24 August 2019

News Flash

प्यारवाली लव्हस्टोरी

आजकाल प्रेमात पडण्याचे वय खूपच अलीकडे आले आहे. पण निराश मन:स्थितीत, घरात प्रतिकूल वातावरण असेल तर अशा परिस्थितीत प्रेमात पडणे हे धोकादायक असू शकते. कारण

| April 18, 2015 01:03 am

ch15आजकाल प्रेमात पडण्याचे वय खूपच अलीकडे आले आहे. पण निराश मन:स्थितीत, घरात प्रतिकूल वातावरण असेल तर अशा परिस्थितीत प्रेमात पडणे हे धोकादायक असू शकते. कारण अशा परिस्थितीत प्रेम केवळ आंधळे नसते तर ते बहिरे आणि मुकेही असते. शिवाय या वयात गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असणे हे काही सन्मानाचे लक्षण नाही. त्यामुळे ते असेल तर फार कौतुकाचे नाही आणि नसले तरी निराश व्हायची गरज नाही.
नवथर प्रेमाविषयीचा हा भाग १.

तेरा वर्षांचा ऋषी जेव्हा आपल्या आईला म्हणाला की त्याला एक मुलगी आवडायला लागली
आहे, तेव्हा त्याची आई फीट येऊन पडायची तेवढी बाकी होती. ‘यासाठी आम्ही तुला शाळेत पाठवतो का?’ धनुष्यातून एका वेळी असंख्य बाण बाहेर पडावेत तसे त्याच्या आईच्या मुखातून असंख्य प्रश्न बाहेर पडू लागले, त्यातला हा पहिला प्रश्न होता. ऋषीच्या बोलण्याला चाप बसला आणि तेव्हापासून घरच्यांशी सल्लामसलत करणे, गप्पा मारणेच त्याने कायमचे सोडून दिले.
घरात तरुण मुलगा वा मुलीने आपल्या प्रेम प्रकरणाची माहिती दिली किंवा ते कळलं की प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात. एका मुलीने आपल्या आईला तिला एक मुलगा आवडू लागल्याचे सांगितले तेव्हा आपल्या मुलीने आपणहून ही गोष्ट आपल्याला सांगितली म्हणून तिच्या आईला आनंद वाटला होता. आणखी एका उदाहरणात, आपल्या मुलाला जी मुलगी आवडते ती गणितात खूप हुशार असल्याचा आनंद एका आईने माझ्याशी बोलताना व्यक्त केला होता. तिचे म्हणणे होते की, त्या प्रेमाखातर तिचा मुलगा गणिताचा चांगला अभ्यास करू लागला होता आणि ती मुलगी त्याला त्याच्या अभ्यासात आणि तो तिला तिच्या अभ्यासात मदत करू लागले होते. त्या बाईंच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट होती. एका पालकांनी मला, त्यांचा मुलगा भिन्निलगी व्यक्तीच्या प्रेमात पडला आहे याचाच आनंद असल्याचे आणि यातून आपला मुलगा मोठा झाल्याचे तसेच लंगिकतेविषयी तो थेट विचार करू लागल्याचे सिद्ध होते, असे सांगितले होते.
एक गोष्ट नक्की की, पूर्वीपेक्षा आता मुले या विषयावर अधिक मोकळे आणि खुलेपणाने आपल्या गुजगोष्टी पालकांना सांगू लागली आहेत. बऱ्याच वेळा पालक मुलांना सांगतात की, त्यांचे हे प्रेम म्हणजे तात्पुरते वेड किंवा मोह आहे. पण डॉक्टर म्हणून मला विचाराल तर माझ्या दृष्टीने हे प्रेम म्हणजे कुणासाठी १० रुपयांचे, कुणासाठी एक महिन्याचे तर कुणासाठी आयुष्यभराचे ‘प्रीपेड कार्ड’ आहे. मुलं