05 August 2020

News Flash

संक्रमणाच्या दिशेने

काळाची गरज ओळखून का. र. मित्र यांनी स्त्रियांसाठी ‘महाराष्ट्र महिला’चे प्रकाशन सुरू केले. स्त्रियांच्या मासिकाचे संपादन करणे म्हणजे स्त्रियांचे वैचारिक नेतृत्व करणे,

| May 16, 2015 02:14 am

काळाची गरज ओळखून का. र. मित्र यांनी स्त्रियांसाठी ‘महाराष्ट्र महिला’चे प्रकाशन सुरू केले. स्त्रियांच्या मासिकाचे संपादन करणे म्हणजे स्त्रियांचे वैचारिक नेतृत्व करणे, याविषयीचे नेमके भान मनोरमाबाई मित्र यांना होते. जानेवारी १९०१च्या प्रथम अंकात मनोरमाबाई लिहितात, ‘शुद्ध लिहिता येईल अशा स्त्रिया थोडय़ा आहेत. स्त्रियांनी मासिक चालवावे हे धाडसाचे काम आहे.

वृत्तपत्रे, नियतकालिके यांसारखी मुद्रित माध्यमे ही संपादकाची माध्यमे मानली जातात. सामाजिक, सांस्कृतिक, परिस्थितीचे अचूक भान, परिवर्तनाची दिशा, व्यक्ती आणि समाज यांच्या नातेसंबंधातून आकाराला येणारे जीवन, भविष्यकाळाचे सूचन इत्यादी विषयीचे संपादकाचे मर्मग्राही भान, संपादकीय भाष्य माध्यमाला नेमकेपणा, टोकदारपणा प्राप्त करून येते. समाजजीवनाच्या दृष्टीने संक्रमणकाळापूर्वीचा काळ, परिवर्तनाची चाहूल लागण्यास, घडी मोडण्याची सुरुवात होणारा संधिकाळही महत्त्वाचा असतो. या काळात वाचकांशी संवाद करीत भविष्यकाळाला सामोरे जाण्याची तयारी व्यक्तीची व समाजाची संपादक अप्रत्यक्ष रीतीने करून घेत असतात.
साक्षेपी संपादकाची परंपरा १९०० ते १९३० या संक्रमणपूर्व कामातील संपादकांनी जोपासली, विकसित केली. काळाची गरज ओळखून का. र. मित्र यांनी स्त्रियांसाठी ‘महाराष्ट्र महिला’चे प्रकाशन सुरू केले. स्त्रियांच्या मासिकाचे संपादन करणे म्हणजे स्त्रियांचे वैचारिक नेतृत्व करणे आहे. याविषयीचे नेमके भान मनोरमाबाई मित्र यांना होते. जानेवारी १९०१च्या प्रथम अंकात मनोरमाबाईंनी आपल्या मनातील हेतू स्पष्ट केला, ‘आज आमचा समाज सर्वच बाबतीत पुरुषाच्या मागे पडलेला. शुद्ध लिहिता येईल अशा स्त्रिया थोडय़ा आहेत. स्त्रियांनी मासिक चालवावे हे धाडसाचे काम आहे.’
स्त्रियांना नवयुगाला सामोरे जाण्यासाठी तयार करणे, हा हेतू ओळखून मनोरमाबाईंनी अनेक नवीन विषयांवरचे लेख प्रसिद्ध केले. स्त्रियांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली. ‘आपल्या सुशिक्षित स्त्रिया रिकामा वेळ कसा घालवतात’, ‘स्त्री शिक्षकांची हल्लीची स्थिती कशी आहे’, यांसारखे कालसंगत विषय स्पर्धेसाठी होते. स्त्रियांच्या संस्थांच्या उपक्रमांना विशेष प्रसिद्धी दिली. ‘महिलेचे उद्गार’ या संपादकीयातून मनोरमाबाईंनी सामाजिक परिस्थिती, स्त्रियांचे प्रश्न, स्त्री संघटनांची गरज इत्यादी विषयांचा परामर्श घेत परखड भाष्य केले.
