स्मशानभूमीत जाणं ही कल्पनाही एरवी अंगावर काटा आणणारी, परंतु लंडनमधील १७२ वर्षे जुनी ब्रॉम्प्टनची स्मशानभूमी अनेकांसाठी पर्यटन क्षेत्र आहे; तर ज्यांचे जिवलग तिथे विसावलेत त्यांच्यासाठी श्रद्धास्थान बनली आहे.
लंडननिवासी असलेली माझी एकुलती एक नात ५-६ महिन्यांची झाली, अन् मी माझ्या लेकीला म्हणाले, ‘अगं, तिला आता उन्हात जवळच्याच बागेत फिरायला नेत जा.’ त्यावर माझी लेक तत्परतेने उद्गारली, ‘अगं हो, आता माझ्या घरासमोरच्या स्मशानभूमीत नेणार आहे तिला फिरायला!’ हे ऐकल्यावर अर्थातच मी अक्षरश: डोक्याला हात लावला आणि तिच्यावर तडकले. ‘मुळीच न्यायचं नाही तिला स्मशानभूमीत!  तुमच्या लंडनमध्ये काही बागाबिगा नसतात वाटतं?’ ती मला सांगायचा प्रयत्न करीत होती की, कशी ती स्मशानभूमी मोठ्ठी, प्रशस्त आहे, कसं तिकडे बरेच लोक आपल्या मुलांना फिरायला नेतात वगैरे. पण मी मुळीच काही ऐकायला तयार नव्हते. शेवटी मी परत लंडनला जाईन तेव्हा प्रत्यक्षच ती स्मशानभूमी पाहून ठरवावे आणि तोपर्यंत ती एखाद्या जवळच्या बागेत बाळाला फिरायला नेईल असा समझोता झाला. लंडनला गेल्यावरही स्मशानभूमीत जाऊन पाय मोकळे करून यावेत, ही कल्पना काही मला रुचत नव्हती. मी आज जाऊ, उद्या जाऊ अशी चालढकल करीत होते. पण घराबाहेर पडल्यावर जाता-येता मला तिकडे जाणारे लोक दिसत होते, कोणी लहान बाळांना फिरायला, कोणी कुत्र्यांना फिरायला घेऊन, तर कोणी एकेकटे ‘वॉक’ला निघालेले! शेवटी एक दिवस मनाचा हिय्या केला आणि मी पण धडकले ब्रॉम्प्टनच्या स्मशानभूमीत!
स्मशानभूमीच्या त्या भव्य प्रवेशद्वारातून मी प्रवेश केला मात्र, आणि तिथेच थबकले! आत सरळ, सरळ जाणारा मध्यवर्ती विशाल रस्ता आणि लांबवर त्या रस्त्याच्या शेवटी दिसणारं चर्चसदृश काहीतरी. रस्त्याच्या दुतर्फा छोटी छोटी मुले आणि त्यांच्या आया! सगळीकडे कसं शांत आणि हिरवंगार! थोडं पुढे जाऊन २-३ बोर्डस् दिसले, ते पाहिले तेव्हा कळलं की ही काही नुसती स्मशानभूमी नव्हे, ही आहे ३९ एकरांवर वसवलेली उद्यान स्मशानभूमी! (ॅं१ीिल्ल उील्ली३ी१८) सन १८४० मध्ये ही आम जनतेसाठी खुली झाली. मी लगेच मनात हिशोब केला. म्हणजे १७२ र्वष जुनी? मी खरोखर चक्रावले. कारण मला इथे अशरश: मूर्तिमंत तारुण्याची सळसळ, हिरवाई, आनंद, प्रसन्नता- सारं सारं काही दिसत होतं. काही सूचनावजा बोर्ड होते. कुत्रे घेऊन येणाऱ्यांसाठी आणि सायकलस्वारांसाठी वेगळे रस्ते होते. तिथे कोणकोणत्या प्रकारची झाडं, फुलं, पक्षी दिसतील त्याची माहिती होती. खारी आणि इतर पक्ष्यांना कुठचेही खाद्यपदार्थ देऊ नयेत, अशी सूचनाही होती.
माझ्या नकळत माझी पावले त्या मध्यवर्ती रस्त्यावरून पुढे-पुढे नेत होती. माझ्या लक्षात येत होतं, की मध्यवर्ती रस्त्याच्या दोन्ही बाजूला दर ठरावीक अंतरावर डावी-उजवीकडे जाणारे छोटे छोटे समांतर रस्ते होते- काही सरळ जाणारे, तर काही वर्तुळाकार जाणारे. त्यावर विसावण्यासाठी मधून मधून सुबक बाकं. दोन्ही बाजूंनी आणि सभोवार छोटे-मोठे सुरेख रुबाबदार वृक्ष, अनंत प्रकारची आणि रंगांची फुलं आणि सर्वदूर, हिरव्यागार अशा निसर्गाच्या कुशीतून डोकावणारी थडगी!
