सुबोध जावडेकर

subodh.jawadekar@gmail.com

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

मेंदूचा अभ्यास करण्यासाठी अलीकडे नवनवीन वैज्ञानिक उपकरणं उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मानवी मेंदूबद्दलच्या संशोधनाला अफाट वेग आला आहे. स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मेंदूत सूक्ष्म फरक असतो, त्यामुळे त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत बराच फरक पडू शकतो, असं बहुतेक मेंदू वैज्ञानिकांचं मत आहे. म्हणजेच ज्याला ‘पुरुषी वृत्ती’ म्हणतात ती केवळ मुलग्यांवर होणाऱ्या संस्कारांतून जन्मत नाही.. काय आहे हा नेमका फरक जो स्त्री आणि पुरुषाला वेगळं करतो?

पुरुष म्हटला की साधारणत: तो आक्रमक, कठोर हृदयाचा, शूर मर्द, हटवादी, आपलं तेच खरं करणारा, सेक्समध्ये वाजवीपेक्षा जास्त रस घेणारा, असा असणार असं मानलं जातं. हे त्याचं पुरुषीपण त्याच्या ‘पुरुषी मेंदूतून येतं की लहानपणापासून त्याच्यावर होणारे संस्कार त्यामागं आहेत? तो जन्मत:च असा असतो, की त्याला तसं घडवलं जातं? मेंदू विज्ञान आज या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करीत आहे.

पुरुषांचं वागणं, बोलणं, विचार करायची पद्धत, निर्णय घ्यायची तऱ्हा ही सामान्यत: स्त्रियांपेक्षा निराळी असते, याचं कारण पुरुषांचा मेंदू स्त्रियांपेक्षा वेगळा असतो, हा समज तसा खूप जुना आहे, अगदी ग्रीक तत्त्ववेत्त्यांपासूनचा. ते तर ‘पुरुषांचा मेंदू स्त्रियांच्या मेंदूपेक्षा आकारानं मोठा असतो म्हणून ते स्त्रियांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात,’ असा निष्कर्ष काढूनही मोकळे झाले होते. हे अर्थातच मूर्खपणाचं होतं. कारण बुद्धिमत्ता ही काही फक्त मेंदूच्या आकारावर अवलंबून नसते. तसं असतं तर हत्ती माणसाच्या चौपट हुशार असतो आणि देवमासा सहापट, असं म्हणावं लागलं असतं. पण माणसाची वर्तणूक मेंदूवर अवलंबून असते, हे त्यांनी ओळखलं होतं, याबद्दल मात्र त्यांचं कौतुक करायला हवं.

माणसाच्या बोलण्या-चालण्यावर, वागणुकीवर, शरीरातल्या संप्रेरकांचा (हार्मोन्स) मोठा प्रभाव असतो हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सर्वमान्य झालं. शिवाय पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या शरीरातली प्रमुख संप्रेरकं वेगवेगळी असल्यामुळे गर्भावस्थेत मेंदूची वाढ होत असताना मेंदूच्या रचनेतही काही फरक होतात, हेही सिद्ध झालं. त्यामुळे एकाच प्रसंगात पुरुषाची वागणूक स्त्रियांहून वेगळी का असते, या प्रश्नाचं एक उत्तर सापडलं. पण तरीसुद्धा स्त्रीपुरुषांच्या वर्तणुकीत बहुतेक सर्वच बाबतीत फरक का असतो, त्याचा उलगडा त्यातून होत नव्हता. तो झाला मेंदू कसा उत्क्रांत झाला ते समजल्यावर.

