|| डॉ. स्मिता लेले

प्रा. डॉ. स्मिता लेले यांना संशोधन क्षेत्रात ४० वर्षांचा अनुभव आहे. १९७७ मध्ये हिंदुस्तान लिव्हरमध्ये पहिली महिला अभियंता म्हणून त्यांनी करियरला सुरुवात केली. त्यानंतर मुंबईमध्ये रसायन तंत्रज्ञान (आयसीटी) संस्थेत संशोधन आणि शिक्षण असे कार्यक्षेत्र निवडले. २०१८ मध्ये त्यांची निवड ‘आयसीटी’च्या मराठवाडा उपकेंद्रासाठी ‘पहिली संचालिका’ म्हणून झाली आहे. शंभराहून अधिक शोधनिबंध आणि दोन पेटंट त्यांच्या नावावर आहेत.

पन्नास वर्र्षांपूर्वी कारखान्यामध्ये एखादे यंत्र चालविण्यासाठी उंचावर चढून, खूप जोर लावून कुठले तरी चाक फिरवा, व्हॉल्व्ह उघडा अशी ताकद लागणारी कामे होती परंतु आता संगणकाच्या मदतीनेच हे सगळे केले जाते त्यामुळे तेथील तंत्रज्ञ आणि अभियंता स्त्री आहे की पुरुष याने काहीही फरक पडत नाही. हे शक्य झाले आहे ते सामाजिक आणि वैज्ञानिक क्रांती आणि प्रगतीमुळे आणि म्हणूनच पुढील २०-३० वर्षांत या क्षेत्रात स्त्री-पुरुष भेद कमी महत्त्वाचा ठरणार आहे.

जगातील स्त्रीशास्त्रज्ञ कोण म्हटल्यावर बहुतेकांच्या तोंडून नोबेल पुरस्कार मिळविणारी मादाम मेरी क्युरी हेच नाव येईल. आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील स्त्रीवैज्ञानिकांची यादी केली तर जानकी अनमल, डॉ.आनंदीबाई जोशी, असीमा चटर्जी, कमला सोहनी इत्यादी नावे डोळ्यांसमोर येतात. कर्करोग संशोधनामध्ये प्रामुख्याने काम केलेल्या स्त्रीशास्त्रज्ञ म्हणजे पद्मभूषण डॉ. कमल रणदिवे. यांचे विशेष योगदान म्हणजे त्यांनी सुरू केलेली आयडब्ल्यूएसए (इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन) ही हजारो स्त्रीशास्त्रज्ञांना एकत्र आणून विज्ञान प्रसार करणारी संस्थेची स्थापना. सुमारे ४५ वर्षे या संस्थेच्या माध्यमातून-कित्येक स्त्रीशास्त्रज्ञांनी समाजप्रबोधन आणि विज्ञानप्रसार याचे काम केले आहे.

‘लीलावतीच्या कन्या’ या पुस्तकात काही स्त्रीशास्त्रज्ञांची यशोगाथा लिहिली आहे. या सर्व मूलभूत विज्ञान संशोधन करणाऱ्या आहेत पण भारताला आज जास्त गरज ही तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी विषयात संशोधन करून ज्ञानातून संपत्ती निर्माण करण्याची आहे. तंत्रज्ञान व अभियांत्रिकी शाखेत स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला येऊन शास्त्रज्ञ झालेल्या स्त्रियांची नावे तर अगदी बोटावर मोजता येतील इतकी कमी आहेत. परंतु गेल्या ३० वर्षांत मुलींना शिकविण्याचा विरोध कमी झाल्यामुळे व अभियांत्रिकी क्षेत्रात ३० टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवल्यामुळे आता देशामधील प्रत्येक उत्तम संशोधन केंद्रामध्ये (आयआयटी, सीएसआयआर लॅब्ज वगैरे) १०-२० टक्के स्त्रीसंशोधक आढळून येतात. यूडीसीटी/यूआयसीटी/ आता आयसीटी म्हणून प्रख्यात असलेली मुंबईची रसायन तंत्रज्ञान संस्था येथेदेखील आता ३० टक्के स्त्रीशास्त्रज्ञ काम करताना दिसतात. अवघ्या १००-१२५ शास्त्रज्ञ शिक्षक असलेल्या या संस्थेत पाच-सहा जणी जागतिक कीर्तीच्या स्त्रीशास्त्रज्ञ सध्या कार्यरत आहेत आणि प्रा. बचवाल व प्रा. पुष्पा कुलकर्णी अशा काही जणी निवृत्त झाल्या आहेत.

