डॉ. सुवर्णा दिवेकर

‘संकल्प’ सोसायटीच्या दारात रिक्षा थांबली. आशाताईंनी पैसे देण्यासाठी पर्स उघडली, ‘‘आजी, सुटे पैसे द्या बरं का.’’ रिक्षावाला त्यांच्या हातातली शंभराची नोट पाहून म्हणाला. शंभरची नोट परत पर्समध्ये टाकताना, त्यांच्या कपाळावर विषादाची एक आठी उमटलीच. तरुण रिक्षावाल्याने आजी म्हणून संबोधावे, असे त्यांचे वय नव्हते. आजच त्या सत्तेचाळीस वर्षांच्या झाल्या होत्या. दर वाढदिवशी जोगेश्वरीला जाऊन ओटी भरायची आणि परत येताना किलोभर श्रीखंड घरी आणायचे. एवढेच वाढदिवसाचे साजरेपण. आजचा वाढदिवसही त्याच रस्त्यावरचा; पण त्याचे काही वाटण्याचेही दिवस संपले होते. आज नव्याने ऐकलेल्या ‘आजी’ या अकाली मिळालेल्या संबोधनाने मनावर ओरखडा निघाला एवढंच!

australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

आशाताई लिफ्टमध्ये शिरल्या. पाठोपाठ समोरच्या फ्लॅटमधील विभाही लिफ्टमध्ये आली. केसांचा सुंदर कट, माफक मेकअप आणि पलाझो – टॉप घातलेली विभा, खरं तर त्यांच्यापेक्षा मोठीच होती; पण ती सर्वासाठी

‘ए – विभा’ होती आणि काठपदरी सुती साडी, एक वेणी, कपाळावर लाल टिकली, हातात सोन्याच्या बांगडय़ांसोबत काचेच्या बांगडय़ा घातलेली ‘ती’ मात्र सोसायटीत राहायला आल्यापासून आशाताई म्हणून प्रौढत्व नांदवत होती आणि आता तर ‘आजी’..

‘‘आशाताई, आज सकाळीच कुठे? देवीला जाऊन आलेल्या दिसताय.. सहज?’’ कपाळावरचे हळदीकुंकू आणि कुंकवाचा टिळा असलेला नारळ पाहून विभा म्हणाली, ‘‘जोगेश्वरीला गेले होते वाढदिवस म्हणून.’’

‘‘ओऽ माय माय.. हॅपी रिटर्नस् ऑफ द डे! व्हॉट्स द प्लान टूडे?’’

प्लॅन केलेले वाढदिवस तर तिच्यासाठी बालपणीही नव्हते. आता जशी जोगेश्वरीला जाऊन आली, तशी जरीचे परकर-पोलके घालून आजीसह कोल्हापूरच्या अंबाबाईला जायची आणि ‘गोडाचे खाणे’ म्हणून पेढे घेऊन यायची. अपवाद फक्त बी.ए.च्या वर्षांतला वाढदिवसाचा.. ती मैत्रिणींच्या आग्रहावरून त्यांना ‘ट्रीट’ म्हणून सोलंकी आइस्क्रीम खायला घेऊन गेली तो वाढदिवस. सहामाही परीक्षा संपल्याबरोबरच तिचे लग्न ठरले होते. त्यामुळे आजीने या पार्टीबद्दल नाराजी दाखवली नाही, इतकेच! मैत्रिणी चिडवत होत्या. ‘तिकडून’ आलेल्या गिफ्ट्सबद्दल विचारत होत्या. स्पेशल ग्रीटिंग दाखवायचा आग्रह करीत होत्या, पण सांगायला काही नव्हते की दाखवायला.. तरुण ‘आशा’ हिरमुसली होती. कोल्हापूरच्या देशपांडे वाडय़ातलं बंदिस्त, सनातन, काळाच्या मागचं जगणं, पुण्यातल्या हळब्यांकडे वाटय़ाला येणार नाही ना, तिचं मन भयग्रस्त होई.