न्या. रानडे यांच्या मृत्यूनंतर रमाबाई रानडे दीर्घकाळ सार्वजनिक कार्यात सहभागी होत नव्हत्या. ‘रमाबाई रानडे यांनी स्वत:ला दु:खातून सावरून स्त्रियांचे प्रश्न, कार्यात लक्ष द्यावे, त्यांच्या कामांची स्त्री समाजाला गरज आहे,’अशी नम्र सूचना मनोरमाबाईंनी केली. सामाजिक परिषदेविषयी नाराजीही त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केली.. ‘दरसाल राष्ट्रीय सभेप्रमाणे सामाजिक परिषद भरविण्यात येते. त्या ठिकाणी वर्षांतून एक-दोन दिवस मोठी कळकळीची भाषणे घेतात. परंतु, स्त्रियांची स्थिती सुधारण्याविषयीचे वास्तविक प्रयत्न कोणी करीत असल्याचे आढळून येत नाही. हिंदू विधवांची करुण स्थिती दिसत असताना त्याविषयी दाखवावी तितकी आस्था दाखवली जात नाही.’
गायन वादन परीक्षेत एकाही स्त्रीचे नाव नाही. याविषयी खंत व्यक्त करताना त्या लिहितात, ‘चित्रकला, गायन, वादन या कलांचे स्त्रियांना यथाशास्त्र शिक्षण मिळाल्याने समाजाचे यत्किंचित अहित न होता अनंत हितच होईल.. महिलांचे समंजस बंधू या कामी त्यांचा उत्साह भंग तरी करणार नाहीत, अशी महिला उमेद बाळगते.’
तसेच स्त्रियांना आता शाळा तपासणीचे काम द्यावे. परदेशातील स्त्रियांच्या मंडळाप्रमाणे आपल्या समाजात, ‘स्त्रियांचे लेखिका मंडळ व्हावे’, ‘व्हिक्टोरिया स्मारक फंड’ कल्पनेचे स्वागत करून ‘मंडळावर एकही स्त्री का नसावी’ यांसारख्या प्रतिक्रियाही मनोरमाबाईंनी वेळोवेळी व्यक्तकेल्या.
स्त्रियांच्या लेखन, संपादनाच्या कार्याला समाजाकडून योग्य प्रतिसाद मिळू लागला. प्रतिष्ठा मिळू लागली. स्त्री वाचकही सहकार्यासाठी हात पुढे करू लागल्या. बंगळुरू, मध्य प्रदेशातील हुसंगाबाद येथून स्त्रियांनी सीताबाई सावंत यांना पत्र लिहिले- ‘मासिकाची पाने वाढवा, आम्ही नवीन वर्गणीदार मिळवून देऊ.’ जयपूरच्या कोंडोशास्त्री रामशास्त्री प्रभुणे यांनी सीताबाई सावंतांना ‘महाराष्ट्र भाषापूर्ण चंद्रिका’ ही पदवी दिली. इतकेच नव्हे तर अचल आणि कंपनीने स्त्रियांसाठी ‘वनिता विश्राम’ मासिक सुरू केले होते. परंतु, ‘गृहिणी रत्नमाला’चे अंक व सीताबाईंचे संपादनकौशल्य पाहून त्यांनी ‘वनिता विश्राम’ मासिक ‘गृहिणी रत्नमाला’त सहभागी करून द्यावे, अशी सीताबाईंना विनंती केली. १९१६ साली स्त्रियांना संपादनावर मिळणारा प्रतिसाद अतिशय बोलका आहे. १९२२ पर्यंत गृहिणी रत्नमाला प्रसिद्ध होत होते.
