मुकुंद किर्दत

kirdatmukund@gmail.com

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Change your morning habits will help in achieving success
Morning Habits For Success: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बदला तुमच्या सकाळी उठल्यानंतरच्या या सवयी
loksatta chatura Relationships Are You an Alpha Woman
नातेसंबंध: तुम्ही आहात का ‘अल्फा वूमन’ ?

पुरुष हा स्त्रीपेक्षा श्रेष्ठ असतो यावर आधारित व्यवस्थेला आपण ‘पितृसत्ताक’ व्यवस्था म्हणतो तर ‘मर्दानगी’ किंवा ‘पुरुषत्व’ यात हा संदर्भ फक्त स्त्री-पुरुष नात्याशी नसून पुरुष-पुरुषांमधील नात्यासंदर्भातही या कल्पनांचं महत्त्व आहे. थोडक्यात, ‘पुरुषप्रधान’ व्यवस्था स्त्री-पुरुष संबंधात पुरुषाला श्रेष्ठत्व देते आणि मर्दपणा किंवा पुरुषत्व हे पुरुषाला अधिक ‘श्रेष्ठ पुरुष’ ठरवते. हे श्रेष्ठत्वाचं पद अढळ नसतं. त्यामुळे हे श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी त्याला सतत परीक्षेला सामोरं जायला लागतं. त्यातून ‘मर्दानगी’च्या कल्पना बदलत राहतात..  मला दिसलेला पुरुष हा माणूसपणाच्या वाटेवरचा आहे..

कधी कधी आपल्याला वाटतं की कुणीतरी सतत आपल्यावर पाळत ठेवून आहे आणि सतत सल्ला देत आहे. माझ्या वयाच्या अठराव्या वर्षांपासून माझ्याभोवती असा एक पुरुष पाळत ठेवून आहे, तो मला सल्ले देत असतो. मला कधीतरी लहानपणी कुणीतरी ‘अगदीच बुळा दिसतो,’ असं म्हटलं. तेव्हा या शब्दाचा अर्थ समजण्यात काही दिवस गेले, आणि तो कळल्यापासून माझ्या आजूबाजूला हा पाळत ठेवणारा पुरुष सतत असतो. तसा बहुधा सर्वच पुरुषांच्या भोवती, आजूबाजूला ‘तो’ असतो. तोच त्यांचे पुरुषत्व तपासत असतो. लोकांच्या नजरेत तुम्ही पुरुषी, मर्दानी, तरुण, दिसता का, हे पाहत असतो. एखादी मुलगी समोर आली की तो मला डिवचतो, चाल बदलायला लावतो..

हा लेख लिहायचा म्हटल्यावर ‘कुटुंबसंस्था ही पुरुषसत्तेची कवचकुंडले असतात आणि समाजव्यवस्था हे पुरुषसत्तेचे ऊर्जास्रोत,’ हे वाक्य लिहिल्यावर माझ्यावर पाळत ठेवणाऱ्या ‘पुरुषा’ने त्याला ‘लाईक’ केले. मग मला जरा बरं वाटलं. राजकीय चतुराई किंवा शहाणपण (पॉलिटिकल करेक्टनेस) काय असतं, हे तोच अगदी सहजपणे शिकवतो, सांगतो. म्हणजे बघा ना, भारतात कुठे बलात्कार झाला आणि चच्रेत आला तर त्याविरोधात हजारो नव्हे, लाखोंचेही मोर्चे निघतात. हे पाहून कुणाचाही असा समज होईल की इथे जनमानस म्हणजे इथला पुरुष नेहमीच स्त्रीचा, तिच्या इच्छांचा खूप आदर करतो. पण दुसरीकडे आकडेवारी बघितली तर रोज भारतात किमान ९० बलात्कार होतात आणि त्यातले बरेचसे ओळखीच्या पुरुषांकडून होतात किंवा मुलींची छेडछाड, शेरेबाजी सर्वत्रच दिसते. हा अंतर्वरिोध, हीच गंमत आहे इथल्या पुरुषांची!

