मदारी जमातीचा परंपरागत व्यवसाय त्यांना जीवनाधार देण्यासाठी पूर्वीपासून कमजोरच होता आणि आता तर भिक्षा प्रतिबंधक व बाल मजुरी संबंधातले कायदे आले, त्यामुळे त्यांचे रस्त्यावरचे करमणुकीचे कार्यक्रम बंद झाले. वन्य जीव संरक्षक कायदा आला त्यामुळे वन्य जीव सांभाळणे गुन्हा ठरला. वनसंवर्धनाचे व वैद्यकीय कायदे आले आणि देशी जडीबुट्टीवाला संपला. अशा तऱ्हेने मदाऱ्याचे व्यवसाय निरुपयोगी ठरले. त्यामुळे आलेल्या विपन्नावस्थेवर तातडीने पर्याय शोधण्याची गरज आहे.
‘‘या जागेवर आमची पाले पडून पन्नासहून अधिक वर्षे झाली. तेव्हापासून आतापर्यंत आम्ही आहो तसेच आहोत, ना नोकरी, ना जागा, ना घर. ना पाणी, ना वीज, ना संडास. रोडशेजारी असलेल्या बंगलेवाल्यांकडून वर्षांनुवर्षे पिण्याचे cr23पाणी आणतो. दयाबुद्धीने ते देतात. मदाऱ्याचा खेळ करत चार-सहा महिने गावोगाव भटकणे, असा आमचा उपजीविकेचा भटका व्यवसाय आहे. इथल्या पालांत आमची म्हातारी माणसे कायमची राहतात. आमच्या दुर्दैवाने, लोकांमध्ये असा गैरसमज पसरला आहे की, आम्हाला घरे बांधण्यासाठी सरकारी जागा देण्यात आली, मात्र आम्ही त्या जागा दुसऱ्याला विकून पुन्हा पालात राहायला आलो. ही अफवा आहे, सत्य परिस्थिती नाही. हे वारंवार सांगूनही आमच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत.
घर मिळण्यासाठी आम्ही काय काय नाही केले? सर्वात प्रथम १९८०-८१ मध्ये मदारी समाजाचा पहिला राज्यव्यापी मेळावा नाशिकच्या येवला येथे घेतला. निराधार मदाऱ्यांना घर मिळावे ही प्रमुख मागणी होती. त्या वेळी गळ्यात साप अडकवून अनवाणी पायांनी राज्यातल्या कानाकोपऱ्यांतून मेळाव्यास चालत आलेल्या मदाऱ्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. वर्तमानपत्रांनी फोटोसह मोठ-मोठय़ा बातम्या छापल्या होत्या. सुरुवातीच्या काळात शेतकरी संघटनेचे मोहन गुंजाळ, कॉ. रणजीत परदेशी, भगवान चित्ते, योगेंद्र वाघ, पत्रकार सय्यदभाई कौसर यांचे मार्गदर्शन होते. अडचणीच्या वेळी त्यांचा आम्हास खूप आधारही होता. त्यांच्या पुढाकाराने स्थानिक पातळीवर आम्ही मोर्चेही काढले होते. मालेगावचे त्या वेळचे आमदार निहाल अहमद यांच्या मोर्चातही आम्ही सारे साप घेऊन मुंबईला गेलो होतो. त्या वेळी त्यांनी आमची मंत्रिसाहेबांशी भेट घडवून आणली होती. त्यांनी घर देण्याचे आश्वासन दिले होते. नाशिकच्या सेंट्रल जेलवर   प्रा. मोतिराज राठोड यांनी काढलेल्या ‘बिऱ्हाड मोर्चा’त नाचणाऱ्यात आम्ही व आमची बिऱ्हाडे आघाडीवर होती. जी. जी. चव्हाण यांनी येवल्यात काढलेल्या अनेक मोर्चात नाचलो. शिवाय त्यांनी नाशिक येथे आणि मुंबई येथे काढलेल्या अनेक ‘बोंबा बोंब मोर्चा’त लेकराबाळासह उपाशी पोटी सामील झालो, पण या साऱ्याचा तितकासा उपयोग झाला नाही. एक झाले- मतदार यादीत आमची नावे आली. १०५ लोक मतदार बनले. मताचा अधिकार मिळाल्याचा आनंद झाला. निवडणुकीत आम्ही घरे मागायचो. निवडून आलो की घरे देतो, असे आश्वासन मिळायचे. अनेक निवडणुका झाल्या. अनेकदा आश्वासने मिळाली. पण डोक्यावर हक्काचे छप्पर अद्यापि मिळाले नाही. म्हणून एकदा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हा ‘तुमची पालवस्ती अनधिकृत आहे, तक्रार करून ती उठवू,’ अशी धमकी मिळाली. मतदार झाल्याने आश्वासने किंवा धमकी मिळणे याला सोडून तिसरा लाभ अद्यापि आम्हाला झालेला नाही.
