News Flash

‘प्रेम, आयुष्य आणि शिक्षण’

प्रेमात पडून जखमी होण्यापेक्षा प्रेमात असतानाही करिअरचा क्रम चढता ठेवणं महत्त्वाचं. महाविद्यालयाच्या अभ्यासिकेत एकत्र अभ्यास करणं किंवा एकमेकांच्या घरी

| May 2, 2015 01:01 am

प्रेमात पडून जखमी होण्यापेक्षा प्रेमात असतानाही  करिअरचा क्रम चढता ठेवणं महत्त्वाचं. महाविद्यालयाच्या अभ्यासिकेत एकत्र अभ्यास करणं किंवा एकमेकांच्या घरी पालकांसोबत अभ्यासासाठी एकत्र घालविलेला वेळ नक्कीच फुकट जात नाही. ‘स्टडी डेटिंग’ करून दोघांनाही परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात.

‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या लेखाच्या पहिल्या भागात (१८ एप्रिल) आपण नवथर प्रेमाविषयीची काही उदाहरणे पाहिली. आजच्या भागात आपण आणखी काही उदाहरणे आणि त्याचे मुलांवर आणि त्यांच्या कुटुंबावर होणारे अनुभव पाहणार आहोत.
चौदा वर्षांच्या आपल्या मुलीच्या मोबाइलमध्ये विवस्त्र तरुण-तरुणींची छायाचित्रं पाहून पंडित बाईंना मोठा धक्काच बसला. त्यांचा विश्वासच बसेना. काय करावं त्यांना सुचेना. हे प्रकरण केवळ छायाचित्र पाठविण्यापुरते राहिले नव्हते. मुलीने तो फोटो तिच्या मित्राला पाठवला होता आणि तो मित्रसुद्धा तिला अर्धनग्न कपडय़ातील फोटो पाठवत होता. त्यांचे हे ‘शेअरिंग’ बघून पंडितबाई कमालीच्या अस्वस्थ झाल्या. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, आई-बाबा कधी, केव्हा घरी नसतील हे सांगणारा आणि त्या वेळी मुलाला घरी यायचे आमंत्रण देणारा मेसेजही मुलीने पाठवला होता. अभ्यासात हुशार असणाऱ्या आपल्या मुलीच्या आयुष्यात याशिवाय दुसऱ्या कुठल्याच विषयाला महत्त्व नाही ही बाब वेदनादायी होती. मी जेव्हा त्या मुलीशी बोललो तेव्हा त्यांचे एकमेकांना छायाचित्र पाठविण्याचे हे उद्योग अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचे कळले.
‘‘माझं आयुष्य अगदी रटाळ आणि कंटाळवाणं झालं होतं. शाळा आणि क्लासेस यामधून मोकळा वेळच मिळत नव्हता. मी उत्तम बॅडमिंटन खेळाडू आहे, पण गेल्या वर्षभरापासून खेळण्यातही रस वाटत नाहीए. दरम्यान एक मुलगा मला आवडू लागला आणि एकमेकांशी तासन्तास मोबाइल किंवा ई-मेलवरून गप्पा सुरू झाल्या. चॅटिंग करणे हाच आमचा आवडीचा कार्यक्रम बनला. तेवढय़ात आईला सुगावा लागला.’’ मुलीने मन मोकळे केले. या प्रकारामुळे गेल्या सहा महिन्यांपासून अभ्यासात तिची घसरण सुरू झाली होती. ‘‘ही आमची प्रतिष्ठा धुळीला मिळवते आहे.’’ पालकांचा पारा चढू लागला. ‘‘हिची अभ्यासात अशीच घसरण होणार असेल तर आम्ही तिला शाळेतून काढून टाकू.’’  त्यांनी थेट निर्णयच जाहीर केला.
खरं तर परिस्थिती अतिशय नाजूक होती आणि पालकांना विषय तसाच नाजूकपणे हाताळावा लागणार होता. या वयात हार्मोन्सच्या ग्रंथीमधून एक विशिष्ट प्रकारचा ग्रंथरस स्रवत असतो आणि मेंदूला (बुद्धीला) न जुमानण्याचे प्रकार चालू असतात. आम्ही पुन्हा तिला तिच्या आवडत्या खेळाकडे वळवायचे ठरवले. बॅडमिंटन खेळायला तिला प्रोत्साहन दिले; तिला तिच्यात होणाऱ्या शारीरिक बदलांची नव्या आणि स्वच्छ दृष्टिकोनातून ओळख करून दिली. स्वत:च्या देहाचा आदर करायला शिकवलं. दोघांच्याही मनात विचारांचा कोलाहल उठलेला होता. तो मुलगासुद्धा आपल्या शारीरिक जाणिवा आणि मानसिक भाव-भावना यांच्यात गुरफटला होता. अतिशय कट्टर विचारसरणीच्या कुटुंबातून आलेल्या त्या मुलाची शाळाही जुनाट आणि पारंपरिक अभ्यासक्रमाला चिकटून बसलेली असल्यामुळे तिथे लैंगिक शिक्षणाचा अंशही नव्हता. तसं असतं तर नक्कीच फायदा झाला असता, किशोरवयात मनात होणारा भावनांचा कल्लोळ आणि शरीराची अवस्था कदाचित शिक्षकांनीच नीट समजावून सांगितली असती.
