मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com

‘‘जी भाषा आपण सतत ऐकतो आणि बोलतो, त्या मातृभाषेतून शिक्षण घेणं ही अधिक नैसर्गिक प्रक्रिया आहे.  व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते नक्कीच पोषक ठरतं. पालकांनी आपल्या मुलाला मराठी माध्यमात घातलं तर जगाच्या रेटय़ात त्याचा टिकाव लागेल का, म्हणून घाबरून जाऊ नये. मूल यथावकाश इंग्लिश बोलेलच. त्याचा अनावश्यक ताण नको. पण तुम्ही मातृभाषेत शिकलात तर समृद्ध आणि संपन्न होता एवढं मात्र नक्की,’’  सांगताहेत ‘इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन’ या राष्ट्रीय संस्थेच्या ७५ वर्षांच्या इतिहासातल्या पहिल्या स्त्री उपाध्यक्ष आणि ‘औषध साक्षरता’ या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या प्रा. मंजिरी घरत.

‘इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन’ या राष्ट्रीय संस्थेच्या ७५ वर्षांच्या इतिहासातल्या पहिल्या स्त्री उपाध्यक्ष व ‘कम्युनिटी फार्मसी विभागा’च्या प्रमुख, उल्हासनगर येथील ‘के. एम. कुंदनानी फार्मसी पॉलिटेक्निक’च्या प्रभारी प्राचार्य, १३७ देशांची सदस्य असलेल्या ‘फिप’ या ‘आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशन’च्या ‘कम्युनिटी फार्मसी’ विभागाच्या उपाध्यक्ष, क्षयरोगाच्या रुग्णांसाठी भारत सरकारने राबवलेल्या ‘डॉट्स’ या योजनेमध्ये केलेली भरीव कामगिरी आणि त्याची ‘जागतिक आरोग्य संघटने’ने घेतलेली दखल, ‘फिप फेलो’ आणि ‘इशिडेट अ‍ॅवॉर्ड’ हे दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय स्त्री आणि या सगळ्याबरोबरच ‘औषध साक्षरता’ या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या ‘औषधभान’ या पुस्तकाच्या लेखिका. प्रा. मंजिरी घरत यांच्या कर्तृत्वाचा हा आलेख वाचून मन थक्क होतं.

डोंबिवलीच्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात मंजिरी यांचा जन्म झाला. डोंबिवलीतल्याच ‘स. वा. जोशी विद्यालय’ या शाळेत दहावीपर्यंत मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अकरावी-बारावीदेखील तिथल्याच ‘पेंढारकर महाविद्यालया’तून केलं आणि त्यानंतर मुंबईच्या ‘यू.डी.सी.टी.’ (आत्ताची ‘आय. सी. टी.’- ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’) या प्रख्यात रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतून औषधनिर्माण शास्त्राचं शिक्षण घेतलं. आधी मराठी शाळेत शिकणं आणि नंतर आपल्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली भरारी या प्रवासाबद्दल मंजिरी यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

प्रश्न : शाळेत दहावीपर्यंत मराठी माध्यम आणि नंतर महाविद्यालयात मात्र इंग्रजी माध्यम. हा प्रवास अवघड गेला का?

मंजिरी : फारसा नाही. याचं श्रेय मी माझे आजोबा रामकृष्ण टिळक, वडील अविनाश टिळक आणि शाळेतले शिक्षक आर. बी. कुलकर्णी यांना देईन. कारण शाळेत इंग्रजी हा विषय इयत्ता पाचवीपासून होता. या भाषेच्या व्याकरणाचा पाया शाळेत पक्का घातला गेला होता. शब्दसंपदा वाढवण्यासाठीही शाळेत नेहमी आग्रह धरला जायचा. शिवाय दरवर्षी मी टिळक विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षा देत असे. घरी आजोबा आणि वडील यांचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यानं घरीही इंग्रजीचा चांगला अभ्यास झाला आणि प्रोत्साहन मिळालं. त्यामुळे इंग्रजीचा बागुलबुवा कधी वाटला नाही, उलट गोडी लागली.

प्रश्न : या सर्वामुळे तुमचं इंग्रजीचं व्याकरण चांगलं झालं, तरीही महाविद्यालयात गेल्यावर इंग्रजी माध्यमातल्या मुलामुलींशी बोलताना न्यूनगंड आला का? विशेषत: सफाईनं इंग्रजी बोलणाऱ्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधताना?