जर याविषयी तुमच्याशी बोलू पाहत असतील तर त्यांना जरूर बोलू द्या आणि प्रेम हीच एकमेकांचे बंध दृढ करणारी गोष्ट आहे याची जाणीव होऊ द्या. प्रेमात असले की मनामध्ये भावनांची नेहमीच दंगल होत असते आणि ते स्वाभाविकदेखील आहे, पण त्यापेक्षा स्वीकृती मोठी असते. यातून मुला-मुलींतील प्रामाणिकपणा दिसून येईलच, पण पुढे जर विभक्त व्हायची वेळ आलीच तर ते सुद्धा पालकांनाच आधी सांगितले जाईल.
अठरा वर्षांची मानसी जेव्हा एकसारखी तिच्या बॉयफ्रेंडला बिलगायला लागली आणि सतत तो जाईल तिथे त्याच्याबरोबर जाऊ लागली तेव्हा तिच्या पालकांची काळजी वाढली. त्याच्याबरोबर जाऊ नको म्हटले तर घरात सारखी चिडचिड करायची आणि बॉयफ्रेंडशीसुद्धा सारखी भांडायची. मी जेव्हा तिच्याशी बोललो तेव्हा तिच्या वागण्यातील हा बदल संशय, असूया आणि मत्सर यांनी मनात घर केल्यामुळे झाल्याचे दिसले. सुरुवातीला तिचे बॉयफ्रेंडशी चांगले जमले होते, पण गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या मनात बॉयफ्रेंड सोडून जाईल की काय, या भीतीने असुरक्षितता निर्माण झाली होती आणि त्यामुळे तिच्या वागण्यात एक तुसडेपणा आला होता. तिच्या या वागण्याला तिचा मित्र पण कंटाळला होता. ती मात्र सगळ्या गोष्टीला त्यालाच जबाबदार धरत होती. तिच्या पालकांनाही तिचेच म्हणणे खरे वाटत होते. पण जेव्हा औषधांचा तिच्यावर चांगला परिणाम होऊ लागला तेव्हा तिच्या वागण्यात पुन्हा चांगला बदल घडून आला. तिच्या विचित्र वागण्याचे कारण काय होते, असे मला तिच्या पालकांनी विचारले तेव्हा माझे उत्तर होते- भीतीतून आलेले नराश्य. असे नैराश्य येण्यासाठी फार मोठे कारण लागत नाही. मेंदू जेव्हा असुरक्षिततेतून येणाऱ्या भावनेच्या आहारी जाऊ लागतो तेव्हा नराश्य आकार घेऊ लागते.
मोनिकाची गोष्ट जरा वेगळी होती. तिचा बॉयफ्रेंड तिच्यावर खूप जास्त प्रेम असल्याचे दर्शवायचा आणि तिच्यावर स्वामित्व गाजवायचा. तिने दुसऱ्या कुठल्या मुलाशी बोललेले त्याला सहन व्हायचे नाही. तिच्यावर प्रेमाचा वर्षांव करण्याचे नाटक करून त्याने एक दिवस गोड बोलत तिचे सर्व पासवर्ड काढून घेतले आणि शेवटी व्हायचे तेच झाले. त्याचे काम झाल्यावर त्याने तिला चारचौघांत थोबाडीत मारून अपमानित केले आणि खोटेपणा बाहेर येताच पळून गेला. मला वाटते की, मुले-मुली दोघांनीही खरे प्रेम आणि भावानातिरेक करणारे प्रेम यातील फरक ओळखायला हवा. प्रेमात पडलेली किशोरवयीन मुले एकमेकांचा आदर करणार नसतील, कमालीची संशयी असतील, भावनातिरेक करणारी असतील, मित्र-मत्रिणींपासून तोडत असतील, पासवर्डसारख्या गोपनीय गोष्टींची मागणी करीत असतील, समोरच्यावर आपला अंकुश ठेवू पाहणारी असतील, उद्वेगजन्य वागत असतील तर अशा मुलांची संगत ताबडतोब सोडायला हवी. ते खरे प्रेम नाही हे ओळखायला हवे.
