अजित घोडेस्वार

‘‘मी नसलो तर काहीच फरक पडणार नाही ना तिला.. मी नकोय तिला.. ये भेटायला, असं म्हणाली म्हणून मी पण लगेच असं धावत जायला नको हवं होतं.. जरा जास्तच गुंतायला लागलोय मी.. बाहेर पडायला हवं यातून.. भेटणं कमी करायला हवं..’’ आशू स्वत:च भांडत होता.. स्वत:च समजावत होता.. त्यांची पावलं चालत होती, तसं विचारचक्रही जोरात चालू होतं.

‘‘जा रे तू.. मला माझं काम करू दे ना..’’ कामाच्या गडबडीत असलेली मुग्धा थोडय़ा वैतागानेच पटकन बोलून गेली. मगापासून सतत बडबड करत असलेला, मुग्धाला हसवायचा जीव तोडून प्रयत्न करत असलेला आशू एकदम शांत झाला..

‘‘सॉरी गं’’, एवढंच त्याच्या तोंडातून बाहेर पडलं. पण त्याचा आवाज आता पार पडला होता. पुढे त्याला काहीच सुचत नव्हतं.

‘‘कर तू तुझं काम.. मी आहे इथेच..’’ कसं तरी त्याने आणखीन एक वाक्य रेटलं. मान वळवून तो मुग्धाच्या केबिनच्या बाहेर काहीतरी बघायचा प्रयत्न करू लागला. थोडावेळ असाच काहीही न बोलता गेला.

मुग्धासुद्धा थोडी शांत झाली. आपलं वाक्य आशूच्या मनाला लागलं, हे जाणवलं तिला आता. आता तिलाही सुचत नव्हतं काही. पार गोंधळ उडाला तिचासुद्धा. ‘‘स्वभाव माहितेय याचा.. आजकाल काळजी घेते मी, पण बोलताना पटकन बोलून जाते आणि हा वेडा मनाला लावून घेतो.. देवा कसं समजावू याला? कसं सांगू?’’

‘‘काय झालं रे? राग आला माझा?’’, मुग्धाच्या प्रश्नाने आशू एकदम भानावर आला.

‘‘नाही गं! राग कशाबद्दल? काहीपण..’’ खोटं हसू चेहऱ्यावर आणूनही खोल गेलेला आवाज त्याला लपवता आला नाही. आवंढा आल्यासारखा वाटला. पण तो लपवण्यासाठी त्याने उगीचच खोकला आल्यासारखा आवाज तोंेडातून काढला. अजूनही त्याची नजर खिडकीच्या बाहेरच रेंगाळत होती. मुग्धाच्या केबिनमध्ये परत नजर आणण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. तिने चेहरा वाचला तर..

दोघांनीही कधी मनातलं एकेमकांना बोलून दाखवलं नव्हतं. तो भेटायच्या अगोदरपासून तिच्या आयुष्यात कोणीतरी होतं. म्हणजे आवडणारं कोणीतरी.. तिने आता काही वेगळा विचार करणं हे तिला नैतिकदृष्टय़ा चुकीचं वाटत होतं. कदाचित बरोबर होतं तिचं. पण असं ठरवून आवडणं-नावडणं नाही ना होतं. त्याचा तर तो स्वभावच नव्हता. माणसं आयुष्यातून गेली तरी त्यांच्यावर हक्क दाखवणं, मनातलं व्यक्त होणं हे आशूकडून कधी झालं नाही. अधिकाधिक हळवा होत गेला तो. खूप गुंतले होते दोघं एकमेकांमध्ये. अव्यक्त.. भेटण्यासाठी दररोज नवीन कारणं शोधून भेटायचे ते.. बस एकमेकांचं असणं. तिच्यासोबत घालवण्यासाठी दिवसभरामध्ये एखादा क्षण जरी मिळाला तरी स्वारी खूश असायची. काहीही करून तिला हसवायचं, हे एकच डोक्यात असायचं त्याच्या.. खूप काही पुढचं डोक्यात नव्हतं. ती आवडतेय एवढंच त्याच्यासाठी पुरेसं होतं.

