तिला फक्त गाडी चालवायची होती, एक साधी इच्छा. पण ‘वाहन चालविणाऱ्या महिला म्हणजे वेश्या’ अशी संभावना केली गेली आणि समाजरीतींनी तिला रोखलं. तिचं कुटुंबही यात फरफटलं गेलं. तिला तुरुंगवास भोगावा लागला. तिने मग हट्टाने त्या विरोधात सोशल मीडियातून ‘वुमन टू ड्राइव्ह’ मोहीमच सुरू केली. तिच्यावर प्रचंड टीका झाली. ही मोहीम म्हणजे केवळ गाडी चालविण्याचं स्वातंत्र्य मिळण्यापुरतीच मर्यादित नाही तर हा हक्क म्हणजे सौदी अरेबियातील महिलांच्या हक्कांतील एक लहानसे पाऊल आहे, असं ती मानते. त्या धाडसी मनल-अल्-शरीफविषयी..
अमुक एका देशात स्त्रीला वाहन चालविण्याचा अधिकार नाही, असं जर कुणी म्हटलं तर त्याचं गांभीर्य कुणाच्या पटकन् लक्षातही येणार नाही. कारण अद्याप स्त्रीचे स्वातंत्र्य आणि तिचे मूलभूत हक्कच जिथे नाकारले जातात, तिथे तिला ड्राइव्ह करायला मिळणं-न मिळणं हे फारच दूर राहिलं! पण अशा देशात एक स्त्री संपूर्ण व्यवस्थेविरोधात उभी राहते. वाहन चालविल्याबद्दल तुरुंगवास भोगते, नोकरीचा राजीनामा देते.. तिचा प्रवास समजून घेताना लहानशा गोष्टी प्राप्त करण्यासाठी स्त्री म्हणून किती लढा द्यावा लागतो, याची पुन्हा एकवार जाणीव होते. तिचं नाव मनल-अल्-शरीफ. ती आहे सौदी अरेबियाची नागरिक.  
दोन वर्षांपूर्वी तिच्या पाच वर्षांच्या मुलाने- अबुदीने झोपताना तिला विचारलं, ‘आई, आपण वाईट माणसं आहोत का गं?’ तिचा प्रश्न ऐकून ती क्षणभर स्तंभित झाली. मुलगा शाळेत परतला, तेव्हा तिनं त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले ओरखडे पाहिले होते. त्याबद्दल त्याला विचारल्यानंतरही तो काही बोलला नव्हता. आता मात्र तिला त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या ओरखडय़ाचं कारण कळलं. तो म्हणाला, ‘तुला फेसबुकवर पाहिल्याने शाळेत काही मुलांनी मला मारलं.’
काही दिवसांतल्या तिच्या एका कृतीमुळे तिच्यासमोर आणि तिच्या कुटुंबीयांसमोर आक्रीत उभं राहिलं होतं. गाडीची किल्ली तिच्या हातात सोपविल्याबद्दल तिच्या भावाची दोनदा चौकशी झाली होती. आणि शिक्षा म्हणून त्याला देशातून हद्दपार व्हावे लागले. तिच्या वडिलांना इमामांनी बोलावून ‘वाहन चालविणाऱ्या महिला म्हणजे वेश्या’ अशी केलेली संभावना ऐकावी लागली. तिने केवळ वाहन चालविण्याचा गुन्हा केला नव्हता तर तिने तिथल्या समाजाचे नियम धुडकावण्याचे साहस केले होते. तिचे हेच साहस तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या जिवावर बेतले होते.