सरकारला एक अर्ज लिहू शकेल, सरकारी योजनांची माहिती वाचून समजावून देऊ  शकेल अशी एखादी व्यक्ती आजही आमच्या पन्नास कुटुंबांत नाही. आम्ही सारेच अशिक्षित व प्रत्येक बाबतीत परावलंबी आहोत. एखादे पत्र किंवा अर्ज लिहायचे तर शहाणा माणूस शोधत गावात जावे लागते. बाहेर दूर राहणारे कोण किती उपयोगी पडणार आम्हाला? आमच्या संपूर्ण वस्तीत जास्त शिकलेली महिला म्हणजे पाचवीत गेलेली (पास नव्हे) शाहिन निसार मदारी. आता ती वीस वर्षांची असून एका लेकराची आई आहे. वस्तीतली आठ-दहा मुले सध्या अंगणवाडी /बालवाडीत जातात. आई-वडिलांच्या व्यवसायात त्यांची गरज लक्षात घेता चौथी-पाचवीच्या पुढे ती शिकू शकणार नाहीत. बाकी सर्व शाळाबाह्य़ मुले आहेत. आमच्यात मागून खायची परंपरा नाही. मात्र गेले आठ दिवस पावसाने चांगलाच जोर धरलाय. पालात पाणी, बाहेर पाणी. कामधंदा बंद, चूल बंद. भुकेली लेकरेबाळे पाहवत नाहीत. अशा अवस्थेत पाऊस थोडासा जरी उघडला तर आमच्या म्हाताऱ्या बाया खायला मागायला जातात. मिळेल त्यावर गुजराण चालू आहे.’’ अशी माहिती मदारी जमातीच्या शबाना, रुक्साना, फरिदा, इर्शाद, शाबिरा, नागिरा या महिला त्यांच्या पालवस्तीतल्या अनेकांसह देत होत्या. बैठकीत नबाब, सलीम, शहाबुद्दीन, अजामुद्दीन, महमद व बुढन मदारी ही प्रमुख पुरुष मंडळीही हजर होती. आम्ही होतो, नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील लक्कडकोट क्षेत्र, विंचूर रोड, इदगाह मैदान शेजारी असलेल्या मदारी जमातीच्या वस्तीत. सदरच्या पालवस्तीतली स्वच्छता वाखाणण्याजोगी असली तरी वस्तीभोवती लोकांनी टाकलेल्या कचऱ्याची व घाणीची दरुगधी असह्य़ होती.cr20
मदारी या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ- रस्त्यावर हातचलाखीचा, जादूचा खेळ दाखविणारा असा आहे. तो आपल्या जादूच्या जोरावर भुताखेताला खेळात हजर राहायला भाग पाडतो असा समज आजही लोकांमध्ये आहे. मदारी आणि जमुरा मिळून हा खेळ करतात. मदारी म्हणजे धनी. जमुरा म्हणजे मदारीच्या आज्ञांचे निमूटपणे पालन करणारा साहाय्यक. प्रत्यक्ष खेळात ते एकमेकाला उद्देशून उस्ताद-जमुरा, किंवा उस्ताद-बच्चा असा उल्लेख करतात. खेळात शब्दछल करून किंवा काही उपहासात्मक मुद्दे उपस्थित करून विनोदी वातावरणनिर्मितीही केली जाते. प्राचीन काळापासून याला ‘मदाऱ्याचा खेळ’ असे संबोधले जाते. या खेळात मदाऱ्यांची लहान मुले जमुराचे काम करतात. प्रसंगी आठ-दहा वर्षांच्या मुलीही जमुराचे काम करतात.
भारत, पाकिस्तान व बांगलादेश या तिन्ही देशांत विखुरलेली, भटकी जीवन पद्धती असलेली मदारी ही जमात भूमिहीन व बेघर आहे. वर्षांनुवर्षे रस्त्यावर केला जाणारा हातचलाखीचा व जादूचा तोच तोच खेळ उपजीविकेस कमकुवत ठरत आहे हे लक्षात आल्यावर, त्या खेळाच्या जोडीला वन्य प्राण्यांचे प्रदर्शन करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यासाठी साप, अस्वल, माकड, सरडा, रंग बदलणारा सरडा, मुंगूस, घुबड आदी प्राण्यांना किंवा त्यांपैकी काहींना पकडण्यात, सांभाळण्यात व त्यांना प्रशिक्षित करण्यास आवश्यक असलेली कुशलता त्यांनी संपादन केली. काही जण जाईल तिथे लोकांच्या मागणीनुसार औषधी वनस्पतींचा पुरवठा करू लागले. पुढेपुढे अनुभवातून ते रोगनिदान, उपाय व पुरवठा अशी तिन्ही कामे करू लागले. काही प्रांतांत त्यांना ‘देशी जडीबुट्टीवाले’ असे नाव पडले. अशा तऱ्हेने हातचलाखी व जादूच्या खेळासोबत मदाऱ्यांच्या परंपरागत व्यवसायात वन्य प्राण्यांचे प्रदर्शन आणि देशी जडीबुट्टीचा पुरवठा या व्यवसायांची भर पडली. महाराष्ट्रात मदाऱ्यांना ‘साप गारुडी’ म्हणून ओळखले जाते.
राजपूत पिता आणि मुस्लीम आई यांच्यापासून मदारी जमातीचा विस्तार वाढलेला आहे अशी आख्यायिका आहे, मात्र हे सारे मदारी ‘अवध’ संस्थानातील मकानपूर येथील नामवंत सुफी संत ‘जिंदा शाह’ यांचे अनुयायी आहेत. यांच्या भक्तांना (मदाऱ्यांना) विस्तवापासून आणि सापाच्या व विंचवाच्या विषापासून सुरक्षित राहता येईल, शिवाय त्यांच्या डसण्यावर उपाय करण्याचे सामथ्र्य त्यांच्यात असेल, असे आशीर्वाद त्यांनी दिले आहेत.
मदारी ही जमात भारतातल्या बहुतेक सर्व राज्यांमध्ये पसरलेली आहे. राजस्थान व उत्तरेत यांना ‘जंगल का योगी’ समजतात. तामिळनाडू व दक्षिणेत यांना ‘पामबत्ती’ म्हणतात. पाम्बू म्हणजे साप. उर्दू व हिंदीमिश्रित असलेली त्यांची स्वतंत्र ‘मदारी’ ही बोलीभाषा आहे. इतर लोकांशी ते स्थानिक भाषेत बोलतात.  मदारी जरी स्वत:ला मुस्लीम म्हणवून घेत असले तरी ते कोणत्या धर्माची किंवा पंथाची बंधने काटेकोरपणे मानताना दिसत नाही. त्यांची कमालीची गरिबी आणि भटक्या जीवनपद्धतीमुळे यांच्याशी नातेसंबंध जोडण्यास स्थिर मुस्लीम समाजातून कोण धजावत नाही. सामान्यपणे मुलींना शाळेत घातलेच जात नाही. एखाद्याने घातलेच तर चौथी-पाचवीच्या पुढे शाळा बंद केली जाते. साखरपुडा मुलीच्या लहानपणीच उरकला जातो.