मला आठवतं, शाळेतल्या एक ट्रिपमध्ये मुले मुलींना चिडवत होती. होता होता एका मुलानं एका मुलीला म्हटलं, ‘कोकोनट ट्री विदाउट कोकोनट’. त्यानंतर सन्नाटा पसरला की नाही हे आठवत नाही, परंतु आपल्याला ‘बुळा दिसतो,’  असं म्हटल्यावर काय वाटतं, हे सर्व आठवून गेलं. या कमेंटचा तिच्या जीवनावर काय परिणाम झाला माहीत नाही, परंतु ही कमेंट आणि त्यामागची समज पुरुषी, घातक आहे ही खूणगाठ मनाशी पक्की झाली.

आम्हा पुरुषांच्या नजरेत ‘मुलींचे सौंदर्याचे निकष इतके समान कसे? याचे उत्तर, ते सर्व लोकसंस्कृतीने थोपवलेले असले तरी वैयक्तिक त्यात काही नसतं का? असा प्रश्न पडतो. केवळ एकटय़ाचा नव्हे तर लाखो लोकांचा दृष्टिकोन एकसारखा बनू शकतो म्हणजे तो घडवता (मोल्ड) पण येत असणार. असा दृष्टिकोन तयार करण्याचे काम कुणी हाती घेतलं तर सर्व समाज बदलू शकतो. अडचण अशी आहे की ‘जैसे थे’ मनोवृत्तीमुळे असा सकारात्मक बदल मोठय़ा प्रमाणावर घडवून आणायचा असेल तर त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती, रेटा बरेचदा पुरेशा प्रमाणात नसतो. मात्र नकारात्मक, आपल्या सोयीचे दृष्टिकोन बदल घडवून आणण्यात हितसंबंध असतील तर हे सहज घडू शकते. म्हणून जाहिरातीतील व्यावसायिक हितसंबंधामुळे दाखवले जाणारे बदलत्या स्त्रीचं रूप, किंवा राजकीय, सामाजिक पटलावरच्या अनेक निर्णयांचे परिणाम पुरुष मानसिकतेवर लवकर आणि सहज होताना दिसतात.

राजकीय पटलावरून छप्पन इंच छातीची भाषा केली जाते तेव्हा स्त्रियांना काय वाटतं माहीत नाही. पण पुरुषांसाठी नवा शारीर आणि अशारीर मापदंड तयार होत असतो. यात स्त्रियांचा संदर्भ नसला तरी पुरुषत्वाला एक आव्हान असतं. गेल्या काही वर्षांच्या प्रवासात स्त्री-पुरुष समतेचा आग्रह धरणाऱ्या मित्रमत्रिणींच्या परिवारामुळे पाळत ठेवणाऱ्या ‘पुरुषा’कडे थोडं दुर्लक्ष करता येतं. नवं पुरुषभान आलेल्या अनेक पुरुषमित्रांचा अनुभव असाच असेल, असं वाटतं.

आता बऱ्याच मध्यमवर्गीय घरात युवक स्वयंपाकात मदत करत असतो, किंवा फार आठय़ा न पाडता काही घरकामे करत असतो. त्याला त्याच्या घरात समता आणायची म्हणून तो करत नसतो तर पत्नी पण कामावर जात असते, तिचे उत्पन्न चांगले असते त्यामुळे तो संसारातील एक पूरक काम म्हणून करत असतो. याचाच अर्थ सर्वसाधारणपणे ‘समता’ ही गरज नसते तर ‘पूरकता’ हा सुखी संसाराचा निकष असतो. त्यामुळे होणारा बदल मूल्यात्मक नसला तरी त्याने वास्तवातील स्त्रीच्या जगण्याच्या काही बाबी सुलभ होतात. स्त्री-पुरुषांमधले सत्ता-बल संबंध संपून नुसते समता असूनही चालत नाही. कारण त्यातून जगतानाचा द्वेष, वैरभाव संपत नाही. नरेश दधिच एका कवितेत म्हणतात,

‘..अपनी पहचान जानने और बनाने के लिये

एक-दुसरे से लडना झगडना जरुरी नही है..