माणसाचा मेंदू हा गेली कित्येक लाख वर्षे घडतो आहे. यातला बहुतेक काळ माणूस शिकार करून आणि कंदमुळे गोळा करून जगत होता. हिंस्र पशूंपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी टोळ्या करून राहत होता. त्या जीवनशैलीला अनुरूप असे बदल त्याच्या मेंदूत होत होते. साहजिकच त्याचा मेंदू त्या काळातल्या परिस्थितीला समर्थपणे तोंड देता येईल असा घडला. हा अश्मयुगात घडलेला मेंदू घेऊन माणूस आजच्या काळात जगतो आहे. त्या पुरातन जीवनशैलीचे पडसाद त्याच्या आजच्या जगण्यात उमटले तर आश्चर्य नाही. या थीमवर आधारलेलं, जॉन ग्रे यांनी लिहिलेलं ‘मेन आर फ्रॉम मार्स अ‍ॅण्ड विमेन आर फ्रॉम व्हिनस’ हे पुस्तक १९९२ मध्ये प्रसिद्ध झालं आणि अफाट लोकप्रिय झालं.

पुरुषाच्या आणि स्त्रियांच्या वागण्याच्या, विचार करण्याच्या पद्धतीत इतका प्रचंड फरक असतो, की जणू काही ते दोन वेगळ्या ग्रहांवरून आले आहेत असं वाटावं, असं त्याला पुस्तकाच्या शीर्षकावरून सुचवायचं होतं. त्याच्याही दोन वर्ष आधी याच गृहीतकावर आधारलेलं डेबोरा कॅमेरॉन यांचं ‘यू जस्ट डोण्ट अंडरस्टॅण्ड : मॅन अ‍ॅण्ड विमेन इन कॉन्व्हस्रेशन’ हे पुस्तक आलं होतं. रोजच्या जीवनातले छोटे छोटे प्रसंग घेऊन त्या प्रसंगात स्त्रिया आणि पुरुष कसे वेगवेगळे वागतात त्याची असंख्य उदाहरणं या पुस्तकात दिली आहेत. पण त्यांच्या मानसिकतेत असा फरक का असतो, त्याबद्दल फारसं विवेचन नाही. त्यापाठोपाठ अशा पुस्तकांची लाटच आली. ‘व्हाय मेन डोण्ट लिसन अ‍ॅण्ड विमेन कांट रीड मॅप्स’, ‘व्हाय मेन लाय अ‍ॅण्ड विमेन क्राय’. ‘व्हाय मेन डोण्ट हॅव अ क्लू अ‍ॅण्ड वुमन ऑल्वेज नीड मोअर शूज’ (अ‍ॅलन आणि बार्बारा पीज यांनी लिहिलेली), ‘व्हाय मेन नेव्हर रिमेंबर अ‍ॅण्ड विमेन नेव्हर फरगेट’ मरियन लेगाटो), ‘ब्रेन सेक्स’ (अ‍ॅन मोई) या पुस्तकांमध्ये हा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात म्हटलंय की, स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेतला फरक हा त्यांच्या आदिमानव पूर्वजांच्या जीवनपद्धतीचा वारसा आहे. लाखो वर्षांपूर्वी मानव गुहेत राहत होता तेव्हा पुरुष मंडळी शिकार करून आणत आणि स्त्रिया गुहेत राहून स्वयंपाक करत, मुलाबाळांचा सांभाळ करत. तेव्हा त्यांनी जी कौशल्यं आत्मसात केली, त्यांच्या खुणा आजही स्त्री-पुरुषांच्या वागण्यात दिसून येतात. शिकारीसाठी लागणारं कौशल्य, म्हणजे शिकार कुठे आहे त्याच्या खाणाखुणा सोबत्यांना अचूक सांगणं, रस्ते लक्षात ठेवणं, वगैरे गोष्टींत पुरुषानं प्रावीण्य मिळवलं, त्यासाठी त्यांचा मेंदू विकसित झाला. याउलट स्त्रियांनी सामाजिक कौशल्य हस्तगत केलं. समूहात कसं राहायचं, एकमेकांशी कसं वागायचं, कसं बोलायचं, यात प्रावीण्य मिळवलं.