याची सुरुवात २०११ साली झाली, जेव्हा मनलने तिच्या मैत्रिणीपाशी बोलताना सौदीत महिलांना वाहन चालविण्याच्या नसलेल्या अधिकाराबाबत नापसंती व्यक्त केली होती. या कायद्याविरोधात स्त्रीने आवाज उठविल्याच्या तुरळक घटना घडल्या असल्या तरी गेल्या २० वर्षांत सौदीत कुणा महिलेनं या विरोधात ब्र काढला नव्हता. मात्र, त्यावर तिच्या मैत्रिणीने ‘असा कुठलाही कायदा नसून ही केवळ धार्मिक नेत्यांनी फतव्याद्वारे आणलेली बंदी आहे आणि तीच इतकी र्वष चालरीत म्हणून पाळली जाते’, असे मनलच्या निदर्शनास आणून दिले. तिच्या मैत्रिणीने हे म्हणणे मनावर घेतलेल्या मनलने सौदीतल्या महिलांना गाडीचे चाक हाती घेण्याचा अधिकार मिळावा, यासाठी ‘सोशल मीडिया’च्या मदतीने १७ जून २०११ रोजी मोहीम सुरू केली.
‘जेव्हा पिंजऱ्याचं दार खुलं होतं.. तेव्हा आपण पक्षी आहोत आणि आतापर्यंत आपलं आयुष्य हे केवळ तुरुंग होतं, याचा साक्षात्कार त्याला होतो.. सुरुवातीला तो पक्षीही पिंजऱ्याबाहेर पडण्यास राजी नसतो.. तो क्षण मी अनुभवला.’ मनल तिच्या पहिल्यांदा गाडी चालविण्याच्या थरारक क्षणाबद्दल सांगते. कारण रीतीरिवाजानुसार तिथे स्त्रीने केवळ वाहनचालकाच्या बाजूच्या प्रवाशाच्या सीटवर बसणे अपेक्षित असायचे. त्यामुळे सुरुवातीला गाडी चालवताना तीही कचरली. पण तिचं हे भांबावणं फार वेळ टिकलं नाही आणि तिने कॅडिलॅक एसयूव्ही गाडी रोरावत पुढे नेली. त्यानंतर पुढे तासभर ती राज्याच्या पूर्वेकडील भागात- खोबर परिसरातील रस्त्यांवर गाडी चालवत होती. तिचा हा प्रवास तिची मैत्रीण आयफोन कॅमेऱ्यात बंदिस्त करत होती. हे चित्रण त्यांनी यूटय़ुबवर पोस्ट केले आणि ‘वुमन टू ड्राइव्ह’ या मोहिमेत सौदी महिलांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, अशा आशयाचे आवाहन केले. फेसबुकवर मनलने केलेल्या ‘टीच मी हाऊ टु ड्राइव्ह, सो आय कॅन प्रोटेक्ट मायसेल्फ’ आवाहनाला सुमारे १२ हजार फॅन्सचा प्रतिसाद मिळाला.
  मे २०११ च्या सुमारास आखाती देशांमध्ये अनेक ठिकाणी सौम्य उठाव होत होते. त्या वेळेस सौदी अरेबियातील महिला हक्कांबाबत काम करणाऱ्यांचं विश्वही ढवळून निघत होतं. महिलांच्या वाहन चालविण्यावर बंदी संपुष्टात येईल का, अशी आशेची धुगधुगी त्यांना वाटत होती. त्याबद्दल सांगताना मनल म्हणते, ‘माझ्या सभोवतालच्या प्रत्येकजण हा अधिकार नसल्याबद्दल तक्रार करत होत्या. प्रत्यक्ष मात्र त्यासाठी कुणीही काहीही करत नव्हतं. अशा वेळी अरब जगतात बरंच काही घडत होतं. त्यातूनच नुसतं तक्रार करीत बसण्यापेक्षा काहीतरी करण्याची प्रेरणा मला मिळाली.’
फेसबुकवर जेव्हा मनलने मोहीम सुरू केली, तेव्हा सुरुवातीला कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. नंतर मात्र अनेकांनी तिच्या वाहन चालविण्याच्या कृत्याबद्दल साशंकता, भीती, नापसंती दाखवायला सुरुवात केली. ती म्हणते, ‘स्त्रियांच्या वाहन चालविण्यास विरोध करणाऱ्यांनी ‘रस्त्यावर लांडगे असतात, बायका गाडी चालवायला लागल्या तर हे लांडगे तुमच्यावर बलात्कार करतील,’ असा ओरडा सुरू केला. अशा वेळी ही भीती खोडून काढण्याची आणि वर्षांनुवर्षे उभारलेली भिंत भेदून पुढे जाण्याची आवश्यकता होती. ज्यामुळे इतर स्त्रियांना समजलं असतं की, ‘ठीक आहे. तुम्ही गाडी चालवू शकता. कुणीही तुमच्यावर बलात्कार करणार नाहीए.’
