News Flash

पुरुष हृदय बाई : अपलापकाळातली मानव संकल्पना   

स्त्री-पुरुष आकर्षण म्हणजेच स्त्रीत्व आणि पुरुषत्व समजावं का? असे अनेक विचार मनात उभे राहातात.

सलील वाघ saleelwagh@gmail.com

पुरुष स्त्रीकडे आणि स्त्री पुरुषाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहातात, हे कसं ठरतं? हा दृष्टिकोन- जो आपला स्वत:चा आहे, असं आपल्याला वाटतं, तो खरोखरच स्वत:चा कितपत असतो. अगदी मूल जन्मल्यापासून एक भयंकर मोठी बाजारव्यवस्था त्याला आपल्या ताब्यात घेत असते, अनेक सामाजिक स्वरूपाच्या अभिव्यक्तीदेखील कोणत्या ना कोणत्या समीकरणांमधून आणि पुष्कळदा साटय़ालोटय़ातून जन्मास आलेल्या असतात. अशा वातावरणात आपण व्यक्तीकडे व्यक्ती म्हणून पाहायची नजर तयार करू शकू  का? या प्रश्नाच्या उत्तरातच स्त्री-पुरुष एकमेकांकडे कसे पाहतात याचं उत्तर मिळेल. 

सतत ‘लाइट कॅमेरा अ‍ॅक्शन’ मोडमध्ये असणारे, कोणत्याही विषयावर कुठेही, कितीही, काहीही हुकमी लिहू शकणारे लेखक लोक बघून खरं तर रोजच्या रोज न्यूनगंड आणि वैषम्याच्या कडेलोटालाच आपण जातो. आपण आता काहीच उपयोगाचे नाही, असं रोज आरशासमोर उभं राहून स्वत:ला बजावण्याचंही त्राण आणि धारिष्टय़ अंगात उरत नाही. पुरुषपणाविषयी विचार करायला लागल्यावर आई, मावश्या, आत्या, काकवा, बहिणी, मत्रिणी, पुतण्या, भाच्या, बायको, मित्रांच्या बायका, सुना, सासवा, भाजीवाल्या, शेजारण्या, सहकारी, क्लायंट स्त्रिया, रिसेप्शनिष्टा, कामवाल्या, नटय़ा, जाहिरातीतल्या स्त्रिया, बातम्यांतल्या स्त्रिया, नुसतंच येताजाता हसून ओळखीच्या, अशा पार निरुपा रॉयपासून ते सनी लिओनपर्यंतच्या असंख्य स्त्रिया आपल्याला घेरून आपल्यावर नजर रोखून उभ्या आहेत असं वाटायला लागतं. नक्की विचार कुठून करायला सुरुवात करणार आणि थांबणार कुठे, हाच मोठा प्रश्न!

पुरुष असल्याबद्दल हळवेगिरीचं जाड कातडं पांघरून, चेहऱ्यावर अपराधगंडाचं डांबर फासून घ्यावं? की उंडगेगिरीचं, प्लेबॉयबाजीचं उदात्तीकरण करावं? शृंगारिक/ रोमँटिक/ हुळहुळतं, झुळझुळतं, स्वप्नाळू काही वाचकानुनयी लिहावं? की टॉमबॉयपणाच्या आणि रणरागिणीपणाच्या आरत्या ओवाळाव्या? की क्षणकाळची पत्नी, अनंतकाळची माता वगरेछाप देवतास्वरूपाचं लोढणं बायकांच्या गळ्यात टाकून बेजबाबदारपणानं वागायला मोकळं व्हावं? कौटुंबिक किस्सेवजा काही चटपटीत, चुरचुरीत, खुसखुशीत लिहावं का? स्त्री-पुरुष आकर्षण म्हणजेच स्त्रीत्व आणि पुरुषत्व समजावं का? असे अनेक विचार मनात उभे राहातात.

