|| ज्ञानेश झोटिंग

जसजसा स्त्री कलावंत, तंत्रज्ञांचा सहभाग वाढतो आहे तसे पुरुष कलाकारांवर स्त्री जाणिवेप्रति संवेदनशील असण्याचे ‘पिअर प्रेशर’ वाढते आहे. त्यातून बरेचदा अहमहमिका, राजकारण, अप्रत्यक्ष शोषण होत असले तरी मोठय़ा प्रमाणात सकारात्मक आणि खुला स्त्री-पुरुष संवाद होतो आहे हे नक्की. बदलाचे वारे नक्कीच वाहू लागले आहेत. म्हणूनच या क्षेत्रातील सर्वच लोकांनी स्त्री-पुरुष समतोलाकडे अधिक सजगतेने पाहणे गरजेचे आहे.

चित्रपट/ दूरचित्रवाणी क्षेत्र हे खासगी असंघटीत क्षेत्र. इथे कुठलेही आरक्षण नाही, राखीव जागा नाहीत. जे मिळवायचं ते स्वत:च्या कलात्मक ताकदीवर! असे असूनही विलक्षण सर्जनशीलता आणि अमाप बुद्धिमत्ता असणाऱ्या कामसू कलाकाराला इथे योग्य संधी आणि काम मिळतेच असे नाही. त्यात ती व्यक्ती स्त्री असेल तर वाटचाल आणखी अवघडच. आपल्या देशातील इतर कुठल्याही खासगी क्षेत्राप्रमाणे ओळख पाळख, आर्थिक कुवत, सामाजिक स्तर, जात, लिंग, धर्म हे कळत नकळत तुम्हाला मिळणाऱ्या ‘संधी’च्या गणितात येतात. ही संधी देणारा ‘सत्ताधीश’ १०० पकी ९० वेळेस प्रस्थापित वर्ग-वर्णाचा पुरुष असतो. मध्यवर्ती भूमिका वठवणारा कलाकार, दिग्दर्शक, निर्माता, लेखक, संगीतकार, प्रमुख तंत्रज्ञ इत्यादी हा चित्रपट/ दूरचित्रवाणी क्षेत्रात ‘सत्ताधीश’ असतो. ज्याची लोकप्रियता अधिक, त्याची मिळकत अधिक, ज्याची मिळकत अधिक त्याची सत्ता मोठी असा साधा नियम!

भारतीय चित्रपट क्षेत्राचा जन्म ‘राजा हरिश्चंद्र (१९१३)’ या मूकचित्रपटापासून झाला असे म्हणतात. तेव्हापासून आजतागायत आधी चित्रपट, मग रेडिओ, पुढे दूरचित्रवाणी आणि अशात या सर्व आधुनिक माध्यमांत ‘मेजॉरिटी’ आणि ‘ऑथॉरिटी’ आहे ती पुरुषांची. सुरुवातीला ती फक्त उच्चभ्रू पुरुषांच्या ताब्यात होती. मग पुढे स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय पुरुष या क्षेत्रात सत्तारूढ होताना दिसू लागले. नवे शतक उजाडल्यानंतर गेल्या पंधरा वर्षांत माझ्यासारखे अनेक कनिष्ठ वर्ग-वर्णातले पुरुषही हे क्षेत्र मोठय़ा संख्येने पादाक्रांत करताना दिसत आहेत. थोडक्यात, आजघडीला थोडय़ाफार फरकाने सर्व आर्थिक, सामाजिक स्तरातल्या पुरुषांचे प्रतिनिधित्व मनोरंजन क्षेत्रात दिसते आहे हे नक्की.

स्त्रियांचा सहभाग या क्षेत्रात बऱ्यापकी उशिरानेच सुरू झाला असे म्हणता येईल. (पूर्वी चित्रपटात स्त्री भूमिकाही पुरुषच करत हे आपण सगळे जाणतोच.) साधारण १९३०-५० दरम्यान स्त्रियांचा या क्षेत्रात शिरकाव होण्यास सुरुवात झाली. पण त्यांच्या वाटय़ाला आले ते अधिकार/ सत्तेच्या दृष्टीने दुय्यम स्थान. चित्रपट/दूरचित्रवाणी माध्यमातला स्त्रीचा प्रमुख सहभाग हा उप-भूमिका वठवणारी नटी, गायिका, नर्तकी, या दुय्यम स्थानांपुरताच मर्यादित राहिला आणि तोच पुढे प्रघात बनला. अर्थात त्या त्या काळात काही अपवाद होते. नाही असे नाही. पण नियम मात्र तोच राहिला. जे कुटुंबात तेच या खासगी असंघटित क्षेत्रात.