 पुढची केस जरा जास्तच कठीण होती. सीताला दिवस गेले होते आणि हे ऐकून तिच्या पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी ती ज्या खासगी शिकवणीला जात होती तिथल्या सरांशी तिचं सूत जुळलं होतं. या प्रकरणामुळे तिचं कुटुंब अक्षरश: उन्मळून पडलं. तिच्या अविचारी वागण्याचा मोठा फटका तिला आणि पर्यायाने घरच्यांनाही बसला होता. बाहेरच्या जगापासून ते कुटुंब दूर राहू लागले आणि एके दिवशी त्यांनी त्या मुलीला खूप मारले. शेवटी त्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यातून तिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं, पण अनेक दिवस ती रुग्णालयात नुसती पडून होती. निराशेने घेरलेली होती. तिला यातून बाहेर काढायला आमच्या समुपदेशकांनाही बरीच मेहनत घ्यावी लागली, कारण तिची जगण्याची इच्छाच संपली होती. ती इच्छा तिच्या मनात पुन्हा निर्माण करायला अनेक महिने गेले. त्यानंतर तिच्यात कुठेसा आशेचा किरण दिसू लागला.  
‘‘मी वाईट मुलगी आहे. माझ्या हातून चूक झाली आहे, मला जगण्याचा काही अधिकार नाही.’’ वगैरे अनेक विचार तिच्या मनात धिंगाणा घालीत होते. तिच्या मनातील वादळ तिच्या ओठावर येऊ  लागलं तसतसं मनातील राग, द्वेषही बाहेर यायला लागले. सात वर्षांची असताना तिला तिच्या काकाने केलेला स्पर्श तिच्या मनात स्त्रीदेहाविषयी घृणा निर्माण करून गेला होता. लहान वयात कुणीतरी गैरफायदा घेतल्यामुळे ती स्वत:बद्दलचा आदर हरवून बसली होती. पालकांनी या सगळ्याचं खापर तिच्यावर फोडलं. ‘तूच असं काही केलं असशील म्हणून तो तुझ्याकडे आकर्षित झाला.’ या वाक्याने तर तिचं भावविश्वच उद्ध्वस्त झालं होतं आणि ती स्वत:चाच रागराग करू लागली होती. ही परिस्थिती निवळायला वर्षांचा काळ गेला. त्यानंतर तिची गाडी हळूहळू पूर्वपदावर यायला लागली आणि औषधांचाही चांगला परिणाम दिसायला लागला.
बऱ्याच पालकांना असं वाटतं की काही काळासाठी सुट्टी घेऊन बाहेरगावी गेलं, जगाशी संबंध तोडले की दु:खाची झळ कमी होईल किंवा ज्योतिषांच्या सांगण्याप्रमाणे धार्मिक विधी-कार्य पार पाडले की सुधारेल सगळं. नाहीतर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपण घरच बदलून दुसऱ्या ठिकाणी राहायला जावं- कुटुंबाला दु:खातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या अधीर, अस्वस्थ झालेल्या मनावरही उपचार करावे लागतात हे पालक विसरतात. आपण पालक म्हणून कुठेतरी कमी पडलो असं आईला वाटत असतं तर घरातील आणखी कुणाला तरी, ‘ही सगळी आपलीच मागच्या जन्मीची पापं आहेत’, ‘कुणीतरी करणी केली आहे’ वगैरे वाटत राहतं. सगळे एकमेकांवर दोषारोप करीत राहतात. ‘या घटनेला तुम्ही जबाबदार नाही’ हे समुपदेशकांना   पालकांच्या मनावरही ठसवावं लागतं. जगापासून स्वत:ला दूर अज्ञातवासात नेऊन ठेवणं धोकादायक असतं. एकांत चांगला असतो, पण थोडय़ा वेळासाठीच, तिथे कुणीच कायमचे वास्तव्य करू नये.
