|| शोभा भागवत

समानता कोणी आपल्या तळहातावर आणून ठेवणार नाही, हे स्त्रियांना चांगलेच माहीत आहे. त्यासाठी त्या कायम प्रयत्न करत राहणार, भांडत राहणार, झगडत राहणार पण त्याचबरोबर पुरुषांचं नेमकं काय चुकतं, त्यांनी स्त्रीकडे कशा दृष्टीने पाहायला हवं हे त्यांनाही औपचारिक, अनौपचारिकपणे शिकवायला हवं. समाजात सध्या जे वातावरण आहे ते बदलण्यासाठी स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-सन्मान, स्त्री-पुरुष समानतेचं प्रशिक्षण द्यायला हवं. नुसत्या पाककृती पुरुषांना शिकवणं पुरेसं नाही. त्यांना स्त्री-पुरुष नात्यातला आदर, प्रेम, सन्मान आणि त्यातला आनंद लक्षात आणून दिला पाहिजे.

आज स्त्री-पुरुषांच्या जगण्यात समतोल आला आहे का? स्त्री-पुरुष समानता आली आहे का? या प्रश्नाला उत्तर द्यायची वेळ आली की मनात येतं ते असं की-कुठल्या स्त्रियांबद्दल आपण बोलतो आहोत? हातावर पोट आणि डोक्यावर संसाराची, मुलाबाळांची आणि नवऱ्याचीही जबाबदारी असलेल्या स्त्रिया की मध्यमवर्गात संसारात दोन्ही टोकं मिळवण्यासाठी दिवसभर नोकरी करणाऱ्या आणि मुलांच्या काळजीने खंतावणाऱ्या स्त्रिया? की सुखवस्तू संसारात ऐषआराम करणाऱ्या, उपभोगात बुडालेल्या, कपडे-दागिने-मालिका यात गुंतणाऱ्या स्त्रिया? की उच्चवर्गात कधी स्वत:ला सिद्ध करत उद्योग सांभाळणाऱ्या स्त्रिया तर कधी दिखाऊ बाहुल्या बनून वावरणाऱ्या स्त्रिया? आपापल्या क्षेत्रात उच्चपदी पोचलेल्या स्त्रिया की ‘नगं तोडू माजी साळा’ म्हणून आईला विनवत शाळेविनाच मोठय़ा झालेल्या स्त्रिया?

या स्त्रीचा एक का चेहरा आहे? विविध चेहरे घेऊन ती आपल्याला दिसत असते विविध प्रकारे समाजात बळी जाताना दिसत असते. समाजात आणि कुटुंबातही! मात्र काही एका विशिष्ट सुशिक्षित, सुस्थितीतल्या कुटुंबांमध्ये समानता काही प्रमाणात आलेली दिसते. या कुटुंबात नवऱ्यांना पटलेलं असतं की बायकोच्या बरोबरीने आपण स्वयंपाक घर सांभाळायला हवं, मुलांना सांभाळायला हवं आणि स्त्रीचं ओझं कमी करायला हवं. विवाह संस्थेबद्दल नव्याने विचारच करावा लागेल असं तरुणांना वाटावं इतके विवाह संस्थेने रंग दाखवले आहेत. त्यामुळे तरुण मुलं-मुली संसाराच्या जबाबदाऱ्या नकोत, मुलं नकोत, लग्न न करता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू या म्हणू लागली, पण जिथे रिलेशनशिप आली, नातं आलं तिथे जबाबदाऱ्या असणारच. त्या झटकून टाकणं सोपं नाही आणि पुन्हा या नात्याचा अर्थ कळला नाही तर ते पुन्हा एकमेकांचे नवरा-बायकोच होतात.

काही तरुण मुलींनी आणि विचार करणाऱ्या स्त्रियांनी आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्य मिळवलं आहे. स्वातंत्र्य, समानता, सन्मान ही मूल्य त्यांच्या विचारांतून त्यांच्या जीवनात आली आहेत. त्यांना स्वत:चं स्वातंत्र्य मिळवताना पुरुषांना तुरुंगात अडकवायचं नाही आहे. अन्याय झालेली माणसं जेव्हा न्याय मिळण्याच्या भूमिकेत येतात तेव्हा ती अन्याय करणाऱ्यांवर सूड उगवत नाहीत तर त्यांच्या बाबतीत संवेदनक्षमतेने, उदारपणे विचार करतात असा एक सिद्धान्त आहे. तो या स्त्रियांना लागू पडतो. हा वर्ग लहान असला तरी तो इतरांच्यात बदल घडवू शकतो. डोळसपणे काम करू शकतो. अशा स्त्रियांना पुरुषांनी पैसे मिळवायचं यंत्र होणं मान्य नाही. त्यालाही चांगल्या दर्जाचं जीवन जगण्याचा हक्क आहेच. गरीब वर्गातल्या स्त्रिया स्वत: मिळवून संसार चालवतच आल्या आहेत. नवऱ्याचा मारही खातात आणि त्याने मागितले तर त्याच्या दारूला पैसेही त्या देतात, पण ताठ मानेनं जगतात.