वरील प्रघात आजही कायम असला तरी अनेक स्त्रिया आज मनोरंजन क्षेत्रात निर्णायक स्थानी पुरुषांच्या बरोबरीने पाय रोवताना दिसत आहेत. यात बहुतांश स्त्रियी शहरी, उच्चवर्णीय, उच्चभ्रू असल्या तरी भविष्यात हे बदलाचे वारे ग्रामीण, कनिष्ठ वर्ग-वर्णातल्या स्त्रियांपर्यंत झिरपेल अशी आशा आहे.

मराठी चित्रपट/ टीव्ही मलिका क्षेत्रापुरते बोलायचे झाल्यास आज इथे स्त्री व्यक्तिरेखा ठाशीव होत आहेत. स्वावलंबी, स्वतंत्र, प्रसंगी विद्रोही स्त्री व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर वारंवार येत आहेत. त्यामुळे रूढ पुरुषप्रधान संस्कृतीला जोरदार धक्के बसत आहेत. माहेरची साडी घालून चूल आणि मुल सांभाळणारी सोशिक रडूबाई नायिका आज बऱ्यापकी मागे पडलेली दिसते आहे. घराबाहेर पडून जगात मिसळणारी, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा असणारी, कुटुंबात स्वत:चा अवकाश मागणारी, स्वत:च्या लैंगिकतेबद्दल उघडपणे बोलणारी नायिका प्रामुख्याने मुख्यप्रवाहाच्या चित्रपट/मालिकेतून समोर येते आहे ही अभिनंदनीय बाब आहे.

वेबसीरिज सारख्या खुल्या आणि सेन्सॉरशिप मुक्त माध्यमात असे प्रयोग तर बेधडकपणे होत आहेत. पण खंत ही आहे की अशी स्त्रीविषयक भूमिका घेणाऱ्या आणि ती जाणीवपूर्वक अभिव्यक्त करणाऱ्या लेखिका संख्येने कमी आहेत. बहुतांश लेखिका या ‘जेंडर’ने जरी स्त्री असल्या तरी त्यांच्या लेखनातले स्त्री चित्रण हे कळत नकळत रूढ पुरुषसत्ताक अर्थानेच होते आहे. (एरवी ‘मी स्त्री-पुरुष समानता मानतो’ असं म्हणणारा पुरुष लेखकांकडूनही हे होते आहेच.) काही पुरोगामी प्रयत्न सोडल्यास दूरचित्रवाणी माध्यमात हे अधिक घडताना दिसते आहे. हिंदीतल्या एका मोठय़ा स्त्री निर्मातीनेच अशा डेली सोप्सच्या यशाचा पायंडा पडला हा त्यातला विरोधाभास आहे. अशा परिस्थितीत आशय विषय स्त्री विषयक असो वा नसो पण आपल्या लिखाणातून कळत नकळत रूढ पुरुषी संस्कृतीला, पुरुषप्रधानतेला  पाठिंबा मिळत नाहीये ना हे लेखक-लेखिकांनी पुन्हा पुन्हा तपासले पाहिजे.

अभिनेत्रींची संख्या आधीही भरपूर होती आताही भरपूर आहे. ग्राहकांना आकर्षति करणारी उपभोग्य वस्तू या रुपातच स्त्रीला सादर केले गेले. कधी मोहक रूप तर गोड गळा. आजही आयटम सॉग्स असू देत की न्यूड सिन परिस्थिती तीच आहे. बरं, हिरोईन हिरोईन करत ज्या ग्लॅमरस आणि सालस भूमिका मिळतात त्यातही अत्यंत उथळ चित्रण दिसते. उदाहरणार्थ ‘छह दिन लडकी इन’च्या फॉर्मुल्याला बळी पडणारी (एनआरआय?) तरुणी किंवा ‘ये जवानी है दिवानी’ म्हणत जगभर लफडी करत हिंडणाऱ्या तरुणाची लग्नासाठी वाट बघत बसलेली (व्यवसायाने डॉक्टर असलेली? ) प्रेयसी. म्हणजे नायिका वर वर जरी आधुनिक वाटत असल्या तरी त्यांची मांडणी पुरुषी अहंकाराला कुरवाळणारीच आहे. त्यात मध्यवर्ती स्त्री भूमिका असलेल्या चित्रपटांची संख्या आणखीनच कमी. शिवाय या मध्यवर्ती स्त्री भूमिका लिहिल्या जातात त्या पुरुषी पगडय़ातूनच. उदाहरणार्थ- सती जाणारी राणी पद्मावती. थोडक्यात, एकटय़ानेच परदेशात इंग्रजी शिक्षण घेणारी गृहिणी ‘शशी’ (इंग्लीशविग्लीश) किंवा बुलेटवर फिरणारी, जाती बाहेर प्रेम करण्याची धमक असलेली तरुणी ‘आर्ची’(सैराट) आजही दुर्मीळच!

