21 September 2020

News Flash

जोंधळय़ाला चांदणं लगडून आलं..

‘कोणती पुण्याई ये फळाला, जोंधळय़ाला चांदणं लगडून आलं..’ ही ना.धों. महानोरांची काव्यओळ प्रेमात साकारणारी, आयुष्याचं चांदणं करत एकमेकांसाठी असणं,

| February 8, 2014 05:02 am

‘कोणती पुण्याई ये फळाला, जोंधळय़ाला चांदणं लगडून आलं..’ ही ना.धों. महानोरांची काव्यओळ प्रेमात साकारणारी, आयुष्याचं चांदणं करत एकमेकांसाठी असणं, एकमेकांचं होणं म्हणजे काय याचा वस्तुनिष्ठ धडा देणारी ही सहा जोडपी, नातेसंबंध हरवताहेत का, सहजीवन संपत चाललंय का, हा प्रश्न विचारायला लावण्याच्या काळातली! आदर्शवत! येत्या १४ फेब्रुवारीच्या ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्ताने..
भेटवस्तू, शुभेच्छापत्रं, पुष्पगुच्छ यांची बरसात म्हणजे प्रेम की काहीही न बोलता कृतीतून प्रकटतं ते प्रेम? माझे आजोबा म्हणत, ‘प्रेम असावं आणि कृतीतून दिसावंही, मग ते बोलून दाखवण्याची गरजच नसते.’ खरंखुरं आंतरिक प्रेम असेल तरच हे शक्य होतं. प्रेमाचा खरा अर्थ समजलेल्या जीवनसाथींच्या या काही विलक्षण प्रेमकहाण्या..
अक्षय फाले ऊर्फ सनी पहिल्यापासूनच हरहुन्नरी स्वभावाचा. स्वत:च ठरवून ‘हॉटेल मॅनेजमेंट’च्या प्रगत शिक्षणासाठी स्कॉटलंडला गेला. खर्चही आपला आपणच मॅनेज केला. शिकता शिकता मित्राच्या वडिलांच्या कंपनीत नोकरीही करू लागला. चटकन मैत्री करण्याच्या स्वभावामुळे मित्रही अनेक मिळाले. स्कॉटलंडमधल्या कुठल्याशा क्लबने त्याला ‘राइट आर्म फास्ट बोलर’ म्हणून त्यांच्या टीममध्येही घेतलं. कुणीही हेवा करावा असं आयुष्य होतं त्याचं. पण..
एक दिवस असाही उजाडला.. ५ जून २०१२ हा तो दिवस. सनी नेहमीप्रमाणे सकाळी साडेसातला त्याच्या कामावर पोहोचला आणि तासाभरातच कसा कोणास ठाऊक त्याचा उजवा हात मशीनखाली सापडला. पुढच्या ५-१० मिनिटांत डॉक्टर्स, अ‍ॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड तिथे येऊन थडकले, पण मशीनखालचा हात सोडवायला ४५ मिनिटं लागली. तिकडच्या एन.एच.एस. (नॅशनल हेल्थ सव्‍‌र्हिस) तर्फे उपचारांची चोख व्यवस्था झाली. हात वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला, पण दहाव्या ऑपरेशच्या वेळी डॉक्टरांनी जाहीर केलं की, ‘हात कापल्याशिवाय पर्याय नाही.’ तोपर्यंत या पठ्ठय़ाने भारतात राहणाऱ्या आईवडिलांना टेन्शन नको म्हणून घरी काहीच कळवलं नव्हतं. त्या काळात सोबत होती ती मित्रमैत्रिणींची.
