ch18‘‘एक-एक दिवस तराजूत तोलत होतो. उद्याचा अंदाज येण्यासाठी. सरभर न होता. गरगरणाऱ्या लाटांना सोबत घेत. केवळ अप्रूप म्हणून! गारा वेचण्याचे दिवस संपल्याचं भान होतंच की मदतीला. आणि मुंबई सोडावी लागली. पत्रकार होण्याचा निश्चय गप्प बसू देत नव्हता. खरं म्हणजे हे जग कळण्याच्या पातळीवरचं नव्हतं. पण १ मे १९७० साली मी अण्णांचा (अनंत भालेराव) शिष्य म्हणून औरंगाबादेत दाखल झालो..’’

जून महिन्यातील सकाळी बलगाडीत बसवून चुलत्या-पुतण्याची रवानगी कुंथलगिरीनामक क्षेत्राकडं झाली. डोंगरात पाठशाळा. झाडात लपलेलं गुरुकुल. व्यायामशाळा, नाटय़गृह, प्रशस्त खोल्या. प्रत्येक वर्गात १२ विद्यार्थी, सगळं तसं शांत शांत, डोंगर वत्सल वाटायचे. झाडी, वेलीनं भरलेले. करवंद, चिंचा, सीताफळांची झाडं दाटीनं उभी. एखाद दुसरं चंदनाचं झाड डोकं वर काढून इतरांना वाकुल्या दाखवायचं. बुटक्या बोरीनं अनेकांना ओरबाडलं असणार. चारुळ्या पिकल्या की ‘बी’ काढायचं अन् खायचं.. त्या दिवशी, या वातावरणात आणून सोडलं अन् बलगाडी गावाला परतली..
दुसराच दिवस असावा. वसतिगृह संचालकानं चुलत्या-पुतण्याचा ताबा घेतला. पुतण्या वयानं मोठा. हुशार पण मनानं निब्बर. मास्तराचं नाव ‘बाबुसा.’ सा म्हणजे सावजी. आम्हाला टेबलाजवळ बोलावलं आणि न्हाव्याला हाक मारली, डोकं भादरायची मशीन अन् कैची बघून काय ते समजलं. डोक्यावरचे केस जाणार म्हणून रडू फुटलं. जना न्हाव्यासमोर बसलो. दोन पायाच्या मधोमध डोकं धरून केली की चंपी जना न्हाव्याच्या हातून. सुटका झाली. हात फिरवला तर डोकं गुळगुळीत लागलं. विहिरीवर जाऊन न्हाणं केलं. परत आल्यावर खोली दिली. एक लोखंडी पेटी, ताट-वाटी आणि नवी कोरी पुस्तकं. दिवसभर करमलं नाही. आता काय शाळा एके शाळा. मास्तर एके मास्तर. हळूहळू सगळं कळू लागलं. हातानंच करायचं सगळं. स्वतची ताटवाटी, चड्डी-बनियन धुवायचं. आठवडय़ातून एकदा म्हणजे रविवारी शेणानं वर्ग सारवायचा. खोली सारवायची. आळीपाळीनं. सांगितलेलं चुकवलं की भोजन बंद.
चौथीत दाखल झालो. शाळा कधी चार िभतीत तर थंडगार िनबोणीच्या झाडाखाली. गवत खुरपायला शिकलो पहिल्यांदा आश्रमाच्या बागेत. लावलेली झाडं वाढवायला शिकवलं म्हात्रे, अथणीकर मास्तरांनी. एक होतं, साठवलेले कपडे चांभारकुंडी नावाच्या डोहावर जाऊन स्वच्छ करून आणायचे. कपडे कडक उन्हात टाकून, डोहात डुंबायचं. जपून जपून. पोहता येत नव्हतं. मित्र बुडून मेल्यापासून मनात भीती बसली होती. पोहायला शिकावं म्हणून तऱ्हेतऱ्हेचे प्रयोग झाले. शेवटपर्यंत पाण्यावर तरंगता नाही आलं. आत्मविश्वास हरवला की, अपयशच हाती येतं याची पहिल्यांदा जाणीव झाली ती तिथं!