तोपर्यंत बाह्य़ वातावरणात अनेक घटना घडल्या. स्त्रियांच्या संघटना तर विकसित होत होत्याच. १९१८ मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत करणारा पटेल अ‍ॅक्ट संमत झाला. परंतु, महाराष्ट्रात मुलींसाठी काही काळ थांबावे असा विचार चालू होता. तेव्हा स्त्रियांनी स्वतंत्र सभा घेताना, रमाबाई रानडे व जानक्का शिंदे यांच्या नेतृत्वासाठी पुण्यात मोठा मोर्चा काढला. १९१९ मध्ये नवीन राज्य व्यवस्थेत स्त्रियांना मतदानासाठी अपात्र ठरवले. तेव्हाही स्त्रियांनी ‘स्त्रीमूलक अपात्रता’ नाहीशी व्हावी म्हणून जिद्दीने लढा दिला. कौन्सिलच्या बैठकीत ‘स्त्रियांना अपात्र ठरवू नये’ हा ठराव बहुमताने पास झाला. स्त्रियांच्या परिषदांतून स्त्रियांच्या हक्क व अधिकारांची मागणी होऊ लागली. ५ जानेवारी १९२७ रोजी पुण्यात अखिल भारतीय महिला शिक्षण परिषद आयोजित केली होती. सांस्कृतिक व राजकीय दृष्टीने मोठा बदल झाला होता. लोकमान्य टिळक युग संपून गांधी युगाची सुरुवात झाली. महात्मा गांधीजींनी स्त्रियांना राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी आवाहन केले. प्रभात फेरी, स्वदेशी चरखा संघात स्त्रिया सहभागी होऊ लागल्या. शिक्षित स्त्रियांची नवीन पिढी पुढे येऊ लागली, सर्वागीण संक्रमण नजरेच्या टप्प्यात आले. तेव्हा कालसंगत भान, वैचारिक प्रगल्भता व संपादनाची स्वतंत्र दृष्टी असणारी तारा टिळक व पिरोज आनंदकर यांची जोडी ‘गृहलक्ष्मी’चे संपादन करण्यास पुढे आली. किती मोठा बदल झाला होता. दोन स्त्रिया प्रमुख संपादक होत्या तर वसंत मराठे सहायक संपादक होते.
पहिल्या संपादकीयात ‘गृहलक्ष्मी’चे धोरणही स्पष्ट केले होते. ‘केवळ स्त्रियांचे लेखन प्रसिद्ध करणे इतका संकुचित विचार नाही. टिळकांना प्रगतिपथावर नेण्यात सुशिक्षित बंधूंचा तितकाच हक्क व कर्तव्य आहे. लोकाभिरुचीसाठी खोटय़ा तत्त्वाचा पुरस्कार करणार नाही. प्रसंगी कठोर भूमिका घेऊ. आपल्या बुद्धी व विवेकवाणीवर अवलंबून राहू!’ या तत्त्वाचा पूर्णपणे अवलंब संपादकांनी केला. स्त्रियांचे विचारक्षेत्र, विकसित व्हावे देशात, जगात स्त्रियांच्या संदर्भात काय घडत आहे, हे स्त्रियांपर्यंत पोचविण्याची संपादकांची धडपड होती. त्या दृष्टीने स्त्रियांच्या परिषदा, संमेलनाचे सविस्तर वृत्तान्त येत. अन्य देशातील स्त्री जीवनाचा परिचय ‘शेजारीण’मध्ये असे. ‘स्त्रियांच्या जगात’मध्ये विविध क्षेत्रांत पुढे असणाऱ्या स्त्रियांचा परिचय असे. ‘रिकामपणाची कामगिरी’मध्ये स्त्रियांना घरात कोणत्या वस्तू तयार करून छोटा व्यवसाय करता येईल याचे मार्गदर्शन असे. शिकेकाई, दंतमंजन, बिस्किटे इत्यादीसंबंधी मार्गदर्शन असे. महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांनी विविध कलांमध्ये रस घ्यावा. स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व सर्वार्थाने विकसित व्हावे, त्यासाठी चित्रकला, संगीत या विषयांवर स्वतंत्र लेखमाला होत्या. ‘गृहलक्ष्मी’चे वैशिष्टय़ म्हणजे ‘शिशु विशेषांक’ आणि जून १९२८चा ‘पतिता विशेषांक’ होय. ‘स्त्री पतिता का होते?’, ‘ती पतिता की पातिता?’, वेश्या