गलत सही न हो और

सही गलत न हो

तेरे-मेरे एक साथ सुख-चन से जीने के लिये

जो कुछ भी लगे वह निखालिश सही और

सही के सिवाय कुछ और नहीं है!’

पूरकता जर भावली तर सामाजिक संस्कारांना तोडण्याची ताकद आणि उत्साह निर्माण होऊ शकतो. मला आठवतं की आईचा स्वयंपाक मला नेहमीच आवडायचा. परंतु कधी तिला ‘आज स्वयंपाक वा पदार्थ चांगला झाला आहे,’ असे तोंड उघडून सांगितल्याचं आठवत नाही. आता ती या जगात नाही त्यानं याची बोच अधिक वाढते. परंतु आता यासाठी मला माझ्यात बदल करायला हवा हे समजते. पण म्हणजे काय करावं हेच कळत नाही. स्वत:मध्ये बदल करणं यात एक कृत्रिमपणा जाणवतो. कौतुकाचे शब्द बाहेर यायला कष्ट घ्यावे लागतात. ती ढोंगबाजी नसते, तरी ते वेदनादायी असते. माझ्या माहितीतील बऱ्याच लग्न झालेल्या मित्र-मत्रिणींमध्ये स्वातंत्र्य पुरेसे असते. निर्णयस्वातंत्र्य मनापासूनचे असते, पण त्यात एक कोरडेपणा असतो. स्त्रियांना स्वातंत्र्य हा हक्क म्हणून हवा असतो आणि तो परिस्थितीनुसार एका फटक्यातही मिळू शकतो, आणि नवरा समजूतदार असेल तर असतेही. पुरुषांना स्वत:ला बदलवणे जरुरीचे आहे. त्याला व्यवस्थेमुळे मिळणाऱ्या अनेक अधिकारांना, फायद्यांना नाकारायला हवे आणि त्यामुळे तो बदल इच्छा असूनही सहज होऊ शकत नाही. त्यामुळे नात्यात हिसडाहिसडी होते आणि गुंता, गाठी न सुटता अधिकच कठीण निरगाठी होतात.

समतेचा विचार करताना स्वत:ला बरेच खरवडायला लागते. म्हणजे सतत एका ‘कन्फेशन बॉक्स’मध्ये जाऊन आल्यासारखे. हेमंत जोगळेकर त्यांच्या एका कवितेत म्हणतात,

..‘का हसतेस?

रात्री तू माझ्याजवळ झोपतेस,

सकाळी माझ्यासाठी न्याहारी बनवतेस,

मी ऑफिसला गेल्यावर माझ्यासाठी

डबा भरून पाठवतेस,

संध्याकाळी न चुकता मी तुला फिरायला नेतो,

वाटेत कुणी भेटले तर तुझी ओळख करून

देतो,‘‘ही माझी पत्नी.’’ मग तू हसतेस.

का हसतेस?

खरं सांग, का हसतेस? ’

एक सुप्त अपराध भावना पतीच्या मनात असावी, म्हणूनच तो जेव्हा तिची ओळख ‘पत्नी’ अशी करून देतो तेव्हा ती उपहासाने तर हसत नाही ना?, असा प्रश्न कवितेतील निवेदकाला टोचणी लावतो. ही टोचणी संवेदनशील पुरुषाला लागत असणार, पण त्याची उघड वाच्यता करण्याची सवय नसणे हा महत्त्वाचा अडसर ठरतो. चूक होत असेल तर त्यातूनच पुढचा टप्पा अपराधभाव. अपराधभाव आला तरच सुधारणा होते, असा सर्वसाधारण समज असतो. पण नात्यात हा अपराधभाव सुटा नसतो, त्यातून क्रिया-प्रतिक्रिया, वाद-प्रतिवाद अशी एक साखळी सुरू होते. त्याचे एक नवे राजकारण तयार होते. कारण नाती गतिशील असतात. म्हणून हा गुंता सोडवण्याला केवळ संवेदनशीलता पुरत नाही तर आस्था आणि सहृदयता असणं महत्त्वाचं. म्हणून हे स्वत: पुरुष असणं, पुरुष म्हणून स्वत:ला समजून घेणं आणि बदल घडवणं हा पुरुषभानाचा माणूसपणाच्या वाटेवरचा प्रवास आहे.