त्यातलीच एक क्लेअर. अपघात होण्यापूर्वी जेमतेम महिनाभराची त्यांची ओळख. पण या आघाताने ती जन्मजन्मांतरीचं नातं असल्यासारखी जवळ आली. हॉस्पिटलमध्ये सनीजवळ कुणी तरी २४ तास राहणं गरजेचं होतं. त्यासाठी या २३ वर्षांच्या स्कॉटिश मुलीने आपली लहानशी नोकरी सोडून दिली आणि त्या वेळी ज्या मानसिक आधाराची त्याला आत्यंतिक आवश्यकता होती तो तिने दिला.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर तर ही मुलगी आपलं सामानसुमान घेऊन सनीकडेच राहायला आली. दोघांनी पूर्ण विचार करून ‘एंगेजमेंट’ करून टाकली आणि एक छोटंसं घर भाडय़ानं घेतलं. सनीला कंपनीकडून दोन वर्षांची पगारी रजा मिळाली होती. त्यानंतर क्लेअरसमोर एकच ध्येय होतं.. सनीचा आत्मविश्वास परत मिळवून त्याला स्वावलंबी करणं! त्याला रात्र रात्र झोप येत नसे तेव्हा त्याच्या हातापायाला, डोक्याला तेलाने मसाज करणं, डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम त्याच्याकडून करून घेणं, त्याला जेवण बनवायची आवड म्हणून सर्व प्राथमिक तयारी करून त्याला ओटय़ापाशी उभं करणं.. तिचे २४ तास त्याच्यासाठीच बांधले होते.
अपघाताचं वृत्त समजताच सनीचे आईवडील प्रचंड दडपण घेऊन तिकडे गेले आणि या मुलीचं प्रेम, तिची समज, तिचा कामाचा उरक पाहून चकित झाले. त्यानंतर थोडे दिवस राहून समाधानाने परतले. क्लेअरच्या सेवेमुळे सनी ३/४ महिन्यांतच सावरला. आणि तिलाही स्कॉटिश पार्लमेंटमध्ये ‘असिस्टंट मीडिया रिलेशनशिप ऑफिसर’ म्हणून नोकरी लागली. आता त्यांनी आपल्या स्वप्नांच्या दिशेने पावलं टाकायला सुरवात केलीय.. त्या दोघांना मिळून इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात नशीब आजमावयाचंय, त्याबरोबर अपघातात हात-पाय गमावलेल्यांसाठी भरीव काम करायचंय आणि त्या सगळय़ात पहिलं म्हणजे २०१४ च्या नोव्हेंबरमध्ये भारतात येऊन हळद, मेंदी, संगीत.. अशा पारंपरिक पद्धतीने लग्न करण्यासाठी पैसे साठवायचेत.
सनी-क्लेअरच्या प्रेमकहाणीतील आणखी एक लोभस बाजू म्हणजे क्लेअरच्या आईने त्यांच्या नात्याला दिलेले आशीर्वाद. गेल्या डिसेंबरमध्ये ही जोडी ठाण्याला आली असताना क्लेअर म्हणाली, ‘माझे वडील आमच्याबरोबर राहत नाहीत, पण माझ्या आईने माझ्या निर्णयाचा आदर राखला. एवढंच नव्हे तर सनीचे आई-बाबा तिकडे आले तेव्हा आम्ही एक छोटं गेट-टूगेदरही केलं.’
क्लेअरच्या पुढचं पाऊल हेमवतीचं. हेमवती अनिलकुमार काची. हिची कहाणीच वेगळी. तिने दाखवलेल्या असीम धैर्याचं वर्णन करायला शब्दच अपुरे पडतील. मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये जवळपास राहणाऱ्या हेमवती व अनिल यांच्यात बालवयातच प्रेम अंकुरलं. शालेय जीवनात जुळलेले धागे तारुण्यात अधिकच घट्ट झाले. अनिल दहावीनंतर म्हणजे २००३च्या एप्रिलमध्ये १७ व्या वर्षीच सैन्यात भरती झाला. त्यानंतर पत्रातून त्यांचं प्रेम फुलत गेलं. घरच्यांचीही संमती होतीच. पण..
सप्टेंबर २००८ मध्ये अनिल सुट्टी घेऊन श्रीनगरहून परतत होता. मन गाडीच्या पुढे अधिक वेगानं धावत होतं.. या खेपेला लग्नाची तारीख पक्की करूनच यायचं आणि पुढच्या वेळी शादी पक्की. विचारांच्या तंद्रीत असतानाच गाडीला अपघात झाला. त्याच्या पाठीच्या कण्याला जबरदस्त दुखापत झाली. शुद्धीवर आला तेव्हा त्याला समजलं की, ‘कमरेखालची सगळी संवेदनाच नाहीशी झालीय.’ त्याच्या डोळय़ांसमोर अंधकार पसरला. या फौजीभाईची सगळी स्वप्नं क्षणात चक्काचूर झाली आणि व्हीलचेअर जन्माची सोबती झाली.
