अभय कांता

abhaykanta3@gmail.com

बाई म्हणून जगता आले नाही तरी किमान पुरुष म्हणून तरी आपण जगू नये, असं मला मनापासून वाटत होतं. इतके टोकाचे विचार का बरं तेव्हा माझ्या मनात उसळी मारत होते? खरं तर त्याची मुख्य कारणं माझ्या भोवतालात होती. समाजात असलेली स्त्री-पुरुष विषमता, स्त्रियांप्रति कमालीची असंवेदनशीलता, तिरस्कार आणि मुख्य म्हणजे स्त्रीविरोधी हिंसाचाराचं थैमान माझ्या भोवतालात होतं आणि ते मला पराकोटीचं अस्वस्थ करत होतं.

आज माझं साडेबावन्न वर्षांचा पुरुष असणं ही मला फारशी आवडणारी बाब खचितच नाहीय, त्यामुळं आता कुठल्याही क्षणी या जगातून एक्झिट घ्यायला मी एका पायावर तयार आहे.. ‘पुरुष हृदय बाई’ या सदरातील माझ्या लेखाचं हे पहिलं विधान वाचकाला काहीसं धक्कादायक वाटायची शक्यता नाकारता येणार नाही. पण याची बव्हंशी माझ्यापुरती सीमित असलेली एक पाश्र्वभूमी आहे. ती पाहण्यासाठी थोडं मागे जावं लागेल. मागे म्हणजे माझ्या पूर्वायुष्यात!

वयाच्या विशीच्या उंबरठय़ावर असतानाच मी सामाजिक कार्यकर्ता बनण्यासाठी घर सोडलं होतं. घर सोडणं ही सुरुवात म्हटली पाहिजे. त्या वेळी तडकाफडकी मी इंजिनीअिरगचं शिक्षण, नोकरीची संधी यासारख्या अनेक लहानमोठय़ा गोष्टी सहजी सोडून दिल्या होत्या. शिवाय काही संकल्प केले होते. त्यातला एक मोठा संकल्प, पुरुष म्हणून आपण जगायचं नाही असा होता. याचे तीन वेगवेगळे अर्थ संभवत होते. एक होता कालातीत, सनातन आत्महत्येचा विचार. एक वेळ मरण पत्करू, पण पुरुष म्हणून जगायचं नाही. दुसरा विचार होता लिंगबदल करून बाई बनण्याचा. आणि ते शक्य नसेल तर मग तिसरा शेवटचा पर्याय होता लिंगविच्छेदन करण्याचा. म्हणजे बाई म्हणून जगता आले नाही तरी किमान पुरुष म्हणून तरी आपण जगू नये, असं मला मनापासून वाटत होतं. इतके टोकाचे विचार का बरं तेव्हा माझ्या मनात उसळी मारत होते?

खरं तर त्याची मुख्य कारणं माझ्या भोवतालात होती. समाजात असलेली स्त्री-पुरुष विषमता, स्त्रियांप्रति कमालीची असंवेदनशीलता, तिरस्कार आणि मुख्य म्हणजे स्त्रीविरोधी हिंसाचाराचं थमान माझ्या भोवतालात होतं आणि ते मला पराकोटीचं अस्वस्थ करत होतं. प्रत्यक्षात मात्र भारतीय इतिहासातला अपवादात्मक प्रचंड स्त्रीविरोधी असा तो काळ नव्हता, असं आज मी ठामपणे म्हणू शकतो. उलट आजचा काळ हा तुलनेने स्त्रियांबाबत अधिक अमानवी, नृशंस असा म्हणायला हवा. तरीही त्या वेळची एक गोष्ट वेगळी अशी होती की मी तरुण होतो. माझ्या ओळखीचा झालेला आणि मनोमन पटलेला स्त्री-पुरुष समतेचा विचार तंतोतंत जगावा, असं मला वाटत होतं. आणि त्या जगण्याला अडसर केवळ आपला भोवताल नाही तर आपलं पुरुष असणं हेही जबाबदार आहे, अशी माझी धारणा होती. तारुण्यसुलभ वयात जसं प्रत्येकाला भिन्निलगी आकर्षण वाटत असतं, तसं ते मलाही वाटत होतं पण त्याचंच दडपण माझ्यावर येत होतं. स्त्रीचा आपण वस्तू म्हणून किंवा मादी म्हणून विचार करतो आहोत, अशी माझी भावना होती. मला माझं वागणं हे तेव्हा दुटप्पी वाटत होतं. त्यामुळेच पुरुष म्हणून जगणं म्हणजेच स्त्रीविरोधी, हिंसक गुन्हेगार म्हणून जगणं असं समीकरण मी करून टाकलं होतं. आणि गुन्हेगार बनून आपण जगू नये अशी भावना होती.