या क्षेत्रातील पुढच्या काळात काय चित्र दिसेल याचा विचार करता मला असे वाटते की, पुढील १५-२० वर्षांत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने नसल्या, तरी स्त्रीशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधक यांची संख्या भारतामध्ये ३०-४० टक्के नक्कीच असेल. राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर नाव कमावण्यासाठी २८-३० वर्षे संशोधन क्षेत्रात घालवावी लागतात. त्यामुळे सध्या वयाच्या तिशीत असणाऱ्या स्त्रिया १५-२० वर्षांत आपल्या कामाचा ठसा समाजाच्या प्रगतीमध्ये, आर्थिक विकासामध्ये दाखवू शकतील. पण एकूणच समाजाचा विचार करता या क्षेत्रातील स्त्री-पुरुषांचे सध्याचे प्रमाण असमान आहे हे नक्कीच. मुळात समानता म्हणजे काय आणि समतोल म्हणजे काय? गणिताप्रमाणे प्रत्येक गोष्ट विभागून करणे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ५० टक्के पुरुष, ५० टक्के स्त्री असणे हे स्वप्नच मुळात असमतोल आहे. १९९० मध्ये जेव्हा प्रथम मी जपानला गेले तेव्हा तिथल्या हॉटेलमध्ये कर्मचारी म्हणून १०० टक्के स्त्रियांना काम करताना पहिले. स्वागत कक्ष, साफसफाई, सुरक्षा, स्वयंपाक, हॉटेलमध्ये राहणाऱ्यांना लागणारी सेवा पुरविणे अशा प्रत्येक ठिकाणी स्त्रियाच काम करीत होत्या. मी कुतूहलाने मोडक्यातोडक्या जपानी भाषेत बोलून चौकशी केली तेव्हा एक जण म्हणाली, ‘‘सगळे जपानी पुरुष कारखान्यामध्ये काम करतात. ज्या ठिकाणी खूप जास्त शारीरिक ताकदीची गरज नाही अशी सगळी कामे, अगदी पुरुषांचे केस कापणेसुद्धा आम्ही जपानी स्त्रियाच करतो.’’ याला मी म्हणेन की गणिती समानता नाही पण समतोल आहे.

पूर्वीच्या काळात म्हणजे माझ्या तरुणपणी भारतीय स्त्रीला स्वत:लाच असे वाटत असे की मी संसार, कुटुंब, घरकाम आणि करियर याचा तोल सांभाळला पाहिजे. म्हणून कालच्या संशोधक स्त्रीला घर आणि प्रयोगशाळा याची तारेवरची कसरत करावी लागे. कदाचित म्हणूनच काही स्त्रिया स्वेच्छेने अविवाहित राहिल्या आणि काहींनी लग्न केले तरी मुलांची जबाबदारी निर्माण केली नाही. परंतु आता काळ बदलला आहे. आजच्या स्त्रीला काय हवे आहे हे तिने ठरवले पाहिजे. काही तरी कमावताना काही तरी गमवावे लागते. मुलांना जन्म देऊन निदान पहिल्या वर्षी तरी त्याची रोजची प्रगती स्वत: पाहायची इच्छा असेल, तर त्या आईने आपल्या करियरमधला ब्रेक किंवा मंदगती करियर आनंदाने स्वीकारले पाहिजे. या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे आपण उच्चशिक्षित स्त्रियांबद्दल बोलत आहोत आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांविषयी नाही. केवळ पदवीधर अथवा त्याहून कमी शिकलेल्या स्त्रीला मिळालेली नोकरी एकदा सोडली तर पुन्हा संधी मिळेलच असे नाही. परंतु विज्ञानशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधक स्त्रिया या उच्चशिक्षित असल्यामुळे करियरमध्ये खंड पडला तरी त्यांना पुन्हा करियर सुरू करता येणे शक्य आहे. आता असे समजा की एखादा पुरुष ४०व्या वर्षी जेथे पोहोचेल तेथे पोहोचायला स्त्रीला कदाचित जास्तीची दहा वर्षे लागतील. पण त्याच्या बदल्यात तिला मातृत्वाचे सुख पूर्ण उपभोगता येईल, पहिली एक-तीन वर्षे मुलाचा सहवास मिळेल, त्याच्याशी मातेचे उत्तम नाते तयार होईल, दोन संशोधन निबंध कमी लिहिले जातील. पण ही स्त्रीवर जबरदस्ती नाही आणि नसावी. जर तिला खूप लवकर पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्याच्या पुढे खूप उंच उडायचे असेल तर ‘स्काय इज लिमिट’ असा कुटुंबीयांचा विचार हवा. नवरा व सासर-माहेर यांनी अडथळा बनू नये.