मंजिरी : थोडासा झाला, पण रूळ बदलताना रेल्वेचा थोडासा खडखडाट होतो तितकाच! सुरुवातीला थोडंसं बिचकायला व्हायचं. कधी कधी त्यांच्या काही शब्दांचा अर्थ कळायचा नाही, तर क्वचित कधी शब्द पटकन सुचायचे नाहीत. पण मग त्यावर जाणीवपूर्वक मेहनत घेतली. शब्दसंपदा वाढवण्यासाठी इंग्रजी वृत्तपत्र वाचणं, इंग्रजी बातम्या, गाणी ऐकणं या गोष्टी प्रयत्नपूर्वक केल्या. इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, की तुम्ही जर तुमच्या अभ्यासात निपुण असाल तर तुम्हाला सर्वाकडून खूप आदर मिळतो. इतर भाषा बोलणारी मंडळीही स्वत:हून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी येतात. तिथे भाषेचं माध्यम आडवं येत नाही. शिवाय माझ्या मनात एक खूणगाठ पक्की होती- इंग्रजी शेवटी एक परकीय भाषाच ना आपल्यासाठी.. मग बोलताना कधी थोडं चुकलं तर इतका ताण कशाला घ्यायचा? ते कसं दुरुस्त करायचं ते शिकू ना! पण मराठी मातृभाषा नसलेल्या मैत्रिणींशी मी जरूर इंग्लिशमधून बोलायचे. त्याशिवाय सवय कशी होणार? आपलं  व्याकरण चांगलं आहे, फक्त शब्दसंपदा आणि सराव कमी आहे, याची मला जाणीव होती.

प्रश्न : मराठी ते इंग्रजी माध्यम बदलामुळे विषय नीट समजण्यासाठी काही अडचण आली का?

मंजिरी : अजिबात नाही. तांत्रिक विषय समजण्यासाठी काहीही अडचण येत नाही. जर वर्णनात्मक विषय असतील तरी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडी मेहनत घेतल्यास अडचणींवर सहज मात करता येते. शिवाय आपल्याला काही भाग कळला नाही तर अध्यापकांना विचारता येतंच की. आपली भाषा मराठी असल्याने आधी मराठीतून विचार होतो आणि त्यामुळे इंग्लिश लिहिताना मराठी वळणानं लिहिणं व्हायचं. अजूनही कधी कधी तसं होतं. म्हणजे ‘हळूहळू’ हा शब्द इंग्लिशमध्ये  लिहिताना ‘स्लोली-स्लोली’ असा नाही लिहीत. हे अनुभवानं, सरावानं, वाचनानं समजत जातं आणि टाळता येतं. इंग्रजी वाचन आणि बोलण्याचा सराव करत राहण्यातून तुमचा आत्मविश्वास वाढत जातो आणि मग मार्ग सुकर होतो.

प्रश्न : पुढे अमेरिकेत तुम्ही काही अभ्यासक्रम केलेत आणि नोकरीही केलीत. भारतात संवादासाठी काही अडचण आली तर वेगळ्या भाषेचा- म्हणजे हिंदीचा पर्याय असतो. त्यामुळे त्या मानाने ते सोपं जातं. पण अमेरिकेत कसं काय जमवलंत? 

मंजिरी : इथे ‘एम. फार्म.’चं पदव्युत्तर शिक्षण घेऊन जेव्हा मी अमेरिकेत गेले, तेव्हा पहिले ४-५ आठवडे अमेरिकी इंग्रजीचं उच्चारण, त्यांची बोलण्याची लकब हे समजून घेताना थोडा वेळ गेला. पण मी विविध प्रकारच्या दुकानांमधून  ‘मार्केटिंग’ (विपणन), विक्री विभागात तांत्रिक विषयाशी संबंधित नसलेल्या नोकऱ्या केल्या. त्या वेळी मी ग्राहकांशी सावकाश म्हणजे कमी वेगानं पण सतत बोलत असे. ‘टेलिमार्केटिंग’ (फोनवरून ग्राहकांशी बोलणं), ग्राहकांनी ‘स्टोअर  क्रेडिट कार्ड’ घ्यावं यासाठी त्यांना गळ घालणं, अशी कामं मी केली. त्यात मला ‘फ्रेंडलीनेस स्टार्स’ वगैरेही मिळाले- जे ग्राहकांच्या अभिप्रायावरून होतं. तुम्हाला कल्पना येईल, यात संवाद करताना भाषा किती महत्त्वाची होती. मी सांगते तो  काळ १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा. तेव्हा भारतात जागतिकीकरण पोहोचलेलं नव्हतं. इंटरनेट आम्हाला माहीत नव्हतं. पण इंग्रजीचा शाळा आणि घरात घातला गेलेला उत्तम पाया,आत्मविश्वास आणि आसपासच्या लोकांकडून कळत-नकळत शिकत जाणं, यामुळे मला अशा नोकऱ्या उत्तम रीतीनं करता आल्या. हा तीन वर्षांचा अनुभव पुढे औषधनिर्माण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना उपयोगी पडला.