पण एका क्षणासाठी का होईना, आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण नकोसे आहोत, ही जाणीव आशूचा जीव घेऊन गेली.

मुग्धाला पण काय बोलावं ते सुचत नव्हतं.

‘‘चल निघतो मी’’, मगापासून आतल्या आत सरकत असलेलं वाक्य एकदाचं ओठातून बाहेर पडलं.

‘‘थांब ना रे’’ मुग्धा थोडी काकुळतीला आली होती.

‘‘नको गं.. संध्याकाळी मुंबईला निघायचंय.. थोड रूममधलं आवरून निघेन.’’ आशूला हे एवढं बोलणंसुद्धा जड झालं होतं आता. त्याने त्याची सॅक उचलली आणि मुग्धाकडे एक ओझरता कटाक्ष टाकून म्हटले, ‘‘चल भेटू सोमवारी.’’

मुग्धाला आता अपराध्यासारखं वाटायला लागलं. कॉलेजच्या बाहेर पडला आशू. रूमकडे जाणारी सवयीची वाट पावलांनी आपोआप पकडली.

‘‘एवढं काय मनाला लावून घ्यायचं त्यात. ठीक आहे ना! बिझी होती ती.. स्पेस द्यायला पाहिजे ना मी तिला तिची.’’ आशू स्वत:ला समजवायचा प्रयत्न करू लागला.

‘‘पण तिने बोलावलं भेटायला म्हणून गेलो ना एवढा धावत धावत.. तिचा मूड खराब होता हे कुठे माहिती होतं मला. आज कॉलेजला येताना किती खूश होतो.. मुग्धाला भेटायचं होतं.. आज काय काय बोलायचं, याची मनातल्या मनात शंभरदा उजळणी केली होती.. आज हे बोलून तिला हसवायचं.. ती हसली की कसं छान छान वाटतं..’’

‘‘अरे टेन्शनमध्ये होती म्हणून पटकन असं बोलून गेली.. तिचा बोलण्याचा अर्थ तसा नव्हता ना.. माहितेय मला.. पण हा असा त्रास का होतोय..? तो पण इतका..? मूर्ख आहे मी.. एवढय़ा छोटय़ा छोटय़ा गोष्टी मनाला लावून घेतल्या तर कसं व्हायचं माझं..’’

‘‘आणि मूड खराब असला म्हणून काय झालं यार.. हे असं थोडं बोलायचं असतं? आणि मला त्रास होतो, कळत कसं नाही तिला.’’

‘‘का कळावं तिला? का समजून घ्यावं तिने? काहीपण.. ती काही गर्लफ्रेन्ड किंवा बायको आहे का समजून घ्यायला? मी जरा जास्तच अपेक्षा ठेवायला लागलोय ना सध्या.. अशाने माणसं दूर जातील अजून.’’

‘‘मी नसलो तर काहीच फरक पडणार नाही ना तिला.. मी नकोय तिला.. ये भेटायला, असं म्हणाली म्हणून मी पण लगेच असं धावत जायला नको हवं होतं.. जरा जास्तच गुंतायला लागलोय मी.. बाहेर पडायला हवं यातून.. भेटणं कमी करायला हवं..’’

स्वत:च भांडत होता.. स्वत:च समजावत होता..

आशूची पावलं चालत होती, तसं त्याच्या मनातलं विचारचक्र पण जोरात चालू होतं.

थोडंसं थकल्यासारखं वाटलं त्याला. नजरसुद्धा थोडी अस्पष्ट झाली. पापण्यांवर थोडं पाणी जमा व्हायला सुरुवात झाली होती. कोपऱ्यावर बालाजीचं टपरीवजा हॉटेल होतं. आशूची पावलं तिकडे वळली. बालाजीकडून पाण्याची बाटली मागितली. फ्रिजमधून बॉटल काढता काढता बालाजीने नेहमीप्रमाणे हसून विचारलं, ‘‘काय कॅप्टन काय चाललंय?’’ आशू उसनं अवसान आणून हसला. पाकिटातून ५० रुपयांची नोट काढून दिली. बालाजीने सुट्टे पैसे काउंटरवर ठेवले. आशूने न मोजता ते पैसे खिशामध्ये टाकले. थोडासा बाजूला गेला, जमेल तितकं पाणी घटाघटा प्यायला आणि उरलेलं पाणी चेहऱ्यावर ओतून दिलं.