मोकळ्या आकाशाखाली म्हणजे झाडाखाली अधूनमधून वर्ग भरायचे. विशेषत मराठीचे. केशवराव हाके मास्तरानं गायलेली म्हणजे गाऊन शिकवलेली पहिली कविता होती कुसुमाग्रजांची- पुळणीत टेकले माथे श्रांत अधीर,
दर्यावर होता वाहत मंद समीर
काजळले होते गगनाचे कंगोरे,
कल्लोळत अंतरि काही तरी काहूर
त्या दिवशीपासून मराठीशी गट्टी झाली. इतर विषयाला दांडी मारायची अधूनमधून. त्यासाठी डोकं धरून बसायचं. मास्तराच्या नाकापर्यंत वास जाईल अशा बेतानं झेंडू बाम लावायचा. नाटक कसं करायचं असतं त्याचा पहिला धडा इंग्रजी पहिलीत असताना गिरवला. गुरुकुल म्हणजे एका अर्थानं संस्कार छावणीच. पहाटे चार वाजता उठायचं. ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ आणि ‘बलसागर भारत होवो’ ही प्रार्थना म्हणायची. टाकीवर जाऊन तोंडावर खळाखळा पाणी मारायचं. झोप जावी म्हणून. मग अंधूक कंदिलाची वात मोठी करायची. गटागटानं त्याच्या प्रकाशाभोवती बसायचं. डुलकी लागली की, पाठीत धपाटा बसायचा. तशाही अवस्थेत बेरकी मित्राला बीडकर गुरुजींच्या पावलांची चाहूल लागायची. या पावलांना आम्ही पोरं दुसरे सानेगुरुजी म्हणायचो. पन्नास ते साठच्या काळात हरिजन पोरांना मायेनं जवळ करून शिकवणारा हा माणूस.
सातवीत असताना पाहिलेले झोपाळू कन्नमवार यांची प्रतिमा पुढंही कायम तशीच राहिली ती आचार्य अत्रे यांच्यामुळं. गुरुकुलात ‘मराठा’ दैनिक यायचं. अर्थात तिसऱ्या दिवशी. शिळं होऊन. विचार कुठं शिळा होतो का? स. का. पाटील, कन्नमवार, निजिलगप्पा, बाळासाहेब देसाई यांच्या भल्याबुऱ्या गोष्टींबद्दल अग्रलेखातून तासलेली असायची. तिरकस असायचं लेखन. त्या वयात अर्थ कळायचा नाही. विद्यार्थी एकत्र करून मराठीचे शिक्षक आचार्य अत्रे यांना काय म्हणायचंय ते समजावून सांगायचे. वर्तमानपत्र वाचायची सवय इथं लागली. नांगरट चांगली झाली की पेरलेलं चांगलं उगवतं. तसं काही तरी होत असावं.
दहावीत आलो. मग सगळंच कळायला लागलं. लाथ मारील तिथं पाणी काढण्याच्या आशेनं पावलं गावाकडून शहराकडं पडू लागलेली. प्रवास सुरू होण्यापूर्वी घरचे म्हणत होते,कशाला जातोस इतक्या लांब? ती मुंबई आपल्यासाठी नाही लेका! त्यांच्या बोलण्याचा किंचितही परिणाम झाला नाही. ‘एका भाकरीचे चारच तुकडे किती दिवस पुरणार.’ हा माझा सवाल होता. सगळं घर एका बाजूला, मी दुसऱ्या टोकाला. सदानंद रेगे यांची कविता होती मुंबईकडं जाताना सोबतीला..
