं.  ‘जे. जे.’मधल्या आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम ‘या मंडळी सादर करू या’ या आमच्या प्रायोगिक नाटय़ संस्थेनं आणि ‘अलवरा डाकू’नं मोठय़ा  प्रमाणात केलं.

‘जे. जे.’तील कॉलेज जीवनानंतर ‘दूरदर्शन केंद्र’ हे जवळजवळ दुसऱ्या महाविद्यालयीन जीवनाचा आनंद देत होतं. १९७६ ते १९७८ या काळात वरळीचं ‘दूरदर्शन केंद्र’ हे एखाद्या तांत्रिक महाविद्यालयासारखं होतं. त्या वेळच्या तमाम प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगकर्मीची ती फॅक्टरी होती. कामही करा, पैसेही कमवा आणि स्वत:ला आजमावून पाहा! मी तिथल्या ग्राफिक विभागात ग्राफिक डिझायनर होतो. मला खरंतर तिथल्या नोकरीपेक्षा एकूण टेलिव्हिजन किंवा चित्रपटनिर्मिती तंत्रात रस होता. त्यातून काही शिकता येतं का, ते पाहायचं होतं. त्यामुळे संधी मिळताच इतर अनेकांप्रमाणे मीही डी.डी.त, म्हणजे ‘दूरदर्शन केंद्रा’त ‘कॅज्युअल’ म्हणून नोकरी स्वीकारली. ‘कॅज्युअल’ म्हणजे कंत्राट पद्धतीनं काम. दर महिन्याच्या अखेरीस पुढच्या महिन्याचं कंत्राट होत असे. मध्ये एखादा दिवस ब्रेक व नंतर परत कंत्राट, असा प्रकार होता. त्यामुळेही तिथल्या प्रत्येक विभागातील ‘कॅज्युअल’ मंडळी वरिष्ठांना दबून असायची, घाबरून असायची, न जाणो पुढच्या महिन्यात कॉण्ट्रॅक्ट नाही झालं तर? पण तरीही पुढे-मागे कायम होऊ, या आशेनं समरस होऊन काम करायची.

तेवढय़ात आमच्या ग्राफिक विभागाचा प्रमुख बदलला. विनायक चासकर यांच्याऐवजी तिथे सुमन मॅडम या इंग्रजी कार्यक्रम सादर करणाऱ्या निर्मात्या आल्या. त्यांनी ग्राफिक विभागावर कडक नियम लावले. उठल्या-सुटल्या आम्ही काही लोक आपापली कामं आटोपून नाटक, चित्रपट  किंवा इतर कलात्मक विषयांवर गप्पा मारीत या विभागातून त्या विभागात भटकत असू. त्यात खरंतर कोणत्या विभागात काय चाललंय याची उत्सुकता असे. मग ठरावीक वेळी कँटीनमध्ये आणि संध्याकाळी उन्हं उतरल्यावर टॉवरखाली चहा. या कार्यक्रमाला दृष्ट लागली. कामं झाली तरी विभागातून हलायचं नाही. शिवाय दिवसभरात काय काम केलं ते लिहून ठेवायचं, त्यावर त्यांच्या केबिनमध्ये जाऊन सह्य़ा घ्यायच्या, वगरे कारकुनी आणि शालेय शिस्त लावली गेली. बऱ्याच लोकांनी हे नियम पाळायला सुरुवात केली. पण स्वामी, दळवी आणि मी बंड केलं. असलं काही लिहीत बसायचं नाही हे ठरवलं. स्वामी, दळवीसारखी मंडळी ‘पर्मनंट’ होती, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध त्यांना ‘अ‍ॅक्शन’ घेता येईना. त्यांचा नाइलाज झाला. पण मी ‘कॅज्युअल बेसिस’वर असल्यामुळे माझं बंड त्यांना मानवलं नाही. आठएक दिवस मी ते सर्व न पाळता माझं काम करीत होतो, त्यामुळे भयानक चिडलेल्या त्या अधिकारी बाईनं मला बोलावून घेतलं आणि जाब विचारला. मी म्हटलं, ‘‘मी माझं काम तर व्यवस्थित करतोय, कोणत्या निर्मात्याची तक्रार आहे का? मग ही कारकुनी कशाला?’’  यावर त्या प्रचंड  चिडल्या, ‘कॅज्युअल’ स्टाफ म्हणजे निम्न स्तरावरचे लोक अशी त्यांची भावना असावी आणि त्यांनी बंड करणं म्हणजे काय? याचा त्यांना राग आला. संतापून काहीबाही बोलायला लागल्या. त्यावर, मीही ‘मी कलावंत आहे, असली कारकुनी कामं करणार नाही.’ असे ठणकावून सांगितले. त्यांनीही, ‘‘देन आय विल सॅक यू’’, म्हटलं. मी तेवढय़ाच जोरात ओरडून सांगितलं, ‘‘तू काय मला सॅक करणार? मीच चाललो सोडून..’’ असं म्हणून दूरदर्शन केंद्रातून ताड-ताड  बाहेर पडलो. राग शांत होईना म्हणून जवळच असलेल्या ‘सत्यम शिवम  सुंदरम’ या ट्रिपल थिएटरात १२ चा, ३ चा आणि ६ चा असे लागोपाठ तीन चित्रपट बघितल्यावर शांत झालो.  दुसऱ्या दिवशी मी चव्हाण आणि स्वामींना फोन करून सांगितलं, की काहीही झालं तरी मी पुन्हा नोकरीसाठी तिथे येणार नाही.

ती नोकरी नव्हतीच, शिक्षणच होतं. पण दोन-अडीच वर्षांत जेवढं मिळालं तेवढं बस, आता आपण स्वत:ला हवं तेच करू. गद्धेपंचविशीत घेतलेला तो निर्णय त्या वयाला शोभणाराच होता, कारण तो नसता घेतला तर पुढे मी, रघू कुल, आणि सुधीर कोसके यांनी मिळून काढलेली ‘बेसिक पब्लिसिटी’ ही जाहिरात संस्था सुरूच झाली नसती आणि ‘या मंडळी सादर करू या’ या आमच्या प्रायोगिक संस्थेतर्फे ‘अलवरा डाकू’ हे नाटक मी लिहून दिग्दर्शित करूच शकलो नसतो.  त्या प्रकरणात खूप लोक माझ्या बाजूनं होते. माझं बंड यशस्वी झालं असतं तर? कदाचित त्या नोकरीत मी अडकलो असतो. पण मग काय झालं असतं ‘टुरटुर’ या माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाचं? काय झालं असतं माझ्या ‘हमाल, दे धमाल ’ या पहिल्या व्यावसायिक चित्रपटाचं?  त्या दिवशी, १९७८ मध्ये, चित्रपट बघून शांत झाल्यानंतर पुन्हा कधीच नोकरी न करण्याचा निर्णय मी शांत मनानं घेतला त्यामुळे पुढे व्यावसायिक नाटय़ आणि चित्रपटसृष्टीत आजपर्यंत स्वत:चं छोटंसं स्थान निर्माण करता आलं..

puruberde@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 12:00 am

Web Title: loksatta chaturang gadepancvishi article by purushottam berde abn 97
Next Stories
1 भय इथले संप(व)ले आहे.
2 ..न मागुती तुवा कधी फिरायचे
3 पर्यावरणपूरक जीवनशैलीचा धडा
Just Now!
X