कार्यकर्ता असल्याने मी हे विचार काही जवळच्या मित्रांना बोलून दाखवले होते. त्यातल्याच एकाच्या सल्ल्याने आणि पुढाकाराने मी मानसोपचारतज्ज्ञांच्या क्लिनिकमध्ये जाऊन पोहोचलो होतो. त्यांनी दिलेली औषधाची गोळी ही मला खूप खचवून गेली होती. आपण एक तर्कशुद्ध, विवेकी विचार करून या निर्णयावर आलेलो असताना आपल्याला डॉक्टरांकडून वेडसर ठरवलं जातं आहे, असं मला वाटू लागलं होतं. मग गोळी घेणं टाळून कोरेगाव, सातारा इथं राहणाऱ्या अविनाश बी. जे. या कार्यकर्ता मित्राशी दीडदोन दिवसांची घनघोर चर्चा करून मी असा निर्णय घेतला की, लिंगविच्छेदन करायचं नाही किंवा स्त्री म्हणून वावरायचं नाही, पण यापुढे आयुष्यभर स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करायचं. त्यामुळेच ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ’, ‘नारी समता मंच’, ‘पुरुष उवाच’, ‘स्त्री-पुरुष समता मंच’ असा माझा प्रवास पुढे घडत गेला. आता असं दिसतंय की तेव्हापासूनच माझी फसण्याला सुरुवात झाली होती. आणि काळाच्या ओघात ते फसणं अधिकाधिक खोलवरचं होत होतं. पण ती झाली नंतरची गोष्ट. ती ओघात येईल. फक्त एकच खुलासा इथे करतो की अधूनमधून गोष्ट किंवा गोष्टी सांगत असल्यानं निवेदनाची प्रथमपुरुषी पद्धत बदलण्याची संधी मी इथे घेणार आहे.

तर विशीत दुसरा थोडा आगळा मुद्दा होता, मरण्याचा. मरण्याबद्दल फारशी नकारात्मक भावना नव्हती. तीस हे वय जगणं संपवण्यासाठीचं आदर्श वय असंच त्याला वाटत होतं (खरं तर ही कल्पना त्याला सार्त् किंवा काम्युच्या पुस्तकात सापडलेली होती आणि पटलेलीही होती) अशा माणसासाठी पन्नाशीतलं हे इतकं अतोनात जगणं अंगावर येणारं न ठरतं तरच नवल. जगण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मरण्याचे त्याने काही प्रयत्न केलेच. पण अगदी खरं सांगायचं तर त्यात तशी काही फार जान नव्हती! दाखवेगिरी, नाटय़मयता नि समोरच्याला (बव्हंशी माझी जोडीदार असलेल्या प्रज्ञालाच) शेवटची संधी देण्याचं कथित औदार्य असं बरंच काही त्यात ठासून भरलेलं होतं.