हळूहळू ओळखी होऊ लागल्या. पुरवठा अधिकारी अ‍ॅड. भालचंद्र कंगळे यांचा हात धरून आलो होतो, श्रेणिक अन्नदाते यांच्या ‘र्तीथकर’ मासिकात काम करण्यासाठी! त्यांचं काम दादरच्या उदय िपट्रिंग प्रेसमध्ये चालायचं. दादर सोडलं अन् डोंबिवलीला नामदेव पाटलांच्या वाडीत गेलो. अन्नदाते यांच्याकडेच राहायला. रविवार सोडून बाकीच्या दिवशी रोज सकाळी उठायचं. लोकलनं दादर गाठायचं. दमछाक व्हायची. हळूहळू काम जमू लागलं. मन रमू लागलं. मुद्रितशोधन, मांडणी कळू लागली. त्यातच एक कन्या ओळखीची झाली. िलग जाणिवा वाढीचाच तो काळ होता. काम करता करता तिला गुणगुणायची सवय होती. कानाला बरं वाटायचं. शिवाजी मंदिर जवळ होतं. नाटक, मुक्त नाटकाची रेलचेल. फावल्या वेळेत तिच्याबरोबर तिकडं जायचं. खरं म्हणजे ती ‘र्तीथकर’चं काम करीत नसे. जवळच असलेल्या ‘नांदी’च्या कार्यालयात ती असायची. अवघड चढणावर मदतीचा हात मिळाल्यानंतर चढण चढणे सुकर होतं. तोच अनुभव येत होता. ‘मुंबई नगरी बडी बाका’ हेही बऱ्यापकी समजून घेत होतो. खेडय़ातलं पोर म्हणूनही कदाचित सहानुभूती मिळत असावी. एक एक पायरी चढावी. घसरून पडणार नाही याची खबरदारी घ्यायची. शक्य तेवढं करावं. पुढं पुढं चालावं. एवढाच निष्कर्ष. जे पाहिलं नाही, जे कधी दिसलं नाही, जे कधी वाचायला मिळालं नाही ते अधाशासारखं वाचावं. बघावं. आनंद घ्यावा. पाय जमिनीवर घट्ट रोवून.
गुजगोष्टी करणाऱ्या, मुंबई समजून सांगणाऱ्या मधुवंतीनं दादरची नोकरी सोडली होती. परंतु असेपर्यंत जगण्याला दिलेलं बळ फार मोठं होतं. नवखेपणाच्या खुणा बुजवणं आणि बुजवल्या जाणं याला अर्थ असतोच की! मकरंद सहवास ही इमारत ‘नांदी’ कार्यालयापासून जवळ. त्याचं अप्रूप होतं. माणिक वर्मा तिथं राहायच्या. ‘वाटेच्या वाटसरू । जाई जाई दुज्या गावा’ या मनस्थितीतून बाहेर पडायला ‘ती’ कारण झाली. तिच्या सान्निध्याचा कसा विचार करायचा, हिशोब कसा करायचा. ‘पुढील जन्मी आता तुझा हिशोब करीन’ अशी भा. रा. तांबेची एक ओळ आठवली. पुनर्जन्मावर विश्वास नव्हता तरी ती ओळ तिच्यासाठी आळवली. एके दिवशी सुरेश खरे यांच्यासोबत कित्ते भंडारी हॉलमध्ये – कलावंत मेळाव्यासाठी गेलो. राजा दाणी, इंदुमती पंगणकर, काशीनाथ घाणेकर यांना भेटत असतानाच मधुवंती समोर आली. ज्या मनात जिवाची ओढ जन्मली होती ते मन समोर हजर. छान हसली. बकुळीसारखी. माहीत नाही असं कसं होतं ते? नात्याचा संदर्भ देण्याइतपत हाती काही नव्हतं. ‘कसं चाललंय तुझं?’ एवढंच विचारलं. मी वरवरचं सांगितलं. तेव्हा ती भेटीगाठी कमीच होतील एवढंच म्हणाली. भविष्यसूचकता कळली. स्त्री मनातील एक नाटय़ कळलं. हे अगदी नकळत सुरेश खरे यांच्यासारखा नाटककार बघत होता. तिच्या मनाच्या आंदोलनामधून पोटात शिरलेलं गाणं आणि भेटलेले कलावंत यांच्या गप्पा रंगत गेल्या एवढंच. पुढचं सांगण्यासारखं असतं तर- माझ्याबरोबर तुम्हालाही आनंद झाला असता. मनातलं दुख बाजूला सारलं. घोंगणाऱ्या विचाराला मेंदूत घर करता आलं नाही. समजलं असतं असंही नाही. आणि नसतं असंही नाही. मनस्थिती दयनीय होती. मधुवंतीनं करून दिलेल्या व्यक्तींच्या ओळखीची. त्याचाच अस्पष्ट साक्षात्कार व्हायचा कधी कधी.