ही भिंत भेदण्याचे मनलने निश्चित केले आणि खोबरमध्ये गाडी चालविल्याचा व्हिडीयो तिने यू टय़ुबवर पोस्ट केला. तिचा हा व्हिडीओ भलताच हिट ठरला. ही वार्ता सौदी अरेबियात वाऱ्यासारखी पसरली. मात्र, साऱ्याच प्रतिक्रिया काही सकारात्मक नव्हत्या. ती सांगते, ‘एका इस्लामिक लिपिकाने लिहिलं, ‘तू स्वत: तुझ्यासाठी नरकाची दारं उघडली आहेस.’ एकाचा ई-मेल आला- ‘तुझी कबर तुझी वाट बघतेय.’
त्यावेळी मनल ही अरॅमको या राष्ट्रीय तेल कंपनीत संगणक सुरक्षा सल्लागार म्हणून काम करीत होती. तिला व्यवस्थापकाने बोलावून घेतलं नि खेकसला, ‘कसल्या नसत्या उठाठेवी चालल्या आहेत तुझ्या?’. त्याची उलटसुलट बोलणी तिला खावी लागली. मनलने त्याच्याकडे दोन आठवडे सुटी मागितली. मात्र जाण्यापूर्वी ऑफिसमधल्या फळ्यावर तिच्या बॉससाठी संदेश लिहून ठेवला- ‘२०११. या वर्षांची नोंद करून ठेवा. या वर्षी तुम्हाला ठाऊक असलेला प्रत्येक नियम बदलेल. मी जे काही करत आहे, त्याबाबत तुम्ही मला व्याख्यान झोडू शकत नाही.’
महिलांनी गाडी चालवू नये, ही केवळ रीत आहे, वाहतुकीचा नियम नाही, याची चाचपणी करण्यासाठी तिने आठवडय़ाभरानंतर पुन्हा तिने गाडी चालवली. यावेळी तिच्यासोबत तिचा भाऊ, वहिनी आणि त्यांचं बाळ होतं. यावेळी मात्र तिचं गृहीतक सपशेल खोटं ठरलं. वाहतूक पोलिसांनी तिची गाडी रोखली आणि काही क्षणांत तिथे मूल्य वृद्धी आणि वाईट घटना रोखण्यासाठी असलेल्या समितीचे सदस्य तिथे पोहोचले. सौदीच्या पोलिसांनी तिच्या गाडीला घेरलं. एक खेकसला – ‘मुली! चालती हो. आम्ही महिलांना गाडी चालवायला देत नाही.’ मनल आणि तिच्या भावाला अटक झाली आणि सहा तास त्यांची चौकशी झाली. त्यावेळेस मनल आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली. चौकशीच्या दरम्यान तिने चौकशी अधिकाऱ्यांना विचारलं, ‘सर, मी कुठला कायदा मोडला?’ त्यांनी उत्तर दिलं, ‘तू कुठलाही कायदा मोडला नाहीस, तू चालरीत मोडलीस.’
चौकशीनंतर दोन भावंडांना सोडण्यात आलं, मात्र दुसऱ्याच दिवशी मनलला पुन्हा अटक करण्यात आली. आठवडाभर तिला डांबून ठेवण्यात आलं. तिच्या वडिलांनी व्यक्तिश: सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांच्याकडे आपल्या मुलीच्या कृत्यासाठी तिला माफी मिळावी, याची याचना केली आणि ‘यापुढे तिला देशात गाडी चालविण्यापासून आपण रोखू,’ असे आश्वासनही दिले. याबद्दल मनलला जेव्हा जेव्हा विचारलं जातं, तेव्हा संतापाने थरथरलेल्या आवाजात ती सांगते,    (पान ४ पाहा) (पान ३ वरून) ‘मी फक्त गाडी चालवत होते.’
