शैलजा तिवले

पहाडी धाडस आणि उत्फुल्ल ऊर्जा यांच्या संगमातून कठोर सामाजिक वास्तवाशी भिडणाऱ्या राज्यभरातून शोधलेल्या ‘आधुनिक दुर्गा’चा यथोचित सन्मान सोहळा २२ ऑक्टोबरला मुंबईत रंगला. स्त्रीच्या ठायी असलेल्या कर्तृत्व आणि दातृत्वाच्या दर्शनाने उपस्थित प्रत्येक रसिक नतमस्तक झाला. कला-साहित्याच्या कोंदणात सजलेल्या ‘लोकसत्ता दुर्गा’ सन्मान सोहळ्याच्या सहाव्या पर्वाचा हा संक्षिप्त वृत्तांत..

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान

आई, पत्नी, बहीण, मुलगी.. त्याही पलीकडे डॉक्टर, इंजिनीअर, उद्योजिका, समाजसेविका, राजकारणी, कलाकार..  स्त्रीची अशी अनेकानेक रूपं आहेत, त्यातली काही आपल्या अगदी परिचयातली, जवळची. पण त्यातल्याच काही जेव्हा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपल्या व्यक्तित्व आणि कर्तृत्वाच्या बळावर खणखणीतपणे उभ्या राहतात, नव्हे समाजासाठी नवी पायवाट तयार करतात तेव्हा त्यांच्याप्रति आदर व्यक्त करावासा वाटतो. या स्वतंत्र, कणखर कर्तृत्वाला मनस्वी सलाम करत त्याचा देखणा उत्सव साजरा करण्याचा क्षण यंदाही ‘लोकसत्ता दुर्गा’ पुरस्काराने प्रत्यक्षात आणला. स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून खुला अवकाश मिळतो तेव्हा ती विधायक कामाचा डोंगरच कसा उभा करते याचाच यानिमित्ताने प्रत्यय आला.

‘लोकसत्ता दुर्गा’चा हा ऊर्जेने सळसळता, प्रसन्न सन्मान सोहळा मंगळवार २२ ऑक्टोबरला मुंबईत दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात मोठय़ा उत्साहात पार पडला. अखंड संघर्ष, प्रवाहाविरोधात चालण्याची धमक, कडवा विरोध सहन करत परिवर्तन घडवण्याची शक्ती आणि मुख्य म्हणजे समाजातील वंचितांप्रति असणारी आत्मीयता असे अनेकविध गुण अंगी बाणवणाऱ्या दुर्गाचा यथोचित सन्मान या सोहळ्यात केला गेला. आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी विविध क्षेत्रांतील नामवंत, कर्तृत्ववान पुरुष आवर्जून उपस्थित होते हे विशेष..

समाजातील विविध सामाजिक समस्यांना भिडून काम करणाऱ्या कुण्याही व्यक्तीचा प्रवास अवघड असतोच. त्यातही ती स्त्री असली तर तिच्या वाटेत अधिकच खाचखळगे असतात. स्त्रियांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न होणे, तिच्या कामाची खिल्ली उडवली जाणे, प्रसंगी तिच्यावर थेट जीवघेणे हल्ले होणे, या घटना भारतातच नव्हे तर जगभरात घडलेल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. पुरुषप्रधान व्यवस्थेचं वर्चस्व झुगारत इतरही अनेक प्रकारची प्रतिकूलता हिमतीने परतवून लावत बदलासाठी सर्वस्व वेचणाऱ्या  आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय काम करणाऱ्या स्त्रियांच्या कामाचा वेध घेत त्याच्याशी यंदाच्या नऊ दुर्गाच्या कामाची यथोचित सांगड घालत हा कार्यक्रम उत्तरोत्तर बहरत गेला.

कार्यक्रमाची सुरेल सुरुवात मिताली विंचूरकर, मेघा राऊत आणि कौशिकी जोगळेकर यांच्या वादनाच्या जुगलबंदीने झाली. सगळा माहोल या दोन कलावंतांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध झालेला असतानाच प्रत्यक्ष सन्मान सोहळा सुरू झाला. ‘लोकसत्ता’ आयोजित ‘ग्रॅव्हिट्स फाऊंडेशन’ प्रस्तुत आणि ‘एनकेजीएसबी को-ऑप बँक लि.’ आणि ‘व्ही.पी.बेडेकर अ‍ॅण्ड सन्स’ सहप्रायोजित लोकसत्ता दुर्गा सन्मान सोहळ्याचे सहावे पर्व सर्वाथाने वेगळे ठरले. आपल्या कामामधून समाजामध्ये प्रेरणेची प्रकाशबीजं रोवणाऱ्या या दुर्गाचा सन्मान करण्याचा मान यावर्षी देण्यात आला वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत पुरुषांना. आजचा भारतीय समाज पुरुषप्रधान आहे यात शंका नाही. मात्र स्त्रियांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आदर करत त्यांना प्रोत्साहन देणारे, सर्वार्थाने त्यांच्या सोबत राहणारे पुरुषही या भवतालात नक्कीच आहेत. अशाच पुरुषांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सहा दिग्गजांच्या हस्ते या दुर्गाना सन्मानित करण्यात आलं. ‘पॉप्युलर प्रकाशन’चे संस्थापक आणि लेखक रामदास भटकळ, जे.जे. रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, कवी-नाटककार प्रेमानंद गज्वी, नाटककार व चित्रपट पटकथालेखक प्रशांत दळवी, कवी सौमित्र, अभिनेता सुमीत राघवन, या नामवंत पुरुषांच्या हस्ते यंदाच्या दुर्गाना गौरवण्यात आलं.

‘लोकसत्ता चतुरंग’ पुरवणीच्या संपादक आरती कदम यांनी या दुर्गाच्या शोधाचा प्रवास आपल्या प्रस्तावनेत उलगडला. कर्तृत्ववान स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आदर्श उभा करावा आणि त्यांनीही मदतीचे दीप लावून समाज उजळावा, हा या पुरस्कर सोहळ्याचा उद्देश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. वृत्तपत्रात केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आलेल्या साडेचारशेहूनही अधिक स्त्रियांच्या नामांकनातून नऊ जणींची निवड तीन-चार चाळणी फेऱ्यांनंतर करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां छाया दातार, ‘एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया’च्या मानद अध्यक्ष आणि लेखिका डॉ. मीना वैशंपायन आणि ‘राईट टू पी’ चळवळीच्या कार्यकर्त्यां सुप्रिया जान-सोनार यांची मदत झाली. यातील प्रत्येक दुर्गेचे कर्तृत्व आपल्या मनात आशेचा दीप जागवेल, अशीही इच्छा यावेळी आरती कदम यांनी व्यक्त केली.

हॉलीवूडमधील सुपरस्टार असलेल्या अँजेलिना जोली हिने केवळ माणुसकीच्या भावनेतून युद्धात होरपळलेल्या, शिक्षणापासून वंचित राहिलेल्या निर्वासित मुलांना हात दिला. अशाच प्रकारे समाजाने वाळीत टाकलेल्या एड्सग्रस्त मुलांच्या आई असलेल्या आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहायला मदत करणाऱ्या मंगलताई शहा यांचे कामही त्याच ताकदीचे आहे. त्यामुळेच त्या ‘लोकसत्ता’च्या दुर्गा ठरल्या.

पर्यावरण रक्षणासाठी ठामपणे उभी असलेली स्वीडनची ग्रेटा थनबर्ग सध्या जगाचं लक्ष वेधून घेत आहे. ‘आमच्या अंगावर पोकळ शब्द फेकून आमचं भवितव्य कुस्करण्याची तुमची हिंमत तरी कशी होते?’ असा थेट प्रश्न राजकारण्यांना विचारणाऱ्या ग्रेटाचीच आठवण करून देणारं काम आहे कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचं. नदीतल्या वाळूचा अवैध उपसा करून तिथली जैवविविधता, पर्यावरण धोक्यात आणणाऱ्या वाळूमाफियांवर कारवाई करणाऱ्या, धडक कारवायांनंतर मिळणाऱ्या धमक्या जिवावर बेतत असतानाही मागे न हटता उलट नव्या जोमानं इतरही अनेक रचनात्मक कामं करणाऱ्या शिल्पा ठोकडे यांनाही ‘लोकसत्ता दुर्गा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मलेशिया या मुस्लीमबहुल देशात स्त्रियांनी कुस्ती खेळणं म्हणजे आक्रितच. अशा परिस्थितीत नूर फिनिक्स डायना हिजाब घालून कुस्ती खेळली, परंतु तिने हार मानली नाही. याच जिद्दीने रुपाली रेपाळे-हिंगे हिने जलतरणात जागतिक पातळीवर भारताची मुद्रा उमटवली.  सोबतच आता स्वत:च्या अकादमीच्या माध्यमातून नवे खेळाडू घडवण्यासाठीही प्रयत्न करणारी रुपाली ही आणखी एक दुर्गा. या तिघींनाही ‘पॉप्युलर प्रकाशन’चे संस्थापक रामदास भटकळ आणि नाटककार प्रशांत दळवी यांनी सन्मानित केलं.