पावलं पुन्हा रूमकडे वळली. चार इमारती सोडून रूम होती आशूची. आता झपाझप पावलं टाकत आशू रूमवर पोहोचला. कुलूप उघडून आत आला. शूज काढून एका बाजूला व्यवस्थित ठेवले. सॅक खुर्चीवर ठेवली आणि तसाच आडवा झाला बेडवर. खूप त्रास व्हायला लागला त्याला. बस्स झालं आता. बाजूला बेडवरचं शिरीष कणेकरांचं ‘गोतावळा’ पडलं होतं. बरं झालं. थोडंसं ‘डिस्ट्रॅक्ट’ तरी होईल. मूड बदलेल थोडा तरी. पडल्यापडल्या त्याने पुस्तक उचललं आणि चाळायला सुरुवात केली. अविनाश खर्शीकरचं ‘पान’ आलं. खूप हसायचा दर वेळेस ते वाचताना. आज हेच वाचू या, ठरवलं. वाचण्यापूर्वीच थोडंसं हायसं वाटलं आशूला. पुस्तक बेडवर ठेवून उपडा पडून आशूने वाचायला सुरुवात केली.

एक-सव्वा तास झाला असेल. दारावरची कडी वाजली. आशू त्याच्या तंद्रीतून भानावर आला. स्नेहा आला बहुतेक लेक्चर करून. दाराकडे जाता जाता आशूने घडय़ाळाकडे पाहिलं. पावणेदोन झालेले. बापरे, कसा वेळ  गेला, समजलंच नाही. स्वत:शीच विचार करता करता आशूने दरवाजा उघडला.

‘‘झोपला होतास काय रे? कधीचा दरवाजा वाजवतोय..’’ आल्या आल्या स्नेहा किरकिर करायला लागला.

‘‘काही कामाचा नाहीस तू.. जरा पेशन्स नाहीत तुझ्यात.. चारवेळा कडी नाही वाजवली तर एवढी बोंबाबोंब करतोयस..’’ आशू पण सुरू झाला.

‘‘जाऊ दे. चल जेवायला जाऊ मेसला. भूक लागलेय मरणाची.’’

‘‘लेक्चर कसं होतं?’’

‘‘काही नाही. पांचटगिरी होती सगळी. हजेरी लागली, बस्स आणि काय रे, आज बरा लवकर आलास. मला वाटलं, आज पण मला एकटय़ालाच जेवायला जायला लागेल. मुग्धा भेटली नाही वाटतं.’’

‘‘भेटली रे. पण ऑफिसच्या कामात होती. उगीच डिस्टर्ब नको तिला. थांब थांब करत होती, पण मीच नको म्हटलं.’’ एवढा वेळ व्यवस्थित बोलणाऱ्या आशूचा आवाज थोडासा खाली गेला.

‘‘गोतावळा वाचत बसलो येऊन. एवढा हसलो ना परत. कधीपासून सांगतोय तुला वाच एकदा तरी. पार धमाल आहे.’’ आशूने विषय बदलला. स्नेहाने रिअ‍ॅक्ट करायचं सोडून दिलं होतं, आशूचं असं काही सुरू झालं की. आजसुद्धा त्याने ती प्रथा प्रामाणिकपणे पार पाडली.

‘‘चल आवर पटकन.’’

आशूने अजून कपडेसुद्धा बदलले नव्हते.

‘‘दोनच मिनट.’’ आशू पुटपुटला.

कपडे बदलायला अजून वेळ जाईल आणि स्नेहा परत किरकिर करायला सुरुवात करेल, असा विचार करून आशूने तोंडावर पटापट पाण्याचे सपकारे मारले आणि टॉवेल घेऊन चेहरा पुसायला लागला.

बेडवर ‘गोतावळा’ तसंच पडलं होतं. अविनाश खर्शीकरचं पहिलं पान अजूनसुद्धा आशूची वाट बघत होतं..

ajeetghodeswar@gmail.com

chaturang@expressindia.com