|| दीपक शिकारपूर

संगणकीय क्रांतीने नोकरी-व्यवसायातले जगभरातले सर्व संदर्भ बदलून टाकले. फक्त कौशल्य व मेहनतीची तयारी या भांडवलावर अनेक स्त्रिया यशस्वीरीत्या सर्व पायऱ्या चढत उच्च पदावर विराजमान झाल्या. ‘वर्क फ्रॉम होम’, ‘टेली वर्किंग’ या तंत्रकार्य पद्धतीचा अनेक स्त्रियांना फायदा झाला. तंत्र व संशोधनच नव्हे तर विक्री, विपणन, सेवा या क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता दिसू लागली आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ

डॉ. दीपक शिकारपूर  हेक्जानिका, सीड, इन्फोटेक आदी आयटी उद्योगांचे संचालक आहेत.मराठा चेंबरच्या नियामक मंडळावर त्यांची २०१८-२० या कालावधीसाठी निवड झाली आहे  नुकतीच त्यांची तंत्र शिक्षण मंडळाने स्थापलेल्या आयटी बोर्ड या प्रख्यात अभ्यास मंडळावर तीन वर्षांच्या कालावधीसाठी नेमणूक झाली आहे. ‘कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया’ या राष्ट्रीय संगणक संघटनेचे ते माजी अध्यक्ष आणि मानद सदस्य (फेलो) आहेत. ३८ पुस्तके, अभ्यासपूर्ण व्याख्याने, समुपदेशन या मार्गाने ते उद्याची युवा पिढी सक्षम व कौशल्यपूर्ण घडवू इच्छितात.

गेल्या पाच-पंचवीस वर्षांत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील सर्व आर्थिक-सामाजिक-राजकीय चित्रे, धोरणे आणि समीकरणे आरपार बदलली. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स व उपग्रहीय संवादमाध्यमांचा फार मोठा वाटा आहे. तंत्रप्रणालींच्या संयोगांमुळे – विशेषत: चित्र, ध्वनी आणि माहितीच्या एकत्रित वापरामुळे – एकात्मिक माहिती, संवाद आणि करमणुकीचे एक वेगळेच दालन उघडले आहे.

साधारणपणे १९९० च्या आसपास आपल्याकडे खासगी तसेच काही प्रमाणात सरकारी क्षेत्रांमध्येही कार्यालयांतून संगणक म्हणजेच डेस्कटॉप पीसी दिसू लागले. ‘संगणकांचे प्रस्थ असेच वाढत राहिले तर त्यांच्यामुळे आमच्या नोकऱ्या जातील’ असा आरडाओरडा झाला, काही ठिकाणी संपदेखील झाले. पण त्यानंतरच्या ५-१० वर्षांतच अंतिमत: संगणक क्षेत्राचा आणि संगणकाधारित सेवांचाच विलक्षण विस्तार होऊन त्यातून भरपूर रोजगार उत्पन्न झाले हे आपण पाहिले आणि अनुभवलेही आहे. या विस्तारामधील अनेक क्षेत्रे अशी आहेत की त्यांमध्ये हजारोंनी नोकऱ्या उपलब्ध होतील असे भविष्य वर्तवणाऱ्यालाच, २००० पूर्वी, लोकांनी वेडय़ात काढले असते. मुद्दा काय तर काळाप्रमाणे बदलण्याची तयारी असेल तर सतत नवनवीन क्षेत्रे क्षितिजावर उगवताना आढळतातच.

आपण थोडे अजून मागे गेलो तर असे दिसते की मुळात सुमारे २०० वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांती घडून तीमधून यंत्रयुग अवतरले तेव्हाही असेच म्हटले गेले, परंतु अशा एकेका कारखान्यांमधूनच कित्येकांना नोकऱ्या मिळाल्या. पण या औद्योगिक क्रांतीमध्ये स्त्रिया फार कमी प्रमाणावर सहभागी होत्या. पण संगणकीय क्रांतीने सर्व संदर्भ बदलून टाकले. फक्त कौशल्य व मेहनतीची तयारी या भांडवलावर अनेक स्त्रिया यशस्वीरीत्या सर्व पायऱ्या चढत उच्च पदावर विराजमान झाल्या. अरुणा जयंती (केप जेमिनी), रेखा मेनन (अक्सेन्चर), आरती सुब्रमण्यम् (टी.सी.एस.), कीर्तिका रेड्डी (फेसबुक), कुमुद श्रीनिवासन (इनटेल) ही या क्षेत्रातील काही महत्त्वाची भारतीय नावे.

स्वातंत्र्यापूर्वी ‘चूल व मूल’ या धबडग्यातून आधुनिक स्त्री आता ‘मोबाइल आणि माउस’पर्यंत स्थित्यंतरे आत्मसात करत गेली. ‘वर्क फ्रॉम होम’, ‘टेली वर्किंग’ या तंत्रकार्य पद्धतीचा अनेक स्त्रियांना फायदा झाला. तंत्र व संशोधनच नव्हे तर विक्री, विणपन, सेवा या क्षेत्रांत स्त्री-पुरुष समानता दिसू लागली आहे.

