‘‘मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांत ‘पर्यावरणप्रिय गणेश’ ही संकल्पना रुजू लागली आणि त्याला प्रतिसाद म्हणून आम्हीही तयार केला गणपती, ओरिगामीचा वापर करून. मेहनत होतीच, पण त्याला पहिलं बक्षीस मिळालं आणि बाप्पांचा प्रसाद मिळाल्याची भावना मेहनतीचं चीज करून गेली.’’
चौसष्ट कला व चौदा विद्यांचा अधिष्ठाता म्हणजे गणपती. म्हणूनच गणेशोत्सवाच्या काळात आपल्यातल्या कलेला, सर्जनतेला व बुद्धीला आवाहन केलं तर प्रत्यक्षात कसली प्रचीती येईल,  तर ‘अशक्य ते शक्य’ घडण्याची. आमच्यासाठी याचं निमित्त ठरलं घरी गणपती बसवण्याचा चिरंजीवांचा बालहट्ट आणि दिल्लीकर अमराठी स्नेह्य़ांची मराठी सण आणि उत्सवांविषयीची उत्सुकता!
त्या वेळी आम्ही दिल्ली येथे वास्तव्याला होतो. शेजारच्या, कार्यालयात अनेक अमराठी कुटुंबीयांशी परिचय होत होता. त्या वेळी एक गोष्ट प्राधान्याने जाणवली, ती म्हणजे इथल्या अमराठी लोकांना मराठी सणांमध्ये, उत्सवांमध्ये कमालीचा रस आहे. मग आपण घरीच गणपती बसवून, येथील लोकांना आपली संस्कृती, सणांचा, परंपरांचा परिचय करून देऊ या, अशा हेतूने मी घरी गणपती बसवला. त्या वेळी ‘इकोफ्रेंडली गणपती’ म्हणजेच ‘पर्यावरणप्रिय गणेश’ ही संकल्पना मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांत रुजू लागली होती. घरगुती गणपतींच्या मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या घेण्याऐवजी  शाडूच्या मातीच्या घेण्याविषयीची जागरूकता वाढू लागली होती; पण बाप्पाच्या आजूबाजूची आरास मात्र अजूनही थर्माकॉल, प्लॅस्टिकचे गोळे-पट्टय़ा, टिकल्या, चमकीचा मुक्त वापर असणाऱ्या वस्तूंनीच व्यापलेली होती. ही बाब खटकणारी होती. मग आरासही पर्यावरणप्रिय तरीही आकर्षक करण्याच्या दिशेने विचारचक्रे सुरू झाली. माझ्यातली चित्रकला शिक्षिका येथे जागी झाली व त्यातून साकारले गेले एकाहून एक सरस देखावे, लक्षवेधी सजावट, मनमोहक आरास आणि त्यांच्यासोबत ‘ओमकार प्रधाना’चे तेजस्वी गणेशाचे रूप!
पहिल्या वर्षी जेव्हा गणपती घरी बसवण्याचं नक्की केलं तेव्हा खूप शोध घेऊनही दिल्लीमध्ये शाडूची गणपतीची मूर्ती मिळेना, त्या वेळी माझ्या पतीने  मुंबईहून ही मूर्ती विमानाने दिल्लीला आणली. पहिल्या वर्षी आरास केली फुला-पानांची. दीर्घकाळ ताजी राहणारी कण्हेर,जास्वंद आणि त्यांची पानं तसेच निशिगंध, झेंडू यांची रंगीबेरंगी नैसर्गिक सजावट करत बाप्पाची प्रतिष्ठापना केली. पुढल्या वर्षी आपल्या संतपरंपरेची महती सांगणारा देखावा सजावटीसाठी उभारला. यात संत तुकारामांची गाथा नदीतून तरंगून वर आली होती तो प्रसंग, संत ज्ञानेश्वर माऊलींनी रेडय़ाकडून वेद वदवून घेतले, त्यांच्या आदेशाने भिंत चालली, त्यांनी पाठीवर मांडे भाजले असे अनेक प्रसंग चितारून भागवत धर्माची परंपरा दाखवण्याचे शिवधनुष्य पेलले. कागदी पुठ्ठय़ांवर हा प्रसंग रेखाटायचा व माहितीसाठी जवळ फलक लावत आपली संतपरंपरा चित्रबद्ध केली. एके वर्षी शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा जीवनपट उलगडणारा देखावा मांडला. यात महाराजांचा राज्याभिषेक, अफजलखान वध असे प्रसंग हुबेहूब रेखाटले. आमच्या या प्रयत्नांना दिल्लीकरांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. गणपतीचे दहा दिवस दर्शनाला येणाऱ्यांची रीघ लागायची. कमी पडायचे दहा दिवस!     
दिल्लीतच नाही, तर संपूर्ण उत्तर भारतात धार्मिक सोहळे साजरे करायचे म्हणजे पंडित, स्वामीजींना आपल्या घरी बोलवतात आणि त्यांच्या हस्ते पूजा करून घेतात. या वेळी तबला, ढोलकी यांच्या साथीनं रात्र रात्र भजनंही रंगतात. धार्मिक वातावरण तयार होतं. ‘पर आपके यहाँ तो गणेशजी की पूजा आप करती है, तो हम भी कर सकते है ना?’ अमराठी लोक चकित होत विचारायचे. त्यांच्यासाठी तो वेगळा विचार असायचा. त्यांच्या गणपतीतल्या अशा सहभागाने मला पुढील वर्षी आणखी काही तरी नवीन करायची प्रेरणा मिळायची.
