डॉ. हिम्मतराव बावस्कर 

‘‘उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात दाखल होण्याचा काळ हा तरुणांसाठी फार उत्साहाचा असतो. तसाच मीही वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालो होतो. पण माझ्यातले न्यूनगंड, आजूबाजूचं वातावरण यांनी मला पुरतं निराश के लं. मी नैराश्यानं वेढला गेलो, पण काही काळानं पुन्हा निश्चयानं उभादेखील राहिलो. मी जाणीवपूर्वक ग्रामीण, गरीब भाग निवडला आणि वैद्यकीय सेवा द्यायला सुरुवात केली. विंचूदंशाचे रुग्ण माझ्याकडे येऊ लागले. मृत्यूचं प्रमाण मोठं होतं आणि त्यावर इलाजही नव्हता. मी अहोरात्र मेहनत घेत संशोधन सुरू केलं आणि त्याचं उत्तर मला सापडलं. आज आपल्याकडचं विंचूदंशानं मरण्याचं प्रमाण शून्य झालं आहे. या काळात मी वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू शकलो नाही. पण लोकांच्या वेदनेवर उपाय शोधू शकलो, याचा आनंद आहे. परिस्थितीशी झगडून पुढे येत, नैराश्याची राख बाजूला करत उमेदीचा वटवृक्ष बहराला लागला तो माझ्या पंचविशीतच.’’ सांगताहेत विंचूदंश आणि सर्पदंश उपचारांमधील तज्ज्ञ व प्रसिद्ध संशोधक डॉ. हिम्मतराव बावस्कर.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Gukesh Youngest Ever To Win Candidates Tournament
लहानाचे मोठेपण..
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
1 to 7 April 2024 Weekly Horoscope
७ एप्रिलपर्यंत लक्ष्मी नारायणासह ३ राजयोग बनल्याने कर्क- कन्यासह ‘या’ राशी जगतील अच्छे दिन, १२ राशींचे भविष्य वाचा

आज माझं वय ७० वर्ष आहे. तरीदेखील बालपणातील आणि तरुण वयातील सर्व काही माझ्या स्मरणात आहे. एकदम ‘गद्धेपंचविशी’च्या काळाविषयी बोलण्याआधी त्यापूर्वीची पार्श्वभूमी सांगणं मला आवश्यक वाटतं. आजही मागे वळून पाहाताना ‘तो मीच का?,’ असं वाटतं. याचं कारण  इतर मुलांना जसं बालपण मिळतं तसं बालपण मला मिळालंच नाही.  मी घरात भावंडांच्यात पाचवा. शेतकऱ्याच्या घरात आजसुद्धा सर्वात मोठय़ा मुलाला प्रेम, मान आणि सर्व काही दिलं जातं. कारण तोच               आई-वडिलांना शेवटी अग्नी  देतो. त्यामुळे मी लहानपणापासून घरात तसा दुर्लक्षितच राहिलो. मुलगा जन्मला  म्हणजे एक कामगारच जन्मला अशी त्या वेळेस भावना होती.

लहानपणापासूनच आई मला शेतात नेत असे. वयाच्या पाचव्या वर्षांपासून शेतात काम करू लागलो आणि मला ते आवडूही लागलं.  गावात कोणीही सुशिक्षित नव्हतं. साधी स्वाक्षरीही लोकांना करता येत नव्हती. म्हणून सरकारतर्फे  देवळाच्या पारावर  प्रौढ स्त्री-पुरुषांसाठी रात्रशाळा भरत असे. मी तिथे जाऊन बसत असे. गावात लहान मुलांसाठी गावातलाच शिक्षक होता, जो फक्त अक्षरं आणि पाढे शिकवत असे. या  शाळेत माझं  नाव घातलं होतं. आमचं कुटुंब म्हणजे पाच बहिणी, दोन भाऊ, आई-वडील आणि आजोबा. स्वत:ची जमीन फक्त ७  बिघा. त्यात कुटुंबाचा खर्च भागत नव्हता म्हणून आम्ही देहेड येथील एका ब्राह्मण काकांची २० बिघा जमीन कसत असू. ही ब्राह्मण मंडळी जालना येथे राहात. त्या जमिनीचा वर्षांचा हिशोब देण्यासाठी एप्रिल महिन्यात माझे वडील त्यांच्याकडे जात. १९५७ ची गोष्ट. वडील हिशोब देण्यास तेथे गेले होते.  दुपारचे तीन वाजले होते. वडिलांबरोबर गावातील दोघेजण होते. हिशोब दिल्यानंतर वडिलांनी, ‘‘आम्हास भूक लागली आहे, कृपया जेवण द्या,’’ असं सांगितलं. त्या काळात हॉटेलात जेवण मिळत नसे आणि वडील माळकरी असल्यामुळे हॉटेलमध्ये जाणं टाळत. काकांनी जेवण दिलं ते स्टीलच्या ताट-वाटय़ांमध्ये. आणि चपाती, भात, कोशिंबीर, भाजी, वगैरे सगळं होतं. ते बघून माझे वडील खूपच  खूश  झाले. त्यांनी विचारलं, ‘‘काका, आम्ही शेतात मरमर रात्रंदिवस काबाडकष्ट करतो पण असं जेवण मिळत नाही. आपणास हे कसं शक्य आहे?’’  काकांनी उत्तर दिलं, की हे फक्त शिक्षणानं आणि नोकरीनं शक्य आहे. त्याच क्षणी वडिलांनी निर्णय घेतला, की आपल्या मुलांनी शिकणं फार गरजेचं आहे आणि तिथेच कुटुंबाची दिशा बदलली. वडिलांनी त्याच क्षणी निर्णय घेतला आणि तो त्यांना सांगूनही  टाकला, की मी यापुढे शेती करणार  नाही.