अशा परिस्थितीत तो गावी आला (पान १ वरून) तेव्हा हेमवती त्याला भेटायला आली. त्या क्षणीच तिने त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय बोलून दाखवला. काळजावर दगड ठेवून अनिलने समजावलं.. असा अविचार करू नकोस. शरीरसंबंध तर फार लांबची गोष्ट, मला नैसर्गिक विधीसाठीदेखील दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. भावनेच्या भरात तू हो म्हणशील आणि पुढे आयुष्यभर दु:खी होशील. प्रत्येकाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिचा एकच ठेका, हेच जर लग्नानंतर झालं असतं तर? यात त्याचा काही दोष नाही, मी त्याला सोडणाार नाही! काही दिवसांनी अनिल मिलिटरीच्या खडकीतील ढ.फ.उ. (पॅराप्रेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर) मध्ये राहायला आला. त्यानंतर २ वर्षांनी ही मुलगी घरातून पळून तिथे आली आणि  जानेवारी २०१० मध्ये दोघांनी पुण्यात रजिस्टर लग्न केलं.
नुकतीच २६ जानेवारी २०१४ ला त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली. अनिल २८ वर्षांचा आहे, तर हेमवती २७. सध्या ती पुण्याजवळ ‘सांगवी’ येथे आर्मी क्वार्टर्समध्ये राहतेय. खडकीच्या पीआरसीमध्ये सर्व सुविधा असल्याने अनिल तिथे राहतो आणि शनिवार- रविवार सांगवीला जातो. आता थोडय़ाच दिवसांत त्यांना खडकीला क्वार्टर मिळेल. या ४ वर्षांत दोघांचं एकमेकांवरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. हेमवतीच्या आधाराने अनिल आता माणसात आलाय. त्याच्याच शब्दात सांगायचं तर ‘उसने मेरे बेजान शरीर में जान डाली है। उसका बलिदान मैं कभी नहीं भूलूंगा।’ पण हेमवतीला मात्र आपण काही विशेष केलंय, करतोय असं वाटत नाही. खरं तर तिला खूप सोसावं लागतंय. तिच्या आईवडिलांनी तिच्याशी संबंध तोडलाय. ‘आमदनी’ही फारशी नाही. अनिलची पेन्शन अजून सुरू व्हायची आहे. हेमवती आधी नोकरी करत होती. (तिने इतिहास विषय घेऊन एम.ए. केलंय.) तिला आता मातृत्वाचाही ध्यास लागलाय. म्हणाली, ‘आय.व्ही.एफ. तंत्रज्ञानाने हे शक्य आहे. मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये सर्व सोई आहेत. नोकरी करत असताना दोघांनी साठवलेल्या पैशातून सध्या त्यांची गुजराण सुरू आहे. समोर अडचणींचा डोंगर आहे, पण तक्रारीचा शब्द नाही..
एखादी मुलगी ज्या वळणावर थबकली असती, मागे वळली असती, नेमक्या त्याच वळणावर हेमवतीने जगण्याला आव्हान दिलं आणि ती जिंकण्यासाठी लढायला तयार झाली. जेव्हा एखाद्या अंध, अपंग व्यक्तीबरोबर, शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्या जोडीदाराची गाठ बांधली जाते तेव्हा आपसूकच त्यांच्या संसाराची सगळी जबाबदारी त्यातील धडधाकट व्यक्तीच्या खांद्यावर येते. पण कधी कधी असंही घडतं.. शारीरिक अपूर्णत्वच पूर्णत्वाचा आधार बनतं आणि सहजीवनाचा एक अनोखा पैलू उलगडून दाखवतं. चंद्रकांत आणि शोभना कुलकर्णी यांची कहाणी याच वाटेवरून जाणारी..