आज माझ्यासारख्या पन्नाशी ओलांडलेल्या पुरुषांना नव्या पिढीतील मुलामुलींचे सार्वजनिक ठिकाणचे शरीरस्पर्शाचे अप्रूप वाटते. संवेदनशील आणि खुल्या विचारांच्या जोडप्यातही विवाहबाह्य़ संबंधाविषयीची उत्सुकता असली तरी आणि लग्नसंस्कारातील अवडंबरावर विश्वास नसला तरी नात्यातील विश्वासाला तडा जाऊ नये, जोडीदाराविषयीच्या निष्ठा – प्रामाणिकपणा याविषयीची अस्वस्थता असते. याची उत्तरे या चाळिशी, पन्नाशीच्या पिढीकडे नाहीत. आमच्या महाविद्यालयीन काळात ‘बॉयफ्रेंड’ ही कल्पना नसल्यानं शरीर संबंधाचा विषयच नव्हता. परंतु तरी शरीर ऊर्मीचे काय करायचे हे कळायचे नाही. मी पहिल्यांदा मत्रिणीचा हात हातात घेतल्यावर आठवडाभर तळहाताला गुदगुल्या होत होत्या. आता आजूबाजूला दिसणाऱ्या तरुणांमध्ये लग्नपूर्व लैंगिक संबंधाविषयी मोकळीक दिसते. पण लग्न झाल्यावर या नातेसंबंधाचे गुंते तयार झाले तर ते सोडवणार कसे याची खुली चर्चा होणं गरजेचं आहे. कॉलेजच्या काळात अभ्यासासोबत इतर वाचन, आजूबाजूच्या राजकीय, सामाजिक घटना यातून एक स्वत:ची सामाजिक जडणघडण होत असते. वयात येताना मुलींकडे पाहून, सहवासात रोमॅंटिक वाटत असते. शरीर बदल होत असतात. त्याचे काय करायचे हे मात्र कळत नाही. त्यातील कुठल्या गोष्टी चांगल्या आणि कुठल्या वाईट, आणि त्या का वाईट याचे शिक्षण मिळण्याला कुठलाच मार्ग नाही आणि आजही तो आहे, असे वाटत नाही. त्याचे काही ‘लैंगिक नागरिकशास्त्र’ असायला हवे, ते समजायला हवे. लैंगिक नातेसंबंधाबाबत ‘पाण्यात पडल्यावर पोहता येतेच’, या प्रकारच्या भरवशांवरचे बरेच अनुभव स्त्री-पुरुषांच्या वाटेला येतात.