आशाचे घर सनातनी. परंपरेचा जबरदस्त पगडा. त्यात आजीचे करारी आणि अधिकारदर्शक, घराचे मालकीपण मिरवणारे व्यक्तिमत्त्व आणि त्या ओझ्याखाली दडपलेले आईवडील. त्यातही आशा-उषा-निशा, या त्रिकन्यांच्या अस्तित्वाने आणखीनच मान झुकलेली आई आजीच्या शब्दांबाहेर नसे. अशा घरात, आशा आजीच्या म्हणण्याबाहेर जायचे नाही, या लक्ष्मणरेषेत बंदिवान झाली. इंग्रजी शाळेत जायची इच्छा मुडपून, मुलींच्या शाळेत गेली. गाण्याचा देवल क्लबमध्ये भरणारा क्लास खुणावत असूनही, आपला गोड आवाज मैत्रिणींच्या घोळक्यापुरताच मर्यादित ठेवू लागली. ‘मुली वाया जातात’ या काल्पनिक धाकापायी खेळ, नाटक, स्पर्धा यांपासून दूर सरून, फक्त ‘प्रश्नोत्तरात’ मन रमवू लागली. पाळी सुरू झालेल्या दिवसांत, ‘उफाडय़ाची’ या विशेषणात गुंडाळली जाऊन, युनिफॉर्मच्या साडय़ा नेसू लागली. केस कापलेल्या, स्कर्ट-ब्लाऊज घालणाऱ्या मुलींकडे पाहून, मनाशी कढ दाटून यायचे. तिचं उमलणारं तरुणपण प्रौढत्वाच्या वस्त्रात अकाली गुंडाळलं गेलं. आधुनिक, अल्लड आणि काळाभिमुख राहणी सभोवताली दिसत असूनही, ती मात्र कमलपत्रासारखी अलिप्त राहिली. निराशेचे कढ, दिवस पालटण्याची वाट पाहात राहिले. पण, दिवस पालटलेच नाहीत. हळब्यांच्या घराने आणि अ‍ॅड. वसंत हळब्यांनी, तिची पसंतीच मुळी ‘रीतभात असलेली, जुन्या वळणाची’ या मुद्दय़ावर केली होती. त्यामुळे पुढचे जगणे ‘मागील पानावरून पुढे चालू’ असेच.. हनिमूनच्या दिवसांतही वसंतरावांनी ना तिच्यासाठी काही नवेसे आणले ना दिले, की तिच्याकडून आधुनिक दिसण्याची अपेक्षा व्यक्त केली नाही. त्यामुळे काठापदराच्या साडय़ा- बांगडय़ा तिच्या देहावरून कधी उतरल्याच नाहीत. फरक एवढाच, कोल्हापूरच्या घरी ‘हायकमांड’ आजी होती. हळब्यांच्या घरी वकील असणारे सासरे ‘हायचेअर’वरती होते. तिला आधुनिक राहणीची हौस होती, हिंडा-फिरायची आसक्ती होती, माफक चैनीची आसही होती; पण तिच्या बंगलीच्या पारंपरिक खिडकीतून अशी सुखद झुळूक तिच्या वाटय़ाला आलीच नाही. ‘तक्रार करण्याजोगे काही नाही’ या वाक्यापलीकडेही तरुणपणी काही हवेसे असते, हे वाटणेही सरकत्या वर्षांगणिक कमी होत चालले आणि आशाचे जग अक्षरांच्या जगात रमायला लागले. मनातले संचित कागदावर उमटायला लागले. तिच्याही नकळत..

लिफ्टमधून आशाताई बाहेर आल्या. ‘लॅच की’ लावून घरात आल्या. त्यांची बंगली पाडून आता तिथे ‘संकल्प सोसायटी’ उभी होती. नवीन राहणीचे शेजारी, आधुनिकतेचा ‘वावर’ आसपास विहरू लागला होता.. पण आता जुनी राहणी वज्रलेपासारखी स्थिरावलेली होती. आता सासरे हयात नव्हते, परंपरा सैलावल्या होत्या, पण मनाची उभारी सोबतीला नव्हती. आजच्या रिक्षावाल्याच्या ‘आजी’ या संबोधनाने भूतकाळाची रिळं उलगडली होती, इतकेच..!

आशाताई घरात आल्या.. आतल्या बेडरूममधून गाण्याचा आवाज येत होता.. ‘शिल्पा कॉलेजमधून लवकर आली बहुतेक..’ त्यांना जाणवून गेलं. वर्षभरापूर्वी सौरभची, त्यांच्या एकुलत्या एक मुलाची बायको शिल्पा हळब्यांच्या घरी आली आणि घराला एक तरुण सुगंध आला. शिल्फा ‘सेंट मीराज’ कॉलेजमध्ये सायकॉलॉजीची लेक्चरर होती. सौरभ-शिल्पाच्या तरुण, हौशी, मॉर्डन जगण्याकडे त्या आनंदी कुतूहलाने पाहात असायच्या. शिल्पाच्या तोंडून नव्या जगाचे अज्ञात पैलू त्यांना समजायचे. आयपॅड आणि स्मार्टफोनची ओळख शिल्पामुळेच आणि त्यातून दृश्यमान होणारे नवे जग उलगडले तेही तिच्यामुळेच..

‘‘हॅलो आई.. मेनी हॅपी रिटर्नस् ऑफ द डे.. आज मुद्दाम लवकर घरी आले.’’ तिने कॅम्पमधून आणलेले सॅन्डविचेस प्लेटमध्ये आणून ठेवले. ‘‘सुरू करा. मी आपल्या दोघींसाठी चहा करून आणते. बोलू या मग.. आपण दोघीच घरी असू, ही वेळ साधून आले मी मुद्दाम.’’ शिल्पा प्रेमानं म्हणाली तशा आशाताई सुखावून गेल्या.