‘‘मी एका मुलाच्या प्रेमात पडले आहे.’’ अंकिता मला सांगत होती. तिला त्याच्या अनेक गोष्टी आवडायच्या, त्यापैकी एक म्हणजे त्याच्या ट्रेंडी जीन्स. तो नेहमी आधुनिक कपडे घालतो, गणपतीचा कडवा भक्त आहे वगैरे गोष्टी ती मला सांगू लागली. ‘‘तुम्हाला काय वाटतं काका?’’ तिने मला विचारलं. ‘‘त्याला जुनी गाणी खूप आवडतात आणि तो छान गातो.’’ तिने मला आणखी माहिती पुरवली. ‘‘ही तुझी निवड आहे’’ मी एवढंच सांगितलं. एक महिन्यानंतर अंकिता माझ्याकडे आली तेव्हा थोडी काळजीत वाटली. धावत धावत आल्यामुळे तिला दम लागला होता. मला म्हणाली, ‘‘काका, त्याची गाण्याची आवड बदलली आहे आणि आता तो नवीन गाणी म्हणतोय,  हम तुम एक कमरे मे बंद हो, और चाबी खो जाय..’’ मी काकुळतीला येऊन तिला विचारलं, मग तू काय केलंस? माझ्याकडे बघून ती खटय़ाळ हसली आणि  म्हणाली, ‘‘मी पण मग गाणं म्हटलं ‘अभी नही अभी नही अभी करो इंतजार..’’
अनेक मुलं-मुली अशा वेळी समोरच्याला शरण जातात. ‘खरं प्रेम नेहमी संयम बाळगून असतं’ हे त्यांना अमान्य असतं. पण अंकिताचं तसं नव्हतं. झाडाच्या मागे एकमेकांना जाऊन बिलगण्यापेक्षा एकमेकांच्या समोर बसून खूप गप्पा मारणे, विचारांची देवाणघेवाण करणे तिला जास्त महत्त्वाचे वाटत होते.
अक्षय जेव्हा अकरावीत नापास झाला तेव्हा त्याच्या पालकांचा प्रचंड संताप झाला. त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली होती. ‘‘मी अकरावीचा अभ्यास वर्षभरात कधीच केला नाही’’ त्याने मला खरी गोष्ट सांगितली. प्रेमात पडून जखमी होण्यापेक्षा प्रेमात असतानाही आपल्या करिअरचा क्रम सतत चढता ठेवणं फार महत्त्वाचं असतं. अक्षयच्या बाबतीत आम्ही एक करारनामा बनवला. महाविद्यालयाच्या अभ्यासिकेत त्यांना एकत्र अभ्यास करण्याची आणि भेटायचे असल्यास एकमेकांच्या घरी पालकांसोबत भेटण्याची परवानगी दिली. पालकांचे जर मुलांशी मित्रत्वाचे नाते असेल तर असे प्रयोग नक्की सफल होतात. अभ्यासासाठी एकत्र घालविलेला हा वेळ नक्कीच फुकट जात नाही. ‘स्टडी डेटिंग’ हासुद्धा ‘डेटिंग’चाच एक भाग आहे. दोघांनाही परीक्षेत चांगले गुण मिळू लागले, शिक्षकांनी दिलेले प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण होऊ  लागले आणि पालकसुद्धा समाधानी दिसू लागले. मुलीची आई अधेमधे मुलाच्या जातीवरून थोडी नाराजी व्यक्त करायची. पण मुलाची अभ्यासातील प्रगती आणि सुधारलेली टक्केवारी पाहून हळूहळू त्या मुलीच्या आईलाही जाणवू लागले की माणसाचे सहृदयी असणे हे सगळ्यांत महत्त्वाचे आहे आणि त्या मुलाकडे ते आहे.
‘प्रेम, आयुष्य आणि शिक्षण’ या विषयावर एका महाविद्यालयात  कार्यशाळा होती. त्या कॉलेजमधील महिला प्राचार्यानी ‘लव्ह, लाइफ, लर्निग’ या शीर्षकातील ‘लव्ह’ हा शब्दच पुसून टाकला. मला आश्चर्य वाटलं, आधीच्या शीर्षकात काही चूक होती का असे विचारले असता त्या बाई म्हणाल्या, ‘आधीच आमच्या कॉलेजमध्ये बरीच प्रेमप्रकरणं चालू आहेत, त्यात या विषयाचा आणखी डोस मुलांना मिळायला नको.’ त्यांच्या या बोलण्याचं मला हसू आलं. प्रेम ही पृथ्वीतलावरची सगळ्यांत शक्तिशाली अशी ऊर्जा आहे जी गर्भापासून ते सरणापर्यंत सगळीकडे भरून राहिलेली असते. प्रेम, आयुष्य आणि शिक्षण यातील हळुवार संबंध समजावून सांगण्याची जबाबदारी शिक्षकांचीही आहे..अर्थातच इतर अभ्यासाबरोबर.    
(क्रमश:)
 डॉ. हरीश श़ेट्टी -harish139@yahoo.com
शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2015 1:01 am

Web Title: love life and education
टॅग : Life,Love
Next Stories
1 प्यारवाली लव्हस्टोरी
2 व्यसनाधीन मुलांना समजून घ्या
3 ओळखा व्यसनाधीनतेचा विळखा
Just Now!
X