माझे वडील अशिक्षित होते तरीदेखील त्यांच्या मते, मराठवाडय़ातील शिक्षण फारसं उपयोगी पडणारं नव्हतं. मग आमचं कु टुंब विदर्भात बुलढाणा जिल्ह्य़ातील दुधा या गावी गेलं.  वडीलबंधूचं बुलढाण्यातील शिक्षण पूर्ण झाल्यावर ते अमरावतीत पुढील शिक्षणासाठी गेले. आई-वडिलांनी बुलढाणा सोडण्याचा निर्णय घेतला आणि सातवी पास झालेल्या आणि सुरुवातीला शिक्षणात फारसा रस न दाखवणाऱ्या मलाही गावाकडे  नेण्याचं ठरवलं. ‘याला  शेतीत काढू,’ असा निर्णय  झाला. मी  रडू लागलो आणि मलाही दादासारखं शिकायचं आहे म्हणून हट्ट करू लागलो. माझं कोणीही ऐकत नव्हतं. शेवटी मी वडीलबंधूस विनंती केली आणि मी ८ वी ते ११ वीपर्यंत बुलढाण्यात सीताराम मंदिरातच राहिलो. तेथील मंदिराची साफसफाई करणं, देवपूजा करणं, भजन गाणं, रामरक्षा, हनुमान चालिसा पाठ करणं, हे मी करत होतो. सकाळी ८ ते ११.३० पर्यंत देवळातल्या महाराजांचं पुस्तकांचं दुकान सांभाळणं, शनिवार-रविवार बाजार करणं, वगैरे. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी जाणं जमत नव्हतं आणि मीही विचारत नव्हतो. कारण पुढच्या वर्षी महाराज ठेवतील की नाही याचा भरोसा नव्हता, त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय जाणं शक्य नव्हतं. सुटीत बस स्टँडवर  पंचांग, माधव डायरी, भाग्योदय कॅलेंडर  विकत असे. अकरावीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर खामगाव येथे वैद्यकीय प्रवेश परीक्षेत ७४ टक्के  गुण मिळाले. नागपूर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकत होता. फक्त ४०० रुपये प्रवेश फी होती, पण तीही भरणं शक्य नव्हतं. मग मी बुलढाण्याच्या प्राचार्याना भेटून प्रवेशासाठीची आलेली तार दाखवली. त्यांनी मला ४०० रुपये दिले. मला खूप आनंद झाला आणि मी ठरवलं, की नोकरीच्या पहिल्या पगारातून त्यांचे पैसे परत करीन. तो निश्चय मी पुढे पूर्णही केला. हे सर्व सांगण्याचं कारण हे, की ऐन तारुण्यात मी ज्या वातावरणातून वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालो होतो ते माझ्याबरोबर तिथे शिकणाऱ्या इतर मुलांपेक्षा खूप वेगळं होतं.