चालता चालता मी त्या मध्यवर्ती रस्त्याच्या शेवटाला आले, तर खरोखरीच एक छोटंसं, पण सुरेख चर्च होतं. मन नकळत साऱ्या छोटय़ा-मोठय़ा गोष्टींची नोंद घेत होतं, पण त्याचबरोबर मनाने एक खूणगाठ बांधली होती- ‘हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे!’ चालत चालत स्मशानभूमीचं दुसरं द्वार गाठलं आणि दिसलं स्मशानभूमीचं कार्यालय. आत जाऊन थोडी माहितीपर पत्रकं घेतली आणि घरी परतले, तेव्हा या अनोख्या उद्यान स्मशानभूमीचा अभ्यास करण्याचा मनाचा निर्धार पक्का झाला होता. मग काय, थोडीशी सवड मिळाली, की माझा अभ्यास सुरू!
तर झालं असं की, १८१५च्या वॉटर्लूच्या युद्धानंतर लंडन ही जणू जगाची औद्योगिक राजधानीच झाली आणि याचा परिणाम म्हणून १८०० ते १८५० च्या दरम्यान लंडनच्या लोकसंख्येत फार झपाटय़ाने वाढ होऊ लागली. त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रोगराई, संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वारंवार होऊ लागला व त्यामुळे स्मशानभूमींची कमतरता भासू लागली. तेव्हा लंडनच्या परिसरात ७ भव्य अशा उद्यान स्मशानभूमी उभारल्या गेल्या. (त्यांना म्हणतात, ळँी टंॠल्ल्रऋ्रूील्ल३ री५ील्ल!) त्यात अग्रक्रमावर आहे ही ब्रॉम्प्टनची उद्यान स्मशानभूमी.
३९ एकरांच्या जागेत सुप्रसिद्ध स्थापत्यतज्ज्ञ बेंजामीन बॉड याच्या रचनेनुसार हिची आखणी करण्यात आली. आज हिची गणना जगातील सर्वोत्तम अशा व्हिक्टोरियन शैलीतील स्थापत्यात होते. मध्यवर्ती रस्त्याच्या शेवटी असलेल्या चर्चची रचना ही रोममधील सेंट पीटरच्या सुप्रसिद्ध चर्चप्रमाणे केली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी समांतर जाणाऱ्या स्तंभांची रचना आहे. आजमितीला इथे ३५०० स्मारकं आहेत, ज्यात जवळपास २,०५,००० लोक चिरनिद्रा घेत आहेत. छोटय़ा थडग्यांपासून ते अगदी मोठय़ा कबरींचा यात समावेश आहे. लोकेच्छेप्रमाणे आणि ऐपतीप्रमाणे एका व्यक्तीपासून ते थेट ३ ते ४ जणांच्या कुटुंबासाठी इथे दफनाच्या सोयी आहेत. बाहेरच्या वाहनांना आत यायला मनाई असली तरी ज्यांचे प्रियजन आत विसावलेत, त्यांना आपली वाहने थेट थडग्यांपर्यंत न्यायची परवानगी आहे.
इथे सामान्यांबरोबरच अनेक ऐतिहासिक, राजकीय व सामाजिकदृष्टय़ा महत्त्वाच्या व्यक्तींची स्मारके आहेत. त्यात पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात वीरगती प्राप्त झालेल्या २८९ जवानांची स्मारकेही आहेत व त्यांची देखभाल कॉमनवेल्थतर्फे केली जाते. सुप्रसिद्ध लेखिका बीअट्रिस पॉटर ही इथून जवळच राहत होती. त्यामुळे तिच्या लिखाणातील कित्येक प्रसिद्ध व्यक्तिरेखांची नावे ही येथील थडग्यांवरील लिखाणातून  सुचली असावीत, असं म्हटलं जातं.
इथला सुरेख, मोहवणारा आणि निरनिराळ्या ऋतूत आपले वेगवेगळे रूप दाखवणारा निसर्ग, इथली नीरव, स्थिरचित्त शांतता, अतिशय सुरेख गोठीक शैलीतील स्थापत्य यामुळे ही उद्यान स्मशानभूमी अनेकानेक प्रसिद्ध चित्रपटांतून लोकांना वारंवार दिसली आहे. त्यातील ठळक नावे अशी- १९९५ साली ‘गोल्डन आय’, १९९७ मध्ये ‘ळँी ६्रल्लॠ२ ऋ ळँी ऊ५ी’, २००३ साली ‘खँल्ल८ एल्लॠ’्र२ँ’, २००६ मध्ये ‘र३१े ु१ीं‘ी१’, २००९ मध्ये ‘शेरलॉक होम्स’ वगैरे.