प्रश्न : आंतरराष्ट्रीय पातळीवरील वर्तुळात वावरताना सुरुवातीला समस्या आल्या का?

मंजिरी : अमेरिकन इंग्रजीचा सराव मला झाला असल्यानं खूप कठीण नाही गेलं. ऑस्ट्रेलियन आणि ब्रिटिश इंग्रजी उच्चारण कळायला सुरुवातीला थोडं अवघड वाटलं, पण तेही हळूहळू सवयीचं झालं. मुख्य म्हणजे परदेशी लोक खूप चांगलं  सहकार्य करतात. त्यांना तुम्ही त्यांची भाषा बोलत आहात याचं कौतुकही असतं. तेही सावकाश बोलून तुम्हाला मदत करतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांबरोबर मी सहज मिसळू शकले. आपल्याला संवादापुरतं, विषयापुरतं इंग्रजी सहज समजतं. आमच्या समितीमधले चिनी, कोरियन किंवा अगदी स्पॅनिश, फ्रें च, जर्मन मातृभाषा असणारे सहकारी तर आपल्या इंग्लिशचं कौतुक करतात, तर मी ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन आणि कॅनडियन सहकाऱ्यांकडे कौतुकाने बघते. म्हणजे  एकंदर सर्व सापेक्ष असतं.

प्रश्न : मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण द्यावं, यावर आपलं काय मत आहे?

मंजिरी : मी याच्याशी सहमत आहे. पण कधी काही अपरिहार्य कारणांमुळे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावं लागतं. अशा वेळी पालकांनी मराठी भाषेशी नाळ तुटू देऊ नये. घरात मराठी वातावरण देणं, ते टिकवणं, मराठी पुस्तकं वाचण्याची सवय लावणं, हे गरजेचं आहे. जी भाषा आपण सतत ऐकतो, बोलतो, त्यातून- म्हणजे मातृभाषेतून शिकणं ही अधिक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे नक्कीच व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते पोषक असतं असं संशोधन सांगतं. शिवाय भाषा ही संस्कृतीची वाहक असते. त्यामुळे ती टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे पालकांनी आपल्या मुलाला मराठी माध्यमात घातलं तर जगाच्या रेटय़ात त्याचा टिकाव लागेल का, म्हणून घाबरून जाऊ नये.  एखादं मूल एक वर्षांचं असताना चालू लागतं, कुणी सव्वा वर्षांनं चालतं. पालकांनी घाई करू नये. मूल इंग्लिश बोलेलच यथावकाश. गोष्टी आपापल्या गतीनं होत राहतात. त्याचा अनावश्यक ताण घेऊ नये.

प्रश्न : मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यानं काय कमावलं आणि काय गमावलं?

मंजिरी : काहीच गमावलं नाही. मी गेली अनेक र्वष लोकांमध्ये औषध साक्षरता निर्माण होण्यासाठी विविध पातळ्यांवर काम करते आहे. सर्वसामान्य लोकांशी सहज संवाद साधण्यासाठी, त्यांना समजेल अशा भाषेत बोलण्यासाठी आणि  लिहिण्यासाठी मला मराठी भाषेतल्या शिक्षणाचा खूप फायदा झाला. किंबहुना माझ्या व्यक्तिमत्त्वात समाजाभिमुखता त्या शिक्षणामुळे आली, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्या भाषेत मी सोप्या शब्दांत, लोकांच्या भाषेत बोलू, लिहू शकते,  लोकांचे गट बांधू शकते. इतर भाषेत जर मी प्राथमिक शिक्षण घेतलं असतं तर या गोष्टी सहजपणे झाल्या नसत्या. आता सर्व शासकीय पत्रव्यवहार मराठीतून असतो. महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या नोकरीत मराठी व्यवस्थित येण्याचा खूप फायदा  मला होतो. मराठी भाषेतलं साहित्य, गाणी, असा सर्व प्रकारचा खजिना माझ्यासाठी खुला झाला. त्यामुळे मी समृद्ध झाले. इतर भाषेत शिकले असते तर या खजिन्याचा आस्वाद कदाचित फार मर्यादित झाला असता.

मला मराठी माध्यमातून शिकल्याने ‘बेस्ट ऑफ बोथ वल्र्ड्स’ मिळालं! समृद्ध आणि संपन्न होता आलं.