चंद्रिकाचे वडील अतिशय शिवीगाळ करायचे. शिवराळ भाषेत बोलायची त्यांना वाईट सवय होती. मुलीसाठी कायम तिच्यापेक्षा वयाने अंमळ मोठाच मुलगा शोधत िहडायचे. शेवटी त्यांनी तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठय़ा असलेल्या मुलाशी तिचे लग्न लावून दिले. तो माणूस गुन्हेगार प्रवृत्तीचा आणि व्यसनाधीन असल्याचे नंतर कळले. तिचे समुपदेशन करताना असे लक्षात आले की, तिच्या वडिलांनी कधीच तिला मायेची ऊब दिली नव्हती, त्यामुळे समोर आलेल्या मुलाने चार प्रेमाचे शब्द बोलताच आणि तिच्याविषयी सहानुभूती दाखविताच ती लग्नाला तयार झाली होती. पण दुर्दैवाने तो नवराही वाईट निघाल्यामुळे ती तिथेही प्रेमाला मुकली. याचाच अर्थ, जर कुणी दु:खी असेल, निराश असेल, आत्मविश्वास गमावून बसले असेल, घरात काही दु:खद घटना घडली असेल, प्रतिकूल वातावरण असेल तर अशा परिस्थितीत प्रेमात पडणे हे धोकादायक असू शकते. कारण अशा परिस्थितीत प्रेम केवळ आंधळे नसते तर ते बहिरे आणि मुकेही झालेले असते.
तसेच हेही लक्षात घेतले पाहिजे की, प्रेमाचा जन्म होतो, त्याची वाढ होते, तसाच त्याला शेवटही असतो. सुप्रियाने जेव्हा शरदला ‘आता आपल्यात तसे काही राहिलेय असे मला वाटत नाही,’ असे सांगितले तेव्हा शरदला धक्काच बसला. तिला असे का वाटावे, याचाच त्याला उलगडा होईना.’ तो नैराश्य अवस्थेपर्यंत गेला. ‘मी वाईट मुलगा आहे का? ती माझ्याशी अशी का वागली?’ असे प्रश्न त्याने मला विचारायला सुरुवात केली. आमच्या खूप वेळ चाललेल्या संभाषणादरम्यान शरद दोन-तीन वेळा मनसोक्त रडला. त्याच्या महाविद्यालयातील उपस्थितीवर परिणाम झाला होता. परीक्षेलासुद्धा तो बसला नव्हता. ‘मी माझ्या मित्रांना काय सांगू? ते मला काय म्हणतील?’ या भीतीने तो त्यांच्यापासूनही दूर पळत होता. आमच्या गप्पांमधून त्याच्या मनातील भीती बाहेर येत गेली आणि मी ती दूर करीत गेलो तसा शरद हळूहळू मनातील विचारांना वाट करून देऊ लागला. ‘कुणीच माझ्यावर प्रेम करीत नाही, माझे आयुष्य फुकट आहे’ अशा विचारांची साचलेली जळमटे मी साफ करीत गेलो. मी त्याचे दु:ख जाणले आहे या गोष्टीचे त्याला समाधान आणि आधार वाटत होता. मनातील वेडय़ावाकडय़ा विचारांना आव्हान देण्याइतपत त्याची तयारी झाली आणि वातावरण पूर्ण बदलून गेले.
‘ती मुलगी तुझ्या योग्यतेची नव्हतीच किंवा ती गेली तर काय झाले, दुसरी कुणी तरी मिळेल,’ अशी वाक्यं निराशेचा सूर आळवीत असतात आणि म्हणूनच पालक, शिक्षक किंवा मित्रांनीसुद्धा असे बोलणे टाळले पाहिजे. हळूहळू शरदची गाडी पूर्वपदावर येऊ लागली आणि तो महाविद्यालयात नियमित वर्गात जाऊन बसू लागला. त्याला रात्री शांत आणि पुरेशी झोप मिळावी म्हणून थोडेफार औषधोपचार केले आणि त्याला बरे वाटले. मुळात जास्त औषधोपचाराची