तरीही मरण्याचा पर्याय आज त्याला सहजी उपलब्ध नाही. कारण देशात एनआरसी, एनपीआरच्या संदर्भात छळछावण्यांची चर्चा दबक्या आवाजात का होईना पण सुरू झालेली आहे. त्या विरोधात गावोगाव लढणाऱ्या ‘शाहीनबागा’ तयार होत आहेत. अशा वेळी फुप्फुस नि यकृत वगैरे बिघडवून घेत एकटय़ा एकटय़ाने जगण्याचा त्याग करणे हा चक्क  पळपुटेपणा ठरेल. छळछावणीमधील मरण किती तरी अधिक अर्थपूर्ण ठरू शकतं यावर त्याचा ठाम विश्वास आहे. अनेक वाचकांना विद्यमान भारतात छळछावणीची चर्चा म्हणजे बेहद्द अतिरेकीपणाची निशाणी वाटू शकते. पण त्याला तसं वाटत नाही कारण पुरुष म्हणून छावणीतला छळशहा आपण स्वत: असल्याचा अनुभव त्याने या साडेबावन्न वर्षांत इतक्यांदा घेतलेला आहे की विचारता सोय नाही. शिवाय आपणच शहा असलेल्या छळछावणीत लंपट मृत्यू स्वीकारण्यापेक्षा दुसऱ्या अधिक बडय़ा शहाच्या छळछावणीत कथित लढाईचे नारे देत मृत्यू स्वीकारणं हे जास्त मर्दानी ठरू शकतं याची थोडीफार कल्पना त्याला खचितच आहे. मर्दानी मृत्यूची आकांक्षा! साडेबावन्न वर्षांच्या इतिहासातून यापेक्षा अन्य काही ऋजू किंवा राजकीयदृष्टय़ा अचूक निघू शकेल असं दिसत नाही. नाही नाही, सगळाच दोष त्याचा आहे असलं अतिरेकी व्यक्तिवादी विधान इथे तोही करू धजणार नाही. पुरुष म्हणजे काय असावं आणि काय नसावं याची अतिशय स्पष्ट अशी अस्पष्टता त्याने त्याच्या भोवतालातच अनुभवलेली आहे. आदर्श पर्यायी पुरुष असणे म्हणजे नेमके काय असणे हे कुठल्याही क्षणी अजिबात कळू न देणारी विवश भावावस्था त्याची संगत अखेपर्यंत सोडत नाही. खरंच आपल्या समाजात पुरुषाला पुरुष न बनण्याचा पर्याय तरी उपलब्ध असतो का? याची त्याला दोन अगदी वेगवेगळ्या प्रकारची कारणं दिसतात.

पहिल्या कारणात अर्थातच पुरुष ज्या मूलत: विषमतावादी व्यवस्थेत घडत असतो ती व्यवस्था त्याला पर्यायी पुरुष बनू देईल अशी सुतराम शक्यता नसते. देशविशिष्टच विचार करायचा तर भारतीय समाजव्यवस्था जात, वर्ग, वंश, धर्म नि लिंगभावाच्या आधारावर तयार झालेली बहुपेडी नि तगडी विषम सत्तासंरचना आहे. त्यामुळे अन्य सर्व विषमता कायम ठेवून पुरुषसत्ता नावाची केवळ एक विषमता मुळातून हटवू असं घडत नाही. साध्या भाषेत सांगायचं तर आपण नुसते पुरुष नसतो. आपण मराठा पुरुष असतो, ब्राह्मण असतो, मुसलमान असतो, बौद्ध असतो, कैकाडी असतो, ख्रिश्चन असतो, कामगार असतो, भांडवलदार असतो, दुकानदार असतो. हे सगळं गूढ वाटू लागलंय? साधं बघा ना, खैरलांजीच्या खून नि बलात्काराच्या घटनेची चीड खरं तर सर्वाना वाटायला हवी. पण ती वाटली आणि मोच्रे काढले ते बौद्धांनी नि दलितांनी. तर कोपर्डी बलात्काराची चीड मराठय़ांना वाटली. नव्वदीच्या दशकात सांगलीतल्या अमृता देशपांडेच्या हत्येचा त्रास ब्राह्मणांना झालेला दिसला.