मुलगी वयात आली की वयाच्या बारा-तेराव्या वर्षी लग्न केले जाते. हुंडा पद्धत नाही. पाच दिवसांच्या लग्नाची आधीची पद्धत बंद होउन ती तीन दिवसांवर आली आहे. पहिल्या दिवशी मंडवा(मांडव), फाते देणे (पूर्वजांच्या नावे मांसाहारी नैवेद्य व मोजक्या लोकांना जेवण) आणि हळद. दुसऱ्या दिवशी मेहंदी व नाचगाणे. तिसऱ्या दिवशीचे अंतिम लग्न कलमा वाचून होते. लग्नाचा खर्च मुलाकडूनच केला जातो. काही वेळा दोन्ही बाजूंकडून केला जातो. पंचांचे जेवण दिले जाते. ते लग्नाला आलेल्या सर्वासाठी असते. लग्नाचे हे जेवण मांसाहारीच असले पाहिजे असा नियम आहे. इतर समारंभाची जेवणेसुद्धा मांसाहारीच असतात. अशा सामूहिक कार्यक्रमात शाकाहारी जेवणास बंदी आहे. महिलांना दागिन्यांची खूप आवड आहे. गळ्यात काळ्या मण्यांची पोत, पायाच्या अंगठय़ात चांदीचे जोडवे, नथनी, हातात काचेच्या बांगडय़ा या विवाहित स्त्रीच्या खुणा आहेत. तिळी, बाळी,  कंठा, बिनबियान, घारीचुरी अशा नावाचे सोन्या-चांदीचे दगिने जमेल तसे करतात. डोक्याच्या दोन्ही बाजूंना केसात सोन्याची किंवा चांदीची फुले घालण्याची पद्धत आहे. पण गरिबीमुळे मुलींची दागिन्याची हौस कृत्रिम दागिन्याने पुरी केली जाते.
मुलाच्या आणि मुलीच्या जन्माचे स्वागत सारखेच केले जाते. मुलगी झाली तर पाचव्या दिवशी पाचवी पुजण्याचा कार्यक्रम होतो. मुलगा झाला तर तो सहाव्या दिवशी होतो. हा कार्यक्रम म्हणजे घरातला (पालातला) एक कोपरा शेणाने सारवून स्वच्छ केला जातो. त्यावर छोटे गारगोटीचे सात दगड (साती असरा) ठेवले जातात. त्यावर पान, सुपारी, हळद-कुंकू, दातवण ठेवून पूजा केली जाते. साध्या शाकाहारी जेवणाचे नैवेद्य दाखवून जवळच्या मोजक्या नातेवाइकांना, मित्रांना जेवू घालतात. घरातली मोठी बाई ही पूजा करते. दुसऱ्या दिवशी हे सारे पूजा साहित्य शक्य तो वाहत्या पाण्यात (नदी किंवा ओढा) तशी सोय नसेल तर तलावात, विहिरीत टाकतात. जन्मानंतर सव्वा महिन्याच्या आत पंचांना व इतर नातेवाईक-मित्रांना बोलवून बाळाचे नामकरण केले जाते. याही वेळी सर्वाना शाकाहारी जेवण दिले जाते. अशा तऱ्हेने जन्मविधी हिंदू पद्धतीने होतात पण मृत्यूनंतर प्रेत पुरले जाते. त्या वेळचे विधी मुस्लीम धर्माप्रमाणे केले जातात. परंतु अन्त्यविधीसाठी धर्म व्यवस्थेतला पुरोहित किंवा खास तज्ज्ञ व्यक्तीला बोलावले जात नाही. सामान्यपणे डेऱ्यातला जुना वयस्कर माणूसच अन्त्यविधी करतो.
घटस्फोट व पुनर्विवाह याबाबत मात्र विभागवार वेगळे नियम आहेत. खास करून येवला व परतवाडा-अमरावती येथील पंचायतीच्या नियंत्रणाखाली असलेल्या महाराष्ट्रातल्या तमाम मदाऱ्यांत महिलांच्या पुनर्विवाहास मान्यता नाही. लग्नानंतर एक वर्षांच्या आत विधवा झाली तरी पुनर्विवाहास मान्यता नाही. ती सासरी किंवा माहेरी राहू शकते. तिने स्वमर्जीने दुसरा विवाह केलाच तर तिच्या कुटुंबीयांसह तिला वाळीत टाकले जाते. नवरा मुलगा जमातीतला असेल तर त्याच्या कुटुंबालाही बहिष्कृत केले जाते. पुरुषाला पुनर्विवाहाची परवानगी आहे, परंतु केवळ अविवाहित मुलीशीच. एखादे मूल झाले तर मुलीला कोणत्याही परिस्थितीत घटस्फोट मिळत नाही. मूल होण्याआधी घटस्फोट मिळू शकेल पण पुनर्विवाह करता येणार नाही. यांच्यात ‘बिरादरी पंचायत’ आहे. बलात्कार, व्यभिचार, चोरी, फसवणूक आदी गुन्ह्यांबाबत त्यांची पंचायत बसते. अशा पंचायतीसाठी वस्तीतली जुनी व अनुभवी माणसे निवडली जातात. मात्र पंचायतीत महिलांचा समावेश नसतो.