चंद्रकांत कुलकर्णी यांची दृष्टी जन्मापासूनच अधू. त्यामुळे लग्न करताना जोडीदार अंध नको ही त्यांची ठाम अट. तरुणपणी डोळय़ांवर उपचार म्हणून संमोहनाचा कोर्स करताना शोभनाची भेट झाली. अंगावरचे कोडाचे डाग कमी व्हावेत म्हणून ती तिथे येत होती. आपलं आयुष्य एकटेपणात जाणार म्हणून खूपच उदास असायची. आत्महत्येचे विचार मनात यायचे. पण दोघांची ओळख झाली आणि चित्र बदललं. खरं म्हणजे शोभना चंद्रकांतपेक्षा ६ वर्षांने मोठी, पण तेव्हापासून आजपर्यंत समजावण्याची, धीर देण्याची भूमिका चंद्रकांत यांची. पत्नीमधला हा न्यूनगंड काढण्याचा त्यांनी चंगच बांधला. तिच्यातील माणसं ओळखण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती त्यांनी ओळखली आणि तिला पोस्टाची एजन्सी घ्यायला लावली. सुरुवातीला मला जमणार नाही म्हणणाऱ्या शोभनाने नंतर वर्षांला ३ ते ४ कोटीं रुपयांचा व्यवसाय केला जो आजही सुरू आहे. बायकोला सावरण्याचे प्रसंग तर चंद्रकांत यांच्या आयुष्यात अनेकदा आले. या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी उपवर झाली तेव्हा तिच्यात काहीही दोष नसताना केवळ आईवडिलांमुळे तिला नकाराला सामोरं जावं लागलंय. हे पचवणं शोभनाताईंना खूप जड गेलं. तेव्हाही त्यांची आशेची ज्योत विझू न देण्याचं काम चंद्रकांतनी केलं आणि आज त्यांना उत्तम जावई नव्हे तर एक हक्काचा मुलगा मिळालाय.
दोघांनी मिळून ट्रेकिंगला जाणं, तिच्याकडून उत्तमोत्तम पुस्तकं वाचून घेणं, जोडीने संगीत ऐकणं.. अशा समृद्ध वाटेने या दोघांचं सहजीवन गेली ३५ वर्षे फुलत आलंय. चंद्रकांत  आज रेल्वेत सुपरिंटेंडंट आहेत. गेल्या काही वर्षांत पूर्ण अंधत्व आलंय. तरीही आनंद देण्याचा आणि घेण्याचा वसा तसाच आहे. आपल्या सुखी संसाराचं गुपित सांगताना शोभनाताईंनी ना. धों. महानोर यांच्या शब्दांचा आधार घेतला. म्हणाल्या, ‘कोणती पुण्याई ये फळाला, जोंधळय़ाला चांदणं लगडून आलं..’
आयुष्याची दिवेलागण होताना जेव्हा घरात दोघंच उरतात अशा वेळी जर एकाला एखाद्या असाध्य रोगाने गाठलं तर आलेल्या परिस्थितीला धीराने सामोरं जाण्यात दुसऱ्याच्या प्रेमाची खरी कसोटी लागते. या कसोटीवर १०० टक्के उतरून वाटय़ाला आलेल्या निरस जीवनात आनंदाचे रंग भरणाऱ्या सविता व वसंत चितळे यांच्या सहजीवनाची ही पिकून रसाळ झालेली कथा!
त्यांच्या लग्नाला आता ४२ वर्षे झालीत. सविताताईंनी ६५ चा टप्पा ओलांडलाय, तर वसंतरावांनी ७३ पावसाळे पाहिलेत. मुलगा दुबईला असतो तर मुलगी तिच्या संसारात, वेळप्रसंगी धावून येणारी. मुलुंडच्या घरात ही दोघंच. सविताताई आमवाताने (रुमाटॉइड आथ्र्रायटिस) हालचाल करण्यात असमर्थ आणि वसंतराव त्यांना  भरवण्यापासून झोपवण्यापर्यंत सर्व काही एकटय़ाने करणारे..
वाटय़ाला आलेलं बंदिस्त, एकाकी जीवन दोघांनीही समजून उमजून आपलंसं केलंय. एवढंच नव्हे तर त्यात आनंदाची फुलबागही फुलवलीय. खुर्चीत बसून वा बिछान्यावर पडून सविताताईंनी लोकप्रिय अशा अनेक हिंदी गाण्यांचा मूळ चालीवर म्हणण्याजोगा भावानुवाद केलाय. ‘साज हिंदी बाज मराठी’ नावाच्या त्यांच्या या काव्यसंग्रहाचं याच महिन्यात प्रकाशन होतंय. वाटय़ाला आलेल्या शून्यापाठी जोडीदाराच्या मदतीने दहा लिहून त्याचे शंभर करण्याच्या त्यांच्या या प्रयत्नांना सलाम करायलाच हवा.
सचिवालयात राजपत्रित अधिकारी म्हणून नोकरी होती सविताबाईंची, पण आजारामुळे प्रवास झेपेना तेव्हा म्हणजे १९९६ मध्ये त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेणं भाग पडलं. सर्व प्रकारचे औषधोपचार घेऊनही रोग वाढतच गेला आणि घरातल्या घरात चार पावलं टाकणंही अशक्य झालं तेव्हा समोर पसरलेला उभा दिवस आणि बरेचदा रात्रदेखील कशी संपवायची हा प्रश्न त्यांना छळू लागला. गाण्याच्या उपजत आवडीमुळे त्यांना हिंदी गाण्यांचा मराठी अनुवाद करण्याची कल्पना सुचली. या शोधानं दोघांचं जग बदललं.
सविताताईंनी थोडय़ा थोडय़ा नव्हे तर तब्बल ८० गाण्यांचं मराठीकरण केलंय. ‘सावन का महिना’ या गाण्यात ‘अरे बाबा, शोर नहीं सो..र’ या ठिकाणी त्या म्हणतात.. ‘अरे बाबा, भांडखोर नाही, बंडखो..र’ तर ‘ज्योती कलश छलके’ या गाण्यातली ‘हुए गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के..’ ही ओळ त्यांनी ‘गुलाबवर्णी सुवर्णवर्खी रंग नभी भरले.’ अशी नटवलीय. अर्थात या निर्मितीत बरोबरीचा वाटा त्यांच्या जोडीदाराचा. मूळ गाण्यातील शब्द नीट कळावेत म्हणून ती गाणी कॉम्प्युटरमधून जशीच्या तशी उतरण्यापासून उर्दू शब्दांसाठी मराठी शब्दकोश शोधून आणण्यापर्यंत सर्व धडपड त्यांचीच. म्हणूनच हा काव्यसंग्रह म्हणजे या दोघांच्या अद्वैताला आलेलं मधुर फळ म्हणावं लागले.
आता तर सविताताईंचं एक तान्हं बाळंच झालंय. सकाळी ब्रशवर पेस्ट लावण्यापासून, केस विंचरणं, कपडे घालणं (तीही साडी) सगळंच परस्वाधीन. दमट हवेत वेदना अधिकच तीव्र होतात. ‘एखादी बाई का नाही ठेवत यांचं करायला?’ या प्रश्नावर वसंतरावांचं उत्तर, ‘आपल्या माणसांचं करण्याने आपलेपणा वाढतो ना’ ऐकताना गलबलूनच आलं. वसंतराव रोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळात एक तासभर बाहेर पडतात आणि बँक, भाजी व इतर किरकोळ कामे करून येतात. तेवढा वेळ सविताताईंना टीव्हीसमोर चैत्रगौरीसारखं टेबलखुर्ची मांडून बसवलेलं असतं. रिमोट आणि मोबाइल हाताशी ठेवलेला असतो. तासाभरानंतर वसंतराव लॅच उघडून आत आल्यावरच पुढची हालचाल. अशा परिस्थितीतही घरातलं वातावरण मात्र आनंदी. माझ्याच वाटय़ाला का.. हा भाव कुठेच दिसत नाही. ‘सुख आणि दु:ख यांच्यामध्ये फक्त दृष्टिकोनाचं अंतर असतं’ हे सुवचन चितळे पती-पत्नीकडे पाहून पटतं.
प्रेम कृतीतून दिसावं म्हणणारे माझे आजोबा त्या काळातील संस्कृत पंडित तर आजी अक्षरशत्रू. माझ्या आठवणीत ती दोघं कधी सुखदु:खाच्या गोष्टी बोलत बसलेत असं दिसलं नाही की कधी कुठल्या निर्णयात त्यांनी आजीचं मत विचारलं नाही, पण आजीच्या अकस्मात जाण्यानंतर आमच्या या धट्टय़ाकट्टय़ा आजोबांनी एक महिन्याच्या आत आपला देह ठेवला. खरेखुरे व्हॅलेन्टाइन यापेक्षा वेगळे थोडेच असतात?   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 5:02 am

Web Title: love story on the occasion of valentine day
Next Stories
1 प्रगल्भता प्रेमातली
2 जीवनाची समग्रता
3 बदलासाठी मी तयार आहे?
Just Now!
X