संपदा वागळे यांचा ‘विस्तारल्या कुटुंब कक्षा’ हा लेख (१५ मे) वाचला आणि मला माझ्या विमल आत्याची आठवण झाली. ती, तिचे पती आणि तीन मुलं असा संसार होता. परिस्थिती बेताचीच. निम्न मध्मवर्गीय. पती टेलिफोनमध्ये नोकरीला, ती स्वत: प्राथमिक शिक्षिका. असं असूनही तिच्या कुटुंबानं तिची एक अपंग नणंद आणि एक दिराची मुलगी यांचा प्रेमानं सांभाळ केला. त्यांची शिक्षणं, लग्न, सणवार, बाळंतपणं सर्वकाही. शिवाय एका अनाथ विद्यार्थ्यांचाही ती खर्च व जेवण करीत असे. शाळा घराजवळच असल्यामुळे शिक्षक, विद्यार्थी सर्वाना अडल्यानडल्याला जोशी बाईंचं हक्काचं घर होतं. सदा हसतमुख. केलेल्या गोष्टीचा कधी उच्चारही नाही. आजही ती, तिची मुलं तो वारसा जपून आहेत हे विशेष. अशी माणसं आता दुर्मीळ होत चालली आहेत. परंतु जगात आजही भल्या माणसांची संख्या वाईट माणसांपेक्षा जास्त आहे. माणुसकी शिल्लक आहे. म्हणून तर हा जगन्नाथाचा रथ चालू आहे.

गीता बर्वे, ठाणे

girish mahajan eknath khadse
“आता तुमचं भविष्य…”, एकनाथ खडसेंचं नाव न घेता गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “मी आहे म्हणून…”
wardha lok sabha marathi news
“केवळ सभेत दिसू नका, व्यक्तिगत नाराजी दूर ठेवा”, भाजप आमदारांना मिळाला सल्ला
How to Make Cabbage Vada Recipe summer food
चिरलेला कोबी- वाटीभर बेसन, या विकेण्डला घरीच करा कुरकुरीत कोबीचे वडे, चविष्ट रेसिपी-आवडेल सर्वांना
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

विस्तारलेलं कु टुंबआमचंही!

‘विस्तारल्या कुटुंब कक्षा’ या लेखामुळे मला आमच्या घरातील अशाच एका ‘विस्तारित कुटुंब सदस्या’ची आठवण आली. साधारण १९६४-६५ चा काळ. मी जेमतेम एक दीड वर्षांची होते. माझे वडील महसूल खात्यात गंगाखेड तालुक्यात नोकरीला होते आणि मोठे काका पाटोदा येथे मुख्याध्यापक. त्यांच्या शाळेत शाम झडपे नावाचा अतिशय हुशार, मितभाषी असा मुलगा शिकायला होता. पाटोदा तसं अत्यंत लहान गाव. या मुलाचं पुढील शिक्षण चालू राहावं म्हणून त्यांनी शामला आमच्या घरी शिकण्यासाठी ठेवलं. शाम खूपच लाघवी, कामसू आणि हुशार असल्यानं अल्पावधीतच त्यानं सगळ्यांना लळा लावला. स्वत:चा अभ्यास सांभाळून तो मला सांभाळणं, घरातील कामांमध्ये आईला मदत करणं वगैरे आनंदानं करत असे. त्याचा एवढा लळा लागला, की त्याच्या सुट्टीच्या काळात- म्हणजे दिवाळी, उन्हाळी सुट्टय़ांमध्येही आम्ही त्याला गावी जाऊ देत नसू. त्यालाही गावी करमत नसे. यथावकाश त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्याला सरकारी नोकरी लागली. त्यांचं लग्नही झालं. पण त्याचे आमच्या घराशी असलेले बंध अतूट राहिले.  आज शामची दोन्ही मुलं आणि सुना प्रथितयश डॉक्टर आहेत. तो आपल्या संसारात खूप सुखी आहे. पण आज ५५-५६ वर्षांनंतरही तो आमच्या सुखदु:खाच्या प्रसंगी येतोच. दरवर्षी न चुकता हिंगोली येथे- आमच्या गावाला एक चक्कर मारतो. आजही तो मोठय़ा भावाप्रमाणे नव्हे, मोठा भाऊच आहे! हल्ली असे बंध निर्माण होणे नाहीच आणि झाले तरी ते इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत मनापासून जाणीवपूर्वक जपणं आणि टिकणं अशक्य वाटतं.

वीणा गोसावी, औरंगाबाद

विस्तारलेली कुटुंब कक्षास्मरणातच उरली

१५ मे रोजी संपदा वागळे यांचा विस्तारित कुटुंबांवरील लेख वाचला. माझ्या तरुणपणी अशी विस्तारलेली कुटुंबं आजूबाजूला अगदी सहज दृष्टीस पडत असत. माझ्या वयाच्या (माझं वय ७५) मुंबईकरांना निश्चित आठवत असावे, की मुंबई शहरात, गिरगाव, दादर, परळ, लालबाग, वरळी या परिसरात चाळींतून ‘पेईंग गेस्ट’ म्हणून एकेकटय़ा होतकरू तरुणांची राहाण्याची व्यवस्था विनासायास होत असे. सगळा व्यवहार तोंडी. लिखापढी अजिबात नाही. तरीही त्यातून फार मोठा वाद  किंवा खटला कधी उभा राहिलेला आठवत नाही.