मात्र अजूनही काही गोष्टींचा विचार करावा लागणार. भविष्यातल्या तथाकथित अनिश्चिततेमध्ये स्वत:चे स्थान टिकवण्यासाठी स्वयंरोजगार करू शकणे, स्वतंत्र व्यवसाय करणे, इतरांबरोबर सहकार्य म्हणजेच टीमवर्क करून एकत्रितपणे कामे पार पाडणे. ही व अशी कौशल्ये स्त्री व्यावसायिकांना स्वत:मध्ये बाणवावी लागतील. समाजाला काय हवे आहे ते नेमके ओळखून ती गरज भागवणे, ज्याला जमेल तो (किंवा ती) भरपूर पैसा कमावेल. स्वतंत्र व्यवसाय-धंदा वा उद्योग करण्याला चांगले दिवस आले आहेत. विशेषत: सेवाक्षेत्र उर्फ ‘सव्‍‌र्हिस सेक्टर’मध्ये तर नक्कीच! यासोबत अर्थातच ‘नेट’च्या प्रसारामुळे तरुण, मध्यमवयीन, स्त्रिया, बेरोजगार, काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती.. अशा सर्व वर्गातून नवकल्पना पुढे येत आहेत.

काहींनी वर्तवलेल्या भीतीप्रमाणे कारखान्यांतून कामगारांऐवजी शेकडो यांत्रिक हात आणि यंत्रमानव काम करू लागले तरी त्यांचीही देखभाल करण्यासाठी व त्यांनाही मानवी गरजांनुसार, नवनवीन कौशल्ये शिकवण्यासाठी कुशल व अर्धकुशल तंत्रज्ञ लागतीलच ना! पिझ्झाची डिलिव्हरी माणसाऐवजी ‘ड्रोन’द्वारे होऊ  लागली तरी ड्रोनचा मार्ग आखणे, त्यांची दुरुस्ती व देखभाल, त्यांचे प्रशासकीय व्यवस्थापन कोण करेल. माणूसच ना? रोख व्यवहार खरोखरीच हद्दपार होऊन डिजिटल व्यवहार होऊ लागले तरी त्या क्षेत्रामध्येही अर्थतज्ञांची आणि त्यांच्या शिफारसी अमलात आणण्यासाठी प्रोग्रॅमर्सची गरज असणारच आहे. अशा प्रकारे तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्ये असलेल्यांना रोजगाराची समस्या येणार नाही. म्हणजेच ‘ज्या तंत्रज्ञानामुळे काही काळ बेकारी वाढते तेच तंत्रज्ञान राबवण्यासाठी कालांतराने रोजगार उत्पन्न होतात..’ अधिकाधिक कंपन्या डिजिटायझेशनवर भर देणार असून त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर स्वत:चा आयटी विभाग विकसित करण्यावर भर देण्यात येईल. या विभागांसाठी किंवा सॉफ्टवेअर पुरवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. टेलिकॉम, माहितीची सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्स, बिग डेटा अनॅलिटिक्स, मोबाइल अ‍ॅप विकसन, हार्ड वेअर /नेटवर्किंग ही क्षेत्रे करिअरसाठी महत्त्वाची आहेत.

मुली आणि स्त्रियांसंबंधीच्या काही समस्यांची चर्चा सध्या चालू असते – कॉलसेंटर किंवा बीपीओ कार्यालयांमधून रात्रपाळी करणाऱ्या मुलींची सुरक्षितता, महिला-आरक्षण विधेयक. अर्थात स्वत:चे विश्व साकार करण्यासाठी सरकारी मदतीवर आणि धोरणांवर अवलंबून न राहणाऱ्या स्त्रियाही आहेत. आयटीने त्यांच्यासाठी एका नव्या विश्वाची दारे उघडली आहेत आणि त्या या संधीचा भरभरून फायदा घेत आहेत. बहुतेक सर्व आयटी कंपन्यांमध्ये स्त्री कर्मचाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. कोणत्याही आरक्षणाची मागणी न करताही आयटी आणि बीपीओच्या क्षेत्रात त्यांनी आघाडी मारली आहे. २०१८ नंतर आलेल्या उद्योजकतेच्या लाटेत अनेक स्त्रिया पुरुषांबरोबर जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. उत्पादकता, गुणवत्ता, शाश्वतता ऊर्फ व्यवसायात दीर्घकाळ टिकून राहणे आणि नफा मिळवण्याची क्षमता असणे (प्रॉफिटॅबिलिटी) हे उद्योग आणि उद्योजकतेचे काही प्रमुख आधारस्तंभ आहेत.