मी कसा घडलो, लहानपणी वगरे आजूबाजूच्या स्त्रिया कोण होत्या, कशा होत्या, पुरुषत्व म्हणजे काय, पौरुषबिरुष म्हणजे काय, मला स्त्रीवाद कसा सापडला किंवा नाही, आयुष्यात आलेल्या (किंवा न आलेल्या) स्त्रिया, प्रत्येकीच्या हलक्याफुलक्या किंवा दाहक चरचरीत आठवणी, त्यांची व्यक्तिचित्रणं, त्याचं गौरवीकरण किंवा गौरवीकरणाच्या नावाखाली बदनामीकरण, सक्षमीकरण वगरेंच्या गोष्टी. पिचलेल्या स्त्रिया, माजलेल्या स्त्रिया, लढे,

आहे रे, नाही रे, (किंवा आहे गं- नाही गं), मी कसा अमुकप्रधान घरात वाढलो, समानता कशी ‘कंडिशनल’ आवडते किंवा असते किंवा नसते, पुिल्लगाची गंमत, व्यभिचारकथा, शोषकशोषितांचे उमाळे.. हे सगळे चावून चोथा झालेले विषय आपल्याला नवं काही तरी सापडल्याच्या आविर्भावात पुन्हा चघळण्यात काहीच हशील नाही.

लहानाचे मोठे होत असताना आणि मोठं झाल्यावर रोजीरोटीच्या उद्योगात मान मोडून काम करताना पुढे आपल्याला पुरुषत्वावर विचार करायचा आहे असं माहीत असतं, तर जगण्याच्या नोंदी जास्त सावधपणे घेत घेत तसं भांडवल गोळा करता आलं असतं; पण तसं काही आधी माहीत नव्हतं आणि ठरलंही नव्हतं. त्यामुळे जसं जगणं येईल तसं नैसर्गिकपणे जगावं लागलं. जगताना, जगणं आणि जगण्याचं भविष्य कसं वळण घेईल आणि जगलो तो भूतकाळही भविष्यात कसा दिसेल, हे सगळंच अज्ञात असतं. त्यामुळे कोणत्याही विषयाचा किंवा संकल्पनेचा विचार जगण्याला धरून करायचा असेल तर तो स्वाभाविकपणे व्यामिश्र होत जाणार. कदाचित भरकटण्याला, विषयांतराला, स्वत:ला मुक्त सोडून द्यायला पर्याय नाही.

करमणूक ही जवळपास जीवनप्रेरणा झालेल्या कालखंडात आपण जगतो आहोत. प्रत्येक गोष्टीत आपण मनोरंजन शोधतो आहोत. मनोरंजनासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे संवेदनांचा अपलाप करणं. संवेदनांचा अपलाप करता करता सत्याचाही अनेकदा अपलाप होतो. आपण ज्या कालखंडात राहतो तो सत्यापलापाचा कालखंड आहे. कोणतीही गोष्ट, विचार, मुद्दा, घटना आज आपल्यापुढे यादृच्छिकतेनं येत नाही. जशीच्या तशी येत नाही. आपल्याला ‘दिसत’ काही नाही. आपल्याला कोणी तरी काही तरी ‘दाखवतं’. आपल्याला ‘सांगितलं’ जातं, ‘ऐकवलं’ जातं, ‘दिलं’ जातं किंवा ‘घ्यायला-द्यायला लावलं’ जातं. ज्या वेळेस आपल्याला काही दाखवलं जातं, त्याच वेळेस आपणही दुसऱ्याला दाखवले जातो. या सगळ्या संप्रेषणात किंवा विदावहनात मूळ गरजा, प्रेरणा, निवडी, वास्तव यांचा सतत अपलाप केला जातो. केवळ राजकीय पक्ष किंवा बाजारशक्तीच हा अपलाप करतात असं नाही, तर आता माणूस छोटय़ा छोटय़ा क्षेत्रांत, वेगवेगळ्या भूमिकांतूनही हा सत्यापलाप करतो. माणूस आता या अपलापासाठी राजकारण/ समाजकारण किंवा बाजारशक्तींवर अवलंबून नाही, तो आता स्वत:चा स्वत:ही अपलाप करण्याइतका आत्मनिर्भर झालेला आहे.