२०१० साली आम्ही मुंबईत परतलो. मुलाने आर्किटेक्चरला प्रवेश घेतला. त्याच्या अभ्यासक्रमात ओरिगामी या जपानी कलेचाही समावेश होता. त्याला ओरिगामीच्या कल्पक दुनियेने पुरते पछाडले होते. एक दिवस त्याने ओरिगामीच्या विविध घडय़ा वापरून हुबेहूब मोर बनवला. हा मोर उलटय़ा बाजूला गणपतीच्या सोंडेचा आभास देत होता. त्या वेळी एक कल्पना चमकली, या वेळी कागदाचाच गणपती बनविला तर? मुलाने व पतीने कल्पना उचलून धरली. ओरिगामीचा गणपती करण्याचा संकल्प जरी सोडला होता तरी डोळ्यापुढं ठोस काहीच नव्हतं, पण निर्मळ भावनेनं एखाद्या गोष्टीचा ‘श्रीगणेशा’ आपल्या हातून होतो आणि त्यानंतरचं सग्गळं बाप्पा आपल्याकडून करून घेतो, याचा प्रत्यय आला.
सुरुवातीला आम्ही विविधरंगी ड्रॉइंगपेपर घेतले. ए-फोर साइजच्या या कागदांच्या घडय़ा घालून, कापून त्यांचे ३२ एकसारखे तुकडे केले. या प्रत्येक तुकडय़ापासून एक विशिष्ट घडी घातली. अशा रंगीबेरंगी सुमारे अडीच हजार घडय़ा तयार केल्या. या घडय़ा एकमेकींमध्ये अडकवून त्यापासून बाप्पाचे डोके, कान, हात, सोंड असे अवयव बनवले. शेवटी त्यांना जोडण्यासाठी टूथपिकचा वापर केला. या गणपतीच्या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे यात कुठेही डिंक, चिकटपट्टी यांचा वापर केला नाही. योगायोग म्हणजे आदल्या दिवशीपर्यंत टु-डीमध्ये असणारा गणपती आपण आणखी थोडी मेहनत घेतली तर थ्रीडी होऊ शकतो, याचा साक्षात्कार झाला. मग दिवसरात्र एक करून साकार झाला ओरिगामी तंत्राचा वापर करून केलेला थ्रीडी गणपती. आरास करण्यासाठी कागदांच्या आणखी काही घडय़ा वापरल्या. बाप्पाचे वाहन उंदीर व आवडता मोदकही आम्ही कागदापासूनच बनवला. रंगीबेरंगी आरास व नाजूक गणपतीची मूर्ती जेव्हा एकत्रितपणे डोळा भरून पाहिली, तेव्हा कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं.
गंमत म्हणजे नेमकी त्याच वेळी मुंबई ग्राहक पंचायतीच्या वतीने ‘इकोफ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी मुंबई व उपनगरातून घरगुती पर्यावरणप्रिय सजावट असणारे तब्बल ३०० अर्ज आले होते. त्यातून आमच्या सजावटीला प्रथम पारितोषिक मिळाले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. अकरा हजार रुपयांचं रोख बक्षीस आम्हाला बाप्पाच्या प्रसादासारखेच वाटले.
 ओरिगामीच्या कलेमागे गणिती मोजमापाचे तंत्र आहे. ते सांभाळून आम्ही हा कलाविष्कार साकारला. ओरिगामीच्या कलाकृतीचं आणखी एक विशेष म्हणजे यासाठी वापरलेल्या गणपतीच्या घडय़ा अलगदपणे काढून त्यापासून आपण प्राणी, पक्षी असे वेगवेगळे प्रकारही बनवू शकतो.
 मुख्य मूर्ती कागदी असली तरी प्रतिष्ठापनेसाठी मी वेगळ्या धातूच्या मूर्तीचाच वापर केला होता. त्यांची पारंपरिक पूजाअर्चाही केली. मात्र मुख्य गणपतीसाठी केलेला हा प्रयोग निश्चितच समाधान देणारा होता. प्रसादाच्या बाबतीतही आम्ही थोडं इकोफ्रेंडली असणं सांभाळतोच. दर्शनाला आलेल्यांना प्रसाद म्हणून मी फळे, शिरा, खोबऱ्याची वडीच देते, तेही कागदी प्लेट किंवा द्रोणामध्ये.
यंदाच्या वर्षीही गणेशाच्या सजावटीसाठी मी वेगळी शक्कल लढवली आहे. मातीपासून बनवलेल्या विविध नर्तनमुद्रांतील मूर्ती आणून तबला, सारंगी इ. वाद्ये वाजवणारे पुतळे ठेवून ‘संगीत सभा’ भरवावी, असा विचार आहे. तयारी चालू आहे..
मी मोठी गणेशभक्त नाही किंवा आध्यात्मिक प्रवृत्तीचीही नाही, पण गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझ्यातल्या नवं काही करण्याच्या वृत्तीला प्रेरणा मिळाली. म्हणूनच पर्यावरणाचा समतोल सांभाळून आपल्यातील कलागुणांना अशा सणांचे औचित्य साधून आपण वाव देऊ शकतो व आनंद मिळवू शकतो, याची साक्ष जरूर पटली.                   
gadekarbr@bharatpetroleum.in

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…