|| अश्विनी भिडे, आयएएस (अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर)

मी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करते. या क्षेत्रात स्त्रियांची संख्या खूप कमी आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेले हे क्षेत्र आहे. कारण यामध्ये सिव्हिल इंजिनिअिरग आहे. फिल्ड वर्क आहे. यातल्या खासगी किंवा सरकारी क्षेत्रातही स्त्रियांची संख्या कमी आहे. त्यामुळे यादृष्टीने तसे हे पुरुषप्रधान क्षेत्र आहे. पण या क्षेत्रातील स्त्रियांना असमानतेची वागणूक मिळत नाही.  जेवढय़ा स्त्रिया या क्षेत्रात आहेत त्या पुरुषांच्या बरोबरीने प्रभावीपणे काम करू शकतात. कामाचे स्वरूप, कामाची गुणवत्ता याबाबतीतही स्त्रियांना इथे कमीपणाची वागणूक मिळते, असे नाही. त्यामुळे या क्षेत्रात संख्यात्मक असली तरी गुणात्मकदृष्टय़ा असमानता आहे, असे मला वाटत नाही.

स्पर्धापरीक्षांमध्ये स्त्रियांचे प्रमाण सकारात्मक आहे. परंतु अशा परीक्षांना दोन-तीन वेळा प्रयत्न करावा लागतो. पुरुषांना ते शक्य होते, परंतु स्त्रियांवर घरून दबाव असतो, त्यामुळे त्या पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या नाही तर एकूणच त्यांच्या करिअरवर परिणाम होतो. माझा ‘अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर’ हा विषय नव्हता. पण मला या क्षेत्रात संधी मिळाल्या. या क्षेत्रातच माझ्या अधिकाधिक ‘पोस्टिंग’ झाल्या. त्यामुळे हा विषय माझा ‘स्पेशलाइज’ विषय झाला. कारण गेल्या दहा वर्षांतल्या माझ्या नेमणुका अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरमधल्या आहेत. सिव्हिल इंजिनीयर, आर्किटेक्ट किंवा ज्या मुली प्रोजेक्ट मॅनेजमेंट करतात, किंवा ज्यांना प्रामुख्याने या क्षेत्रात यायचे आहे. त्या येऊ शकतात. कारण शिक्षणाचा विचार करता मुलीही मुलांसारख्या उच्चशिक्षित आहेत. कॅम्पस इंटरव्ह्य़ूमध्ये मुलींनाही मुलांच्या बरोबरीने नोकऱ्या मिळतात. त्यामुळे असमानता आहे, असे मला वाटत नाही. पण प्रश्न कुठे निर्माण होतो, एकदा नोकरी लागल्यानंतर मग करिअरमध्ये होणारी प्रगती आहे, तिथे मात्र स्त्रियांवर मर्यादा आहेत आणि एक प्रकारचे ‘ग्लास सीलिंग’ आहे आणि हे कशामुळे आहे तर स्त्रियांना त्यांच्या आयुष्याचा आणि करिअरचा समतोल राखताना करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. घराची जबाबदारीही असते. मुलांना वाढवण्याची जबाबदारीही असते. अनेकदा एक वेळ अशी येते की तिला काही तरी एक निवडावे लागते. त्यामुळे करिअरला कमी महत्त्व द्यावे लागते. साहजिकच ‘प्रमोशन’च्या संधी, वेगळे काही करण्याच्या संधींना मर्यादा येते. त्यामुळे ‘मिड करिअर क्रायसिस’ स्त्रियांच्या बाबतीत जास्त आहे. नोकरी मिळते, पण नोकरीतील प्रगती आहे, पदोन्नती आहे, पुढे जाऊन करिअरचा पुढचा टप्पा आहे, तो गाठताना मात्र स्त्रिया आणि पुरुषांमध्ये असमानता आहे, असे मला वाटते. एका टप्प्यावर स्त्रियांना स्वत:पेक्षा इतर गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि करिअरला थोडे दुय्यम स्थान द्यावे लागते. हे कुठे तरी बदलायला हवे, घरच्यांनीही स्त्रियांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. तशी सपोर्ट सिस्टम तयार होण्याची गरज आहे. तसेच कार्यालयांमध्येही तिच्या पाठीशी उभी राहणारी व्यवस्था हवी आणि हे गरजेचे आहे, असे मला वाटते.