समाजकारणात अनेक स्त्रिया मला अशा दिसतात की ज्या गाजावाजा न करता अनेक र्वष शांतपणे आपला व्यवसाय सांभाळत अनेक संस्थांना मदत, मार्गदर्शन प्रत्यक्ष काम अभ्यासपूर्ण लेखन करत असतात.

डॉ. श्यामला वनारसे हे असं नाव आहे. वेगळ्या प्रकारे समाजकारण करणाऱ्या अनेक तरुण मुली मला भोवताली दिसतात. त्यात पर्यावरणाचा विचार करणाऱ्या, त्यात प्रशिक्षण देणाऱ्या, त्यावर आधारित काम करणाऱ्या सोनाली फडके, केतकी घाटे, मानसी करंदीकर, मृणाल वनारसे आहेत. बालकारणात अनेक र्वष काम करणाऱ्या संजीवनी कुलकर्णी, शुभदा जोशी, डॉ. विदुला म्हैसकर, वर्षां सहस्रबुद्धे, विद्या पटवर्धन, गौरी, वंदना आहेत. त्यांच्या कामाने समाज समृद्ध झाला आहे. राजकारण आणि समाजकारण अशा दोन्ही आघाडय़ा सांभाळत बालकारणाला पुढे नेणाऱ्या माधुरी सहस्रबुद्धे आहेत. वंचित मुलांच्या कामात स्वत:ला झोकून दिलेल्या डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे, सुनीता जोगळेकर आहेत. याशिवाय मुलांसाठी मासिकं चालवणाऱ्या, विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या कितीतरी स्त्रिया आहेत. समाजकारणात त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. निरपेक्षपणे काम केलं आहे, त्याची नोंद घ्यायलाच लागेल.

समाजात एकटय़ा राहणाऱ्या स्त्रियांची संख्याही वाढली आहे. समाजात सोयी चांगल्या झाल्याने ते शक्य होत आहे, पण तरी ते धाडस म्हणावं असे काही प्रश्नही समोर येतात. समाजाला मात्र असं वाटतं की अशा स्त्रियांनी एकतर आई वडिलांच्या आश्रयाला जावं किंवा मुलांच्या बरोबर रहावं किंवा भावांच्या संसारात रहावं पण कोणाच्या तरी सोबतीनं रहावं. तिला स्वत:चं काम, स्वत:चं स्वातंत्र्य, सन्मान नसतो का? तिने का कोणाच्या आश्रयाला जायचं? या स्त्रियांनी आपला सन्मान कमावला आहे.

आता लग्न न करता राहणाऱ्या, स्वत:चं वेगळं काम असणाऱ्या मुली-स्त्रिया असतात. काही लग्न करून मुलं नाकारलेल्या असतात त्या लग्न करून मुलं वाढवणाऱ्या आणि काही कामंही करणाऱ्यांना म्हणतात, ‘‘एवढे शिकून सवरून कसल्या पोरं वाढवत बसता?’’ कुणाला मुलं आवडतील कुणाला नाही तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण लग्न करून मुलं होणं, ती वाढवणं यातही आनंद आहे हे नजरेआड करता येणार नाही. युगानुयुगं स्त्री-पुरुष पुरुषप्रधान व्यवस्थेत राहिले. त्याचा परिणाम असा झाला की पुरुषांना कायम सगळ्याचा कब्जा घ्यायची सवय लागली आणि स्त्रियाही पुरुषप्रधानच बनल्या. पण उत्क्रांतीच्या काळात स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. मुलं सांभाळण्याची, घर सांभाळण्याची, नाती सांभाळण्याची सर्व जबाबदारी स्त्रियांनीच सांभाळली त्यामुळे त्यांची संवेदनक्षमता टिकून राहिली. पुरुष मात्र एकांडा शिलेदारच राहिला, त्यामुळे क्वालिटी लाइफ म्हणजे काय याची जितकी तळमळ स्त्रीला असते तितकी ती पुरुषाला नसते. याला काहीजण अपवाद असतातच. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्यात समानता येऊच शकत नाही. त्यासाठी विशेष प्रयत्नच लागतील.