काही आघाडीच्या नायिका मात्र अशा उथळ – उप भूमिका नाकारण्याची धमक असणाऱ्या आहेत. फक्त आकर्षक दिसणे, नाचगाणी करणे नाकरून या अभिनेत्री सकस मध्यवर्ती भूमिकेसाठी आग्रही आहेत हे दिसते. अशा मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, प्रिया बापट या लोकप्रिय नायिकांना मनस्विनी लता रवींद्र, इरावती कर्णिक, मधुगंधा कुलकर्णी, अदिती मोघे, शिल्पा कांबळे या अत्यंत संवेदनक्षम लेखिकांनी चितारलेल्या स्त्री व्यक्तिरेखांची जोड आणखी आणखी मिळायला हवी असे वाटते.

मराठी चित्रपट/ टीव्ही मलिका क्षेत्रात निर्मिती /दिग्दर्शन करणाऱ्या स्त्रियांची संख्या (काही सन्माननीय अपवाद वगळता) हिंदीच्या तुलनेने फार कमी आहे. गेल्या चार पाच वर्षांतले चित्रपट पाहता प्रतिमा जोशी हे एकच ‘नवे’ नाव मराठी स्त्री दिग्दर्शकांच्या यादीत समाविष्ट झालेले दिसते. कार्यकारी निर्मिती हा चित्रपट व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण विभाग हाताळणारी गार्गी कुलकर्णी, तन्मयी देव, अश्विनी परांजपे अशी तीन चारच नावे आज मराठीत आहेत. दूरचित्रवाहिन्यांमध्ये कार्यकारी निर्मातींची संख्या त्या मानाने अधिक आहे. पण  दूरचित्रवाहिन्यांचे प्रमुख मात्र प्रामुख्याने पुरुषच आहेत. दिग्दर्शन आणि निर्मिती ही कुठल्याही माध्यमात ‘कंटेंट’ची दशा आणि दिशा ठरवणारी सर्वात प्रबळ चाके आहेत. या दोन्ही चाकांचे स्टिअरिंग व्हील अधिकाअधिक स्त्रियांच्या हातात सातत्याने येईल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष सम-तोलाच्या दृष्टीने मोठा बदल घडायला सुरुवात होईल असे वाटते.

वेशभूषा, रंगभूषा, कला दिग्दर्शन अशा सुबक विभागात स्त्री सहभाग पूर्वीपासून दिसत असला तरी आजही छायाचित्रकार, संकलक, ध्वनी-रेखनकार, व्हीएफएक्स सुपरवायझर, संगीतकार, गीतकार, डीएल कलरिस्ट (दृश्य तंत्रज्ञ) इत्यादी हे सगळे प्रामुख्याने पुरुषच. स्त्री तंत्रज्ञांची संख्या संपूर्ण भारतातच पन्नाशीच्या आत असावी असा अंदाज आहे. मराठी चित्रपट/ मलिका क्षेत्रात तर दहाच्या आतच. त्यात काही विभागात एकही स्त्री आज कार्यरत नाही. परवाच कलाकार मित्र मत्रिणींच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर या विषयी चर्चा सुरू असताना आमच्या ध्यानात आले की आजच्याघडीला मराठी चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेली एकही मराठी स्त्री संगीतकार नाही. (एकच मराठी आडनावाची संगीतकार आहे पण ती हिंदीत काम करते.) एकही मराठमोळी ध्वनी-रेखनकार नाही. (केतकी चक्रदेव ही माझ्या माहितीत सध्या कार्यरत अशी एकमेव ध्वनी संकलक आहे) व्हीएफएक्स सुपरवायझर, डीएल कलरिस्ट (दृश्य तंत्रज्ञ) नाहीतच. हेतल देढिया ही भारतातली पहिली आणि एकमेव स्त्री (चित्रपटाची प्रमुख प्रकाश योजनाकार) सध्या कार्यरत आहे. चित्रपट/मलिका ही तंत्राधिष्ठित माध्यमं आहेत. त्यामुळे ही पोकळी भरून काढणे तातडीने आवश्यक आहे असे वाटते. या क्षेत्रातल्या मत्रिणी गप्पा मारताना म्हणतातही, ‘‘स्पॉटगर्ल पासून दिग्दíशका, प्रमुख अभिनेत्रीपर्यंत चित्रपटांची संपूर्ण टीम ही स्त्रियांची असेल तो दिवस दूर नाही. तेव्हाच ‘मी टू’ सारखे प्रकार कायमचे बंद होतील!’’ हे खरे आहे.