४५ वर्षांपूर्वीचं आयुष्य समोर येतं तेव्हा मी घेऊन दिलेला एक गजरा, तिनं आनंदानं माळलेला आजही आठवतो. सौंदर्यग्रहण करण्याची सवय लावायला एवढं कारण पुरे होतं. हे नवलपर्व लवकर संपलं तेही बरंच झालं! विसरणं अशक्य होतं. अनेकांच्या घडवून आणलेल्या गाठीभेटी. ओळखपाळख. नाटय़समीक्षा. दाखविलेली नाटकं, समांतर आणि व्यावसायिक रंगभूमीचा तिचा असलेला अभ्यास. त्याचं चिंतन, मनन, भरताचं नाटय़शास्त्र. त्यावरच्या गप्पा हेही नसे थोडके. ‘देवाजीने करुणा केली’, ‘देवकी’ ही नाटकं पाहिली. प्रभाकर पणशीकरांचा लखोबा लोखंडे अंगात भिनला होता. कॅप्टनही. ‘तो मी नव्हेच’चा अकरावा प्रयोग तिनं दाखविला. ‘नांदी’मुळं प्रभाकर पंतांची ओळख झाली खरी. त्याचा फायदा शिवाजी मंदिरात त्यांचं नाटक असलं की पास मिळायचा. सुहास भालेकरांमुळे लोकनाटय़, मुक्तनाटय़ाची ओळख झाली. ‘फुटपायरीचा सम्राट’, ‘माकडाला चढली भांग’. आत्माराम भेंडे, बबन- नीलम प्रभू, शंकर घाणेकर यांच्या लवचीक अभिनयातून साकारलेली फार्सकिल नाटकं पाहिली. याचं श्रेय जातं सुरेश खरे आणि मधुवंती या कन्येला. मग सांगा तिला विसरायचं काय म्हणून?
हा प्रवास संथगतीनं सुरू होता. मनातलं सहजसाध्य होत नसतं. काळ कठीण आणि स्वभाव संकोची भीडभाड नाही. तरीही मधुवंतीमुळं आणि मित्र सुभाष रणदिवे आणि ‘र्तीथकर’चे संपादक श्रेणिक अन्नदाते यांच्यामुळं वर्तमान बदलत होतं. नवं जग समजत होतं. आकर्षण वाटत होतं. जाणकार आत्मविश्वास देत होते. नवनव्या स्वप्नांना जन्म देण्याचं काम करीत होते. तशातच राजा बढे भेटले. भावगीतकार. रविवारी हमखास शिवाजी पार्कजवळील घरी जायचो. गप्पा मारायला. मराठवाडय़ातलं पोरगं मुंबईत आलंय म्हणून त्यांना अप्रूप. तसं मराठवाडा-विदर्भाचं आंतरिक नातं आहेच.