संगणक आणि त्याहीपेक्षा आता स्मार्टफोनद्वारे शिक्षणाचा दूपर्यंत प्रसार करणे शक्य असल्याचे सिद्ध झालेच आहे. यामुळे विरळ वस्तीच्या किंवा दुर्गम भागातील रहिवाशांनाही घरबसल्या विविध प्रकारचे उत्कृष्ट शिक्षण मिळू शकते. दूरशिक्षण (डिस्टन्स लर्निग) आणि शिक्षण या संकल्पना आता ‘नेट’च्या प्रसाराने लोकप्रिय झाल्या असून त्यांना मोठय़ा प्रमाणात मान्यताही मिळते आहे. या मार्गाने आता इंग्रजीप्रमाणेच महत्त्वाच्या विविध प्रादेशिक भाषांमध्येही प्रथम दर्जाचे शिक्षण घेणे बहुतेकांच्या आवाक्यात आले आहे. प्रशिक्षण, समुपदेशन, कौशल्यवृद्धी अशा अनेक क्षेत्रांत स्त्रिया यशस्वी होत आहेत. मागील काही वर्षांपासून संगणकीकरणाचा वेग वाढत आहे. शिवाय संगणकांच्या विक्रीचा दरही प्रतिवर्षी १३ टक्क्यांनी वाढत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता हार्डवेअर क्षेत्रात करिअर करणे हे सुरक्षित व खात्रीलायक झालेले आहे.  एखाद्या कंपनीत नोकरी करण्यासोबतच स्वत:चा बिझनेस अथवा कन्सल्टन्सी देण्याचा पर्यायही असतो. अलीकडे नेटवर्किंग किंवा सिस्टिम इंजिनीअर म्हणून नवीन कार्यक्षेत्र विकसित झाले आहे. हे क्षेत्र म्हणजे हार्डवेअर क्षेत्रातील एक स्पेशलायझेशन होय. एखाद्या कंपनीला तिच्या गरजेप्रमाणे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर पुरवण्याचं काम सिस्टिम इंजिनीअरला करावं लागतं. कंपनीची सिस्टिम म्हणजे कॉम्प्युटर किंवा सव्‍‌र्हरमध्ये समस्या आल्यास ती सोडवण्याची जबाबदारी यांच्यावरच असते. नेटवर्क इंजिनीअर कंपनीतील अनेक कॉम्प्युटर्स सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जोडून देतात. यामध्ये सिस्टिम सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनचं काम महत्त्वाचं असतं. आज प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटरची गरज असल्याने या क्षेत्राला असणारी मागणी वाढतच आहे. इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन इंजिनीअिरग ही सर्व संबंधित क्षेत्रं आहेत.

या क्षेत्रांत काम करायचं तर पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान, कार्यानुभव व परिपूर्ण प्रशिक्षण असायला हवं. यापुढील सर्वच व्यवहार आयटीचाच आधार घेऊन पुढे सरकणार आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आयटीशी सध्या थेट निगडित नसलेल्या क्षेत्रांमध्येही संगणकीय यंत्रणा प्रवेश करणार आहेत व आयटीवाल्यांना त्यांमध्येही नोकरीच्या व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत हे नक्की. स्त्रिया व तरुण विद्यार्थिनींनी याबाबत सजग व तत्पर असले पाहिजे.

२०२५ पर्यंत माहिती तंत्रज्ञान उद्योगातल्या स्त्रियांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होईल – या क्षेत्रात स्त्रियांना मागणी असण्याची आणि संधी मिळण्याची काही विशिष्ट कारणे आहेत. सर्वच क्षेत्रांत स्त्रियांच्या बुद्धिमत्तेचा आणि कौशल्यांचा वापर करता येईल हा ‘शोध’ लागल्यावर त्यांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली. असे दिसते की जीवनातल्या एकंदर वाढत्या विविधतेचा नवनिर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या संस्कृतीशी काही संबंध आहे. ही विविधता लिंग-जात-धर्म-देश अशा मर्यादा केव्हाच ओलांडून जाते. आजच्या, वेगळ्या पठडीतल्या, अनेकविध रोजगारांसाठी स्त्रिया पुरुषांइतक्याच योग्य आहेत किंबहुना काही बाबतीत त्या जास्त सरस आहेत – त्या आपले लक्ष दिलेल्या कामावर जास्त चांगल्या प्रकारे केंद्रित करू शकतात, त्यांची नवीन गोष्टी शिकण्याची मानसिक तयारी जास्त असते.

हा लेख वाचणाऱ्या सर्व पालकांनी होऊ घातलेल्या या परिवर्तनांची दिशा समजून घेऊन मुलींना शिक्षण देण्याबाबतच्या स्वत:च्या दृष्टिकोनात योग्य ते बदल करावे अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो. त्यांना हरहुन्नरी होऊ द्या, जगात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी लागणारी सर्व कौशल्ये आत्मसात करू द्या.

deepak@deepakshikarpur.com