सोहळा उत्तरोत्तर रंगत असतानाच कवी सौमित्र यांनी त्यांच्या खास लोकप्रिय शैलीत कविता सादर करत स्त्रीच्या अनेकविध रूपांचे पदर उलगडले. स्वत:च्या आशयघन कवितांसह समकालीन कवी अशोक कोतवाल, किरण येले, प्रदीप निफाडकर या कवींच्या त्यांनीसादर केलेल्या रचनांमधील स्त्रीरूपांनी सगळ्यांच्या ओठांवर ‘वाहवा’ची दाद आणली.

‘बिल अण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’च्या माध्यमातून जगभरातल्या महत्त्वाच्या सामाजिक संस्थांना आर्थिक पाठबळ देऊन काम करण्याचं प्रोत्साहन मेलिंडा गेट्स यांनी दिलं. ‘देणे समाजाचे’ या उपक्रमातून अशाच प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना विविध सामाजिक संस्थांशी जोडले ते दुर्गा वीणा गोखले यांनी. कोटय़वधी रुपयांचं दान सत्पात्री पडण्याचा उदात्त आनंद वीणा यांनी आजवर हजारो दात्यांना दिला आहे.

मध्य आणि पूर्व युरोपात बाललैंगिक शोषण रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या जॉर्जेट मुल्हेर या अनाथ मुलांना अनाथगृहाशिवाय वेगळा पर्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कामाची नोंद घेण्यात आली असून अशाच रीतीने ‘ज्ञानदेवी’ संस्थेच्या माध्यमातून डॉ.अनुराधा सहस्रबुद्धे या मुलांना त्यांचे हरवलेले बालपण देण्यासाठी नि:स्पृह प्रयत्न करत आहेत. त्यासाठी दुर्गेचा सार्थ मान अनुराधाताईंना मिळाला.

आदिवासींचा बुलंद आवाज असणाऱ्या झारखंडच्या दयामणी बिर्ला. झारखंडमधील आदिवासी गावांना विस्थापित करून स्टीलचा कारखाना उभारण्याचा कट त्यांनी चळवळ उभारत उधळून लावला. दयामणींप्रमाणेच अविरत संघर्ष करत मेळघाटातील आदिवासींच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या

डॉ. कविता सातव या एक दुर्गा. आदिवासी समाजात आरोग्यसाक्षरता रुजवण्यासाठीचे त्यांचे भगीरथ प्रयत्न यशस्वी झालेत ते असंख्य अडचणींच्या अनवट वाटा चालून झाल्यावर. कविताताईंना जे. जे. रुग्णालयातील नेत्ररोगतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, अभिनेता-कवी किशोर कदम, अर्थात सौमित्र यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.

सोहळ्याच्या या उत्साहाला नाशिकच्या सुरश्री, गौरी, ईश्वरी आणि अश्विनी या दसक्कर भगिनींनी कोणत्याही वाद्याविना गायलेल्या ‘सुन्या सुन्या मफिलीत,’ ‘असा बेभान हा वारा,’ आणि ‘किसी के मुस्कुराहटों पे हो निसार’ या गाण्यांनी बहार आणली.

अंध किंवा अक्षम व्यक्तींच्या अधिकारांसाठी लढणारी त्रिवेंद्रमची टिफनी ब्रार हिच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. त्याच निर्मळ जिद्दीने विशेष मुलांसाठी घरकुल उभारून त्यांना खंबीर पाठबळ देणाऱ्या नंदिनी बर्वे ठरल्या आहेत यंदाच्या दुर्गा. स्वत:चं दु:ख मोठं न मानता इतर अनेक समदु:खी व्यक्तींच्या दु:खावर फुंकर घालण्यात कार्यमग्न असलेल्या बर्वे दाम्पत्याचं काम अनेकांना स्पर्शून गेलं.

शिक्षणासाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या आफ्रिका खंडातील सुदानच्या मर्सी अकुट यांनी जवळच्या काकांकडूनच होणाऱ्या लैंगिक अत्याचारांपासून सुटका करून वकील होण्याचं स्वप्न पुरं केलं आहे. स्त्रियांचे हक्क, बाललैंगिक शोषण याच्या जनजागृतीसाठी त्या धडपडत आहेत. अशाच प्रकारे अत्याचारग्रस्त मुलांना शारीरिक आणि मानसिक वेदनेतून बाहेर काढण्याचे अविरत प्रयत्न करत आहेत दुर्गा बालशल्यविशारद डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले. भीषण अत्याचारांना बळी पडलेल्या बालकांवर अत्यंत कौशल्यानं शस्त्रक्रिया करत त्यांच्या भविष्यात उमेद पेरण्याचं काम त्या दीर्घकाळापासून करत आल्यात.