शांता शेळके, शिरीष प या ‘दैनिक मराठा’ची पुरवणी संपादित करीत असत. कधी कथा, कधी ललित लेख लिहिले. या दोघींनी जिव्हाळा लावला. जपला. आमटी-भात खाऊ घातला. शांताबाई तर पुढे माझ्या मुलीच्या आत्याच झाल्या. ‘साहित्य सहवासात’ त्या होत्या तोपर्यंत आणि पुण्यात आल्यावरही भेटी व्हायच्या. किती चांगले होते ते दिवस. एक गाणं किंवा कविता त्यांच्याजवळ जायला पुरे वाटायची त्या काळात. ‘तोचि चंद्रमा नभात’ या गीतामुळे त्या पोरसवदा वयात मी मुंबईत पहिल्यांदा त्यांना भेटल्याचं आठवतं. एक-एक दिवस तराजूत तोलत होतो. उद्याचा अंदाज येण्यासाठी. सरभर न होता. गरगरणाऱ्या लाटांना सोबत घेत. फेसाळ पाण्यांसह. केवळ अप्रूप म्हणून! गाऱ्या वेचण्याचे दिवस संपल्याचं भान होतंच की मदतीला. मुंबई सोडावी लागली. कारणं वेगवेगळी होती. मुख्य मुद्दा होता पावसाचा. खूप छळलं त्यानं. जीव मेटाकुटीला यायचा. सर्दी-पडसं, अंग दुखणं ताप आणि खोकला. क्रमाक्रमानं हजेरी लावून जायचे. या समस्येवर एकच उपाय होता. तो म्हणजे परतीचा प्रवास. तोही बऱ्यापकी जम बसत असताना. मार्ग दाखवणारी, प्रसंगी आधार देणारी माणसं भेटत असताना मनाविरुद्ध निर्णय घेणे क्लेशदायकच होतं. घरी परतून काय करायचं होतं. परंपरागत काहीच नको होतं. शेतीही नको होती. आतबट्टय़ाच्या व्यवहारात बुडालेल्या बारा तोंडात आणखी एका तोंडांची भर कशाला? एक प्रकारचं हे वादळ घोंघावत होतं. जळी, स्थळी, काष्ठी. मधुवंतीनं तरी तिच्या घरी बोलावून बाबाकडून कान पिळले होते. नुसते पिळले नाहीत तर ओढले होते. तरी आकर्षणही होतं, नाटकाचं. नाटकात काम करणाऱ्याचं. लेखकाचं. कवीचं. पत्रकाराचंदेखील. दीड-दोन वर्षांचा काळ जसा फार नाही; पण मुंबईनं जगावं कसं शिकवलं. कष्टाची शिकवण दिली. मिळालेल्या कामाला कधीही कमी लेखायचं नाही हे सांगितलं. पदोपदी जाणीव दिली. कामगार, उपेक्षित, दलित, गरजवंत यांच्याकडं बघण्याची नजर दिली. संस्काराचा कोष घट्ट आवळू दिला नाही. ‘माणूस’ पाहायला शिकलो तो मुंबईत. आजच्यासारखी ‘संकुचित’ स्थिती त्या वेळी नव्हती. शब्दबंबाळ प्रादेशिकतेचं वारंही घोंघावत नव्हतं. कुणी विचारलं तर एवढंच म्हणायचं, ‘कशासाठी? पोटासाठी!’