अशा पुस्तकांनी लोकांचं थोडंफार प्रबोधन केलं असलं तरी गेल्या शतकात माणसाच्या मेंदूवर झालेलं संशोधन बाल्यावस्थेत होतं. अलीकडे मात्र मेंदूचा अभ्यास करण्यासाठी नवनवीन वैज्ञानिक उपकरणं उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मानवी मेंदूबद्दलच्या संशोधनाला अफाट वेग आला आहे. स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मेंदूत काही सूक्ष्म फरक असतात, हे आज सर्वमान्य झालं आहे. त्यामुळे त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत बराच फरक पडू शकतो, असं बहुतेक मेंदू वैज्ञानिकांचं मत आहे. पण वर उल्लेखलेली पुस्तकं हे काही वैज्ञानिक शिस्तीनं लिहिलेले ग्रंथ नव्हेत. स्त्री-पुरुषांच्या मेंदूत असणारे फरक आणि त्याचे त्यांच्या वागण्यावर होणारे परिणाम हे शास्त्रशुद्ध पद्धतीनं पण सोप्या भाषेत सांगायचं श्रेय जातं ते अमेरिकेतील प्रसिद्ध मेंदूतज्ज्ञ लौन ब्रिझेंडाइन हिच्याकडे. हजारपेक्षा जास्त व्यक्तींवर संशोधन करून तिनं ‘द फिमेल ब्रेन’ आणि ‘द मेल ब्रेन’ नावाचे दोन ग्रंथ सिद्ध केलेत. ते महितीपूर्ण आणि तरीही मनोरंजक आहेत. अर्थात मनोरंजक करण्याच्या नादात त्यात थोडी अतिशयोक्तीही झाली आहे. पुरुषांच्या लैंगिक भावना स्त्रीपेक्षा तीव्र असतात. याचं कारण त्यांच्या मेंदूतला लैंगिक भावनांशी निगडित भाग स्त्रियांपेक्षा अडीचपट असतो, हे सांगताना ‘पुरुषांचा हा भाग एखाद्या भल्या थोरल्या विमानतळासारखा असतो तर स्त्रियांचा एखाद्या लहानशा शहरातल्या धावपट्टीसारखा,’ असं ती म्हणते. आपला मेंदू दोन भागांत विभागलेला असतो. हे दोन भाग ‘कॉर्पस कोलायझम’ नावाच्या मज्जातंतूंच्या जुडग्यानं जोडलेले असतात. मेंदूतली काही केंद्रं उजव्या भागात असतात तर काही डाव्या. या दोन्ही भागांना जोडणारा हा पूल जेवढा मोठा तेवढे दोन्ही भागांतलं दळणवळण जास्त सुलभ, जास्त चांगलं. स्त्रियांचा ‘कॉर्पस कोलायझम’ पुरुषांच्या मानाने मोठा असतो. बोलताना आपण मेंदूच्या दोन्ही भागातली केंद्रं वापरतो. साहजिकच स्त्रियांना संभाषण करणं अधिक सोपं जातं. भाषेचा उपयोग करण्याच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांच्या कैक योजने पुढं असतात त्याचं कारणही हेच. पण ते सांगताना ती म्हणते, ‘स्त्रियांकडे चारपदरी राजमार्ग असतो तर पुरुषांकडे गावाकडची कच्ची सडक’! पुरुष नकाशा जास्त चांगल्या पद्धतीने वाचू शकतात. याचं कारण त्यांचा प्रगत झालेला ‘परायाटल कॉर्टेक्स’ हा मेंदूचा भाग. शिकार मिळवायला भटकावं लागत असल्यानं पुरुषांचं दिशांचं भान पक्कंझालं. हा भाग जास्त विकसित झाला.

या विषयावर पेन्सिल्व्हानिया युनिव्हर्सटिीतल्या रागिणी वर्मा आणि मधुरा इंगलहळ्ळीकर या सध्या पुण्यातल्या ‘सिंबॉयसिस’मध्ये काम करतात. या दोघींनी केलेलं संशोधन अतिशय महत्त्वाचं आहे. पुरुषांच्या मेंदूचा पुढचा भाग आणि मागचा भाग यात जास्त जोडण्या असतात तर स्त्रियांमध्ये मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांमध्ये जास्त चांगलं दळणवळण असतं. मेंदूचा पुढचा भाग निर्णय घेणं आणि हालचाली करणं याच्याशी निगडित असतो तर मागचा भाग अवकाश आणि दिशा यांच्याशी. त्यामुळे पुरुषांमध्ये सुविहित हालचाली करण्याची क्षमता अधिक असते. गतीशी संबंधित कृती करण्यात पुरुष जास्त वाकबगार असतात. तर दोन्ही अर्धगोलांतील उत्तम जोडण्यांमुळे स्त्रिया दुसऱ्या व्यक्तीच्या भावना जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतात. डाव्या बाजूचा अर्धगोल मुख्यत्वे तर्कबुद्धीनं विचार करतो तर उजवा अंत:स्फूर्तीनं निर्णय घेण्यात मदत करतो. त्यामुळे स्त्रियांनी घेतलेले निर्णय संतुलित असतात.