मी स्वत:ही कालची स्त्रीतंत्रज्ञ-शास्त्रज्ञ आहे, आजचे बदल मला काय जाणवतात तर सुशिक्षित कुटुंबात मुलगा-मुलगी असा भेद केला जात नाही व मुलींना हवे ते व हवे तितके शिक्षण घेता येते. आजच्या स्त्रीला अधिक आत्मविश्वास, आर्थिक स्वातंत्र्य असून ती स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचा प्रयत्न करते. विज्ञान आणि तंत्रज्ञान अधिक प्रगत झाल्यामुळे आधीची जी कामे (उदा. पेट्रोलियम रिफायनरीमध्ये एक मोठे चाक हाताने फिरविणे) ज्याला खूप शारीरिक ताकद लागते अशी बहुसंख्य कामे संगणकाच्या साहाय्याने एक बटण दाबून होत असल्यामुळे, ते बटण दाबणारा हात स्त्री किंवा पुरुष कोणाचाही असू शकतो. स्त्रीची शारीरिक ताकद पुरुषापेक्षा कमी असते, मानसिक ताकद कदाचित जास्त असते, पण मानसिक व भावनात्मक विचारसारणी वेगळी असते. परंतु बुद्धीसाठी आणि आत्म्यासाठी स्त्री-पुरुष असा काही भेदभाव नाही. आहारशास्त्रामध्ये किशोरवयीन मुलींनी काय खावे, मातेने काय खावे अशी वेगळी पुस्तके आहेत किंवा मानसशास्त्रामध्ये ‘चाइल्ड सायकॉलॉजी, वुमन सायकॉलॉजी असे वेगवेगळे विभाग आहेत. परंतु बौद्धिक किंवा आध्यात्मिक पातळीवर कधी असा भेदभाव करणारी पुस्तके पाहिली आहेत का? ५० वर्र्षांपूर्वी कारखान्यामध्ये एखादे यंत्र चालविण्यासाठी उंचावर चढून, खूप जोर लावून कुठले तरी चाक फिरवा, व्हॉल्व्ह उघडा अशी ताकद लागणारी कामे होती परंतु आता संगणकाच्या मदतीनेच हे सगळे केले जाते, त्यामुळे तेथील तंत्रज्ञ आणि अभियंता स्त्री का पुरुष याने काहीही फरक पडत नाही. हे शक्य झाले आहे ते सामाजिक आणि वैज्ञानिक क्रांती आणि प्रगतीमुळे आणि म्हणूनच पुढील २०-३० वर्षांत स्त्री-पुरुष भेद कमी महत्त्वाचा ठरणार आहे.

रोजच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला तर सामान्यातील सामान्य माणसाचेसुद्धा जीवनमान सुधारेल, रोगराई कमी होईल व जगणे सोपे होईल. महिला दिनाच्या निमित्ताने मला वाचकाला अशी विनंती करायची आहे की तुम्ही यंत्रमानव व कृत्रिम बुद्धी (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) याविषयी थोडी माहिती वाचा. ज्या वेगाने कृत्रिम बुद्धीवर आधारित यंत्रमानव व संगणक बनत आहेत ते पाहता २०५० पर्यंत स्त्री विरुद्ध पुरुष ही तुलना मोडीत काढली जाईल आणि मानव विरुद्ध यंत्र ही तुलना करायची वेळ येईल!

dr.smita.lele@gmail.com