शिल्पा चहा घेऊन आली. त्यांचा हात हातात घेत म्हणाली. ‘‘आई, तुमच्याबद्दल मला आदर आहे आणि प्रेमही.. तुमचे वाचन आणि लेखन माहीत आहे मला. मी खूप काही मराठी वाचणारी नाही; पण मी तुमची ‘व्यथा’ ही कथा तुमच्याही नकळत वाचली होती, हस्तलिखित म्हणून. मन लावून कथा वाचता वाचता, आतून काही तरी प्रेरणा होत होती. म्हणून परत परत वाचली आणि उलगडा झाला, ‘व्यथा’ कथेची नायिका म्हणजे आशा हळबेंचं मन आहे. पुष्पाच्या व्यथेच्या मागे आशाचा चेहरा आहे. तुमच्या या कथेला पुरस्कार मिळाल्याचेही आसुसून सांगितले नाहीत तुम्ही. कथेतल्या पुष्पासारखी तुम्हालाही नावीन्याची इच्छा होती; पण ‘होते मनोहर तरी – गमते उदास’ अशी स्थिती तुमच्या वाटय़ाला आली. त्यातून निशा मावशींसारखा बेधडक स्वभावही तुमचा नाही. बाबांनाही कधी तुम्ही मन उलगडून काही सांगितले नाहीत. संवाद नसलेल्या संसारात तुम्ही कोमेजलेल्याच राहिलात ना?’’

मानसशास्त्र शिकलेल्या – शिकवणाऱ्या शिल्पाचे हे ‘अचूक निदान’ ऐकून आशाताई स्तब्ध झाल्या. हातातला चहाचा कप हातातच राहिला. शिल्पाचा चहा पिऊन झाला. ती तिच्या रूममध्ये जाऊन एक प्रेझेंट पॅक घेऊन आली. ‘‘आई, धिस इज फॉर यू!’’ तिने एक पिस्ता रंगाचा, प्युअर कॉटनचा थ्री पीस पंजाबी सूट बाहेर काढला आणि एक सुंदर रिस्टवॉच.. तिने आशाताईंच्या डाव्या हातातल्या बांगडय़ा काढून रिस्टवॉच हातात बांधले. ‘‘आवडले?’’

‘‘हो.. पण..’’

‘‘आता मला बोलू दे.. आपण नेहमी म्हणतो इट इज नेव्हर टू लेट. आई, तुम्ही अद्याप तरुण तर आहात. हा ड्रेस आजच्या वाढदिवशी घालून नवीन राहणीचा उंबरठा ओलांडा.. सुरुवातीला अवघड वाटेलच.. पण सरावाने सोपेही वाटेल. एक नक्की, मी तुमचा मेकओव्हर करू पाहातेय, तुम्हाला काही तरी धाडस करायला शिकवते आहे, असं मीही मानत नाही.. तुम्हीही मानू नका.. पण अकाली आणि अनिच्छेने पांघरलेली प्रौढत्वाची झूल आस्ते आस्ते उतरवून, तुमच्या मनाप्रमाणे जगा. त्याच विचारांचे प्रतीक म्हणून हा पंजाबी ड्रेस दिला आहे, असं समजा हवं तर.. अर्थात, जबरदस्ती नाही.’’

आशाताई पुढे झाल्या. जणू काही एखादा नजराणा हाती घ्यावा, त्या तोलाने ड्रेसची बॅग हाती घेतली. आधुनिक कोऱ्या कपडय़ाचा सुगंध नाकात भरून घेतला. मनभर समाधानाची लहर पसरत गेली. तो ड्रेस मिळाल्याचा फक्त बालिश आनंद नव्हता, तर कुणी तरी, एका स्त्रीनेच, त्यांचे मन न सांगता जाणून घेतले आणि तिच्या परीने आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला, या भावनेचा आनंद होता आणि त्यांच्या आणि शिल्पाच्या सहृदय नात्याची ग्वाहीही!

‘‘आई, ड्रेस घालून तयार व्हा.. बाबांना आणि सौरभला सरप्राइज द्यायचंय.. ‘पिझ्झा कॉर्नर’ला जायचं आहे.. आवडेल तुम्हाला.. पिझ्झाची पॅम्प्लेट्स मनापासून वाचताना, तुमच्या डोळ्यांतले कुतूहल कळले आहे मला..’’

‘‘इतक्या मनकवडय़ा सुनेची मागणी कोण डावलेल गं शिल्पा?’’ म्हणत आशाताई ड्रेस घालायला आतल्या खोलीत गेल्या आणि शिल्पा सुखावली..

drsuvarnadivekar@gmailcom

chaturang@expressindia.com