जगणं एकगठ्ठा-एकरकमी नसतं. संवेदना एकरंगी नसतात. माणसाचं अस्तित्व बहुस्तरीय असतं. माणसाचा काळ बहुध्रुवीय असतो. वास्तवाचं असं अनेकत्व मान्य केलं, तर अनेक गुंतागुतीच्या गोष्टी समजायला मदत होते. काही अटळ आणि निसर्गानेच दिलेले जैविक फरक सोडले तर मनुष्यप्राण्यात स्त्री आणि पुरुष फार काही वेगळे नाहीतच. माणूस म्हणून दोघांचेही संघर्ष एकच आहेत, समानच आहेत. विभाजनवाद्यांच्या सोयीसाठी या दोघांचे लढे फार परस्परभिन्न असल्याचं किंवा परस्परविरोधीही असल्याचं सतत भासवलं जातं. तसं करण्यात अनेकांचे अनेक राजकीय आणि व्यावसायिक हितसंबंध मोठय़ा प्रमाणात गुंतलेले असतात. अगदी छोटं उदाहरण द्यायचं, तर अगदी काल-परवापर्यंत अतिशय आश्वासक आणि दमदारपणे वाटचाल करणाऱ्या स्त्रीवादी किंवा स्त्रीमुक्तीसारख्या चळवळी गेल्या काही दशकांत बघता बघता चंगळवादानं घेरल्या गेलेल्या आणि साटय़ालोटय़ाच्या भांडवलशाहीनं (क्रोनी कॅपिटॅलिझम) हायजॅक केलेल्या आपल्याला  दिसतात. त्यामुळे स्त्रीन्यायाच्या संकल्पनेची मांडणीच परत वेगळ्या प्रकारे मुळापासून करण्याची गरज आहे, यावर कोणी काही (अपवाद वगळता) बोलतही नाही किंवा दुसरं उदाहरण म्हणजे, भारतीय समाजातली विषमता, वर्ग-वर्ण-जाती संघर्ष यांच्या अभ्यासाला भारतातली आणि भारताबाहेरची साटय़ालोटय़ाची भांडवलशाही मोठय़ा प्रमाणात प्रोत्साहन देत असते. हा फक्त अभ्यास नसतो, तर त्या अभ्यासातून एक मांडणी उभी करून भारतीय समाजाच्या नीतिधर्याला छेद देण्याची योजनाही त्यामागे असते. दुर्दैवानं उजव्या भांडवलदारीसाठी हे ग्राउंडवर्क करून देण्यात आपली अनुदानलोलुप (यात स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारेही आले.) मंडळी आघाडीवर असतात. थोडक्यात, स्त्री आणि पुरुष ही दोन अस्मिताक्षेत्रं मानून त्यांना एकमेकांविरुद्ध सतत उभं करण्यानं एक प्रकारच्या फिल्मी मानसिकतेची जडणघडण होते आणि अगदी मूळ  प्रश्न (उदा. स्त्रियांसाठी सुरक्षित अशा सार्वजनिक स्वच्छतागृहांची गरज.. अशा अनेक साध्यासुध्या नागरी प्रश्न प्रश्नांपासून ते भाषेच्या अबोधात रुतून वाक्प्रचार-म्हणींमधून पिढय़ान्पिढय़ा जोपासलेल्या भेदभावकेंद्रित मूल्यभावापर्यंतच्या गोष्टी इ.) व्यवस्थितपणे बाजूला सारले जाऊन चर्चाचे झोत फक्त सनसनाटी गोष्टींवर फिरत राहातात. आजच्या घडीला ज्याला आपण स्त्रीवाद किंवा स्त्रीमुक्ती समजतो किंवा संबोधतो, तो खरा प्रश्न हा ‘स्त्री-न्यायाचा’ आहे. स्त्रीवाद किंवा पुरुषवादाचा नाहीच. पुरुषांची स्पंदनं आणि स्त्रियांची स्पंदनं ही फार परस्परविरोधी आणि परस्परव्याघ्याती नाहीतच. मग तरीही हा भेद, कधी कधी सवंग करमणुकीच्या (उदा. बाप्यांनी बायांचे कपडे घालून पाचकळपणा करणाऱ्या अतिवाह्य़ात मालिका) आणि बव्हंशी सतत खुमखुमीच्या, एकमेकांना खिजवण्याच्या, दोषारोपाच्या आणि कधी कधी द्वेषाच्याही पातळीला जात असतो, तो माणसातल्या विभाजनवादी मानसिकतेमुळे.

विभाजनवाद्यांचं मोठं शस्त्र म्हणजे माणूस स्वत:च असतो. हे विभाजन अनेक प्रकारे होत असतं. स्त्री आणि पुरुष. आपल्या धर्माची स्त्री आणि आपल्या धर्माचा पुरुष. आपल्या पक्षाची स्त्री आणि आपल्या पक्षाचा पुरुष. आपल्या वर्ग- वर्ण- व्यवसाय- जात- पोटजात- कुटुंब- आईकडची- वडिलांकडची- बायकोकडची- मुली- सुनेकडची- सासूकडची- सासऱ्याकडची – जावयाकडची स्त्री आणि पुरुष, असे अनेक भेद आपण अत्यंत बारकाव्यांनिशी जिवापाड जोपासतो. त्याचे कधी छुपे, कधी उघड, कधी सौम्य, कधी उग्र आविष्कार करतो. त्यामुळे चेहऱ्यावर बुरखा घेणं आणि डोक्यावर पदर घेणं, यात काहीही गुणात्मक फरक नाही (आणि हे बदलायला हवं) हे मान्य होत नाही. बंडखोरीचा मुखवटा घेतलेले तर विभाजनवादी असतातच, पण चेहऱ्यावर आदर्शवादाचा मुखवटा घातलेले ‘सर्वाचं भलं होऊ दे रे बाबा’ म्हणणारेही समूहात पट्टीचे विभाजनवादी निघू शकतात. भारतीय व्यक्तिमत्त्वाला या विभाजनवादाची लागण फार पटकन आणि वारंवार होते. याचं कारण भारतीयांच्या समूहशरण मनोरचनेत आहे.

आपल्याला क्षीण का असेना, पण समूह पाठीशी लागतो. पाठीशी असलेला समूह जितका दांडगा, तितकी सोय आणि मस्ती जास्त. खरं तर या पार्श्वभूमीवर भारतीयांच्या मानव संकल्पनेचंच नीट विश्लेषण व्हायला हवं आहे. वैदिक असोत की अवैदिक, वैष्णव असोत की शैव, वारकरी असोत की धारकरी, सुफी असोत की रामदासी, बौद्ध असोत की जैन, की अन्य; भारतीयांच्या मानव संकल्पनेतच फार मोठा जनुकीय फॉल्ट आहे असं मला वाटतं. तो म्हणजे, आपल्या परंपरेतच नव्हे, तर आपल्या आधुनिकतेतही व्यक्तीला प्रतिष्ठा नाही. व्यक्तिप्रतिष्ठेला किंमत नाही. त्यामुळे आधुनिक जगण्यातल्या अनेक पेचांना आणि अनेकांगी अस्तित्वाला सामोरं जाताना भारतीय माणसाला अमूर्त एकात्मता किंवा समग्रता गवसत नाही. त्यामुळेच अनेक उत्तम क्षमता असूनही कोणतंही मूलगामी काम आपल्या हातून होत नाही. याला स्त्री आणि पुरुष दोघंही समप्रमाणात जबाबदार आहेत. व्यक्तिप्रतिष्ठेचा अभाव आपल्याला सर्व प्रकारच्या असंतुलनाकडे आणि रानटीपणाकडे ढकलत राहातो. मुख्य म्हणजे भारतीय माणूस (स्त्री आणि पुरुष) दांभिक का आहे, याचं उत्तर, आपल्या मानव संकल्पनेत फार मोठी उणीव आहे, हे आहे. ती दुरुस्त व्हायला हवी. माणूस आणि त्याची प्रतिष्ठा हीच आपल्या जगण्याच्या केंद्रस्थानी हवी. व्यक्तीला आणि तिच्या व्यक्तिजीवनाला, निर्णयांना प्रतिष्ठा द्यायची असते, हे मूल्य जोपर्यंत आपण आपल्यात रुजवत नाही तोपर्यंत आपल्या कोणत्याच आविष्कारात वैश्विकता उमटणार नाही. आता जागतिकीकरणोत्तर काळात बदलेल्या मानव संकल्पनेचा विचार आपल्याला या कालसापेक्ष आव्हानांचा आवाका समजून घेण्यासाठी करायला हवा आहे. जागतिकीकरणपूर्व काळात भारतात माणसाचा ताबा, तो जन्माला आल्यानंतर, बराच काळ कुटुंबाकडे असे. जागतिकीकरणाच्या काळात कुटुंबव्यवस्थेचे बंध क्षीण होऊन तो ताबा मीडियामाग्रे समाजाकडे आला आणि लगोलग जागतिकीकरणोत्तर काळात तो समाजाकडून बाजारपेठेकडे आला. आज समाज आणि बाजार यांना आता जवळपास समानार्थी संबोधावं लागत आहे. माणसाचं मूल जन्माला आलं की त्यावर झडप घालून हा समाजबाजार त्याला ताब्यात घेतो. हा समाजबाजार त्याला ताब्यात घेताना किंवा गळाला लावताना प्रचारवास्तवाचा आधार घेतो आहे. हे प्रचारवास्तव निर्दयपणे आपला शोध घेत आपल्या मागावर आहे. आपण काय पाहातो, ऐकतो किंवा वाचतो यापेक्षा आपण कोणी दिलेलं वाचतो? कोणी (आणि का) दाखवलेलं पाहातो? या गोष्टी अभूतपूर्व महत्त्वाच्या आहेत. वरवर निरुपद्रवी भासणाऱ्या माहितीकचऱ्यापासून ते सरकारी अनिवार्य तपशिलांपर्यंत, बाजारपेठांपासून ते राजकीय विचारांपर्यंत आणि तांत्रिक तपशिलांपासून ते मनोविकारांपर्यंत सगळ्या विषयांवरच्या प्रचारसाहित्यानं पुढच्या पिढय़ांचे मेंदू इतके गुदमरतील, की सगळ्या मानवजातीची सर्जकता आटत जाऊन निम्म्यावर येईल का? का त्याही खाली जाईल? असा प्रश्न पडतो!