‘एम.बी.बी.एस.’च्या पहिल्या वर्षांत मी एकलकोंडा झालो होतो. बरोबर सगळी सुशिक्षितांची मुलं. कॉलेजच्या पहिल्या दिवशी त्यांचे पालक कौतुकानं बरोबर आले होते. माझ्या आईवडिलांना त्यातलं काहीही समजत नव्हतं. मेडिकलच्या दुसऱ्या वर्षी खूपच अभ्यास असतो. मोठी जाडजाड पुस्तकं बघूनच मी हादरलो होतो आणि लहानपणापासूनच ‘अभ्यास’ म्हणजे पुस्तकातील सर्व येणं, ही माझी मनोभावना होती. ते शक्य नव्हतं. त्यामुळे नकारात्मक विचार मनात येऊ लागले. त्या वेळी जगप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. के. डी. शर्मा यांचं नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये आगमन  झालं. त्यांच्या तासाचं पहिलं वाक्यं होतं, ‘पॅथॉलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र) ही वैद्यकीय शास्त्राची जननी आहे.’ ते मला खूपच भावलं आणि पॅथॉलॉजी मनापासून समजून  घेण्याचं मी ठरवलं. परीक्षेत शर्मा सरांनी मला रक्ताच्या ‘स्लाइड’वरून ते रक्त पुरुषाचं की स्त्रीचं हे कसं ओळखायचं हे विचारलं. मी ताबडतोब ओळखून दाखवलं. ते इतके  खूश झाले की मी त्यांचा आवडता विद्यार्थी झालो. मीही असाच पॅथॉलॉजिस्ट होईन असं वाटू लागलं. डॉक्टर  झाल्यानंतर  संशोधन करीन, गरिबांची सेवा करीन, असं म्हणून मी प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरी सुरू केली, कारण तिथे येणारा रुग्ण गरीब असतो. दोन वर्षांतच माझं संशोधन ‘लॅन्सेंट’ या जगप्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झालं. मी माझं प्रसिद्ध झालेलं संशोधन शर्मा सरांना दाखवलं. त्यांचा खूश झालेला चेहरा बघून संशोधनाला जगात किती मान आहे हे माझ्या मनात  खोलवर रुजलं. मला संशोधनच करायचं आहे आणि तेही  ग्रामीण जनतेसाठी आणि ग्रामीण भागातच राहून करायचं आहे, हे मी ठरवलं. ते आतापर्यंत  करतच आहे.

शर्मा सरांनी ‘एम.डी.’साठी  माझं नाव सरकारला कळवलं. ‘या मुलात संशोधनाचा स्पार्क आहे, त्याचा देशासाठी उपयोग करून घ्यावा,’ असं त्यांनी नमूद केलं आणि त्वरित माझी नेमणूक बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात झाली. त्या वेळी आमची २० मुलांची बॅच होती. त्यात मी आणि माझा बारामतीचा मित्रच फक्त खेडय़ातून आलो होतो. आमची रांगडी भाषा ऐकून ती मंडळी आम्हा दोघांना ‘हे बैल कोठून आले!’ असं चिडवायची. पण आम्ही ते सकारात्मकतेनं घेतलं. बैल जसे शेतात कष्ट करतात तसेच कष्ट आपण अभ्यासात करू, असं ठरवलं आणि आम्ही उत्तीर्ण झालोही. मला शहराचं आकर्षण नव्हतं. मी शर्मा सरांना भेटलो. त्यांनी मला कोकणात परतण्यास आणि विंचू आणि सर्पदंशावर संशोधन करण्यास सुचवलं. मी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात हजर झालो. पोलादपूरला रुजू झाल्यावर सरांचे शब्द माझ्या कानात सतत होते, ते म्हणजे ‘संशोधनानं जगात सन्मान आणि नाव होतं. कितीही पैसे कमावल्यानं ते होत नाही.’ हे  मी आयुष्यभर अमलात आणतो आहे.

इथे ‘एम.बी.बी.एस’ला प्रवेश घेतल्यानंतरची थोडी परिस्थिती सांगणं पुढच्या अनेक संदर्भाच्या दृष्टीनं मला आवश्यक वाटतं. एम.बी.बी.एस.ला गेल्यावर आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मी एकटा पडलो आणि पुस्तकी किडा झालो. कॉलेजमधील वातावरण आणि माझ्यातल्या न्यूनगंडामुळे माझ्या मनावर परिणाम होऊन मला नैराश्य आलं, हळूहळू स्मरणशक्ती कमी झाली. मी अक्षरश: एकलकोंडा झालो, कॉलेजला जाणं बंद केलं, सतत आत्महत्या करण्याचे विचार मनात येत. स्वत:ला सांभाळणं कठीण झालं. कॉलेजात ‘बावस्कर  सायकिक  झाला आहे,’ असं बोललं जाऊ लागलं. माझ्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन बदलला होता. मला कोणी समजून घेत नव्हतं. जवळचे मित्रदेखील माझ्यापासून दूर झाले. १९७३ मध्ये द्वितीय वर्षांची परीक्षा न देता मी घरी परतलो. माझी परिस्थिती आईच्या लक्षात आली. ‘‘अभ्यासामुळे याच्या डोक्याचं खोकं झालं. इतका भारी कोर्स देऊन याला परदेशात का पाठवायचं?’’ असं म्हणून ती भावाला दोष देत असे.  पण मला मात्र नेहमी म्हणायची, की तू हमखास बरा होशील! आईची बरोबरी जगात कोणीच करू शकत नाही. माझ्या आईचं रसायनच वेगळं आहे. हीच आई मला जन्मोजन्मी मिळो अशी मी रोज प्रार्थना करतो. तिनं मला रोज शेतात न्यायला सुरुवात केली. मीही शेतात लागेल ते काम करत खूप कष्ट उपसत होतो. मी घरी गेल्याच्या सुरुवातीच्या काळात मला झोप येत नसे. पण नंतर नंतर दिवसभर शेतात घाम गळेपर्यंत कष्ट केल्यामुळे शरीर अतिशय थकून जात असे आणि त्यामुळे झोप लवकर येऊ लागली. कष्ट आणि व्यायामामुळे शरीरातील पेशींत साठलेले ‘फ्री रॅडिकल्स’, नाशिवंत जमा झालेली रसायनं नष्ट होतात, मेंदूतील ‘सेरोटोनिन’, ‘डोपामिन’ रसायनं वाढतात आणि नैराश्य कमी होतं. माझ्या आईच्या या प्रयत्नांमुळे ‘काळ्या आई’नं मला नैराश्यातून बाहेर काढलं. १९७५ वर्ष उजाडलं तेच नवी उमेद घेऊन. मी पूर्ण बरा झालो होतो.

मी डॉक्टर झालो. मला ‘सेकंड हायेस्ट’ गुण मिळाले. नागपूरला नोकरी मिळत होती. पण मला तेथे राहायचं नव्हतं. २३ ऑगस्ट १९७६ ला मला बिरवाडीच्या प्राथमिक आरोग्य कें द्रात नोकरी मिळाली आणि मी लगेच हजर झालो. प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिस्थिती अतिशय  वाईट होती. मी ठरवलं, की हा दवाखाना गोरगरिबांचा आहे आणि त्यांना पुरेपूर  सेवा देणं माझं आद्य कर्तव्य आहे. मी विनामूल्य सेवा देणं सुरू केलं, कारण तेथे काहीच मोफत मिळत नसे.  काम करत असताना लक्षात आलं की तेथे विंचूदंशानं मृत्यूचं प्रमाण ३० ते ४० टक्के  होतं. तिथला लाल रंगाचा विंचू जहाल विषारी असतो, असं मला सांगण्यात आलं आणि त्यावर तेव्हा काहीच इलाज नव्हता.  मी रात्रंदिवस विंचूदंशाचे रुग्ण भरती करू लागलो. दंशामुळे रक्तातील ‘कॅटेकोलामिन’चं प्रमाण वाढतं आणि रुग्णाचा रक्तदाब व हृदयाचे ठोके कमी-जास्त होतात, हृदय कमकुवत होतं, ‘पल्मोनरी एडिमा’ (फुप्फुसांत पाणी भरून श्वास न घेता येणं) होतो आणि रुग्ण दगावतो. हे निकामी हृदय पारंपरिक औषधाला दाद देत नाही. रुग्णाच्या शरीरावर दंशाचे परिणाम आणि लक्षणं हे माझे प्रबंध ‘लॅन्सेंट’मध्ये १९७८ आणि १९८२ मध्ये प्रसिद्ध झाले. या काळात मी सर्वस्व  विसरून संशोधन  करत होतो. ते वर्ष होतं १९८३. याच काळात माझे वडील दगावले. त्याची मला तार आली. पण एक ८ वर्षांचा मुलगा विंचूदंशानं अत्यवस्थ अवस्थेत भरती झालेला होता. मी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानली आणि वडिलांच्या अंत्यदर्शनास गेलो नाही.

