News Flash

‘मानस प्राणायाम’

सज्जनगडावरील मकरंदबुवा रामदासी आपल्या एका प्रवचनात म्हणाले, ‘‘साधनेला तीन गोष्टींचा शाप आहे- आळस, यांत्रिकता आणि सकामता!’’

| December 20, 2014 01:01 am

सज्जनगडावरील मकरंदबुवा रामदासी आपल्या एका प्रवचनात म्हणाले, ‘‘साधनेला तीन गोष्टींचा शाप आहे- आळस, यांत्रिकता आणि सकामता!’’ पतंजली ऋषींनीदेखील आळस हा साधनेतील प्रमुख अडथळा मानला आहे. साधनेतील यांत्रिकता हीसुद्धा अपेक्षित लाभ कधीच मिळवून देऊ शकत नाही. यांत्रिकतेने, म्हणजेच प्राणसंकल्पना समजून न केलेला प्राणायाम फक्त त्या वेळापुरते थोडे फार लाभ मिळवून देईल पण अंतरंगापर्यंत पोहोचवणार नाही. साधनेतील ‘सकाम’ वृत्ती फक्त फायद्या-तोटय़ाचे गणित कागदावर मांडत राहील. आमच्या मधुमेहाच्या शिबिरांमध्ये आम्ही डॉ. बिजलानींचा एक विचार मांडतो- जर एक महिन्याच्या शिबिराच्या कालावधीत, दिवसातून एक तास केलेली साधना मला इतके सुंदर वैद्यकीय निष्कर्ष देऊ शकते, तर चोवीस तास अंगीकारलेली योग जीवनशैली मला किती आनंदी करू शकेल? साधना करताना श्रद्धा हवी. खऱ्या श्रद्धावानालाच ज्ञानप्राप्ती होऊ शकते. ही श्रद्धा निरपेक्ष हवी. श्रद्धा स्वत:तील शक्तीवर असावी. खरी श्रद्धाच समर्पण करू शकेल आणि मृत्यूच्या भयापासून दूर नेऊ शकेल.
   मानस प्राणायाम         
प्राणायाम साधनेतील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत आपण आलो आहोत. हा टप्पा म्हणजे ‘मानस प्राणायाम.’ आपल्या शास्त्रामधे मानस पूजा वर्णन केली आहे. त्यानुसारच आपल्याला आता प्रत्यक्ष प्राणायाम मुद्रा धारण न करता, मनानेच साऱ्या कृती करायच्या आहेत. उदाहरणार्थ, मनाने आपण नाडीशुद्धी करू या. एक श्वास सोडून द्या. आता मनानेच उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने पूरक करा. नंतर कल्पना करा की, श्वास उजव्या नाकपुडीने सोडला जात आहे. आता उजव्या नाकपुडीने पूरक करा व मनानेच डाव्या नाकपुडीने सोडून द्या. हे झाले मानस प्राणायामाचे एक आवर्तन. सुरुवातीला दोन आवर्तने करा. हळूहळू अधिक आवर्तने करा.
कृतीशी समरस झालो, तर प्रत्याहार साधता येईल, त्यातून एकच विषय -श्वास – त्याच्याशी जोडलो गेलो – तर धारणा आपोआप साध्य होईल. धारणेतून ध्यानाकडचा प्रवास आपोआप सुरू होईल. मनाला चांगले प्रशिक्षण लाभेल.
 मानस प्राणायाम कुणीही करू शकेल. त्यासाठी फक्त मनाची एकाग्रता साधता आली पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2014 1:01 am

Web Title: manas pranayam
टॅग : Chaturang,Loksatta
Next Stories
1 ‘तेजोवलय’
2 गुरूपदिष्ट माग्रेण
3 आधुनिक असुर
Just Now!
X