पत्रकार होण्याचा निश्चय गप्प बसू देत नव्हता. खरं म्हणजे हे जग कळण्याच्या पातळीवरचं नव्हतं. त्याच दरम्यान अंबाजोगाईत भिकूभाऊ राखे भेटले. अक्षर देखणं होतं माझं. ‘साधना’, ‘आनंद’, ‘मराठा’तील लेखन वाचलं होतं त्यांनी. भिकूभाऊ राखे ‘मराठवाडा’ दैनिकाचे वार्ताहर होते. स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतलेला होता. माणूस गांधीवादी. उक्तीनं आणि कृतीनंसुद्धा. भिकूभाऊ. सडसडीत अंगकाठी. व्यवसाय शिक्षकाचा. हळूहळू दोस्ती जमली. एके दिवशी त्यांनीहून विचारलं, ‘महावीर, काय करायचं ठरवलंस? पुढं शिकणार की पोटापाण्याचं बघणार?’ त्यांना माहीत होतं- पत्रकार होण्यासाठी मुंबई गाठलेली. म्हणूनच ते म्हणाले, ‘मराठवाडा दैनिका’चे संपादक अनंत भालेराव यांच्या नावानं एक अर्ज लिही. त्यात सगळं लिही. त्यांनी सांगितलं. मी लिहिलं. त्यांनीच तो माझा अर्ज भालेराव यांना पाठविला. चारपाच दिवसात त्यांच्या सुंदर अक्षरातील सुंदर वळणानं मोहित करणारं पत्र आलं. भिकूभाऊकडं. त्यात लिहिलं होतं, त्याला औरंगाबादला पाठव. तिथेच राहण्याच्या तयारीनं. पत्रकारिता शिकण्यासाठी. ‘दै. मराठवाडा’ त्याची सगळी सोय करील.
आणि १ मे १९७० साली मी अण्णांचा (अनंत भालेराव) शिष्य म्हणून औरंगाबादेत दाखल झालो. अनंत भालेराव यांच्या लेखणीचं सामथ्र्य अनुभवण्यासाठी. वृत्तपत्रात काम करायला मिळाल्यामुळं वाचनाची, लेखनाची आवड निर्माण झाली. वाङ्मयातील नवेनवे प्रवाह संपादकांनीच समजून दिले. दलित, ग्रामीण साहित्याचा प्रवाह. जे जे नवे ते ते वाचावे असे सांगितले. त्या काळात साप्ताहिक बठकीत ख्यातनाम समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी, प्राचार्य भगवंतराव देशमुख, प्रा. नरहर कुरुंदकर, प्रा. गो. मा. पवार, प्रा. चंद्रकांत भालेराव ही मंडळी असायची. संपादक आपल्या सहकाऱ्यांना चच्रेत सहभागी करून घ्यायचे. पुढं विजय तेंडुलकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, उद्धव शेळके, अनंत अंतरकर यांनी लिहितं ठेवलं. ख्यातकीर्त कादंबरीकार प्रा. भालचंद्र नेमाडे त्या वेळी औरंगाबादेत होते. मुंबईत चंद्रकांत खोत, भाऊ पाध्ये यांना भेटायचो. नामदेव ढसाळ, केशव मेश्राम, नारायण सुर्वे यांची कविता पहिल्यांदा तेथेच भेटली. ती माझी झाली. तुळशी परब तर माझ्या शेजारी. खांद्यावर पडणारा प्रत्येक हात मला माझा वाटायचा. अगदी नेमाडे यांचासुद्धा. ‘कोसला’च्या प्रेमात होतो तेव्हा. साहित्याच्या प्रांतातील धडपड पुढे ‘सत्यकथे’त पहिली कथा प्रसिद्ध होईपर्यंत ‘मजल-दरमजल’ पुढं सरकत होती. साहित्यिक मेळाव्यात मन हळूहळू रमत होतं. ७० ते ७६ पर्यंत एकटाच होतो. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कामात पडलो. अर्थात अण्णांच्या आग्रहामुळं. पाचला कार्यालयातलं काम संपायचं, वृत्तसंपादनाचं. ‘मराठवाडा’ दैनिकाच्या शेजारीच ‘मराठवाडा साहित्य परिषद.’ पडेल ते काम करायचं. पुस्तकावरील प्रेमापोटी. पुढं कार्यकारिणीवर निवडून आलो. ‘प्रतिष्ठान’चा कार्यकारी संपादकही झालो. सुरात सूर मिसळला नाही, नंदीबलासारखी मान डोलावली नाही. तसं केलं असतं तर बरंच काही मिळवलं असतं. मूíतजापूरचे उपेक्षित कवी सुधाकर पूर्णाजी जाधव यांच्या शब्दात सांगायचं तर,
छद्माच्या अंगारातून जीवनाचे पद्म फुलावे दरवळत्या हवनाला या ज्वालांचे पोषण द्यावे.