इथे महाराष्ट्रात दर १००-२०० किलोमीटरवर भाषा बदलते, सणवार, पद्धती बदलतात. तसेच गावात आणि गावकुसाबाहेर वेगवेगळी संस्कृती नांदते. शिवाय त्या विविध समाजगटांचे संबंधही उतरंडीचे म्हणजे उच्च-नीचतेचे असतात. यामुळे पुरुष नावाचा वर्ग एकजिनसी नाही. त्यामुळे पुरुषत्वाची रूपे आणि पुरुषप्रधानता सार्वत्रिक दिसत असली तरी ती वेगवेगळ्या स्वरूपात भासते, समजते, व्यक्त होते. मला दिसलेला, आजूबाजूचा माणूस वेगळा, इतरांचा अनुभव वेगळा. पुरुष हा स्त्रीपेक्षा श्रेष्ठ असतो यावर आधारित व्यवस्थेला आपण ‘पितृसत्ताक’ व्यवस्था म्हणतो तर ‘मर्दानगी’ किंवा ‘पुरुषत्व’ यात हा संदर्भ फक्त स्त्री-पुरुष नात्याशी नसून पुरुष-पुरुषांमधील नात्यासंदर्भातही या कल्पनांचं महत्त्व आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ‘पुरुषप्रधान’ व्यवस्था स्त्री-पुरुष संबंधात पुरुषाला श्रेष्ठत्व देते आणि मर्दपणा किंवा पुरुषत्व हे पुरुषाला अधिक ‘श्रेष्ठ पुरुष’ ठरवते. हे श्रेष्ठत्वाचं पद अढळ नसतं. श्रेष्ठत्व हा त्याच्या भोवतीच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शारीरिक घडामोडींचा परिणाम असतो. त्यामुळे हे श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी त्याला सतत परीक्षेला सामोरं जायला लागतं. त्यातून ‘मर्दानगी’च्या कल्पना बदलत राहतात आणि पुरुषाला सतत श्रेष्ठत्व सिद्ध करावं लागतं. समाजात, कामाच्या जागी, कुटुंबात आणि स्त्री-पुरुष नात्यांत ही कुरघोडी अनिवार्य ठरते. आता त्याचा इगो चेचला जातो, पण त्याच्यावरच्या अपेक्षांचे, जबाबदाऱ्यांचे ओझं संपत नाही. संवेदनशील पुरुष असेल तर त्याला त्याच्या क्षमतांची जाणीव असते आणि मग अपेक्षांची पूर्तता न करता येण्याचे दु:ख किंवा आत्मविश्वास नसल्याचा ठसठसता सल!  घराबाहेरची ठोकशाही किंवा आभासी लोकशाही त्याला आणखीच हतबल बनवते. त्याला व्यवस्थेचा राग येतो तो कोठे बाहेर पडेल हे सांगता येत नाही. हैदराबादला बलात्कार प्रकरणातील आरोपी सापडल्यावर त्यांची चौकशी चालू असतानाच त्यांचा ‘एन्काऊ टर’ होतो. त्यात योग्य पद्धतीने न्याय होण्याअगोदरच झालेला ‘एन्काऊ टर’ अशा तमाम पुरुषांना उन्मादी, सूड भावनेतून आनंद देतो, तर दुसरीकडे उन्नाव प्रकरणात पीडित मुलीवर संशयित पेट्रोल टाकून देतात, तेव्हा ती मुलगी एक किलोमीटर मदतीची भीक मागत चालत राहते, पण हा ‘मर्द पुरुष’ तिच्या मदतीला जात नाही. त्याच्यात हतबलता आणि बघेपणा नसानसात भिनला आहे. हा प्रचंड अंतर्वरिोध हीच भारतीय पुरुषाची ओळख बनते आहे. पुरुषाला ‘ते’ असावं लागतं किंवा तसा आव आणावा लागतो. ‘अर्धसत्य’, ‘आक्रोश’ असे चित्रपट आणि नंतर ‘जंजीर’, ‘नमकहराम’, ‘शोले’, ‘कुली’, ‘दिवार’, ‘डर’ , ‘बाजीगर’ असे चित्रपट बघत आम्ही आमच्यातला पुरुष जागा ठेवला, पण आता, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘उडता पंजाब’ , ‘गजनी’, ‘दबंग’, ‘गॅग्स ऑफ वासेपूर’, ‘गली बॉय’ पाहत तयार होत असलेला पुरुष जास्त ग्लॉसी रंजनवादी, आत्मकेंद्री, पलायनवादी आणि सहज हिंसा करणारा तयार होतो आहे की काय अशी शंका वाटते.

आंधळ्या व्यक्तींना हत्ती समजून घेण्याचे काम दिले तर कुणाच्या हाताशी शेपूट तर कुणाच्या हाती सोंड लागेल, तसं मला जाणवलेला, कळलेला हा ‘पुरुष.. माणूसपणाच्या वाटेवरचा!’.