‘स्त्री-पुरुषांच्या मेंदूतल्या सूक्ष्म फरकामुळेच स्त्रिया आणि पुरुष वेगळे वागतात’, ही थिअरी सगळ्याच मेंदूशास्त्रज्ञांना मात्र मान्य नाही. गेल्याच वर्षी (२०१९) प्रकाशित झालेल्या ‘द जेंडर्ड ब्रेन’ आणि ‘जेंडर अ‍ॅण्ड अवर ब्रेन्स’ या पुस्तकांत जिना रिप्पॉन या मेंदूतज्ज्ञानं हे साफ अमान्य केलं आहे. तिच्या मते, ही मांडणी म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. हे फरक इतके सूक्ष्म असतात की त्यांचा प्रभाव स्त्री-पुरुषांच्या वागणुकीत दिसणं केवळ अशक्य आहे. वागणुकीतला फरक फक्त त्यांच्यावर होणाऱ्या संस्कारांचा, सामाजिक दबावाचा परिणाम आहे. मात्र या म्हणण्याच्या समर्थनार्थ तिनं जो पुरावा सादर केला आहे, तो मात्र पुष्कळसा एकांगी आहे. आपल्या मांडणीला सोयीस्कर नसलेल्या संशोधनाकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सामान्य संशोधनाची तिनं भलामण केली आहे. साहजिकच या पुस्तकांवर अनेकांनी आक्षेप घेतले. याउलट स्त्री-पुरुषांच्या वेगवेगळ्या वागण्यामागे मेंदूत असणारे फरक कारणीभूत असतात, हे सिद्ध करणारं संशोधन  झालेलं आहे. त्याची काही उदाहरणं पाहू या.

पुरुष शक्यतो स्वत:ला होणाऱ्या वेदनेची वाच्यता करत नाहीत, याउलट स्त्रिया मात्र सतत वेदनाशामक औषधं घेत राहतात, ऊठसूट डॉक्टरांकडे धाव घेतात, असा समज आहे. यात तथ्य आहे. पण त्याचं कारण ‘पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त सहनशील असतात’, हे नाही. तर पुरुषांना (आणि प्राण्यांमध्ये नरांना) खरोखरच स्त्रियांच्या तुलनेत कमी वेदना होतात. गेल्याच वर्षी झालेल्या संशोधनात वेदनेची संवेदना मेंदूकडे वाहून नेण्याची व्यवस्था नर आणि माद्या यांच्यात वेगवेगळी असते, असं दिसून आलं. त्यामुळे  ‘आम्ही शूर असल्यानं मुकाटय़ानं वेदना सहन करतो’ या पुरुषांच्या गर्वोक्तीला सुरुंग लागलाय.

आपण नेहमी पाहतो, लहान मुली बाहुल्यांशी खेळण्यात रमतात तर मुलगे मात्र ट्रक्स, मोटारींशी खेळणं पसंत करतात. ही त्यांची आवड निसर्गत: असते की संस्कारातून येते? मुलांना बाहुल्या खरोखरच आवडत नाहीत की त्यांच्याशी खेळलं तर मित्र चिडवतात आणि पालक ‘हे काय मुलीसारखं बाहुल्यांशी खेळतोयस?’ असं म्हणतात म्हणून? या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी एक प्रयोग केला गेला. माकडांपुढं आणि त्यांच्या पिलांपुढं काही बाहुल्या आणि ट्रक्ससारखी खेळणी टाकण्यात आली. त्यातल्या नरांनी नेमके ट्रक्सच उचलले आणि माद्यांनी बाहुल्या. त्यांच्यावर तर काही ‘संस्कार’ करण्यात आले नव्हते! त्यामुळे काही फरक तरी जन्मजात असतात हे सिद्ध झालं.

पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त क्षमाशील असतात. दुसऱ्याला चटकन माफ करतात. नकळत हातून एखादी चूक झाली तर पुरुष फारसं मनावर घेत नाहीत. स्त्रिया मात्र स्वत:ला दोष देत राहतात. सूड घेतल्यावर पुरुषांना होणारा आनंदसुद्धा स्त्रियांपेक्षा अधिक असतो. प्रलोभनांना बळी पडण्याचं प्रमाण स्त्री-पुरुषात वेगवेगळं असतं. असे स्वभावाचे अनेक पलू संशोधनातून समोर आले आहेत. त्यातल्या बहुतेक गोष्टी मेंदूतल्या फरकामुळे घडतात, असं दिसून आलंय. स्त्री-पुरुषांच्या मेंदूवर झालेलं हे संशोधन पूर्णावस्थेत गेलं आहे, असं म्हणता येणार नाही. त्यात काही त्रुटीही आहेत. उदाहरणार्थ, पुरुषी मेंदूबद्दल काढलेले बरेचसे निष्कर्ष १८ ते २२ वयोगटांतल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर केलेल्या संशोधनावर आधारित आहेत. संशोधनात ते उत्साहानं भाग घेतात, कारण त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो (शिवाय त्यांना पॉकेटमनीही मिळतो!). पण वयाच्या पंचविसाव्या वर्षांपर्यंत माणसाच्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली नसते. साहजिकच पंचविशी गाठण्यापूर्वीचा त्यांचा मेंदू आणि प्रौढ मेंदू यात फरक असतो. त्यामुळे असे निष्कर्ष कधी कधी चुकीचेही असू शकतात.

सारांश काय? ज्याला ‘पुरुषी वृत्ती’ म्हणतात ती केवळ मुलग्यांवर होणाऱ्या संस्कारांतून जन्मत नाही. समाज त्याला खतपाणी घालतो हे खरं, पण स्त्री-पुरुषांच्या मेंदूत मूलत:च काही फरक असतात. त्यांचा आविष्कार त्यांच्या वागण्यात दिसतोच. यावरून ‘स्त्री-पुरुष समानता आचरणात आणणं शक्य नाही’, असा अर्थ मात्र कुणी काढू नये. दोघांनाही समान हक्क असले पाहिजेत आणि समान संधी मिळाल्या पाहिजेत, यात वाद नाही. पण स्त्री आणि पुरुषांच्या आवडीनिवडी, विचार करायची पद्धत, प्रश्नाला सामोरे जायची धाटणी, ही नैसर्गिकपणे वेगळी असते. आपल्याला दुसऱ्याचं वागणं चुकीचं वाटत असलं तरी त्याच्या ‘मेंदूकोनातून’ ते बरोबर असू शकतं, हे दोघांनीही लक्षात ठेवलं आणि ‘समानता म्हणजे सारखेपणा नाही’, हे समजून घेतलं तर घरातलं वातावरण चांगलं राहील. निदान एवढं तरी नक्की होईल! ६

पुरुष शक्यतो स्वत:ला होणाऱ्या वेदनेची वाच्यता करत नाहीत, याउलट स्त्रिया मात्र सतत वेदनाशामक औषधं घेत राहतात, असा समज आहे. यात तथ्य आहे. पुरुषांना  स्त्रियांच्या तुलनेत कमी वेदना होतात.  वेदनेची संवेदना मेंदूकडे वाहून नेण्याची व्यवस्था नर आणि माद्या यांच्यात वेगवेगळी असते, असं संशोधनात दिसून आलं. त्यामुळे ‘आम्ही शूर असल्यानं  वेदना सहन करतो,’ या पुरुषांच्या गर्वोक्तीला सुरुंग लागलाय.