इथे नियमितपणे येणाऱ्या लोकांनी ‘ा१्रील्ल२ि ऋ ळँी इ१ेस्र्३ल्ल उीेी३ी१८’ या नावाची एक संस्था स्थापिली आहे. त्यातून स्मशानभूमीच्या देखभालीसाठी मदत, महिन्यातून दोनदा नाममात्र शुल्क घेऊन गाईडबरोबर स्मशानभूमीची अभ्यासपूर्ण सहल, वार्षिक दिन- असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.
हळूहळू आजीबाईंची (म्हणजे अस्मादिकांची) स्मशानभूमीची भटकंती नियमितपणे होऊ लागली. आता माझी परिस्थिती ‘अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने’ अशी झाली होती. एखादे दिवशी वेगवेगळ्या प्रकारची थडगी पाहावीत, त्यावरची माहिती आणि संदेश वाचावेत. थडगी तरी किती प्रकारची असावीत? काही अगदी लहानशी, एका व्यक्तीसाठीची, तर काहीत एकाच कुटुंबातील ३-४ सदस्य एकमेकांशेजारी विसावलेले. कोणाच्या थडग्यावर नुसताच क्रॉस, तर काहींवर चित्र-विचित्र पुतळे. एका थडग्यावर तर सिंह विसावलेला दिसला.  काही अगदी लहान मुलांची थडगी. त्यावर छानशी परी आपले पंख पसरून उभी, तर काहींवर देवदूत. मी त्या थडग्यांवरची नावे वाची. त्यांची जन्मतारीख, मृत्यूची तारीख सर्व वाचे. कधी टोपणनाव, कधी छोटासा संदेश, तर कधी एखादी कविता. मन उगाचच त्या न पाहिलेल्या कुटुंबाबद्दल तर्क-वितर्क करीत राही.
काही काही थडगी उपेक्षित दिसत, त्याभोवती तृण वाढलेले दिसे. मी जवळ जाऊन त्यावरची  तारीख वाचे. बहुधा सगळी १००-१५० वषर्ं जुनी असत. मनाशी विचार येई- यांचे नातेवाईक बहुतेक लंडन सोडून दुसरीकडे स्थिरावले असतील. पण बरीचशी थडगी अगदी नीटनेटकी, आणि काही काही तर अगदी व्यवस्थित देखभाल केलेली वाटत. त्यांच्याभोवती विटांनी कुंपण करून त्यात फुलझाडं लावलेली असत. एखादे दिवशी एखाद्या थडग्याभोवती फुलेच फुले दिसत. मग मी हळूच पुढे होई आणि लक्षात येई की, ‘त्या’ आजोबांचा आज वाढदिवस होता. अरे वा! माझं मन कल्पनेच्या भराऱ्या मारीत असे. हे आजोबा गेले आहेत १९४० साली, म्हणजे नक्की त्यांची नातवंडं आली असतील आज! म्हणजे आपल्या वाडवडिलांच्या स्मृती जपणारी, त्यांच्यासाठी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढणारी माणसे इथे पण आहेत तर!
कधी कधी नशिबाने साथ दिली, तर मला असं एखादं कुटुंब दिसे. आपली गाडी घेऊन, डिकीत सामान भरून आपल्या वडीलधाऱ्यांबरोबर वेळ घालवायला आलेलं. आई वेगवेगळी रोपं लावण्यात दंग आहे, मुलं छोटय़ा छोटय़ा झारी घेऊन त्यांना पाणी घालताहेत, बाबा डिकीमधून सामानाची ने-आण करताहेत! मग त्या रस्त्यावरच्या माझ्या फेऱ्या वाढत आणि त्याचबरोबर मनातली विचारांची आवर्तनंसुद्धा. काही काही थडगी तर एव्हढी सुबक आणि कल्पक असत! जणू गेलेल्यांच्या जिवलगांनी अतिशय प्रेमाने त्यांच्यासाठी हे सुंदरसं घरच बांधून दिलं असावं. इंग्लिश लोकांमधला हा अनपेक्षित माणुसकीचा ओलावा पाहून मन भरून येई.
कधी कधी मी फक्त आल्यागेल्याचं निरीक्षण करीत राही. छोटय़ा छोटय़ा मुलांना बाबागाडीत घालून आलेले त्यांचे आई-बाबा किंवा आजी-आजोबा. सर्वाचा बहुधा रोख असे खारुताईंच्या मागे पळण्यात. नियमांना झुगारून बरीचजणं शेंगा घेऊन येत (म्हणजे हे लोकं पण नियम झुगारतात बरं का!) आणि त्या आमिषाने खारुताईंचे अगदी जवळून दर्शन लहानग्यांना होई. कोणी आपापले कुत्रे घेऊन येत. काही काही कुत्रे तर एव्हढे धष्टपुष्ट की मालक कुत्र्याला फिरवतो आहे की कुत्रा मालकाला असा संभ्रम पडावा. त्यांच्यासाठी वेगळे रस्ते होते म्हणून बरे!