व्यवसायाकडे स्त्रिया का वळतात? त्यावरचे उपाय कोणते? इत्यादी दिशांनी प्रश्नांचा वेध घेतला. स्त्रीचे अध:पतन टाळण्यासाठी १८ कलमे सांगितली. संपादकीयात समाजाला आवाहन केले- ‘वेश्यावृत्तीचे खरेच निर्मूलन होऊ द्यायचे असेल तर पतित स्त्रियांप्रमाणे पतित पुरुषांचाही उद्धार झाला पाहिजे. चला तर प्रत्येक जण लहान-थोर या आरंभलेल्या कार्याला आपल्या परीने हातभार लावू या. मार्ग बिकट.. पण अंधविश्वास, समाजाच्या अनिष्ट रूढींशी झगडलात तर या कार्यात यश देणारा परमेश्वर दूर नाही.’
१९२७ साली समाजात प्रेमविवाहाच्या तुरळक शक्यता निर्माण होण्याच्या काळात डॉ. भांडारकर यांची नात मालिनी पाणंदीकर यांनी श्री. गुलाल बशिरुद्दीन खान या मुस्लीम तरुणाबरोबर प्रेमविवाह केला. मालिनी पाणंदीकर मुलींच्या हुजूरपागा शाळेत शिक्षिका होत्या. १९२७ साली समाजावर सदर विवाहाच्या रूपाने ‘बॉम्बच’ पडला. विरोध, चर्चा, निषेधाच्या सभा इत्यादींचा धुरळा उडाला. मालिनी पाणंदीकर पदवीधर, सुशिक्षित होत्या. त्यांनी विचारपूर्वकच निर्णय घेतला असणार. तेव्हा त्यांना त्यांची बाजू मांडायची संधी दिली पाहिजे. या विचारांनी संपादकांनी मालिनी खान पाणंदीकर यांचे पत्र ‘माझी कैफियत’ जुलै १९२७च्या अंकात प्रसिद्ध केले. ‘गृहलक्ष्मी’व्यतिरिक्त फक्त ‘ज्ञानप्रकाश’ने सदर पत्र प्रसिद्ध केले.
‘गृहलक्ष्मी’च्या संपादकांनी पत्रासोबत जोडलेली टीपही महत्त्वाची आहे- ‘कु. मालिनी पाणंदीकर यांचा विवाह रा. गुलाबखान यांच्याशी नुकताच पुणे येथे झाला. या विवाहाबद्दल खळबळ उडून जाणे साहजिक आहे. तशीच पहिल्या विधवा विवाहाच्या व पहिल्या भिन्न जातीय विवाहाच्या वेळेस उडाली असेल. परंतु, आजपासून पन्नास वर्षांनी मालिनीबाईंच्या या कृतीचे, कदाचित लोकांना कौतुक वाटेल. काय होईल ते नक्की सांगता येणार नाही. परंतु, या कृतीचा खरा न्यायाधीश काळ आहे.’ मासिकाचे संपादन एका अर्थाने वैचारिक नेतृत्व असते. हेच संपादकीय टिपेतून तारा टिळक व पिरोज आनंदकर व्यक्त करतात.
‘गृहलक्ष्मी’ प्रसिद्ध होत होते तेव्हाच ‘किलरेस्कर’ मासिकाने ‘स्त्रियांचे पान’ प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. परंतु, एका पानावर संपादकांचे समाधान होईना. १९३० मध्ये ‘गृहलक्ष्मी’चे प्रकाशन थांबले. परंतु, ‘गृहलक्ष्मी’ने तयार केलेली पाऊलवाट मोठी करणारे ‘स्त्री’ मासिक ऑगस्ट १९३० पासून सुरू झाले. संक्रमणाचा नवा टप्पा आणि ‘स्त्री’ची निर्मिती सुयोग जुळून आला. नवपर्वाची सुरुवात झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2015 2:14 am

Web Title: maharashtra mahila magazine towards transition
Next Stories
1 नाटय़रंग ताजा अजुनी
2 दुधी भोपळा
3 आहारवेद : खजूर
Just Now!
X