सत्तरीच्या आधीचं दशक हे केवळ कलामूल्यांचं दशक होतं. साहित्य, नाटक आणि संगीताच्या क्षेत्रापुरतं बोलायचं, सांगायचं झालं तर व्याप्तीच्या, संवादाच्या मर्यादा असूनही भावनिक गुंतवणुकीला साहाय्यक होणं गरजेचं असतं. साहित्यिक, कलावंत आणि वाचक यांच्यातील परस्पर संवाद यातून दिसणारं समाजशास्त्र कामाला येतं. उत्तरार्धातील वळणवाटा ठरवतं.
साठोत्तरी काळ तसा समजून घेण्यात गेला. तत्कालीन वाड्मयीन नियतकालिकांचा अभ्यास करताना विविध प्रभावांची जाणीव झाली. त्या काळी एक अभ्यास मंडळ होतं. त्यात चंद्रशेखर जहागीरदार, रंगनाथ तिवारी, विश्वास तांबोळी, प्रा. पेंडसे, छत्रे मॅडम होते. नवनवीन कथा, कविता, एकांकिकांचे वाचन करून अशा विविध वाङ्मयीन आकृतिबंधाच्या संदर्भात चर्चा होत असत.
मुंबई सोडल्यानंतर औरंगाबाद गाठलं. तिथे आत्मविश्वास वाढविणारे समीक्षक-संपादक भेटले. पत्रमहर्षी अनंत भालेराव आणि म.य. दळवी यांच्या मुक्त विद्यापीठात दाखल झाल्यानंतर एकदम वाटच बदलली. वळण बदललं. वाङ्मयीन व्यवहारात होत असलेल्या परिवर्तनाची, प्रायोगिकतेची ओळख करून देण्यासाठी ख्यातनाम समीक्षक वा.ल. कुलकर्णी, डॉ. गंगाधर पानतावणे, कमलाकर सोनटक्के यांची भरीव मदत झाली. तेही नवं वळण घेण्यासाठी कामी पडलं. ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे अधूनमधून भेटत असत. त्याचं वाङ्मयीन वर्तुळ वेगळं असलं तरी नव्या लेखकावर ते प्रेम करायचे. त्यांच्यामुळेच माझा पहिला समीक्षा लेख वसंत दावतर यांच्या ‘आलोचना’त प्रसिद्ध झाला. सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाचं दशक असंही या काळाला म्हणता येईल. निग्रो वाङ्मय, दलित वाङ्मयविषयक विशेषांक काढले जायचे. आमच्या पिढीतील भास्कर चंदनशीवचं दशक होतं ते. धर्मवीर भारती यांनी त्याच्या काही कथा ‘सारिका’, ‘धर्मयुग’मध्ये अनुवादित केल्या होत्या. माणूसपण हिरावून घेतलेल्या समाजाचं चित्रण तो खुबीनं करायचा. एकमेकांच्या अनुभवाविषयी फायदा करून घेण्यासाठी साधनं कमी असली तरी साधना थांबली नाही. कवी पाहुणे यायचे. समकालीन साहित्यिकांच्या भेटी ‘सत्यकथा’, ‘अस्मितादर्श’, ‘युगवाणी’, ‘संदर्भ’, ‘प्रतिष्ठान’मधून व्हायच्या. वर्तुळ अभंग राहिलं. अनेक वळणं पार केली. वाटा दाखवणारी ज्ञानवंत माणसं भेटत गेली, म्हणून एका दैनिकाचा संपादक म्हणून काम करता आलं. प्रयोग करता आले. ठसा उमटवता आला.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार