News Flash

हिलींग

बदल हवा असेल तर शिक्षा न देता त्यांच्यात स्वभावात, गुणात बदल घडवून आणणं महत्त्वाचं. हे केवळ आणि केवळ प्रेमानेच शक्य आहे.

| August 2, 2014 01:01 am

बदल हवा असेल तर शिक्षा न देता त्यांच्यात स्वभावात, गुणात बदल घडवून आणणं महत्त्वाचं. हे केवळ आणि केवळ प्रेमानेच शक्य आहे.
 * Perfect maturity is when a person hurts you & you try to understand their situation & don’t hurt them back.
  * Love me when I least deserve it because that is when I really-really need it.
किती वास्तविकता आहे या शब्दांत! आपण खरंच असा विचार कधी करतो का? शाळेत किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांचं, कुठल्याशा कारणावरून आपल्या मित्रपरिवाराशी बिनसतं. अधिक प्रमाणात ‘तू तू मैं मैं’ झाल्यावर हे प्रकरण जेव्हा घरी येतं तेव्हा किंवा कधी घरातील एखादं किमती सामान त्यांच्याकडून फुटतं. कधी तर बाबांची गाडी घेऊन जाण्याचा मोह मुलाला आवरत नाही. पण नेमकी गाडी ठोकली जाते आणि बाबांचा पारा चढतो. या आणि अशा प्रकारच्या वागण्याला वडीलधाऱ्यांकडून ‘चूक’ म्हटलं जातं व मग ही चूक कुठल्याही स्वरूपाची का असेना, घरातील मोठी माणसं , विशेषत: बाबा त्याच्यावर रागावतात.  बाबांकडून ‘स्तुतिसुमनं’ उधळली जातात. ‘तू असाच आहेस, तू तसाच आहेस, तू कधी सुधारणार नाहीस, कमवण्याची नाही, पण गमावण्याची अक्कल मात्र तुला आहे.’ सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला काही लागले आहे का, याची विचारपूस न करता अनेकदा त्याच्या श्रीमुखातही भडकवली जाते. आधीच आपल्या हातून घडलेल्या कृत्यामुळे दु:खी असलेलं, घाबरलेलं ते मूल या वागण्याने अधिकच आक्रसून जातं. काही वेळेस एखादी अशी घटना घडते की, प्रौढ व्यक्तींना आपल्या स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. ‘तू माझा विश्वासघात केलास. तुला आमच्या घरात राहण्याचा काही एक अधिकार नाही,’ असं म्हणून हाताला धरून ‘गेट आऊट’  म्हणण्यापर्यंतदेखील त्यांची मजल जाते. मुलांना त्या वेळी खरी गरज कसली असते आणि आपण पालक त्यांना काय देतो?
काही दिवसांपूर्वीची गोष्ट आठवते. आई-वडील त्यांच्या साधारण आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीला घेऊन माझ्याकडे आले होते. ही मुलगी तिच्याच शाळेतील एका मुलामध्ये गुंतली होती. एका संध्याकाळी ती घरी परतली. पण चेहऱ्यावर कसलेसे डाग घेऊनच. तिला पाहताच आई-वडिलांना धक्का बसला. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. या प्रकारची पुसटशी कल्पना त्यांनाही होती. सगळ्यात खालच्या थरातील शब्द तिच्यासाठी वापरले गेले. तिला बोलण्याची संधीदेखील त्यांनी देऊ केली नाही. वर आईने तिला बेदम मारले. नंतर नंतर तर ते तिला घरात बंद करून जाऊ लागले. कारण दोघेही नोकरी करायचे. शाळेत बरेच दिवस पाठवलं नाही. मग जेव्हा शाळेत पाठवायचं ठरलं तेव्हा तिला एकटं जाऊ दिलं नाही. हळूहळू ही गोष्ट शाळेपर्यंत पोहोचली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या मुलाला शाळेतून काढून टाकण्याचे ठरवलं. कारण त्याच्या सहवासामुळे इतर मुलंही तशीच वागतील या भीतीने. या मुलीची शाळा दिल्लीतील एका नामांकित शाळांपैकी एक होती. तिथे समुपदेशक व मानसोपचारतज्ज्ञदेखील मुलांसाठी नियुक्त करण्यात आले होते. जेव्हा मी या मुलीला पाहिलं तेव्हा नकळत माझ्याकडून तिला ‘एन्जल’ म्हटलं गेलं. तिला हे ऐकून बरं वाटलं असावं, कारण तिच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं होतं. माझ्या दृष्टीने ‘कोण चूक, कोण बरोबर’ यापेक्षा त्या परिस्थितीतून तिघंही व्यवस्थितरीत्या बाहेर पडावीत अशी मनीषा होती. माझ्याचप्रमाणं त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकाने त्यांना समुपदेशनाचा सल्ला दिला. मी त्यांना एवढंच सांगितलं, ‘अशा वेळेला मुलांना आई-वडिलांकडून दिलासा मिळावा, प्रेम मिळावं अशी अपेक्षा असते. त्या वेळी त्या मुलाला रागावणं नको असतं. समजावणं नको असतं, सल्ला नको असतो, कारण ते मूल स्वत:च खूप दु:खी असतं. ज्या पद्धतीने तुम्ही तिच्याशी बोलता-वागता आहात त्या शब्दांचा तिच्यावर काय परिणाम होईल, याचा विचार करायला हवा. कदाचित तिचं भविष्यही याने खराब होऊ शकेल. आधीच त्या मुलांमध्ये अपराधीपणाची भावना आहे. लोक, समाज मला काय म्हणतील याची भीती आहे. तुम्ही तुमच्या मुलीचा विचार करा.’ पण आई-बाप हे समजू शकत नाहीत. मघाशी सांगितलेली ओळ पुन्हा आठवा. Love me when I least deserve it…. पण आई-बाप म्हणतात, आता जर का आम्ही असं बोललं नाही तर न जाणो उद्या तो -ती दुसरं काही तरी करून घरी येईल. याने होतं काय की ते मुलांचं स्वत:च्या कोशात जाणं सुरू होतं. तसंच झालं. मी त्यांना सांगितलं, यासाठी नियमित समुपदेशनाची गरज आहे. त्या तिघांना जेव्हा समुपदेशकाकडे नेण्यात आलं व सर्व बाबींची चाचपणी केल्यावर समुपदेशक म्हणाले,   ‘पुढच्या सेशनसाठी फक्त आई-वडलांना पाठवा. मुलीला समुपदेशनाची गरज नाही.’ आई-वडिलांचे परस्परांशी संबंध ठीक नव्हते. त्यातही ही त्यांची एकुलती एक. दोघांमध्ये बरेच मतभेद होते. दोघेही सतत आपलं नैराश्य मुलीवर काढायचं. आई तर बऱ्याचदा तिच्यावर हात उचलायची. तिने जिव्हाळा कधी बघितलाच नाही. त्यामुळे प्रेम काय असतं हे ती समजू शकली नाही. घरात जे प्रेम तिला मिळालं नाही, ते जिथे दिसलं तिथे ती ओढली गेली. पण आई-वडलांना जेव्हा समुपदेशकाने हे सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अर्थातच त्यांना हे आवडलं नाही, त्यांचा निर्णयही आवडला नाही. त्यांनी समुपदेशकाकडे जाणं बंद केलं. तसंच मुलीची शाळादेखील बदलली. तिच्यावर कडक र्निबध लावले गेले व काही गोष्टींची तिच्यावर सक्तीही करण्यात आली. पुन्हा वरील वाक्य आठवा.   Love me when…
आपण प्रत्येक जण दिवसातून एकदा तरी म्हणतो, ‘आय लव्ह यू बेटा.’ पण एकदा का त्यांच्याकडून काही चूक झाली तर या गोड शब्दांऐवजी घायाळ करणारे शब्दच वापरले जातात. कधी कधी काही मुलं अभ्यास करतच नाहीत, त्यामुळे त्यांना गुणदेखील कमी मिळतात. कधी तर अशी मुलं नापासदेखील होतात. काही नशेच्या अधीनही होतात. आपण लेबल लावत जातो. ‘हा मुलगा खूप वाईट आहे. आमच्या घराण्याची इज्जत धुळीला मिळवणारा आहे.’ पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर असा विचार करता येईल, की जो चूक करतो तो देखील दु:खात असू शकतो. नापास होण्याची कारणं काही वेगळी असू शकतील, पण आई-वडील मात्र म्हणतात, ‘चूक याने केली, पण त्रास मात्र आम्हाला होतो.’ खरं तर त्याच्याही मनात काही तरी सल असतोच. मला समाज, मित्रपरिवार, कुटुंब काय म्हणेल, याचंही दु:ख असतं. आता त्याला या दु:खातून बाहेर काढण्यासाठी कशाची गरज लागेल, तर ‘हीलिंग’ची. हीलिंग म्हणजे जेवढी मोठी चूक त्याच्याकडून होईल त्याला स्वीकारा, तो आहे तसा व त्याच्यावर जास्तीत जास्त प्रेम करा. या प्रेमामुळे तुमचं स्वत:चंही हीलिंग होईल व मुलगाही सहीसलामत बाहेर येईल.
केलेल्या चुकीच्या कृत्याची शिक्षा म्हणून कैद्यांना तुरुंगात ठेवलं जातं. सगळ्यांना माहीत आहे तिथलं वातावरण कसं असतं, त्यातही ‘तिहार’ जेल तर फारच प्रसिद्ध. येथील जेलमधील कर्मचाऱ्यांना एक प्रोजेक्ट दिला गेला. जे कैदी आहेत त्यांना अतिथी म्हणून वागवण्याचा. ‘अतिथि देवो भव’ म्हणतो ना आपण तसं.  तशीच या कैद्यांचीही बडदास्त ठेवली गेली. जेलमधील प्रत्येकाकडून या कैद्यांना प्रेम व आदराची भावना मिळू लागली. हा चोर आहे, हा खुनी आहे असं म्हणण्याने कशा प्रकारची ऊर्जा त्यांच्यापर्यंत जाईल? सतत तेच तेच ऐकून (त्यांना तर त्यांच्या बिल्ला क्रमांकाने संबोधलं जातं) त्याच प्रकारचं व्हायब्रेशन मिळाल्याने त्यांच्या मनातील गुन्हेगारी संपणार नाही. मग ती शिक्षा १४-१५ वर्षांची का असेना, जेव्हा ते बाहेर पडतील, तेव्हा त्यांचं मतपरिवर्तन खरंच झालं असेल का? म्हणून हा अभिनव प्रयोग संस्थेमार्फत केला गेला. जेणेकरून जेव्हा ते तुरुंगामधून बाहेर पडतील तेव्हा गुन्हेगार म्हणून नाही तर सुधारलेले नागरिक म्हणून. त्यासाठी जेलमध्येच त्यांच्यासाठी आध्यात्मिक चर्चासत्र आयोजित केली गेली,. अनपेक्षितपणे मिळालेला प्रेमाचा व आदराचा परिणाम म्हणून अर्थातच त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला. म्हणून बदल हवा असेल तर शिक्षा न देता त्यांच्यात स्वभावात, गुणात बदल घडवून आणणं महत्त्वाचं. हे केवळ आणि केवळ प्रेमानेच शक्य आहे. आता लेखाच्या सुरुवातीचं वाक्य पुन्हा वाचा. जेव्हा आपण हे प्रेम अंगीकारू, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपणही प्रगल्भ होऊ, नाही का?    
(प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या ओम शांती मीडिया या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या आध्यात्मिक प्रवचनांचा मराठी अनुवाद.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 1:01 am

Web Title: love me when i really need it
टॅग : Love
Next Stories
1 तिची-माझी मैत्री
2 झोपेचे घडय़ाळ
3 विषाद रोग ते विषाद योग
Just Now!
X