या परिसरातील चाळीत एक-दोन खोल्यांत राहाणाऱ्या, निराधार किंवा मुलाबाळांपासून, स्वतंत्र राहाणाऱ्या वयस्कर स्त्री-पुरुष व्यक्ती आपल्या घरात एखाद्दोन होतकरू तरुणांना ‘पेईंग गेस्ट’ म्हणून ठेवून घेत असत आणि आपला उदरनिर्वाह सन्मानपूर्वक चालवत असत.

असे पेईंग गेस्ट शिकून सवरून भविष्यात खूप मोठय़ा पदावर गेले आणि लग्नकार्य झाल्यावर स्वतंत्र जागा घेऊन राहू लागले, तरी आपल्याला उमेदीच्या काळात आश्रय देणाऱ्या आजी, काकू, काका यांच्याशी त्यांचं जडलेलं नातं त्यांनी आयुष्यभर जपलं. त्यांचे आपल्याकडच्या मंगल कार्यातून सख्ख्या नातेवाईकांसारखेच मानपान केले, त्यांच्या मुलांचेही ते आजीआजोबा झाले.  अगदी आजारपणातदेखील मुलासारखी सेवा केली, वेळप्रसंगी दिवसवार सुद्धा केले, अशी असंख्य उदाहरणं दाखवता येतील.

काळाच्या ओघात बरीच नाती पुसट होत गेली किंवा अर्थकारणानं मानवी जीवनाचा नकळत ताबा घेतला आणि कोरडय़ा व्यवहाराची रुजवात झाली.

मोहन गद्रे, कांदिवली

दु:ख अचूकपणे मांडणारा लेख

संज्योत देशपांडे यांचा ‘आहे अटळ तरीही..’ (१५ मे) हा लेख खूप आवडला. करोनाकाळात मृत्यूचे तांडव अनुभवलेल्या असंख्य कुटुंबांच्या दु:खाला  लेखिके ने यात अचूकपणे शब्दबद्ध केले आहे. मीदेखील करोनाच्या पहिल्या लाटेत २८ सप्टेंबर २०२० रोजी माझ्या वडिलांना गमावले आहे. त्यांच्या अनुपस्थितीत आयुष्य जगणे खरोखरच अवघड आहे. पुढील आयुष्यात आपण जे काही कमावू ते बघायला ते आपल्यात नसतील ही भावना मानसिक त्रास देणारी आहे. अशा कितीतरी भावना लेखिकेने उत्तम प्रकारे लेखात मांडल्या आहेत.

केदार केंद्रेकर

बाबा तुम्ही राहू द्यामनाला भिडणारं

अपर्णा देशपांडे यांचा ‘बाबा तुम्ही राहू द्या’ (१५ मे) हा लेख वाचताना मी स्वत:चं भविष्य बघतोय की काय असं वाटलं. जगण्याचा पोत नेमका कशानं सुधारतो असा प्रश्न केला, तर आर्थिक उन्नतीनं हेच उत्तर येईल. कुटुंबाच्या सहवासाचा त्याग करून ती उन्नती साधता येत असेल तर ते करावं लागतं. इथे प्रेमाचे उमाळे काही कामाचे नाहीत हे वास्तव आहे. अतिशय दुर्लक्षित विषयावर प्रकाश टाकल्याबद्दल आभार.

अनिकेत देशपांडे, चेन्नई

विस्मरणाचे अनुभववाचनीय

मंगला जोगळेकर यांचा ‘विस्मरणाचे रोजचे अनुभव’ (१५ मे) हा लेख वाचला. लेखिकेने दैनंदिन जीवनातील विस्मरणाची दिलेली विनोदी उदाहरणं खूप आवडली. त्यांनी वेगळ्या पद्धतीनं  प्रत्यक्ष वर्गात चर्चा करुन प्रायोगिक पध्दतीनं लेखन केलं आहे. तसंच लेखाच्या मागील पहिल्या भागात आम्हा वाचकांना दिलेला गृहपाठ ही कदाचित गृहपाठ देण्याची वर्तमानपत्रातील लेखातील पहिलीच वेळ असेल.

विस्मरणाचे अनेक किस्से प्रत्येकाच्या जीवनात असतात. माझा एक रफिक नावाचा मित्र त्याची रक्तदाबावरची गोळी घेतलीच नाही म्हणून बऱ्याच वेळा १०-१५ मिनिटांच्या अंतरानं दुसरी गोळी विस्मरणानं घेतल्याचं सांगतो! पण एका बाजूस विस्मरण हे स्मरणाइतकेच आवश्यकही आहे. आपल्या जन्मापासून सगळेच अनुभव आपल्याला आठवले असते तर नवीन अनुभव ग्रहण करणं अवघड झालं असतं. आपल्याला येणारे दु:खद अनुभव आपण आठवत बसलो, तर जीवनातील आनंद वाढलाच नसता. एकूणच लेख अतिशय आवडला.

संजीव सावकारे, पालघर