मार्गरेट थॅचरबाईंची आर्थिक धोरणं, ठाम राजकारण,  सामाजिक गती, कमीत कमी चलनवाढ, मुक्त बाजारपेठ, खासगीकरण व कामगार संघटनांवर वचक ही परिणामकारक सूत्रे अंगीकारून आता लेबर पक्ष वाटचाल करतो, एवढे सांगितले तरी मार्गरेट थॅचर व थॅचरिझम म्हणजे काय ते समजावे!  
इंग्लंडसारख्या देशाच्या नेतृत्वाचे सुकाणू सलग ११ वर्षे सांभाळणाऱ्या मार्गरेट थॅचर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्याविषयी..
इंग्लंडसारख्या देशाच्या नेतृत्वाचे सुकाणू सलग ११ वर्षे सांभाळणे सोपे नव्हेच. म्हणजे ओळीने तीन-तीन वेळा पंतप्रधानपद भूषविणे आवश्यक ठरते. मुळातच इ.स. १८३२ च्या ‘ग्रेट रिफॉर्म अ‍ॅक्ट’ पासून ब्रिटनमध्ये एकाच व्यक्तीने असे ओळीने हे पद प्राप्त करण्याचे उदाहरण घडलेच नव्हते. अगदी सर विन्स्टन चर्चिलसारख्या, म्हणजे ज्याने दुसऱ्या महायुद्धाचा इशारा देऊन जगाच्या तारणहाराच्या भूमिकेतून ते महायुद्ध जिंकून दाखविले, त्या अलौकिक नेत्यालाही इंग्रज जनतेने ‘आता तुमची गरज संपली’ असे स्पष्ट करून युद्धोत्तर घरी पाठविले होते आणि डेव्हिड जॉर्ज लॉईडसारख्या थोर मुत्सद्दय़ालाही आपटबार दाखविला होता. अशा परंपरेत मार्गरेट हिल्डा रॉबर्टस् डेनिस थॅचर ही तद्दन मध्यमवर्गातून आलेली महिला ब्रिटनची पहिली महिला पंतप्रधान बनणे; एवढेच नव्हे तर सलगपणे तीन वेळा निवडून येऊन त्या पदावर बसणे हे अविश्वसनीय होते. त्याव्यतिरिक्त इंग्लंडच्याच नाही तर जगाच्या राजकारणावर आणि अर्थकारणावरही तिचा ठसा उमटणे हेही अतक्र्य होते. किंबहुना, आधुनिक अर्थशास्त्राची सुरुवात जॉन अ‍ॅडमच्या धडय़ापासून झाली आणि त्यात माल्थस सिद्धांताने नवी दृष्टी दिली, तर जॉर्ज मार्शलने त्यास हृदय दिले असे म्हटले जाई. आता १९८० पासून  त्यात ‘मॅगीनॉमिक्स’ (मार्गरेट थॅचर यांना मॅगी हे संबोधन दिले गेले होते) आणि राजनीतिशास्त्रात ‘थॅचरिझम’ या दोन संज्ञांची भर पडली आहे.