एकदा सायकलस्वारांसाठी असणाऱ्या रस्त्यावर मी चालत होते. समोरून लांबवर मला धावत येणारा कुत्रा व सायकलवर बसलेला त्याचा मालक माझ्या दिशेने येताना दिसले. मी जराशी घुटमळले. तेव्हढय़ात बाजूच्या एका रस्त्यावर तो कुत्रा धावला आणि त्याच्यापाठी त्याचा मालकपण. त्यामुळे मी निर्धास्तपणे परत चालू लागले. थोडी पुढे गेले असेन, एव्हढय़ात तो कुत्रा आणि त्याचा मालक परत दिसले आणि या वेळेला तो कुत्रा थेट माझ्याकडेच धावत येत होता. आता या संकटातून माझी सुटका तो मालकच करेल असा क्षणार्धात विचार करून मी पळत सुटले त्या मालकाच्या दिशेने. या झटापटीत तो मालक सायकलीवरून पडला, मीही पडले, आणि कुत्रा गायब! एकमेकांना १० वेळा सॉरी, सॉरी म्हणत मग पुढचा ‘वॉक’ सुरू झाला. कधी कधी कुणीतरी बाकावर बसून शांतपणे वाचन करताना दिसे. कधी मुलं अभ्यास करताना दिसत. कधी एखादं कुटुंबच्या कुटुंब कुत्र्याबरोबर बॉल घेऊन खेळत असे. कधी मीसुद्धा वॉकनंतर बाकावर मांडी घालून प्राणायाम करीत असे.
बऱ्याच वेळा माझ्या निरीक्षणाचा रोख झाडं-पक्षी-फुलं यांच्यावर असे. बाहेरच्या बोर्डावर या उद्यानात कोणकोणते पक्षी विसाव्याला येतात, त्यांचे चित्र आणि वर्णन असे. मग एखादा वेगळा मंजूळ आवाज आला की त्याच्यामागे जावे किंवा क्वचित छानसा वेगळा पक्षी दिसला तर परत जाताना त्या बोर्डावर त्याला शोधावे. छान-छान वेगवेगळ्या आकारांचे डौलदार वृक्ष पाहत बसावे. फुलं तरी किती प्रकारची असावीत? एखादं झाड अलवार गुलाबी रंगांच्या फुलांनी लगडलेलं, तर एखादं पिवळ्याधम्मक फुलांनी! एखादं आपली लालभडक फुलं मिरवे. जणू काही ती झाडं एकमेकांना म्हणताहेत, ‘हम भी कुछ कम नही!’ जमिनीलगतच्या हिरवळीत छोटय़ा-छोटय़ा पांढऱ्या, पिवळ्या आणि जांभळ्या फुलांची नक्षी दिसे. वाऱ्याबरोबर आनंदाने डुलत ती जणू मला विचारत, ‘सांग बघू, कोण सर्वात सुंदर आहे?’ फारच अवघड प्रश्न असं पुटपुटत मी पुढे सरके. आज एखाद्या झाडाला आलेली टपोरी कळी उद्या आवर्जून पाहावी, तर एखादं डौलदार फूल माझं हसतहसत स्वागत करीत असे. कधी कधी माझी स्वारी फुलपाखरांच्या मागावर निघे. त्या सुरेख, सुरेल वातावरणात त्यांची ती नि:शब्द रंगीबेरंगी लगबग पाहत राहावं असं वाटे.
दिवस सरत होते आणि माझ्या मनात घर करून बसलेलं स्मशानभूमीचं अमंगल, अपवित्र, अशुभ, भीतीदायक असं चित्र पुसलं जात होतं. यापैकी कशा-कशाचाही इथे वास नव्हता. इथे होता मन प्रसन्न करणारा, हसरा, खेळकर, लोभावणारा निसर्ग आणि त्याच्या कुशीत विसावलेल्या वडीलधाऱ्यांची प्रेमळ आणि आश्वासक सोबत! उत्पत्ती-स्थिती-लय हा स्वत:चा नियम जणू निसर्गच सोपा करून समजावून देत होता. इथे चालला होता जगण्याचा आणि मरणाचा आनंदोत्सव! बघता बघता माझ्या नातीची बाबागाडी खारुताईंच्या मागे कधी पळू लागली, मला कळलं पण नाही.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित