अनुजा बर्वे

‘‘सुकान्ता, तू लवकर निघून, जाऊन ये मावशीकडे. संध्याकाळी वेळेत यायला हवं.’’

‘स्वेच्छा-निवृत्त’ माधवरावांनी ‘वेळेचं बंधन’ घालून बायकोला मोठय़ा उदार (?)मनानं सकाळीच परवानगी देऊन टाकली. पस्तीसेक वर्षांची मेहनत अन् यशस्वी कारकीर्दीचा प्रचंड अभिमान असणाऱ्या माधवरावांचा एक विलक्षण दरारा होता घरादारावर. वेळेचं बंधन असलं तरी या ‘संधीचा’ वेळीच लाभ घेत, चपळाईने घरात नीटनेटकी व्यवस्था करून, सुहास्य वदनाने सुकान्ता घराबाहेर  पडलीसुद्धा!

वर्तमानपत्रातील अग्रलेख, अर्थविषयक दोनेक जर्नल्स वाचावीत निवांतपणे म्हणून सगळा संच घेऊन माधवराव आरामखुर्चीवर स्थानपन्न झाले. पाचेक मिनिटंच झाली असतील नसतील, तोच डोअरबेल वाजली. दार उघडायला नाइलाजानं उठताना त्यांना नाही म्हटलं तरी सुकान्ताची अनुपस्थिती जाणवलीच.

‘‘अगंबाई, तुम्ही? सुकान्ता कुठाय?’’

दाराबाहेर उभ्या असलेल्या दामले यांच्या दचकलेल्या सुराने, ‘‘स्वत:च्याच घरात स्वत:चं असणं इतकं बिनकामाचं असू शकतं,’’ असं काहीसं जाणवून माधवराव अंमळ अस्वस्थ झाले. ‘‘घरात नाहिये ती. काही काम होतं का?’’

‘‘त्या अन्नपूर्णेकडेच होतं काम. गुलाबजामची रेसिपी हवी होती. इतके मुलायम कसे होतात बाई? ते विचारायचं होतं. ठीकै. नंतर मोबाइलवर बोलेन मी तिच्याशी.’’

‘एका स्त्रीने दुसरीचं (इथे ती ‘दुसरी’ म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून आपली पत्नीच आहे की!) इतक्या सहजपणे कौतुक करावं? ऑफिसमध्ये ‘अ‍ॅप्रिसिएशनचं’ महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आपल्याकडून मात्र ‘हे’ राहूनच गेलं की!’ दामल्यांची पाठ वळताच या अशा सगळ्या विचारांनी किंचितसे अस्वस्थ झालेले माधवराव डोकं झटकून पुनश्च वाचनाकडे वळले.

‘ट्रिंग ट्रिंग’..कर्कश्श वाजणाऱ्या टेलिफोनकडे त्रासिक नजरेनं बघत अखेर माधवरावांनी रिसिव्हर उचलला तर पलीकडून लेकाचा आवाज, ‘‘हॅलो आई, पहिलं म्हंजे आम्ही तिघं मित्र जरा लवकर कॉलेजमधून निघून आपल्या घरी येतोय. जर्नल्स कम्प्लीट करून उद्याच सबमिट करायचेत. अन् दुसरं म्हंजे तुझ्या हातच्या यम्मी ‘शेवपुरी’ची डिमांड आहे मित्रांची.’’

‘‘हॅलो, मी बाबा बोलतोय. आई बाहेर गेलेय आणि संध्याकाळी येणारे एकदम. आधी फोनवर कोण बोलतंय ते कन्फर्म करून बोलावं रे.’’  बेशिस्त खपवून न घेणारी जरब डोकावलीच माधवरावांच्या स्वरात.

‘‘र्अे यार, आई घरी नाहिये? तेही नेमकी आत्ताच? ओक्के, आय विल मॅनेज. ठेवतो फोन,’’ बाबा पुढे काही लेक्चर देतील या भीतीने फोन ठेवलासुद्धा त्याने.

आई-लेकाच्या रॅपोचा हेवा वाटत असतानाच, माधवरावांना त्यांच्या दोघांमधला दुरावा क्षणभर जरा अधिकच खटकला. पण नकारात्मक विचारांना लीलया दूर करत ते पुन्हा वाचनाकडे वळले. खट् करून लॅच उघडलं अन् त्या आवाजाने माधवरावांची लिंक परत एकदा तुटली. सकाळची लेक्चर्स अटेंड करून आलेली तन्वी घरात शिरली ती आरोळी देतच, ‘‘आई., ए आयुडी., खूप बोअर झालंय गं! सक्काळपासून नुस्ती लेक्चर्स एके लेक्चर्स! दोघी मस्त गरमागरम कॉफी घेऊ या.’’

‘‘आई नाहिये बेटा घरात. तुला कॉफीसाठी मी कंपनी देतो आज.’’ खरंतर आई घरात नाही ही कल्पनाच असह्य़ झाल्याने, कॉफी करण्यासाठी चरफडतच तन्वीनं स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. ‘‘ओह वाव, थर्मासमध्ये कॉफी रेडी आहे बाबा. कस्सली ‘ऑर्गनाइज्ड’ आहे आई. ग्रेट यार! कस्सं बरोब्बर कळतं तिला.’’ तन्वीच्या कौतुकभरल्या ‘चित्कारांनी’ घर भरून गेलं अन् ट्रेमधून वाफाळलेल्या कॉफीचे दोन मग्ज घेऊन येणाऱ्या लेकीकडे माधवराव पाहतच राहिले. खरंतर अर्थविषयक लेख वाचल्यानंतर त्यांनाही कॉफीची तल्लफ आलीच होती. आईबद्दलच्या अभिमानाने फुललेला लेकीचा चेहरा बघून माधवरावांच्या डोळ्यात असूया डोकावलीच नि जोडीला ‘घरात मीच फक्त कसा ऑर्गनाइज्ड आहे’ हा अभिमानही कलंडला.

‘‘तन्वी, झालं का कॉलेज? तुझी आई दिसली नाही सकाळपासून. उद्या माझ्याबरोबर डॉक्टरांकडे येणारे ती. सुकान्ता असली नं बरोबर की अगदी निर्धास्त वाटतं. तिनेच घेऊन दिलेय ना अपॉइंटमेंट तेव्हा लक्षात असणारच म्हणा तिच्या!’’ बाजूच्या ब्लॉकमधल्या बाल्कनीतून भांडारे आजींनी हाक दिली अन् तन्वी लगोलग उठून गेलीच त्यांच्याशी बोलायला. ‘सुकान्ता’ बद्दलचा भरवसा भांडारे आजींच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होत होता.

‘कर्तृत्ववान’ माधवरावांच्या मनात, त्यांच्याही नकळत आज सक्काळपासूनचे प्रसंग क्रमवारीने फेर धरू लागले. ऑफिस हेच ‘जग’ मानून वागत आलेल्या माधवरावांना या वेगळ्याच ‘घरगुती जगा’चा परिचय होत होता. संसाराचा डोलारा केवळ त्यांच्या भक्कम मिळकतीने उभारल्याचा मनातला गर्व हलला होता आज. त्यांच्या ज्या जनसंपर्क कौशल्याचं पावलोपावली कौतुक होत असे त्यालाही धक्का बसला काहीसा. अन् या सगळ्या गोष्टींमुळे नकळत त्यांचं ‘आत्मावलोकन’ सुरू झालं.

‘जितकी वर्ष, केवळ कार्यालयीन जबाबदाऱ्या पेलून मिळालेल्या यशाने आपण ‘अहं’ जपला तितक्याच वर्षांत सुकान्ताने आपल्या गुणांनी, कौशल्यांनी हे ‘गृहराज्य’ निर्माण केलंय आणि विविध प्रजाजनांनी तिला केव्हाच ‘राज्ञीपद’ बहाल केलंय,’ हे माधवरावांना मनोमन पटलं.

अन्.. सुकान्ता घरी परत येण्याचे ‘वेध’ लागले त्यांना, अगदी नकळतच !

neelimabarve@gmail.com

chaturang@expressindia.com