 विसाव्या शतकाचे एक वैशिष्टय़ लक्षात यावे. या शतकात कित्येक लढाया आणि दोन महायुद्धे झाली. त्यांची विभागणी करू जाता असे दिसते की, तीन महिलांनी लढविलेली तीन युद्धे ऐतिहासिक आणि भौगोलिक, सैद्धांतिक आणि सामरिक वा चारही दृष्टिकोनांतून १०० टक्के निर्णायक ठरली. पहिले युद्ध इस्राएलच्या गोल्डा मेयरनी लढवून जिंकले, दुसरे युद्ध भारताच्या इंदिरा गांधींनी बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्णायक उभारणी करून जिंकले तर तिसरे युद्ध फॉकलंड बेटावरील अधिकार कायम राखण्यासाठी ब्रिटनच्या मार्गरेट थॅचर यांनी जिंकले. फॉकलंडस् युद्ध हा थॅचरबाईंचा कळसाध्याय मानला जातो. वस्तुत: मॅगी थॅचर यांचे एकूण राजकारण- अर्थकारणही कळसाध्याय ठरावेत. तथापि, एका स्त्रीने युद्ध  करणे, जिंकणे म्हणजे अतक्र्य मानण्याएवढी जगातली राजकीय परिस्थिती पुरुषप्रधान होती त्यामुळे असेल कदाचित, पण गोल्डा मेयर आणि यॉॅम किप्पूर युद्ध, इंदिराजी आणि बांगलादेश मुक्तियुद्ध व मॅगी थॅचर आणि फॉकलंड्स युद्ध अशी सांगड या तिघींच्याही बाबतीत प्रामुख्याने पाहिली जाते. पृथ्वीच्या पाठीवरची बेटे इवलाली असती किंवा विस्तीर्ण असती तरी दुर्लक्षणीय खासच नसतात. याचा पहिला धडा दुसऱ्या महायुद्धाने दिला आणि बेटांच्या अधिकाराबाबत आग्रह धरायचा असतो हा वस्तुपाठ रिएगो गार्सिया बेटाच्या निमित्ताने समजला. तर बेट राखण्यामागे सामरिक दृष्टीशिवाय अर्थकारण, राजकारण आणि अस्मितेचे लोकहितही समजून घेऊन युद्ध लढायचे असते हे फॉकलंडने स्पष्ट केले.
मॅगीनॉमिक्स तथा थॅचरबाईंचे अर्थकारण पोथीनिष्ठांचे नव्हते. आल्फ्रेड रॉबर्ट्स हे बाईचे वडील. त्यांचे ग्रँटहॅम (लिंकनशायर परगणा) येथे ग्रोसरी स्टोअर होते. स्टोअरच्या वरच्या मजल्यावर हे कुटुंब राहत होते. व्यापारी व्यवसाय असला तरी आल्फ्रेड रॉबर्ट्स, मेथडिस्ट ख्रिस्ती पंथाचे धर्मसेवक म्हणूनही काम पाहत. पुढे ते ग्रँटहॅमचे मेयरही झाले. मार्गरेटना आई-वडिलांचे काटकसर, करडी शिस्त (मेथडिस्ट पंथाचे नावच पराकोटीच्या शिस्तीमुळे, पद्धतशीरपणामुळे मेथडिस्ट असे बनले आहे) आणि उद्योगजकता हे तीन महत्त्वाचे संस्कार लाभले. पुढच्या उज्ज्वल राजकीय भविष्याचा हा पाया होता. मेथडिस्ट तत्त्वानुसार राष्ट्र, राष्ट्राची नैसर्गिक संपत्ती, पाणी-नद्या-तळी, इतर संपदा ही माणसांनी ‘भोगी’ या भूमिकेतून उपभोगायची नसते तर रक्षक या भूमिकेतून राखायची असते. याच संपत्तीत ‘समय’ हीदेखील संपत्ती मानल्यामुळे प्रत्येक फुरसतीचा क्षण मॅगी रॉबर्ट्सने अभ्यासात घालविला होता. ऑक्सफर्डमधून रसायनशास्त्रात पदवी मिळवणाऱ्या या मुलीने वेळ मिळाल्यावर अर्थशास्त्र, राजनीती, कायदा आणि दंडाधिकार, समाजशास्त्र आणि परराष्ट्रनीती या विषयांवरील मिळतील ते ग्रंथ वाचून, अभ्यासून, स्वयंशिक्षित बनण्यावर भर दिला होता. ही पाश्र्वभूमी पाहता मार्गरेट थॅचर राजकारण, अर्थकारण यात पारंगत होऊन राजकीय कारकिर्दीसाठी सज्ज झाल्या होत्या आणि त्यासाठी त्यांना दोन प्रेरणास्रोतही लाभले होते. गोल्डा मेयर आणि इंदिराजी हे ते दोन स्रोत. त्यातही इंदिराजींबाबत आणि भारताबाबत मॅगी थॅचरना अधिकच कुतूहल वाटे.