गरज नव्हतीच. चेष्टा-मस्करी करणाऱ्या मित्रांचा कसा सामना करायचा हे त्याला सांगितले आणि तुटलेल्या प्रेमसंबंधाबद्दलही मोकळेपणाने बोलायची त्याला परवानगी दिली. त्याला ज्याची भीती वाटत होती ती दूर झाली. उद्वेग आणणाऱ्या, चिथविणाऱ्या प्रश्नांना कसं सामोरे जायचे याचेही त्याला प्रशिक्षण देण्यात आले. भावनिक उपचार करताना समुपदेशकाबरोबरच मित्रवर्ग फार मोलाची भूमिका बजावीत असतो. मित्र नेहमीच आपल्या मित्राला किंवा मत्रिणीला मदत करायला तयार असतात, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज असते. कारण नाजूक मन:स्थितीत त्यांच्याकडून होणारी मदत ही योग्य दिशेने जाणे गरजेचे असते.
किशोरवयातील मुलांच्या प्रेमसंबंधात विभक्त होण्याची घटना घडणे ज्याला आजकाल ‘ब्रेकअप’ म्हणतात ती घटना म्हणजे रस्त्यावर झालेल्या अपघातात हात किंवा पायाचा अस्थिभंग होण्यासारखे असते. त्या परिस्थितीत सगळे जण त्या पायाला किंवा हाताला जपतात, त्या व्यक्तीला हालचाल करायला मदत करतात तसेच या परिस्थितीत करायचे असते म्हणजे प्रेमभंगातून मुले लवकर बरी होतात.
एका छोटय़ाशा अविश्वासाच्या घटनेवरून सानिया आणि विघ्नेशच्या प्रेमसंबंधात तणाव निर्माण झाला होता. सानियाला वाटत होते की विघ्नेश तिच्या मत्रिणीकडे जरा जास्तच झुकू लागला आहे. पण त्यात तथ्य नव्हते. तीन महिन्यांनंतर दोघांनाही एकमेकांशिवाय अस्वस्थ वाटू लागले. सानियाने जेव्हा मला विचारले की, ‘आता मी काय करू?’ तेव्हा मी तिला सांगितले की, ताबडतोब तू विघ्नेशशी बोल आणि तुला काय वाटतेय ते त्याला स्पष्टपणे सांग. तिने तसे केले आणि त्यानंतर त्यांचे बंध अधिक घट्ट झाले.
बऱ्याचदा मुले-मुली आपल्याला ‘गर्लफ्रेंड’, ‘बॉयफ्रेंड’ नाही म्हणून खिन्न-उदास होतात. त्यांना मी सांगू इच्छितो की, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असणे हे काही सन्मानाचे लक्षण नाही. ज्यांना गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड आहे त्यांनी आपण फार कार्यक्षम आहोत असे समजू नये, तसेच ज्यांना गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नाहीये त्यांनी ती आपली उणीव किंवा कमतरता समजू नये. गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणे एक वेळ सोपे आहे, पण चांगले मित्र मिळणे कठीण आहे. शिवाय हा काळ तुमचे शिक्षण, तुमचे आयुष्य एका ठरावीक दिशेने जात असते त्याकडे अधिक लक्ष पुरवायला हवे. तेव्हा मित्रांनो, चांगल्या मत्रीत गुंतवणूक करा. तेच जास्त टिकणारे असते.
(लेखात नमूद केलेली उदाहरणे खरी असली तरी मुलांची नावे बदलली आहेत.)
शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी
डॉ. हरीश श़ेट्टी

First Published on April 18, 2015 1:03 am

Web Title: love
टॅग Love,Youth