नव्या काळानुसार नवी शिकवण हवी. दोघांनीही एकमेकांना समजून घेण्यासाठी काही शिक्षण हवं. दहावी-बारावीपासूनच हे हवं आहे, लग्नाचा अर्थ काय, स्त्री-पुरुषांच्या सहजीवनाचा अर्थ काय, दोघांच्या भूमिका काय असतात, त्यांच्या आड काय येतं? दुसऱ्याच्या चुका काढताना स्वत:चे दोष कसे लक्षात घ्यायचे, दुसऱ्याला शिकवायला जायचं नाही तर स्वत: बदलायचं अशा अनेक गोष्टी शिकवाव्या लागतील.

त्याहीपेक्षा आधी लहानपणापासून मुलग्यांना मुलींशी चांगली मैत्री करायला शिकवायला हवं. माध्यमांमधून मुलं फार लवकर स्त्रियांकडे विकृत नजरेनं पाहायला शिकतात. त्याआधी त्यांना अविकृत संदेश गेले पाहिजेत. तसे अनुभव दिले पाहिजेत. कुमार वयात आणि तरुण वयात काही चांगल्या सामाजिक कामाच्या निमित्तानं मुलगे-मुली एकत्र आली तर त्यांच्यात चांगलं नातं निर्माण होऊ शकतं. एकमेकांचा आदर करायला ती शिकतात. समानता त्यांच्यात सहजपणे रुजते.

समानता कोणी आपल्या तळहातावर आणून ठेवणार नाही, हे स्त्रियांना चांगलेच माहीत आहे. त्या त्यासाठी कायम प्रयत्न करत राहणार, भांडत राहणार, झगडत राहणार पण त्याचबरोबर पुरुषांचं नेमकं काय चुकतं, त्यांनी स्त्रीकडे कशा दृष्टीने पाहायला हवं हे त्यांनाही औपचारिक, अनौपचारिकपणे शिकवायला हवं. समाजात सध्या जे वातावरण आहे ते बदलण्यासाठी स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-सन्मान, स्त्री-पुरुष समानतेचं प्रशिक्षण द्यायला हवं. नुसत्या पाककृती पुरुषांना शिकवणं पुरेसं नाही त्यांना स्त्री-पुरुष नात्यातला आदर, प्रेम, सन्मान आणि त्यातला आनंद लक्षात आणून दिला पाहिजे. आपल्या सहज लक्षात येत नाही पण आज जी अस्वस्थता आपल्याला घेरून राहिलेली आहे, तिला इतर अनेक कारणं आहेत. समाजात पाहता पाहता होणाऱ्या हत्या. त्यांच्या विरोधात माणसांनी एकत्र येणं, पर्यावरणावर होणारे हल्ले, जागतिक स्तरावर होत असलेला निसर्गाचा ऱ्हास, अनेक रोगांची निर्मिती, अनेक प्राणी नष्ट होणं, वनस्पती नष्ट होणं ही सगळी संकटं आपल्याला अस्वस्थ करणारी आहेत.

त्या अस्वस्थतेतून समाजाचं स्वास्थ्यही हरपतं आहे. त्यातूनच माणसंच एकमेकांना नकोशी वाटणं, लग्नं नको वाटणं, मुलं नकोत असं वाटणं हा सगळा जीवनाचाच ऱ्हास सुरू झाला आहे. माणसामाणसात भेद आहेत. शहरातली माणसं, खेडय़ातली माणसं, गरीब-श्रीमंत, उच्चवर्गीय-कनिष्ठवर्गीय, शिकलेली-न शिकलेली, एवढंच नाही तर मुलांना इंग्रजी माध्यमात घालणारी मराठी माध्यमात घालणारी, सोसायटय़ांत राहणारी झोपडीत राहणारी, एकाच सोसायटीत घर भाडय़ानं घेऊन राहणारी-घर विकत घेऊन राहणारी मुलं हुशार-बेताची आपले भेदभाव संपतच नाहीत. स्त्री आणि पुरुष हा तर केवढा मोठा भेद! समानता कुठे कुठे आणणार? या सगळ्यात निर्णायक वाटा राजकारणाचा असतो. धोरणांचा असतो.

बालवाडीतल्या मुलांनाही आपण शिकवतो, मुलगे-मुली सारखेच असतात, भावंडं असतात, दुसऱ्यावर प्रेम करा, मारामाऱ्या करू नका, आपले पसारे, घाण आपण आवरा, पैसा महत्त्वाचा नाही माणसं महत्त्वाची आहेत. पण देशाच्या आणि विश्वाच्या पातळीवर मोठी माणसंच ही मूल्य जपत नाहीत. मारामाऱ्या करतात, घाण करतात, पैसाच महत्त्वाचा मानतात हा जीवनाचा ऱ्हास कसा थांबवायचा? स्त्री-पुरुष समतोल, समानता याच सगळ्या विश्वाचा एक भाग आहे. जगात स्वास्थ्य आलं तर ते या नात्यातही उतरेल.

shobhabhagwat@gmail.com