डार्लिग विली
मार्गरेट थॅचर प्राणिप्रेमी होत्या. तो ब्रिटिश गुणच म्हणावा. एडवर्ड हीथ यांच्या पंतप्रधानकीत १०, डाऊनिंग स्ट्रीट या अधिकृत निवासस्थानापाशी कुत्र्यांना चुकवत एक मांजराचे पिल्लू बावचळून आले. हीथ यांनी त्याला घरात आणले, पाळले आणि त्याचे नाव विल्बरफोर्स असे ठेवले. हा बोका अगदी बावळा निघाला. ना कधी शिकार केली, ना उंदीर खाल्ला. तो चक्क शाकाहारी बनला आणि फक्त हीथच्या न्याहरीच्या वेळी थोडेसे अंडे खाई. एवढाच मांसाहार. पण तो लाडका होता. हीथनंतर हेरोल्ड विल्सन पंतप्रधान बनले तेव्हा हीथनी निवासस्थान सोडताना विल्सनकडे विलीही सोडविला. विल्सनही त्याच्यावर खूप माया करीत राहिले. विल्सननंतर आलेल्या कॅलहनकडे विलीचे हस्तांतरण झाले आणि हे लाडप्यार आणखी वाढले. विली हा १०, डाऊनिंगचा कायम रहिवासी राहिला. कॅल्हननी विलीसह मॅगी थॅचरकडे निवासस्थान सोपविले तेव्हा तर थॅचर कुटुंबाने विलीला एक अपत्यच मानले म्हणा! तो सदैव थॅचरबाईंच्या लिहिण्याच्या टेबलावर, पुस्तकांवर अंगाची कोळंबी करून पहुडलेला असे. थॅचरच्या कारकिर्दीत विलीचे जीवन संपले. मांजर किती काळ जगणार? तेव्हा थॅचरबाईंनी विलीचे छायाचित्र काळ्या चौकटीत छापून आधीच्या तीन पंतप्रधानांना निमंत्रित केले. तीन माजी आणि थॅचरबाई अशा चौघांनीही १०, डाऊनिंग स्ट्रीटवर काळ्या पोशाखात एकत्र येऊन विलीला श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्या आठवणी जागवल्या.

pension for government employees
लेख : सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष
loksatta editorial pm narendra modi controversial statement on muslim community
­­­­अग्रलेख : पंतप्रधानांचे आभार माना!
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

याच कुतूहलापोटी थॅचरबाईंनी पुढाकार घेऊन एक कृती केली. ही १९७२ची घटना आहे. म्हणजे तेव्हा मॅगी थॅचर हुजूर पक्षाच्या सरकारात शिक्षण सचिव (ब्रिटनमध्ये मंत्री हा शब्द न वापरता सचिव म्हटले जाते) होत्या आणि भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून ख्यातकीर्द मुत्सद्दी महाराजकृष्ण रसगोत्र काम करीत होते. रसगोत्र राजनीतीतले खंदे तज्ज्ञ आहेत. शिक्षणमंत्री असलेली ही महिला आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणार हे रसगोत्रांनी बरोबर हेरले आणि थॅचरबाईंना भेटायला ते गेले. मॅगी थॅचरनी इंदिराजींना भेटण्याची इच्छा रसगोत्रांपाशी व्यक्त केली आणि थॅचर भारतात आल्या. अर्धा तास दोघी जणी चर्चा करणार होत्या, पण वेळापत्रक बाजूला ठेवून दीड तास त्यांच्या गप्पा रंगल्या. अधूनमधून वेळ संपल्याची सूचना देणाऱ्या सचिवांना आम्ही नातवंडांबाबत बोलत आहोत, असे सांगून चर्चा चालूच राहिली. मॅगी-इंदिराजी ही मैत्री कायम राहिली. इंदिराजींच्या हत्येने थॅचर व्यथित झाल्या. पण ही व्यथा फक्त शब्दाने व्यक्त करून त्या थांबल्या नाहीत. इंग्लंडमध्ये राहून खलिस्तानवाद्यांनी ज्या कारवाया चालू ठेवल्या होत्या त्या अतिशय शीघ्र गतीने कारवाई करून थॅचरबाईंनी त्यांना अटकाव केला. इंदिराजींच्या हत्येच्या पंधरा दिवस आधी ब्रायटन येथे थॅचरबाईंच्या हत्येचा प्रयत्न ‘आयरिश रिपब्लिकन आर्मी’ने केला होता.
काही विश्लेषकांच्या मते मॅगी थॅचर हे नाव परिवर्तनवादाशी निगडित व्हावे, तर काही विश्लेषकांच्या मते थॅचरबाईंनी इंग्लंडमध्ये क्रांती घडविली. स्पष्ट शब्दात सांगायचे तर औद्योगिक क्रांतीची जन्मभूमी असलेल्या इंग्लंडमध्ये अधुरी राहिलेली औद्योगिक क्रांती पूर्णत्वाला नेऊन उद्यमशीलतेच्या दिशेने इंग्लंडला थॅचरबाईंनी फरफरा ओढले आणि ‘कल्याणकारी राष्ट्र’ हा इंग्लंडवरील मुलामा खरवडून काढला व सशक्त, पहिल्या श्रेणीतील देश बनवून इंग्लंडला आर्थिक सत्तेच्या उंचीकडे वळण्याची दिशा दिली. समाजवादी अर्थरचना ही ऐकायला, वाचायला आणि संसदेत बोलायला गोड वाटते तरीपण राष्ट्राचा कणा म्हणजे मध्यमवर्ग असतो आणि या मध्यमवर्गाकडे समाजवादी अर्थशास्त्रात दुर्लक्ष केले जाते. हे थॅचरबाईंनी ओळखले होते. पात्रताधिष्ठित धोरण (मेरिटॉक्रसी) आर्थिक प्रगती आणि सामाजिक गतिमानता ही थॅचरबाईंच्या राजकारणाची त्रिसूत्री होती. अनेक उद्योग व उत्पादकता सरकारने ताब्यात ठेवणे हे राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला हानिकारक असल्याने उद्योगधंद्यांचे खासगीकरण हवेच, हे जाणून मार्गरेट थॅचरनी खासगीकरणाचा झपाटा लावला. १९७९ मध्ये प्रथम पंतप्रधान बनल्यावर बाईंनी आधी कामगार संघटनांवर आसूड उगारला. युनियनचे नेतृत्व सरकारकडूनही आणि कामगारांकडूनही मोठा वाटा घेते आणि कामगारांची उत्पादकता ढासळते, सरकारने उद्योग पोसण्याची आवश्यकता नसते, कामगारांना, श्रमिकांना वरच्या श्रेणीत जाण्यासाठी स्वकष्टाने दर्जा उंचावण्याकरिता प्रवृत्त करायला हवे, हे ओळखणारी ही पंतप्रधान होती.
एकेकाळी गोदी कामगार, वेल्सच्या कोळसा खाणी, मत्स्योद्योग, स्कॉटलंडचा शेतकरी, मँचेस्टरच्या गिरण्या, शेफिल्डची शस्त्रागारे, फाऊंडरीज पाहता इंग्लंडच्या कष्टकरी श्रमिकांची संख्या जबरदस्त होती. या श्रमिकांना ‘लेबर’ तथा मजूर पक्ष आपला वाटणे साहजिक होते. ब्रिटनची  संस्कृतीही ‘वर्ग’ तथा ‘श्रेणी’युक्त राहिली होती. हे चित्र मॅगी थॅचरने बदलले. कामगार व्यथित झाला. तथापि, पाहता पाहता हाच श्रमिक वर्ग मध्यमवर्गाकडे चढत गेला आणि त्यात समाविष्ट झाला. आज ब्रिटनमध्ये असे २० टक्के मतदार नागरिक श्रमिक या वर्गात मोडतात. थॅचरबाईंनी फक्त युनियनवर हल्ला केला, असे म्हणणे अपुरे ठरेल. बाईंनी इंग्लंडच्या हुजूर (म्हणजे स्वपक्षच) पक्षातील ढुढ्ढाचार्यानाही लक्ष्य बनविले. ही ‘थॅचरक्रांती’ होती. या क्रांतीची फळे आज इंग्लंडमध्ये दिसतात. वारसाहक्काने दौलत मिळविली, असे अभिमानाने सांगणारे उमरावपुत्र आज स्वत:च्या हिमतीवर पैसे मिळविले, असे अभिमानाने सांगतात आणि एकेकाळी मजुरी करून दोन वेळचे जेवण कसेबसे कमविणारा श्रमिक अभिमानाने सांगतो की, त्याची मुलगी राजनैतिक सेवेत आहे आणि मुलगा उद्योगपती बनला आहे.
मॅगी थॅचरनी बाजारपेठ ध्यानात घेऊन आर्थिक सुधारणा राबविल्या. या सुधारणांचे फलित असे की, घामेजलेली ब्रिटिश औद्योगिक सत्ता अत्यंत गतिमान पद्धतीने क्रांतीनंतरची उद्यमशील आर्थिक ताकद बनली. सोव्हिएत नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या उदारमतवादाची पहिली ओळख थॅचरबाईंना झाली आणि ‘गोर्बाचेव्ह विश्वासार्ह आहेत,’ हे विधान करून बाईंनी शीतयुद्ध समाप्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. एवढेच नव्हे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेगन यांनाही आपल्याबरोबर खेचत नेले. रेगन स्टार वॉरच्या हास्यास्पद कल्पनेने भारून गेले होते. त्यांना सोव्हिएत युनियनकडे नव्या चष्म्यातून पाहायला लावणे सोपे नव्हते. पण थॅचरनी ते साध्य केले. परिणामी अमेरिकेची आर्थिक महासत्ता आणि ब्रिटनची बौद्धिक महासत्ता यांची युती आंतरराष्ट्रीय राजकारणाला नवे सुकाणू देण्यात यशस्वी ठरली. पुढे पूर्व युरोपातील साम्यवादी चिरेबंदी भिंती कोसळत गेल्या ते अलाहिदा! थॅचरबाई एकाधिकारशाहीने प्रशासन करतात, हा आरोप खुद्द त्यांच्याच हुजूर पक्षात होऊ लागला. पक्षांतर्गत विरोधाची धार वाढू लागली. तीन वेळा निवडणुकीत जय मिळवून तीन वेळा सलग पंतप्रधानपद भूषविणाऱ्या या अत्यंत कर्तबगार महिलेला तिच्याच पक्षातल्या सदस्यांनी जणू सूचित केले, ‘मॅडम, या खुर्चीत तुम्ही काहीशा अधिक काळ बसला आहात.’ १९९० च्या पोल टॅक्सवरून तर एवढे आंदोलन सुरू झाले की, ३१ मार्च १९९० ला ट्रॅफल्गर स्वेअर पेटला. ८ महिने हे आंदोलन चालू राहिले तेव्हा थॅचरच्याच हुजूर पक्षाने त्यांना बाद केले. राजीनामा देऊन मार्गरेट थॅचर पाणावलेल्या डोळ्यांनी १०,  डाऊझिंग स्ट्रीटमधून बाहेर पडल्या. मात्र –  मागे खूप मोठा वारसा ठेवून. इतके प्रगल्भ आणि प्रभावी व प्रवाही प्रशासन बाईंनी मागे ठेवले की, त्यांच्या विरोधांतल्या लेबर पक्षाला स्वत:चे नामांतर करून  ‘न्यू लेबर’ पक्ष होऊन पुढे यावे लागले. ‘न्यू’ काय? तर थॅचरबाईंचीच आर्थिक धोरणे- ठाम राजकारण, आर्थिक सुधारणा आणि सामाजिक गती, कमीत कमी चलनवाढ, मुक्त बाजारपेठ मात्र वित्त पुरवठय़ावर नियंत्रण, खासगीकरण व कामगार संघटनांवर वचक ही परिणामकारक सूत्रे अंगीकारून आता लेबर पक्ष वाटचाल करतो, एवढे सांगितले तरी मार्गरेट थॅचर व थॅचरिझम म्हणजे काय ते समजावे!