स्वत:च्या हक्कासाठी थेट अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांना जाब विचारणारी मुलगी म्हणजे अमारीयन्ना मारी कोपनी. समाजमाध्यमांच्या मदतीने सामाजिक प्रश्नांविरोधात लढण्याची चळवळ तिने उभी केली. अमारीयन्नाप्रमाणेच समाजासाठी लढण्याची शक्ती आहे दुर्गा

अ‍ॅड. रंजना गवांदे यांच्यात. स्थानिक पातळीवरील अनेक आव्हानं पेलून त्या ‘अंधश्रद्धा निमूर्लन समिती’च्या माध्यमातून त्या सहकाऱ्यांना सोबत घेत सामाजिक परिवर्तनाचा यशस्वी लढा देत आहेत. या तीनही दुर्गाचा सत्कार कवी, लेखक प्रेमानंद गज्वी, अभिनेता सुमीत राघवन यांच्या हस्ते करण्यात आला.

दुर्गाची विविध रूपे समोर येत असतानाच संत तुकाराम महाराजांची पत्नी आवली आणि रखुमाई यांच्यातील मोहक नात्याचं मुग्ध दर्शन रसिकांना घडलं ते ‘संगीत देवबाभळी’ नाटकातील एका प्रसंगातून. मानसी जोशी यांनी सादर केलेला हा प्रवेश जणू दैवी अनुभूती देऊन गेला.

या सन्मान सोहळ्याची उंची अधिकच वाढवणारा पुरस्कार म्हणजे ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार.’ यावर्षीच्या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरां चड्ढा-बोरवणकर. या पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट करताना ‘दै. लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी बोरवणकर यांच्यातील खाकी वर्दीतला मानवी चेहरा मोजक्या शब्दांतून उपस्थितांसमोर ठेवला. बोरवणकर या खात्यामध्ये कार्यरत असताना याकूब मेननला फाशी देण्यासह अनेक महत्त्वाची कर्तव्यं त्यांनी खंबीरपणे बजावली. पण त्यानंतर मेननच्या बहिणीला कागदपत्रांसह इतर बाबींमध्ये येणाऱ्या अडचणींमध्ये मदत करण्याची संवेदनशीलता त्यांनी ‘डय़ूटी’ पलीकडे जात दाखवली. खाकी वर्दीतल्या या माणूसपणासाठी हा जीवनगौरव पुरस्कार, अशी भावना गिरीश कुबेर यांनी यावेळी व्यक्त केली.

सन्मानित करण्यात आलेल्या यंदाच्या लोकसत्ता दुर्गा आणि ‘ग्रॅव्हिट्स फाऊंडेशन’च्या उषा काकडे यांच्या हस्ते मीरा चड्ढा-बोरवणकर यांना ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. बोरवणकर यांनी यावेळी अत्यंत हृद्य मनोगत व्यक्त केलं. पोलिसांच्या पत्नीने त्यांना दिलेल्या खंबीर पाठिंब्यामुळेच त्या खात्यामध्ये कार्यरत असताना आलेल्या अडचणींवर मात करू शकलो, असं मत व्यक्त करत बोरवणकर यांनी हा पुरस्कार पोलिसांच्या पत्नींना समर्पित केल्याचं जाहीर केलं.

अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी या कार्यक्रमाचं नेटकं सूत्रसंचालन केलं. कार्यक्रमाचं आशयघन संहितालेखन चिन्मय पाटणकर यांनी केलं होतं. नवदुर्गाच्या कामाची झलक दाखविणाऱ्या ध्वनिचित्रफितीचं लेखन केलं होतं

आरती कदम आणि शर्मिष्ठा भोसले यांनी आणि ते आपल्या आवाजाच्या ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहचवलं मकरंद पाटील यांनी. हा सोहळा अनुभवण्यासाठी जाणत्या रसिकांनी भरगच्च गर्दी केली होती. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कामाला दाद तर दिलीच, शिवाय कार्यक्रम संपल्यानंतरही दुर्गाची भेट घेऊन कौतुकाची भरभरून थाप दिली.

समाजात अंधार आहे, प्रश्न, नकारात्मकता आणि सोबतच येणारी निराशा हे वास्तव आहेच. मात्र ही सगळी काजळी आपापल्या छोटय़ा पण मोलाच्या प्रयत्नांनी दूर करत सगळ्यांचा ‘उद्या’ उजळ करणारी प्रकाशबीजं तितकीच वास्तव आहेत. या सुंदर सत्याचा उत्सव म्हणजे, ‘लोकसत्ता दुर्गा.’ हा विधायक विचार ठळक करत सोहळा संपला, नव्हे एक विधायक सुरुवात मनामनांत पेरून गेला.

shailaja.tiwale@expressindia.com

chaturang@expressindia.com