त्यानंतर ‘बी.जे. वैद्यकीय महाविद्यालया’तून ‘एम.डी.’ केलं. दरम्यान माझं लग्न डॉ. प्रमोदिनीशी झालं आणि आम्ही दोघं पुन्हा कोकणात ग्रामीण रुग्णालयात पोलादपूरला हजर झालो. विंचूदंशावर संशोधन सुरू केलं आणि ‘प्राझोसिन अल्फा ब्लॉकर’ हे औषध वापरून यातील मृत्यूचं प्रमाण ४ टक्क्यांवर आलं. हा डेटा १९८६ मध्ये ‘लॅन्सेंट’मध्ये प्रकाशित  झाला. प्राझोसिन हे औषध ब्राझील, सौदी अरेबिया, इस्त्रायल, पेरू , त्रिनिदाद आणि इतर देशांत वापरणं सुरू झालं आणि तिथल्या संशोधकांचाही अनुभव भारतासारखाच होता. तिथेही मृत्यूंचं प्रमाण कमी झाल्याचं दिसलं. ग्रामीण भागात काहीच सुविधा नसल्यानं मी केलेल्या मूलभूत संशोधनाची वाहवा झाली. मला ‘सिबा फाउंडेशन’- लंडन  आणि मोरोक्को  येथे भाषणं देण्यासाठी निमंत्रित केलं गेलं. नंतर विंचूदंशावरील प्रतिलस ‘हाफकिन’नं तयार  केली. विंचूदंशानं  होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण आता शून्य टक्के  झालं आहे.

डॉ. प्रमोदिनीनं माझ्या संशोधनास फार मोठा हातभार लावला. आम्ही दोघंही नि:स्वार्थ वृत्तीनं या रुग्णांवर उपचार करत होतो. विचूदंशावर माझं संशोधन सुरूअसताना प्रमोदिनी रात्रंदिवस रुग्णांच्या बाजूला बसून त्याच्यावर औषधाचा होणाऱ्या परिणामांचा डेटा तयार करत असे, नोंदी ठेवत असे. भरती असलेल्या रुग्णास तिनं रात्री १२ वाजताही गरम जेवण करून दिलं आहे. हे गरीब रुग्ण असल्यानं त्यांच्याकडून पाहिजे तसा मोबदला कधी मिळाला नाही. मी तशी अपेक्षा केली नाही आणि  तिनंही एका शब्दानंही मला दुखावलं नाही. माझ्या  संशोधनात प्रोत्साहन देऊन उलट कायमच मोलाचा हातच दिला. तिच्यासारखी जोडीदार योग्य वेळी माझ्या आयुष्यात आल्यानंच मी हे संशोधन त्रासाविना करू शकलो. तिच्याबरोबरच आमची दोन मुलं पराग आणि पंकज यांचाही आमच्या संशोधनात मोलाचा वाटा आहे. त्यांनी कधीही कसलाही हट्ट केला नाही, उलट मदतच केली. आम्ही नवीन डॉक्टरांसाठी ‘मेडिसिन टेक्स्ट बुक’मध्ये पूर्ण पाठ लिहिला आहे. विंचूदंशावर पुस्तक प्रकाशित केलं आहे. वडील अशिक्षित होते, परंतु त्यांची शिक्षणाची ओढ लक्षात घेऊन सगळे त्यांना ‘बॅरिस्टर’ म्हणत. त्यावरून लिहिलेलं माझं ‘बॅरिस्टरचं कार्ट’ हे पुस्तक मराठी व इंग्रजीत प्रकाशित झालं आहे.

आमच्या आजवरच्या संशोधनाला अनेकांचं सहकार्य लाभलं आहे आणि त्यांचा मी कायम ऋणी राहीन. आमची सामाजिक संस्था नाही वा ट्रस्टही नाही. कोणत्याही संस्थांची मदत आम्ही घेत नाही. दरवर्षी एक ते दीड  लाख रुपये संशोधनावर  खर्च करतो.

माझं बालपण करपून गेलं, ऐन उमेदीत नैराश्य आलं होतं, पण मी हरलो नाही. ईश्वरानं दिलेला प्रत्येक क्षण आरोग्य समस्या आणि संशोधन यांसाठी वापरला आणि शेवटपर्यंत हेच करणार आहे. ज्यामुळे जीवनाची राख झाली होती, त्या राखेतच वटवृक्षाची बीजं रोवली गेली. तो वटवृक्ष आता सर्वाना छाया देत आहे, हीच माझ्या दृष्टीनं जमेची बाजू आहे.

himmatbawaskar@rediffmail.com