दुसरं कारणदेखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आदर्श पर्यायी पुरुष कोण? त्याचे निकष कोण ठरवणार? परीक्षा कोण करणार? याबद्दल पुरेसा गोंधळ आहे. संवेदनशील पुरुष असावा, हे झालं साधारण उत्तर. पण नुसता संवेदनशीलपणा कसल्या कामाचा? काही कर्तृत्व नको दाखवायला? प्रश्न असा आहे की आदर्श पुरुषाच्या आणि खरं तर आदर्श स्त्रीच्याही पारंपरिक, सनातनी पण समाजमान्य कल्पना आपण नाकारू पाहतो आणि ते नाकारणं योग्यच म्हणायला हवं. पण त्याला पर्याय कोणता असावा यासंबंधी आपण ठाम विधान करू शकतो का? पुरुषांसाठीचे सनातनी, पारंपरिक साचे असे सांगितले जातात : पुरुषाने राकट आणि कणखर असायला पाहिजे, त्याच्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे. त्याने कायम कृतिशील असायला हवं आणि जगरहाटीची त्याला जाण असायला हवी.

आता मला सांगा, मनाने हळवा आणि दुबळा, आत्मविश्वास गमावलेला, कृतिशील नसलेला आणि जगरहाटीबद्दल अनभिज्ञता असलेला पुरुष आदर्श ठरू शकेल का? उलटपक्षी यातला प्रत्येक गुण; कणखरपणा, आत्मविश्वास, कृतिशीलता, जगरहाटीचे ज्ञान स्त्रीमध्ये असायला हवं, असं आपण उठता बसता म्हणत असतो. त्यामुळे पुरुषांनी बलात्कार करू नयेत आणि जीवघेणा हिंसाचार करू नये एवढय़ा बाबी सोडल्यास बाकीच्या कोणत्या बाबींवर सर्व स्त्रियांचे पुरुषांच्या गुणांसंदर्भात एकमत होऊ शकेल? कदाचित ती दुसरी बाब म्हणजे ‘त्याने माझे ऐकावे’ हीच उरेल!

प्रत्यक्षातलं आयुष्य मात्र ऐकण्या न ऐकण्यातून पुढे जात असतं. अलीकडेच त्याला न्यूमोनिया झाला होता. प्रज्ञाचं अजिबात न ऐकता आपल्या कार्यकर्तापणाचं कर्तृत्व त्यानं तिच्यासमोर नाचवलं होतं. एक्स-रेमध्ये आढळलेला फुप्फुसातील अपारदर्शी पॅच पाहून तज्ज्ञाने तातडीने आयसीयू अ‍ॅडमिशन सांगितलेली असताना समोर दिसणारा दीड लाखाचा संभाव्य खर्च पाहून त्याने हॉस्पिटलच्या दारातून काढता पाय घेऊन शासकीय रुग्णालयामध्ये जाणे स्वीकारले. दोनच दिवसांत तिथून तो बाहेर पडला आणि एकूण खर्च झाला होता साडेपाच हजार रुपये फक्त.

फुप्फुसातला तो अपारदर्शी पॅच काही दोन दिवसांत लगेच नाहीसा होणं शक्यच नव्हतं. पुढे ट्रीटमेंट आहेच. पण मुद्दा तो नाही. प्रज्ञाला तिच्यासोबत पारदर्शी नातं जगण्याचं अभिवचन दिल्यानंतरही असे अनेक अपारदर्शी पॅच त्यानं नात्यात निर्माण होऊ दिले होते, चांगले पिकूही दिले होते.

हृदयाचं माहीत नाही, मनाच्या भूमिकेत जात ते फार गोल गोल विचार करत आपल्याला सावरून घेत असतं, आपली प्रत्येक कृती योग्यच ठरवत असतं. पण तसं डोकं सुदैवाने फुप्फुसाला नसतं! तर त्याच्या फुप्फुसाने त्याच्या पुरुषपणाचं केलेलं रोगनिदान आणि त्यावरचा इलाज हा अधिक नेमका, अल्पसा आणि म्हणून तुलनेने सहृदयीच म्हणावा लागेल असा होता. कारण पुरुष म्हणून जाणता-अजाणता त्याने आजवर केलेले एकूण गुन्हे पाहायचे तर प्रज्ञाशी केलेलं गैरवर्तन हा हिमनगाचा दृश्यमान असणारा एक सप्तमांश भागच ठरावा!