इराणमध्ये शिया पंथाच्या कट्टर अनुयायांनी सामाजिक स्वातंत्र्य देणारी राजसत्ता उलथून टाकली आणि निर्बंध लादणारी सत्ता आणली. नोव्हेंबर १९७९ मध्ये सौदी अरेबियात सुन्नी पंथाच्या जिहादी टोळीने मक्काच्या मशिदींवर हल्ला चढवून शेकडो लोकांना, सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना ठार मारले आणि त्या मशिदींचा ताबा घेतला. त्यांच्याकडे दोन आठवडे ताबा होता. त्यांचा बीमोड करायला फ्रेंच कमांडोंची मदत घ्यावी लागली. ही गोष्ट सौदी अरेबियाच्या राजघराण्यासाठी नाचक्की करणारी गोष्ट होती. कारण सौदी अरेबियाचे राजघराणे हे त्या मशिदींचे रक्षणकर्ते मानले जातात. या घटनेनंतर पुन्हा जिहादींनी हल्ला करू नये यासाठी त्यांच्या तुष्टीकरणाचे, चुचकारण्याचे धोरण राजाने अनुसरले. महिला आणि शिक्षण या संबंधातील कायदे हे जिहादींच्या इच्छेप्रमाणे बनले. सार्वजनिक जीवनात महिलांना पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आणि स्त्री-पुरुषांसाठीच्या कायद्यात प्रचंड तफावत करण्यात आली.
इतर बंधनांसोबत महिलांनी वाहनं चालविण्यावरही निर्बंध आले. १९९०च्या दशकात मनलच्या आधीच्या पिढीतल्या महिलांनीही वाहन चालविण्याचे स्वातंत्र्य मिळविण्याचे प्रयत्न केले, मात्र ही बंदी उठविण्यात त्या अयशस्वी ठरल्या. कुवेतवर इराकने केलेल्या हल्ल्याच्या काळातही ४० सौदी स्त्रियांनी ‘ड्राइव्ह इन’ मोहीम उभारली. ‘राष्ट्रात आणीबाणी असताना जेव्हा त्यांचे पुरुष रक्षणकर्ते उपलब्ध नाहीत, अशा वेळेस सौदी महिलांना गाडी चालविण्याची परवानगी मिळावी,’ अशी त्यांची मागणी होती. पण तीही धुडकावून लावण्यात आली.
मनलच्या मते, तिची ही मोहीम म्हणजे केवळ गाडी चालविण्याचं स्वातंत्र्य मिळण्यापुरतीच मर्यादित नाही तर हा हक्क म्हणजे महिला हक्कांतील एक लहानसे पाऊल आहे. ओस्लो फ्रीडम फोरममध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी तिथे जायला मनलने नोकरीच्या ठिकाणी परवानगी मागितली. वरिष्ठांनी परवानगी नाकारली. तिच्यासोबत कंपनीचे नाव जोडले जाऊ नये, असं त्यांना वाटू लागलं तेव्हा मे २०१२मध्ये तिने पदाचा राजीनामा दिला.
मनल आता दुबईला तिच्या ब्राझिलियन नवऱ्यासोबत राहते. तिला पहिल्या लग्नापासून झालेला सात वर्षांचा मुलगा आहे. त्याला सौदीबाहेर न्यायला तिच्या पहिल्या नवऱ्याने परवानगी नाकारली. म्हणून प्रत्येक आठवडय़ाअखेरीस आपल्या मुलाला भेटायला सौदीत जाते.
वाहन चालविण्याच्या हक्कापासून तिने उभारलेला लढा आज व्यापक बनला आहे. मानवी हक्कांची जपणूक, महिलांच्या छळवणुकीविरोधातील लढा, पोटगीचा हक्क, कुटुंबातील तिचं मानाचं स्थान अशा अनेक बाबतीत मनल लढत आहे. मनलची ही चित्तरकथा – देशा-परदेशातील प्रत्येकीला स्फुरण चढवणारी आहे. आपल्याला असणाऱ्या लहान-लहान गोष्टींमधल्या स्वातंत्र्याचं मोलं अधोरेखित करणारं आहे!    
suchita.deshpande@expressindia.com