आता बोलूया पुरुष कलावंताविषयी. गेल्या एक दोन वर्षांत ‘गुलाबजाम’, ‘आनंदी गोपाळ’ हे दोन चारच मुख्य प्रवाहातले चित्रपट असे आहेत की ज्यांचे दिग्दर्शक हे पुरुष आहेत आणि ज्यात स्त्रीविषयक अभिव्यक्ती/ मध्यवर्ती स्त्री व्यक्तिरेखा जबाबदारीने मांडली गेली आहे. स्त्री जाणिवेचे विषय मांडू इच्छिणारी पुरुष लेखक/दिग्दर्शक/कलावंत मंडळी चित्रपट/मलिका क्षेत्रात नगण्यच. एक उदाहरण देतो. दोन वर्षांपूर्वी माझ्या एका लेखक मित्राला मुलगी झाली. या दोन वर्षांत स्त्रीविषयक जाणीव व्यक्तिगत पातळीवर येऊन त्याच्या रोजच्या जगण्याचा भाग झाली. त्याने माध्यमाचा विचार न करता ही जाणीव आपल्या टीव्ही मालिकेच्या एका भागात अभिव्यक्त करत वडील मुलीच्या नात्यातून मासिक पाळी सारखा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय मांडला. या लेखक मित्राला निर्माता आणि दूरचित्र वाहिनी प्रमुख (दोघेही पुरुष)यांचे पाठबळ मिळाले हे विशेष. पण अशी उदाहरणे हजारात एक!

अनेकदा स्त्री जाणिवेचे विषय निवडून त्याची मांडणी आणि चित्रण उथळ, भडक होतानासुद्धा दिसते आहे. यात पुरुष कलावंत आहेत तसे स्त्री कलावंत पण आहेत. विशेषत: वेब माध्यमात हे आताशा अधिक जाणवते आहे. अशाने मूळ हेतू जरी प्रामाणिक असला तरी मांडणी संवेदनशील नसल्याने एकंदरीत घोळ होतो आहे. याचाही विचार या निमित्ताने स्त्रीविषयक अभिव्यक्ती करणाऱ्या कलाकारांनी करावा असे वाटते.

जसा जसा स्त्री कलावंत, तंत्रज्ञांचा सहभाग वाढतो आहे तसे पुरुष कलाकारांवर स्त्री जाणिवेप्रति संवेदनशील असण्याचे ‘पिअर प्रेशर’ वाढते आहे. त्यातून बरेचदा अहमहिका, राजकारण, अप्रत्यक्ष शोषण होत असले तरी मोठय़ा प्रमाणात सकारात्मक आणि खुला स्त्री पुरुष संवाद होतो आहे हे नक्की. या खुल्या संवादात १८-३० वयोगटातील तरुण स्त्री पुरुष सर्वाधिक आहेत. आपण आपल्या वर्तनात कुठे संतुलन ढासळू देत नाही आहोत ना? असा चेक ‘मी टू’ सारख्या चळवळीमुळे सर्व पुरुषांवर राहतो आहे.

आजच्या तारखेला मनोरंजन क्षेत्र हे कुठल्याही देशातले सर्वात प्रभावी क्षेत्र आहे. त्या त्या देशाची सांस्कृतिक वाटचालच जणू मनोरंजन क्षेत्राच्या हातात आहे. म्हणून या क्षेत्रातल्या कलावंतानी स्त्री पुरुष सम-तोलाकडे आणखी सजग आणि जबाबदारपणे वाटचाल करणे जरुरी आहे असे वाटते.

maildpzoting@gmail.com