|| मीरा बोरवणकर निवृत्त आयपीएस

‘बॅलन्स फॉर बेटर’ ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची मध्यवर्ती संकल्पना मला खरोखरंच स्वागतार्ह वाटते. अधिकारी म्हणून पोलीस दलात काम करणं हा अनुभव अत्यंत समाधानी होता, पण सगळ्याच स्त्री कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तो तसा असेलच असे मी ठामपणे म्हणू शकत नाही. पोलीस सेवेतील स्त्री पुरुष समानतेचं चित्र तपासण्यासाठी ‘सेंटर फॉर पोलीस रिसर्च’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मदतीने २०१६ मध्ये एक सर्वेक्षण केलं गेलं. सत्तेचाळीस टक्के महिला कॉन्स्टेबल आणि छत्तीस टक्के महिला सबइन्स्पेक्टर त्यांच्या ‘वर्क एन्व्हायर्नमेंट’बद्दल समाधानी नव्हत्या. स्त्री-पुरुष समानता आणि आदर याबाबत हे असमाधान होतं. त्यांना स्वच्छतागृह उपलब्ध करून देणं, आठ तासांच्या शिफ्ट आणि त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांची सुट्टी मंजूर होणं या गोष्टी करण्याची गरज होती. माझ्या सारख्या अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या स्त्रीला सर्व सुखसुविधा उपलब्ध असतात. घरगुती कारणांसाठी मदतनीस नेमणं आम्हाला आर्थिकदृष्टय़ा शक्य असतं, त्यामुळे ओढाताण तुलनेनं कमी असते. महिला कॉन्स्टेबल आणि महिला सब इन्स्पेक्टर यांना मात्र कार्यालयीन आणि गृहिणी, आई, पत्नी अशा सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळायच्या असल्याने त्यांची तारेवरची कसरत होते हे वास्तव आहे.

पोलीस सेवा ही अत्यंत जबाबदारीची सेवा आहे त्यामुळे या क्षेत्राकडे स्त्रियांनी येणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात गेली २५ र्वष पोलीस सेवेत स्त्रियांना ३३ टक्के आरक्षण आहे. पण या क्षेत्रात येणाऱ्या स्त्रीवर चौदा तासांची डय़ूटी संपल्यावर घरची जबाबदारीही आहे हे लक्षात ठेवून महिलाभिमुख पायाभूत सुविधा आपण निर्माण करायला हव्यात असं मला वाटतं. पायाभूत सुविधांच्या बरोबरीने स्त्रियांसाठी नेतृत्वगुण विकसित करणाऱ्या, अनुभव समृद्ध करणाऱ्या कार्यशाळा हव्यात. जेंडर सेन्सिटिविटी – स्त्री पुरुषांना परस्परांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेनं बघता यावं यासाठी स्त्री आणि पुरुष दोन्ही कर्मचाऱ्यांसाठी अशा कार्यशाळा होणं ही अत्यंत गरजेचं आहे.

लेडी बॉस म्हणून अनेक पदांवर काम करताना माझ्या पुरुष सहकाऱ्यांचं मला नेहमीच उत्तम सहकार्य मिळालं हे मला आवर्जून सांगायला हवं. मुंबई क्राइम ब्रांचचं नेतृत्व करत होते तेव्हा मुंबई पोलीस दलातलं जांबाज पथक अशी ख्याती असलेल्या क्राईम ब्रांचमधल्या कर्मचाऱ्यांनी मला संपूर्ण साथ दिली. मध्यरात्री धाडी टाकणं असो की छोटा राजनच्या टोळीचा दारूगोळा आणि स्फोटकं जप्त करणं, हैदराबादच्या अलुकास ज्वेलर्सकडून चोरीला गेलेले सात कोटी रुपयांचे दागिने पकडणं – यातल्या कुठल्याही मोहिमेवर क्राईम ब्रांचचं नेतृत्व करणारी मी एकमेव महिला अधिकारी होते, पण म्हणून कुठलीही वेगळी वागणूक देणं, पुरेसा मान न ठेवणं असं काहीही कधीही माझ्या बाबतीत झालं नाही. राज्यातल्या प्रत्येक पोस्टिंगमध्ये पुरुष सहकाऱ्यांचा भक्कम पाठिंबा मला मिळाला, त्याचा सकारात्मक परिणाम माझ्या कामगिरीवर झाला.

महाराष्ट्र सर्वार्थानं पुरोगामी आहे, तरी स्त्रियांची कामगिरी अधिकाधिक उत्तम व्हावी यासाठी आपण विशेष प्रयत्न करायला हवेत कारण जिथे स्त्रिया आनंदानं आणि समाधानानं काम करू शकतात तो समाज आणि देश नेहमीच प्रगती करतो.