माणसापुढचं आजचं आव्हान हे या प्रचारवास्तवाला तोंड देत किंवा या प्रचारवास्तवाची नजर चुकवत, कधी दोन हात करत, स्वत:चं सर्जित वास्तव सांभाळण्याचं आणि जतन करण्याचं आहे. हे आव्हान जगभरातले सर्जनशील लोक कशा प्रकारे पेलतात, त्यावर सर्जकतेचं आणि जगाचं भवितव्य अवलंबून आहे. मात्र हे करताना प्रचारवास्तवाचा किंवा प्रचाराचा प्रतिकार जर प्रतिप्रचारानं केला, तर त्याइतकी दुर्दैवी गोष्ट कुठली नसेल. प्रचार आणि प्रतिप्रचाराच्या टोळीउन्माद युद्धात मानवी जाणिवांच्या लगडींचे थर विस्कटतील, विवेक औषधालाही उरणार नाही. सर्जनसातत्याची आणि मानवजातीच्या सांस्कृतिक सलगतेची आशाच नष्ट होईल. ऑटोमेशनला आधुनिकता किंवा आधुनिकोत्तरता समजणाऱ्या आपल्यासारख्या बाष्कळ नागरिकांच्या समूहात हा धोका जास्त आहे. आजच्या आपल्या साहित्यातली, चित्रपटातली आणि कलेतली मानव संकल्पनाच अनेक जीवनक्षेत्रांत भेडसावणाऱ्या प्रचारदाहाच्या होरपळीत संभाषणलोलुप होऊन तडफडते आहे आणि हे फक्त आपल्याकडेच आहे असं नाही, तर हा धोका जगभर आहे. त्या अर्थानं माणसापुढचं संज्ञापननिरक्षरतेचं हे आव्हान वैश्विक आहे; पण भारतात हे आव्हान जास्त मोठं आहे, कारण पाश्चात्त्य जगात व्यक्तिप्रतिष्ठेचं मूल्य प्रबोधनकाळापासून ते मधली औद्योगिक क्रांती, दोन महायुद्धं आणि नंतरची माहिती तंत्रज्ञान क्रांती इत्यादी सर्व पचवून त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे. आपल्याकडे याविषयीची ओढ किंवा याविषयीच्या अगदी प्राथमिक जाणिवाही अपवादानंच आढळतात. आपल्यासोबत दुसऱ्या व्यक्तीची, तिच्या व्यक्तिजीवनाची, व्यक्तिप्रतिष्ठेची किंमत हेच सर्वोच्च मूल्य म्हणून जोपर्यंत आपण आपल्या हाडीमांसी रुजवत नाही, तोपर्यंत आपण कितीही स्त्री-न्यायाच्या आणि पुरुषप्रतिमेच्या बाता केल्या तरी त्या फसव्या ठरतील. कारण मुळात आपली मानव संकल्पनाच ‘फॉल्टी’ आहे! तिच्यात मोठी दुरुस्ती गरजेची आहे.

पौरुषाची किंवा पुरुषत्वाची संवेदना किंवा प्रेरणा जर मानवीयतेची (मानवतावादाची) संवेदना नसेल आणि जर त्या मानवीयतेत व्यक्तिप्रतिष्ठेला उत्स्फूर्त स्थान नसेल तर माणसात आणि जनावरात काय फरक राहील?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 1:03 am

Web Title: male and female differences facts what makes a woman different from a man zws 70
Next Stories
1 जोतिबांचे लेक  : नोकरीचं आश्वासक ठिकाण
2 गद्धेपंचविशी : नाटक नावाचा तराफा
3 विस्तारल्या कुटुंब कक्षा
Just Now!
X