राजस्थान व उत्तरेतल्या मदाऱ्यांमध्ये महिलांना पुनर्विवाहास परवानगी आहे. पती, पत्नी दोघांपैकी कोणीही व्यक्ती घटस्फोट मागू शकते. जी मागेल तिला समोरच्या पार्टीला नुकसानभरपाई द्यावी लागते. नवरा मेला तर त्याच्या धाकटय़ा भावाशी तिला लग्न करावे लागते. धाकटा भाऊ  तयार नसेल तर तो ‘नात्रा’ करू शकतो. म्हणजे दुसऱ्या पुरुषाशी लग्न करण्यास परवानगी देऊ  शकतो. यासाठी काही पैसे धाकटा भाऊ  घेऊ  शकतो. सुनेने बुरखा घेतला पाहिजे असा नियम आहे. समाजजीवनात महिलांचा दर्जा दुय्यम आहे.
या अशा जमाती म्हणजे मुहम्मेडन (मुस्लीम) व्यवस्थेतला ‘बेशारा’ (बेसहारा) घटक समजला जातो. हे मदारी लोक, हिंदू जोगी किंवा संन्यासी यांच्यासारखेच विभूतीचा वापर करतात. शिवाय जोगींप्रमाणे भांग वापरतात. मशिदीत रोज प्रार्थना किंवा नमाज यांच्याबाबत इतरांएवढे गंभीर व नियमित नाहीत. त्यांच्याकडे त्यांच्या लोककथा, लोककला, लोकगीते आहेत. ज्यांच्या साहाय्याने ते त्यांच्या भटक्या जीवनाचा अनुभव, इतिहास, स्थलांतर, परंपरा यांचे वर्णन करतात.
मदारी जमातीचा परंपरागत व्यवसाय त्यांना जीवनाधार देण्यासाठी पूर्वीपासून तसा कमजोरच होता. आजच्या आधुनिक विकास प्रक्रियेत भिक्षाप्रतिबंधक व बालमजुरीसंबंधातले कायदे आले, त्यामुळे त्यांचे रस्त्यावरचे करमणुकीचे कार्यक्रम बंद झाले. खेळात ‘जमुरा’ असणे गुन्हा ठरला. वन्य जीव संरक्षक कायदा आला आणि साप, माकड आदी वन्य जीव सांभाळणे गुन्हा ठरला. पर्यावरणाचे, वन संवर्धनाचे व वैद्यकीय कायदे आले आणि देशी जडीबुट्टीवाला संपला. अशा तऱ्हेने मदाऱ्यांचे परंपरागत व्यवसाय उपजीविकेसाठी निरुपयोगी ठरले. त्यामुळे आलेल्या विपन्नावस्थेचे प्रथमबळी (कुपोषण, रोगराई, अन्याय-अत्याचार अशा अनेक कारणाने) त्यांच्या महिला ठरत आहेत.
समाजाच्या कल्याणासाठी केलेले कायदे काही लोकांचे जगण्याचे अधिकार हिरावून घेत असतील तर त्यांच्या हितासाठी तातडीने व प्राधान्याने पर्याय शोधण्याचा विचार व कृती सरकारने करू नये तर कुणी करावी?
अ‍ॅड. पल्लवी रेणके – pallavi.renke@gmail.com

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Sudden transfer of municipal officials has affected the pre-monsoon work
महापालिका अधिकाऱ्यांच्या अचानक बदलीमुळे पावसाळ्यापूर्वीच्या कामांना फटका
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!